माजलगाव — तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह नवरदेव, सासू आणि सासरे अशा पाच जणांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यात लावून देण्यात आला होता. दरम्यान, ९ जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीदरम्यान संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीच्या आई-वडिलांनी बालविवाह लावून दिल्याप्रकरणी तसेच सासू-सासऱ्यांनी विवाहाला सहकार्य केल्याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याने आणि ती गर्भवती झाल्याने तिच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता तसेच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय सचिन धोरणाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाकडून करण्यात येत आहे.

