बीड — विधानसभा निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. घटनेच्या तीन महिन्यानंतर बीड पोलिसांची कुंभकर्णी झोप संपली आहे. झोपेतून जागे होताच तब्बल तीन महिन्यानंतर पोलीस गार्डचा जबाब नोंदवून कैलास फडसह इतर साथीदारावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यादरम्यान मतदाना दिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या एडवोकेट माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला असून याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस गार्डचा जबाब नोंदवण्यात आला असून तो उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवला जाणार आहे. दरम्यान याच अनुषंगाने मारहाण करणारा कैलास फड याच्यासह इतर साथीदारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस गार्ड मोहन रामा दांडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला. त्याचबरोबर धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आल्याने कैलास फड त्याचा मुलगा निखिल फड व इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र गुन्हा नोंदविण्यास एवढा विलंब का लावला गेला? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. या गुन्ह्यातील आरोपी कैलास फड याच्यावरती गेल्या महिनाभरापूर्वी हवेत गोळीबार केल्याप्रकरणी परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक देखील झाली होती. त्याचा शस्त्र परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. यानंतर हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा तो निकटवर्तीय आहे.

