गेवराई — गेवराई तालुक्यातील राजपिंप्री शिवारात कापूस आणि तुरीच्या पिकामध्ये गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गेवराई पोलिसांनी कारवाई करत 130 गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त केलेल्या झाडांचे एकूण वजन सुमारे 10 किलो असून त्यांची अंदाजे किंमत 2 लाख 20 हजार रुपये आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई पोलीस ठाण्यातील पथकाने 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राजपिंप्री शिवारातील शेत गट क्रमांक 31 मध्ये कारवाई केली.
या शेतात कापूस आणि तुरीच्या सरीमध्ये फुले व बिया असलेली गांजाची छोटी-मोठी झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून एकूण 130 झाडे जप्त केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन सुमारे 10 किलो असल्याचे समोर आले.
या प्रकरणी शेतमालक भाऊसाहेब काशिनाथ केदार (वय 75) यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत, अपर पोलीस अधीक्षक समीर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत, पोलीस निरीक्षक किशोर, सहायक पोलीस निरीक्षक समाधान, पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.




