अकोला — राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलेले असतानाच दुष्काळी तालुक्यांची एक यादी काही माध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित झाली. मात्र, शासनाने अद्याप दुष्काळी तालुक्यांची कोणतीही अधिकृत यादी जाहीर केलेली नाही, अशी स्पष्ट माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. या खोट्या यादीमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने ती तयार करून प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात रविवारी (२० सप्टेंबर) अमरावती विभागातील पिकांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी कृषिमंत्री भरणे यांनी दुष्काळी तालुक्यांच्या व्हायरल यादीबाबत भूमिका स्पष्ट केली.
गेल्या आठवड्यात बुलढाणा तसेच राज्यातील काही जिल्ह्यांतील तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश झाल्याचे सांगणारी माहिती प्रसारित झाली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. लोकप्रतिनिधींनाही याबाबत स्पष्टीकरण देताना मनस्ताप सहन करावा लागला.
या पार्श्वभूमीवर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कृषिमंत्री भरणे यांच्याकडे केली. त्यानंतर भरणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
‘शासनाने अधिकृतपणे कोणतीही दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर केलेली नसताना अशी यादी प्रसारित करणाऱ्यांची चौकशी करावी आणि पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी,’ असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित यादी अधिकृत नसल्याचे स्पष्ट करावे, अशा सूचनाही कृषिमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवर फिरणाऱ्या अप्रमाणित यादीवर विश्वास न ठेवता शासनाकडून जाहीर होणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुष्काळी यादी कधी जाहीर होणार?
दरम्यान, राज्यातील पावसाची स्थिती आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शासनाकडून माहिती संकलित केली जात आहे. ३० सप्टेंबरपर्यंत संबंधित माहिती संकलित करून शेतकऱ्यांच्या हिताचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे.

