बीड — परळी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून स्थानिक गुन्हे शाखेने कापसाच्या शेतात लावलेला गांजा जप्त केला आहे. या धाडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करून एकावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवराज आंधळे यांची हेळंबमध्ये गट क्रमांक 746 मध्ये शेती असून त्यांनी आपल्या शेतात कापसासोबत गांज्याची देखील लागवड केली होती.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांना पेट्रोलिंग करत असताना याबाबत माहिती मिळाल्यावरून त्यांनी शेतात जात पाहणी केली. यावेळी शेतात कापसासोबतच गांज्याची देखील लागवड झाल्याचा प्रकार समोर आला.पोलिसांनी छापा मारून 25.950 ग्रॅम गांजा जप्त केला.या कारवाईत 1 लाख 29 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.परळीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,परळी ग्रामीणचे प्रभारी सय्यद,पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने,अंकुश निमोणे,रियाज शेख, केकाण, जोगदंड, भताने, आंधळे, घोडके, मराडे यांच्यावतीने करण्यात आली.

