बीड — बीड शहरातील बस स्थानक आणि विविध भागात महिलांना लक्ष्य करून चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बस स्थानकावर महिलांच्या पर्स, दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन महिला आरोपींना रंगेहात पकडल्यानंतर आता महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन जणांच्या टोळीला देखील पोलिसांनी दोन तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
या सलग कारवायांमुळे बीड शहरातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी प्रभावी पाऊल उचलले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बस स्थानकावर महिलांची पर्स चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद
बीड बस स्थानकावर मागील काही दिवसांपासून महिला प्रवाशांचे दागिने, मोबाईल आणि पर्स चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांची गंभीर दखल घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई केली.
दि. १२ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे दीड ते सव्वादोन वाजण्याच्या दरम्यान एका महिला प्रवासी बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी गर्दीचा फायदा घेत धक्का देत तिच्या हातातील खाकी रंगाची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला.
मात्र, संबंधित महिलेने आरडाओरडा केल्यानंतर बस स्थानकावरील पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी तत्काळ धाव घेत दोन्ही महिलांना पकडले. त्यांच्याकडून चोरीची रोकड आणि पर्स हस्तगत करण्यात आली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गर्दीचा फायदा घेत महिलांना करत होत्या टार्गेट
या महिला चोरट्या सामान्य वेशात गर्दीत मिसळून चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे लक्ष विचलित करून पर्स, मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरण्याची त्यांची पद्धत होती.
महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावणारी टोळी पकडली
शिवाजीनगर पोलीस हद्दीत दिवसाढवळ्या महिलांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन मोटरसायकलस्वार चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते.
अवघ्या १५ ते २० मिनिटांच्या अंतराने तीन महिलांचे मोबाईल हिसकावण्यात आले होते.
पहिल्या घटनेत अश्विनी कृष्णा सुर्वे या दीप हॉस्पिटल परिसराकडे जात असताना स्वराज्य नगर कमानीसमोर फोनवर बोलत होत्या. यावेळी मोटरसायकलवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून नेला.
दुसऱ्या घटनेत मिराबाई बाळू मुळीक यांचा सरस्वती विद्यालय परिसरातून जात असताना मोबाईल हिसकावण्यात आला.
तर तिसऱ्या घटनेत के. एस. के. कॉलेजसमोरून जाणाऱ्या एका नर्स महिलेच्या एप्रनच्या खिशातील मोबाईल चोरट्यांनी पळवला.
दोन तासांत पोलिसांनी लावला छडा
घटनांची माहिती मिळताच शिवाजीनगर डीबी पथकाने पाच पथके तयार केली. दोन ठिकाणी नाकाबंदी करत अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले.
अटक आरोपी:
1) आवेश खान खाजा शेख (वय २२), रा. कानडी रोड, केज
2) गणेश श्रीराम मुंडे, रा. किल्ले धारूर, बीड
3) ऋषिकेश लक्ष्मण वायबसे (वय १९), रा. कासारी, ता. केज
आरोपींकडून चोरीचे तब्बल ९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. मोबाईल चोरी करून त्यांचे पार्ट विक्री करण्याचे काम हे आरोपी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांची धडाकेबाज कारवाई
ही कारवाई बीड जिल्ह्याच्या प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि शिवाजीनगर पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महिला पोलीस जमादार मीरा पाटील यांनी तपासात विशेष योगदान दिले.
शिवाजीनगर पोलिसांनी या कारवायांमुळे चोरी करणाऱ्या टोळ्यांना स्पष्ट संदेश दिला असून पुढील काळात अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले




