बीड — मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे असतानाच बीडमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या प्रस्तावित उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये काढलेल्या विराट मोर्चादरम्यान केलेल्या वक्तव्यांवरून त्यांच्याविरोधात पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चानंतर झालेल्या सभेत तसेच शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावेळी त्यांनी केलेल्या काही वक्तव्यांवर जरांगे समर्थकांकडून आक्षेप घेण्यात आला.
जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरून धमकीवजा इशारा दिल्याचा आरोप करत समर्थक गंगाधर काळकुटे यांनी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सदावर्ते यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाची भूमिका घेत असताना दुसरीकडे ओबीसी समाजाकडूनही प्रतिआंदोलनाची तयारी सुरू आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली असतानाच सदावर्ते यांच्याविरोधातील या कारवाईने बीडमधील वातावरण आणखी चर्चेत आले आहे.
दरम्यान, सदावर्ते यांच्या भाषणातील नेमकी वक्तव्ये, त्यांचा संदर्भ आणि तक्रारीतील आरोप याबाबत शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया स्पष्ट होणार आहे.

