Sunday, December 14, 2025

आ.नमिता मुंदडांच्या निवडीला आव्हान; मुंदडासह निवडणूक आयोगाला खंडपीठाची नोटीस

छत्रपती संभाजीनगर — केज येथील आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. या विरोधात उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करून देखील फॉर्म 17 सी ची प्रत त्यांनी दिली नाही. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओ शुटींग, सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून दिले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुकते माप दिले आहे.

केज विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कुठलेही नोटिफिकेशन काढले नाही. ईव्हीएम (मतदान यंत्र) द्वारे निवडणूक घेतली, म्हणून लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम 59 आणि 61 यांचे उल्लंघन झाले आहे. कलम 59 मध्ये निवडणुकीत मतदान करण्याची पद्धती ही मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल याबाबतीत आहे.
सदरील निवडणुक याचिकेत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तसेच व्हिव्हिपॅट मशीन यांना अनुक्रमांक देताना कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही. ईव्हीएम मशीन तसेच बॅलेट युनिट्स आणि व्हिव्हिपॅटचे प्रिंटर्स यांना कायमस्वरूपी अनुक्रमांक न देत त्यावर स्टिकर लावण्यात आले होते.त्यामुळे ईव्हीएम मशीन यांची सुरक्षितता संशयास्पद असल्याने निवडणुकीचा निकाल हा प्रभावित झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सील यावर स्वतः स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 100 मधील ड (4) नुसार राज्यघटनेचे तसेच त्यामधील तरतुदी आणि नियमांचे व आदेशांचे अनुपालन न केल्यामुळे निवडणुकीवर विपरिणाम झाला आहे.

त्यामुळे नमिता मुंदडा यांची निवडणूक रद्दबातल घोषित करण्याची विनंती केली आहे. सुनावणीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्यासह 23 उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. अर्जदारांतर्फे ॲड. रविंद्र गोरे, ॲड. सुस्मिता दौंड काम पहात आहेत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles