कष्टाने उभारले तीन मजली घर, भूखंड बळकावले;७९ वर्षीय माजी मूख्याध्यापक वडिलांना सौदीतील मूलाने रस्त्यावर आणले

बीड — वडिलांनी आयुष्यभर स्वकष्टातून उभारलेले तीन मजली घर आणि कोट्यवधी रुपयांचे भूखंड बोगस कागदपत्रांच्या आधारे बळकावून ७९ वर्षीय वडिलांना त्यांच्या वार्धक्यात राहत्या घरातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. सौदी अरेबियात नोकरी करणाऱ्या मुलानेच हा प्रकार केल्याचे फिर्यादीत नमूद असून, या प्रकरणी त्याच्यासह नगर परिषद, बीडच्या कर्मचाऱ्यासह एकूण १२ जणांविरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मसरत नगर, जिजामाता चौक, बीड येथील रहिवासी शेख निजाम अमीर हे ७९ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा मोठा मुलगा निसार हा केमिकल इंजिनिअर असून सध्या सौदी अरेबियात नोकरी करतो. तो वर्षातून साधारण महिनाभर बीडला येत असे. याच काळात तेलगाव नाका आणि जुना धानोरा रोड परिसरातील वडिलांच्या तसेच लहान मुलगा इम्रानच्या नावे असलेल्या जमिनी ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

शंभर रुपयांच्या बाँडवर हिबानामा

ऑगस्ट २०२४ मध्ये निसारने शंभर रुपयांच्या बाँडवर वडिलांकडून ‘हिबानामा’ म्हणजेच बक्षीसपत्र करून घेतले. मात्र, मालमत्तेचा ताबा मिळाला नाही. त्यामुळे हा हिबानामा नंतर रीतसर रद्द करण्यात आला.
हिबानामा रद्द झाल्यानंतर मालमत्तेवरून वाद अधिक तीव्र झाला. त्यानंतर घर आणि मालमत्तेच्या नोंदी आपल्या बाजूने करण्यासाठी नगर परिषद, बीडमधील कर्मचारी प्रदीप वडमारे याच्या माध्यमातून पीटीआरच्या बनावट नोंदी तयार करण्यात आल्या.

नगर परिषदेत नोंद नसलेले पीटीआर तयार

घर क्रमांक ३-१८-५३७२, ३-१८-५१८४ आणि ३-१८-६७९७ यांचे पीटीआर तयार करण्यात आले. मात्र, या पीटीआरची नगर परिषदेत कोणतीही नोंद नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या कागदपत्रांचा वापर करून जुन्या भाडेकरूंना कमी भाड्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर बनावट भाडेकरारपत्रे तयार करण्यात आली. या कागदपत्रांच्या आधारे न्यायालयीन प्रकरणांमध्येही माहिती दाखवून मालमत्तेबाबत हक्क निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

स्वतःच्या घरातूनच ७९ वर्षीय वडिलांना बाहेर काढले

मालमत्तेच्या वादातून निसारने आई-वडील आणि लहान भाऊ इम्रान यांच्याशी वाद घातला. त्यानंतर ७९ वर्षीय शेख निजाम अमीर यांना त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरातून बाहेर पडावे लागले.
आयुष्यभर कष्ट करून उभारलेले घर असूनही वृद्धापकाळात त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. सध्या शेख निजाम अमीर आणि त्यांची पत्नी गेवराई येथे भाड्याच्या घरात राहत आहेत.

बनावट संमतीपत्राने वीज मीटरही नावावर

मालमत्तेपुरतेच हे प्रकरण थांबले नाही. वडिलांच्या नावावर असलेले वीज मीटरही बनावट संमतीपत्र तयार करून स्वतःच्या नावावर करून घेण्यात आले. या संमतीपत्रावर वडिलांच्या खोट्या सह्या करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, मालमत्तेवरील हक्कासाठी न्यायालयात दिवाणी दावेही दाखल करण्यात आले. त्यामुळे एकीकडे घर आणि भूखंडांच्या मालकीचा वाद सुरू असताना दुसरीकडे मालमत्तेच्या नोंदी, भाडेकरार आणि वीज मीटरच्या कागदपत्रांमध्येही बदल करण्यात आल्याचे प्रकरणातून समोर आले आहे.

मुलासह नगर परिषद कर्मचाऱ्यासह १२ जणांवर गुन्हा

या संपूर्ण प्रकाराबाबत शेख निजाम अमीर यांनी बीड शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून सौदी अरेबियात राहणारा मुलगा निसार, नगर परिषद कर्मचारी प्रदीप वडमारे यांच्यासह एकूण १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट पीटीआर, भाडेकरारपत्रे, संमतीपत्र तसेच मालमत्तेशी संबंधित इतर कागदपत्रांबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles