गेवराई — तहसीलदार संदीप खोमणेवर १०० कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तसेच अवैध वाळू उत्खनन प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने केली आहे.गुरुवारी (दि.१८) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या सदर्भात निवेदन सादर केले असून, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
समितीने निवेदनात गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कथित १०० कोटी रुपयांच्या महसूल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, गेवराई तालुक्यात परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन, वाहतूक आणि साठवणूक करण्यात आली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई झाली नाही, असा आरोप समितीने केला आहे.
तपास एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्याची मागणी
या प्रकरणाचा तपास चकलंबा पोलिसांकडून काढून स्वतंत्र यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. चकलंबा पोलिसांवरही समितीने आरोप केले असून, संपूर्ण प्रकरणाची एसआयटी किंवा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि वाळू माफिया यांच्यातील कथित आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी समितीने केली आहे.
विना नंबर हायवा वाहतुकीवरही प्रश्नचिन्ह
अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विना नंबर हायवा वाहनांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत आरटीओ आणि वाहतूक विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपघात आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित
अवैध वाळू वाहतुकीदरम्यान झालेल्या अपघातांमुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याचा मुद्दाही समितीने उपस्थित केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ महसूल नुकसानीपुरते मर्यादित नसून सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित गंभीर विषय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
समितीने या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासनाचा महसूल वसूल करावा, अशी मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, लवकर कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा गोदावरी बचाव सर्व पक्षीय कृती समितीने दिला आहे.




