अत्याचार अन् अश्लील व्हिडीओ; तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी ताब्यात!

बीड — पाण्यात गुंगीचे औषध मिसळून तरुणीवर अत्याचार केल्याचा आणि या घटनेचे फोटो-व्हिडीओ मोबाईलमध्ये ठेवून त्याचा आधार घेत वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकल्याचा गंभीर प्रकार बीड शहरात समोर आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मकसूद कॉलनी परिसरातील एका तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी शिक्षणासाठी बीडमध्ये क्लासेसला जात असताना आरोपी शेख मुस्सवीर शेख वसीम (रा. मकसूद कॉलनी, हिना पेट्रोल पंपामागे) हा तिचा बारावीपासून पाठलाग करत होता. तो प्रेम आणि लग्नाची मागणी घालत होता. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला होता.

९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी साडेएकच्या सुमारास पीडितेचे आई-वडील घरी नसताना आरोपी तिच्या घरी गेला. त्याने स्वतःजवळील बाटलीतील पाणी तिला पिण्यास दिले. पाणी प्यायल्यानंतर डोके जड होऊन चक्कर येत असल्याचे जाणवताच आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ त्याने मोबाईलमध्ये जतन केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

यानंतर ८ डिसेंबर २०२४ रोजी आरोपीने चारचाकी वाहनातून बाहेर घेऊन जाण्याच्या बहाण्याने पीडितेला सोबत घेतले. मांजरसुंबा परिसरातील एका लॉजवर नेल्यानंतर पुन्हा तिला पाणी देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने मोबाईलमध्ये ठेवलेल्या अश्लील फोटो आणि व्हिडीओचा वापर करून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंधासाठी दबाव टाकला. शनिवारी, दि. ५ रोजी चित्रपटगृहात येण्यासाठीही तिच्यावर दबाव टाकण्यात आला आणि शारीरिक संबंधाची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकाराला कंटाळून पीडितेने अखेर शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी शेख मुस्सवीर शेख वसीम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ६४, ६४(२)(i), ६४(२)(m), ७५(२), ७८, १२३ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास ज्ञानेश्वर धोत्रे करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles