परळी — सरकारी नोकरीचे आमिष दाखवत तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, परळी तालुक्यातील एका तरुणाची तब्बल ८ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत जालना जिल्ह्यातील दोघांनी ही फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळेगाव (ता. परळी) येथील प्रतीप पांडुरंग मुंडे (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बी.ई. इलेक्ट्रिकलचे शिक्षण घेत असताना त्यांची ओळख जालना जिल्ह्यातील ऋषिकेश सुनील खराटे याच्याशी झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही दोघांमध्ये संपर्क कायम होता. दरम्यान, ऋषिकेश खराटे याने महापारेषण विभागात ओळखीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवून देतो, असे सांगत पैशांची मागणी केली.
फिर्यादीनुसार, २९ डिसेंबर २०२४ रोजी सहाय्यक अभियंता पदाची परीक्षा दिल्यानंतर आरोपीने संपर्क साधत इतर उमेदवारांकडून २५ लाख रुपये घेत असल्याचे सांगितले. मात्र मैत्री असल्याने १५ लाखांत काम करून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर जानेवारी २०२५ मध्ये फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी जालना जिल्ह्यातील आरोपींच्या कार्यालयात भेट घेतली. चर्चेनंतर ८ लाख रुपये आगाऊ देण्याचे ठरले. त्यानुसार रोख रक्कम तसेच बँक व्यवहाराद्वारे आरोपींना पैसे देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फेब्रुवारी २०२५ मध्ये आरोपींनी बनावट निकाल यादी दाखवत फिर्यादीचे नाव निवड यादीत असल्याचा दावा केला. तसेच “पार्टी”साठी आणखी दोन हजार रुपये ऑनलाइन घेतल्याचाही आरोप आहे. मात्र अधिकृत निकालात नाव नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर फिर्यादीने आरोपींकडे विचारणा केली असता “वेटिंग लिस्टमध्ये नाव येईल” असे सांगत वेळकाढूपणा करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पैसे परत मागण्यासाठी गेल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आली. तसेच पुन्हा पैसे मागण्यासाठी आल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी ऋषिकेश सुनील खराटे (वय २८) आणि सुनील वायुराव खराटे (वय ५०, रा. एकलहरा, ता. अंबड, जि. जालना) यांच्याविरुद्ध परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २३) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

