भारत पांढरेंची कारवाई; नेकनूर पोलिसांना आता जाग येणार का ?

बीड —  प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या साठ्यावर परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने मांजरसुंबा परिसरात धडक कारवाई करत ₹5 लाख 18 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ₹2 लाख 68 हजार 628 रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि सुमारे ₹2 लाख 50 हजारांची स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी भाऊसाहेब राम पडुळे (रा. औरंगपूर, ता. जि. बीड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 9 सप्टेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारत पांढरे यांच्या पथकाने मांजरसुंबा परिसरात संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली. वाहनामध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ आढळून आल्यानंतर पंचांसमक्ष जप्ती करण्यात आली. प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274 आणि 275 अन्वये नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारत पांढरे यांच्या पथकाला माहिती मिळते; स्थानिक पोलिसांना का नाही?

या कारवाईनंतर नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या कार्यक्षेत्रात गुटखा, अवैध दारू आणि इतर अवैध धंद्यांविरोधात स्थानिक पातळीवर अपेक्षित धडक कारवाया का केल्या जात नाहीत, हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करणे निश्चितच आवश्यक आहे. मात्र जनजागृतीसोबत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अवैध धंद्यांवर नियमित कारवाई हीदेखील ठाणे प्रमुखांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन करून पोलिसांची जबाबदारी संपत नाही.

ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांची जबाबदारी निश्चित होणार का?

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईचा विषय निघाला की आता एक प्रश्न थेट पुढे येतो—ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यांविरोधात प्रत्यक्ष किती कारवाया झाल्या?

कारण एकीकडे भारत पांढरे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळते, ते त्याच हद्दीत पोहोचतात आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करतात; तर दुसरीकडे स्थानिक पोलिसांच्या कारवायांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वी मांजरसुंबा परिसरातील जुगार अड्ड्यावर कारवाई, कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाची सुटका आणि आता गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्याची कारवाई झाली. या सर्व घटनांमुळे स्थानिक पोलीस ठाणे नेमके कोणत्या पातळीवर काम करत आहे? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

आता जनजागृतीसोबत ‘ॲक्शन’ दिसणार का ?

ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांनी आपल्या हद्दीत अवैध दारू, गुटखा, जुगार आणि इतर अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाईचा धडाका सुरू करणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केल्यानंतरच अवैध धंदे उघडकीस येत असतील, तर स्थानिक पोलिसांची गुप्त माहिती यंत्रणा आणि पेट्रोलिंग नेमके किती प्रभावी आहे, याचेही परीक्षण होणे आवश्यक आहे.

नागरिकांनी जागरूक राहावे, अशी जनजागृती सुरूच ठेवावी; परंतु त्याचवेळी अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा धाकही दिसला पाहिजे. ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखाली आता नेकनूर पोलीस खरोखरच ‘ॲक्शन मोड’मध्ये येतात का ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

अवैध धंद्यांना आळा घालणे ही केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्हे, तर संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुखाची थेट जबाबदारी आहे. त्यामुळे नेकनूर हद्दीत पुढील काळात होणाऱ्या कारवायांवरून ठाणे प्रमुख मंगेश साळवे यांच्या कार्यपद्धतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या पथकाने केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles