बीड — शहरातील चांदणी चौक ते काळा हनुमान चौक मार्गावर औषधी अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ताब्यात घेतले. त्याच्याकडून अंमली पदार्थ सदृश्य औषधांच्या १६० बाटल्या आणि अॅक्सेस स्कुटी असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार गोविंद राख, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदणी चौक ते काळा हनुमान चौक मार्गावर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस स्कुटीच्या फुटरेस्टमध्ये पांढऱ्या पिशवीत अंमली पदार्थ सदृश्य औषधांच्या बाटल्या घेऊन विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधव जगन्नाथ निमसे यांच्यासोबत पोलिसांनी संबंधित परिसरात सापळा रचला.
काळा हनुमान चौक परिसरात MH 23 BL 4259 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या अॅक्सेस स्कुटीवर एक व्यक्ती पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन जाताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेतली असता पिशवीमध्ये प्लास्टिकच्या सिलबंद, विना लेबलच्या १६० बाटल्या आढळून आल्या.
जप्त करण्यात आलेल्या बाटल्यांची अंदाजे किंमत ४० हजार रुपये, तर अॅक्सेस स्कुटीची किंमत सुमारे ७५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव अफताब सलीम खान पठाण (वय २८, रा. दाऊदपुरा, पेठ बीड, ता. जि. बीड) असे आहे. त्याच्याविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. एनडीपीएस कायद्यासह भारतीय न्याय संहिता आणि औषधीद्रव्ये व सौंदर्य प्रसाधने अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत , अपर पोलीस अधीक्षक समीर , उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त माधव जगन्नाथ निमसे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार गोविंद राख, अर्जुन यादव, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, बबन सलगर आणि चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे सहभागी होते.
‘नशामुक्त बीड’साठी पोलिसांचे आवाहन
बीड पोलीस दलाकडून ‘नशामुक्त बीड’ अभियान राबविण्यात येत आहे. अंमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी तात्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.




