नेकनूर पोलिसांची धडक कारवाई समोर आली असून..
बीड — नेकनूर पोलिसांनी पोलीस ठाणे हद्दीत तीन मोठ्या कारवाया केल्यामुळे खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार आणि अवैध दारू व्यवसायासह गुटखा वाहतुकी विरुद्ध केलेल्या कारवायामध्ये मोठ यश मिळाला आहे. ट्रक मध्ये सुरू असलेल्या जुगार विरुद्ध कारवाई करतांना तब्बल 15 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईत हिंगणी खुर्द येथील हॉटेलवर कारवाई करत अवैध दारू साठा जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये देखील एक लाख हून अधिक रुपयाचा माल पोलिसांच्या हाती लागला. कारवाई एवढ्यावरच न थांबवता पुन्हा मोरगाव फाटा येथून अवैध पद्धतीने गुटखा वाहतूक करणाऱ्या कार वर धाड मारली. या कारवाईमध्ये स्विफ्ट कार सह गुटखा मिळून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती सापडला. नवरात्राचा जागर सुरू असतानाच नेकनूर पोलिसांनी कारवायांचा धडाका लावत अवैध धंद्यांचं कंबरड मोडण्याचं काम हाती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होणं हे नेकनुर पोलिसांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडल्याचं सांगितलं जात आहे.
मोरगांव फाटा येथे आयशर ट्रकमध्ये सुरू असलेल्या जुगारावर छापा, तर चौसाळा बिटमध्ये अवैध दारूविक्री व वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवायांत वाहन, रोख रक्कम आणि दारूसह एकूण १५ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोरगाव फाट्यावर ट्रकमधील जुगारावर छापा
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोरगाव फाटा परिसरात आयशर ट्रकमध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईत आयशर वाहन आणि रोख रकमेसह १४ लाख ८४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गेवराई येथील मिर्झा बाबरली यावरली (४४) आणि अली हसन शहाजन मिर्झा (२१) यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौसाळा बिटमध्ये अवैध दारूविरोधात कारवाई
दुसऱ्या कारवाईत चौसाळा बिटमधील हिंगणी खुर्द येथील निसर्ग हॉटेल परिसरात आणि रस्त्यावरून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत वाहन आणि अवैध दारूसह एकूण १ लाख ७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी श्रीकृष्ण शहादेव मुंडे (२८) आणि यादगिरी लिंगम मिरगुवार (४४) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

नेकनूर पोलिसांची तिसरी मोठी कारवाई, 10 लाखांचा गुटखा जप्त
दरम्यान, आज दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी नेकनूर पोलिसांनी पुन्हा एक मोठी नेकनूर पोलीस कारवाई केली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील मोरगाव फाटा परिसरात स्विफ्ट कार क्रमांक MH-01-BD-9409 मधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी पाठलाग करून कार पकडली असता त्यात 4,60,056 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 5,40,000 रुपयांची कार असा एकूण 10, लाख 56 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लिंबागणेश येथील निलेश नारायण शिंदे वय 34 याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यान्वये कारवाई सुरू आहे. या नेकनूर पोलीस कारवाई मुळे 24 तासात एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उपनिरीक्षक सचिन धायगुडे, विठ्ठल सांगळे, सुशील कारंडे आणि होमगार्ड जवान सहभागी झाले होते.
पोलिसांचे आवाहन
या कारवाईनंतर नेकनूर परिसरात समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी येत होत्या. यापुढेही अशी मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी अवैध धंद्यांची माहिती निर्भयपणे द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन नेकनूर पोलिसांनी केले आहे.
नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली होती. विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर आणि हॉटेल परिसरात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू होती. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. अनेक पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणे प्रभारींना अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नेकनूर पोलिसांनी ही विशेष मोहीम हाती घेतली.
या कारवाईमुळे नेकनूर, मोरगाव, चौसाळा, हिंगणी खुर्द परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर देखील या नेकनूर पोलीस कारवाई चे कौतुक होत आहे. नागरिक म्हणत आहेत की अशाच प्रकारची कारवाई दर आठवड्याला झाली पाहिजे. तरुणांनी देखील या कारवाईचे स्वागत केले आहे. अवैध जुगार आणि दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. पोलीस पुढेही अशीच कारवाई करत राहतील असा विश्वास नागरिकांना आहे.

