आष्टी — बळीराजासाठी आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण सुरू असतानाच आष्टी तालुक्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चिखली येथील शेतकऱ्याचा गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टी करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून जागीच मृत्यू झाला.
शहाजी लक्ष्मण आवारे (वय ४४, रा. चिखली, ता. आष्टी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहाजी आवारे हे आपल्या गोठ्यात जनावरांसाठी कडबा कुट्टीचे काम करीत होते. यावेळी अचानक त्यांना विजेचा जोरदार करंट लागला. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोळ्याच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने आवारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने चिखली गावावरही शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी योगायोग
ज्या दिवशी शेतकरी आपल्या सर्जा-राजाची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो, त्याच दिवशी एका शेतकऱ्याचा अशा पद्धतीने दुर्दैवी अंत झाल्याने या घटनेने परिसरातील नागरिकांनाही धक्का बसला आहे.

