Home राज्य दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना पत्र, 17 मागण्या मांडल्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना पत्र, 17 मागण्या मांडल्या

0
7
मुंबई — महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. राज्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत पवार यांनी पत्रातून तब्बल 17 मागण्या केल्या आहेत.
शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा देण्यासाठी या मागण्या केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शरद पवारांच्या 17 प्रमुख मागण्या
1. वंचित तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश
राज्यात दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होण्यापासून वंचित राहिलेल्या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त म्हणून समावेश करावा.
2. जमीन महसूल माफ करावा
दुष्काळग्रस्त भागातील संपूर्ण जमीन महसूल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
3. विविध प्रकारची शेतीविषयक कर्जे माफ करावीत
कर्जमाफीच्या तारखेनंतर शेतकरी व शेती व्यवसायासाठी घेतलेली विविध कर्जे, फळबागांसाठी घेतलेले कर्ज तसेच महिला बचत गटांची कर्जे संपूर्णपणे माफ करावीत.
4. कृषी पंपांची वीज बिले माफ करावीत
शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची सर्व वीज बिले माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
5. विद्यार्थ्यांची शैक्षणिक वसतिगृह-मेस फी माफ करावी
दुष्काळग्रस्त भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी तसेच वसतिगृह आणि मेस फी माफ करावी.
6. रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करावीत
रोजगार हमी योजनेचे सध्याचे निकष शिथिल करून मागणी करणाऱ्या नागरिकांना तीन किलोमीटरच्या परिसरात तातडीने रोजगाराची कामे उपलब्ध करून द्यावीत.
7. तहसीलदारांना टँकर मंजुरीचे अधिकार द्यावेत
पिण्याच्या पाण्यासाठी तसेच जनावरांसाठी टँकर मंजूर करण्याचे अधिकार तहसीलदारांना देऊन तातडीने कार्यवाही करावी.
8. वीजपुरवठा खंडित करू नये
टंचाईग्रस्त गावांतील कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करू नये. दुष्काळग्रस्त भागात लोडशेडिंगही करू नये.
9. कुटुंबांना 25 किलो धान्य मोफत द्यावे
शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना प्रतिकुटुंब 25 किलो धान्य सरसकट मोफत देण्याची मागणी आहे.
10. पशुधनासाठी थेट आर्थिक मदत
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या पशुधनासाठी अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावे.
11. जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करावीत
जलसंधारणाच्या कामांसाठी निकष शिथिल करून विशेष निधी उपलब्ध करावा आणि ही कामे तातडीने सुरू करावीत.
12. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदत
दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपये अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे.
13. फळबाग, केळी, ऊस आणि भात उत्पादकांना मदत
दुष्काळामुळे फळबागा, केळी, ऊस आणि भात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
14. फळबागांसाठी टँकरने पाणीपुरवठा
मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत.
15. प्रलंबित अनुदान व देयके वितरित करावीत
शेतकरी आणि शेतमजुरांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांतील प्रलंबित देयके आणि अनुदान तातडीने वितरित करावे.
16. दुष्काळ निवारणाचा निधी तातडीने उपलब्ध करावा
दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने वर्ग करावा.
17. विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे
दुष्काळाच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. अधिवेशनातील निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करून नुकसानग्रस्त शेतकरी व शेतमजुरांना दसरा आणि दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची मागणीही पवार यांनी केली आहे.
शरद पवार यांनी या सर्व मागण्यांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण नागरिकांना तातडीने दिलासा मिळावा, हा या पत्रामागील मुख्य उद्देश असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here