पिंपरनईत शेतकऱ्याची आत्महत्या; दुष्काळ आणि मुलीच्या लग्नाच्या खर्चाचा ताण?

सकाळी आत्महत्येची माहिती देऊनही महसूल-पोलिस प्रशासन घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप

लिंबागणेश —  लिंबागणेश पंचक्रोशीतील पिंपरनई येथे शेतकरी विक्रम बाबासाहेब दाभाडे (वय ४४) यांनी शनिवारी सकाळी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विक्रम दाभाडे हे दररोज शेतातील कामे करून तसेच दूध घालून घरी परतत असत. शनिवारी ते नेहमीच्या वेळेत घरी न परतल्याने त्यांची मुलगी साक्षी दाभाडे (वय १८) त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेली. त्यावेळी विक्रम दाभाडे हे शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेली आर्थिक अडचण आणि मुलीच्या लग्नासाठी लागणारा खर्च यामुळे विक्रम दाभाडे आर्थिक विवंचनेत होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

विक्रम दाभाडे यांच्या पश्चात पत्नी अश्विनी विक्रम दाभाडे, मुले प्रशांत (वय २२) व सुशांत (वय २०), मुलगी साक्षी (वय १८) तसेच वडील बाबासाहेब देवराव दाभाडे आणि आई सुंदरबाई बाबासाहेब दाभाडे असा परिवार आहे.

आत्महत्येची माहिती देऊनही प्रशासनाची प्रतीक्षा

दाभाडे यांनी सकाळी सुमारे ८ वाजता आत्महत्या केल्याची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली. मात्र त्यानंतरही महसूल आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गांजाची लागवड कळताच प्रशासन धावते; शेतकरी आत्महत्येची माहिती देऊनही अधिकारी पोहोचत नाहीत

“एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड असल्याची माहिती मिळताच महसूल आणि पोलिस प्रशासनाची यंत्रणा धावपळ करते. मात्र एका शेतकऱ्याने सकाळी आत्महत्या केल्याची माहिती देऊनही प्रशासन घटनास्थळी पोहोचत नसेल, तर शेतकरी आत्महत्येचे गांभीर्य प्रशासनाला आहे तरी किती?” असा सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी उपस्थित केला.

शेतकरी आत्महत्येच्या घटनेनंतर महसूल व पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आवश्यक कार्यवाही करावी तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून द्यावी, अशी मागणीही डॉ. ढवळे यांनी केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles