बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाची बुलढाण्यात कारवाई; पिंपळनेर गुन्ह्याचा तपास
बीड — पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरणातील पीडित मुलींचा शोध घेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTU) बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून त्यांची सुटका केली. याप्रकरणातील आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७६/२०२५, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल असलेला गुन्हा पुढील तपासासाठी AHTUकडे वर्ग करण्यात आला होता. प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी मूळ कागदपत्रांचे अवलोकन करून फिर्यादी व साक्षीदारांकडून माहिती घेतली.
त्यानंतर AHTUच्या पथकाने बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी पीडित व आरोपीचा शोध घेतला. संशयित व्यक्तींची चौकशी करूनही ठोस माहिती मिळत नसल्याने गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
गोपनीय बातमीदारामार्फत पीडित व आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खात्री करून २ ऑक्टोबर २०२६ रोजी AHTUचे पथक चिखलीकडे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी कारवाई करत पीडित व आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
दोघांना चिखली पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर AHTUचे पथक त्यांना घेऊन बीडकडे रवाना झाले. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यात पीडित व आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी हजर करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, सहायक पोलीस उप निरीक्षक उषा चौरे, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे तसेच पोलीस शिपाई भाऊसाहेब कारले यांच्या पथकाने केली.


