Home क्राईम ‘सतरा लुगडे’ तरी जेल प्रशासनाचे ‘कुल्ले’ उघडे; पुन्हा तिसरी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

‘सतरा लुगडे’ तरी जेल प्रशासनाचे ‘कुल्ले’ उघडे; पुन्हा तिसरी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

0
18

बीड‌ — समाज माध्यमांमधून गेल्या तीन दिवसापासून व्हायरल होत असलेल्या वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप मुळे जिल्हा कारागृहाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑडिओ क्लिप असेल किंवा कैद्याने प्रशासनाला दिलेला अर्ज व्हायरल होणं याचाच अर्थ कारागृह अधीक्षकांनी मोठ्या गुन्हेगारासाठी जेलमध्ये “राम“राज्य आणून अल्हाददायक “चांदणे“तेथे निर्माण केले मात्र 17 लुगडे असले तरी सगळेच कुल्ले उघडे असल्याचं जनतेला पाहायला मिळत आहेत. व्हायरल झालेल्या नव्या ऑडिओ मुळे पुन्हा मोठे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
गेल्या तीन दिवसापासून जेलमध्ये दहशतीचं वातावरण किती आहे याची इत्यंभूत माहिती व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिप मुळे मिळू लागली आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये कैदेत असणाऱ्या गुंडांना कशा व्हीआयपी सुविधा मिळत आहेत याचा उलगडा देखील होऊ लागला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कारागृह अधीक्षकांची अवस्था “बकरीची शेपटी ना माशी हाके ना ढुंगण झाके“अशी बनली आहे की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

सलग दोन दिवस अझहर पठाण नावाच्या कैद्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती. पहिल्या रेकॉर्डिंगमध्ये त्याने वाल्मिक कराड गँगकडून अमानुष मारहाण झाली अस सांगितलं होतं. तर दुसऱ्या रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराडला बदनाम करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, म्हणून मी तसं बोललो असं अजहर पठाण ने सांगितलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर जेलची सुरक्षा व्यवस्था कडक असताना देखील जेल प्रशासनाला दिलेला अर्ज देखील बाहेर पडला. हे कमी होतं की काय म्हणून पुन्हा एकदा जेल प्रशासनाचे कुल्ले उघडे करणारी व प्रशासन व्यवस्था शेळीच्या शेपटासारखी कशी शोभेची बनली आहे.

हे दाखवणारी तिसरी ऑडिओ रेकॉर्डिंग सनी आठवलेची व्हायरल झाली आहे. सनी आठवले देखील बीड कारागृहातच कैदी आहे. या वायरल ऑडिओ क्लिप मध्ये
सनीने कराडचा जेलमध्ये दबदबा आहे, तो अझहर पठाणवर दबाव आणत आहे, पठाणला खरंच मारहाण झाली आहे.त्याचा खुबा उपसला होता, असं आठवले सांगतो आहे. यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील त्याने केली आहे.
कॉल रेकॉर्डिंगमध्ये सनी आठवले म्हणत आहे की, अझहर पठाणला मारहाण झाली होती, त्याचे सगळे स्टेटमेंट बदलले आहेत. बंदी झालेली असताना रात्री साडेआठ वाजता वाल्मिक कराड याला बाहेर काढून त्याचा जबाब घेतला आहे. त्यानंतर त्याला रात्री 9 वाजता बराक क्रमांक तीनमध्ये आणून टाकले गेले.
जेलमधील सगळे अधिकारी अझहर पठाणवर दबाव आणत आहेत,

दहा हजार रुपयांची कॅन्टीन देतो, बाहेर तुला पैसे देतो, असं अमिष वाल्मिक कराडने दिलं आहे. जर त्याने ती चिठ्ठी लिहिली तर ती बाहेर कोणी आणली याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. कराडने आणि त्याच्या गँगने खोटे गुन्हे दाखल केले आणि असेच लोकं मारलेले आहेत. ते आता माझ्या जेल बदलीच्या मागे लागलेले आहेत.

जेलची तपासणी करा

बाहेरच्या पथकाने जेलमध्ये येऊन झाडाझडती घ्यायला पाहिजे. त्याच्याकडे किती आणि कोणाच्या नावावर सिम कार्ड आहेत, ते मला माहित आहे. त्याला कोण कॅन्टीन देतो, कोण पैसे देतो आणि कोण पैसे घेतं हे सगळं मला माहित आहे. सगळं जेल प्रशासन वाल्मिक कराडच्या जीवावर चालतंय असा गंभीर आरोप आठवलेने ऑडिओ क्लिप मधून केला आहे.

वाल्मिक कराडला व्हीआयपी सुविधा

”कराडला जेलमध्ये सगळी व्हीआयपी सुविधा मिळत आहेत. त्याला नवी डिश सह सेट टॉप बॉक्स नवा आणून देण्यात आला आहे. या प्रकरणात अंजलीताई दमानिया आणि सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याची चौकशी लावावी.” अशी मागणी देखील सनी आठवलेने ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here