अंबाजोगाई घरफोडीतील पाहिजे आरोपी जाळ्यात; 18 तोळे सोने, 743 ग्रॅम चांदी जप्त

अंबाजोगाई —  बंद घराचे कुलूप तोडून 53 तोळे सोन्यासह मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करणाऱ्या टोळीतील पाहिजे आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर ताब्यात घेतले. मंगलसिंग हिरासिंग बावरी (वय 22, रा. शिवाजी चौक, परळी) याला परळी रेल्वे पुलाजवळ सापळा रचून पकडण्यात आले. त्याच्याकडून 18 तोळे (187.430 ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि 743 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.

अंबाजोगाई शहरातील एका कुटुंबाने 20 सप्टेंबर रोजी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील 53 तोळे सोन्याचे दागिने, सुमारे पावणे दोन किलो चांदीचे दागिने आणि रोकड चोरीला गेली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 391/2026 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या पथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान अमर काकासाहेब थोरात (23, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) आणि जगजीतसिंग अचलसिंग दुधानी (32, रा. शिवाजी चौक, परळी) यांना 25 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 27 तोळे (270 ग्रॅम) सोने आणि 858 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.

मात्र, या प्रकरणातील मंगलसिंग बावरी हा पोलिसांच्या हाती लागला नव्हता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू ठेवला. तो बाहेर राज्यातून परळी येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परळी रेल्वे पुलाजवळ सापळा रचला. 3 ऑक्टोबर रोजी मंगलसिंग बावरी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईनंतर अंबाजोगाई घरफोडी प्रकरणात आतापर्यंत 45 तोळे सोन्याचे दागिने आणि 1,601 ग्रॅम चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरी गेलेल्या एकूण मुद्देमालाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर दागिने परत मिळवण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे तसेच पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles