Home Blog Page 88

बोक्याच्या खोक्याची विद्यार्थ्यांना हातपाय मोडण्याची धमकी व्हिडिओ व्हायरल

0

शिरूर — आ. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नव नविन कारनामे समोर येत असून आता एका व्हिडिओ मध्ये तो चक्क शालेय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना हात-पाय मोडण्याची धमकी देत असल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे.

तसेच आधीच माझ्यावर खूप सार्‍या केसेस आहेत. आणखी काही केसेस झाल्याने काही फरक पडत नाही असे देखील म्हणत असल्याचे दिसते. हा व्हिडिओ शिरूर येथीलच कालिकादेवी विद्यालयातील असल्याचे समोर आले असून यामध्ये प्राचार्य व शिक्षक उपस्थित असल्याचे दिसते. प्राचार्य व शिक्षकांनी अशा व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कसे काय बोलावले असेल असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

शिरूर तालुक्यातील सतीश भोसले याने एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर ढाकणे पिता पुत्राला देखील अमानुष मारहाण करत जखमी केले होते. या दोन्ही प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून सतीश भोसलेला ताब्‍यात घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

या दरम्यानच आता सतीश भोसलेचा एक नवा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये तो शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांना हातपाय मोडण्याची धमकी देत असल्याचे दिसते. कार्यक्रमात हा सगळा प्रकार सुरू असून यावेळी संबंधित विद्यालयाचे प्राचार्य शिक्षक देखील उपस्थित असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. अशा प्रकारच्या गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला कस काय बोलावले असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.

वाल्मिक कराडलाही भेटला महाठग; 15 लाखाची खंडणी केली वसूल

0

बीड — संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड विषयी मोठी माहिती समोर आली आहे. कराडलाच खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. त्यानंतर जीवाच्या भीतीने त्याने खंडणी खोराला 15 लाख रुपये दिले होते.माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयातून हे पैसे दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

https://x.com/anjali_damania/status/1897924759859638443

कराडला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी मागील वर्षी जानेवारी महिन्यातच गुन्हाही दाखल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या बाबतचा एफआयआर सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यानुसार माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी येथील कार्यालयात टाइप रायटरची नोकरी करणाऱ्या गणेश उगले याने ही फिर्याद दिली आहे. तो इतर कार्यालयीन कामही पाहतो. शिवराज बांगर हा 1 जानेवारी 2023 रोजी जगमित्र संपर्क कार्यालयात आला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे.वाल्मिकअण्णा कराड यांना बोललो आणि त्यांनी मला 15 लाख रुपये देण्यात सांगितले आहेत, असे बांगर आपल्याला म्हणाल्याचे उगले याने फिर्यादीत नमूद केलेआहे. कराड यांना फोन करून आपण याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, बांगर मला वारंवार व समक्ष भेटून तसेच वॉट्सअपद्वारे कॉल करून धमकी देत होता. मला 15 लाख रुपये देत नाहीतर तुझ्या अंगावर गाडी घालून ठार मारीन, तुझी समाजामध्ये बदनामी करेन. मला माझ्या जिवाचा धोका नको आहे. त्यामुळे त्याला 15 लाख रुपये दे, असे कराड यांनी सांगितल्याचे उगले म्हटले आहे.
बांगरला पैसे दिल्याचे सीसीटीव्हीमध्ये असल्याचा दावाही उगलेने केला आहे. पैसे घेतल्यानंतर बांगरकडून धमकी दिली जात होती. त्यामुळे पोलिसांत फिर्याद दिल्याचे उगलेने म्हटले आहे. ही फिर्याद मागील वर्षी 2 जानेवारी 2024 रोजी परळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.एफआयआर पोस्ट करताना दमानिया यांनी म्हटले आहे की, वाल्मिक कराड कडून 15 लाखाची खंडणी शिवराज बांगर यांनी वसुल केली होती, असा एफ आय आर बाहेर आला आहे. वारंवार समक्ष भेटून व व्हॉट्सअप कॉल वरून, “पैसे दे नाहीतर तुला मारून टाकिन” अशी धमकी शिवराज बांगर यांनी दिली आणि 15 लाख कराडच्या सांगण्यावरून, जगमित्रच्या लॉकर मधून देण्यात आले? कराडला कोणी धमकी देऊ शकत होतं, हे माझ्या बुद्धीला पटत नसल्याचं दमानिया यांनी म्हटलं आहे.

अमानुष मारहाण प्रकरणी सतीश भोसले उर्फ खोक्या विरोधात गुन्हा दाखल

0

शिरूर (का) –अज्ञात व्यक्तीस विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या सतीश भोसले ऊर्फ खोक्या याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर  भोसलेने तीक्ष्ण हत्याराने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार बावी येथील एका व्यक्तीने गुरुवारी पोलिसात दिली आहे.दिल्यानंतर भोसलेवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील बावी येथील एका व्यक्तीला विवस्त्र करून मारहाण केली जात असल्याची चित्रफीत व्हायरल झाली होता. या व्यक्तीच्या पायावर एका तुटलेल्या बॅटने जोरजोरात अमानुषपणे मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. याप्रकरणात बुधवारी सतीश भोसलेसह चार जणांवर पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी दुसराही गुन्हा दाखल झाला आहे. बावी येथील फिर्यादी दिलीप ढाकणे (वय ५५) हे रानवस्ती येथे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. ते आपल्या जांभळीच्या शेतामधे गेल्यानंतर झापेवाडी येथील भाऊसाहेब भोसले याने हरिण पकडण्याकरीता जाळे लावल्याचे त्यांना समजले. जाळे काढून घेण्यास सांगताच भोसलेने साथीदारांना बोलावून मारहाण केली.

आरडाओरड ऐकून दिलीप ढाकणे यांचा मुलगा महेश त्याठिकाणी आल्यानंतर ते पळाले. फोन करून त्यांनी सतीश भोसले आणि साथीदारांना बोलून घेऊन दोघांना मारहाण केली. त्यामध्ये दिलीप यांचे दात पडले तर महेशच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, सतीश भोसले हा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

नायब तहसीलदाराच्या दालनात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

0

केज – पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्याकडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावाने केली. तो बनावट फेरफार रद्द करावा.या मागणीसाठी एक परित्यक्ता महिला अनेक वर्षापासून तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयात चकरा मारत होती. त्या प्रकरणी सुनावणी ठेवण्यात आली होती.

सुनावणी संपल्यानंतर संतप्त आणि त्रस्त महिलेने गुरुवारी  दुपारी चार वाजण्याच्या सुमारास नायब तहसीलदारांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखल्याने अनर्थ टळला.

तालुक्यातील वरपगाव येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्यासोबत दीपा देशमुख यांचा वर्ष १९९० मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती.

परंतु काही दिवसानंतर रवींद्र भोसले याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका महिलेशी विवाह केला. तिच्यापासून रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा ही अपत्ये झाली. त्यामुळे दिपा देशमुख ही तिची मुलगी कोमल देशमुख हिला घेवून पती रवींद्र भोसले यांच्यापासून विभक्त राहत आहे.

या दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दिपा हिच्या नावाने असलेली गट नंबर ५६/१ व गट नंबर ५७/१ मधील ८१ आर जमीन ही रवींद्र भोसले यांनी बनावट दान-पत्रा आधारे आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून एका बाँड आधारे दुसऱ्या पत्नी पासून झालेला मुलगा उत्तरेश्र्वर भोसले याच्या नावाने महसुली दस्तावेज करून घेतला.

त्यामुळे रवींद्र भोसले यांनी तत्कालीन महसुली अधिकारी यांच्याशी संगनमत करून उत्तरेश्र्वर भोसले यांच्या नावे केलेला फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी दिपा देशमुख या अनेक दिवसापासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात चकरा मारत होत्या.

गुरुवारी सदर फेरफार रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर दिपा देशमुख यांनी हा फेरफार रद्द का झाला नाही? म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोबत एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तहसील कार्यालयात असलेल्या महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड व महसूल कर्मचाऱ्यांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान साधून त्या महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखले.

त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे व सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निरडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिपा देशमुख या महिलेला आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

अंजनवतीचा नकली पासबुक बनवणारा पोस्ट मास्तर शेटे; 50 लाखाची लूट झालेले मारताहेत पोस्टात खेटे

0

चौसाळा — बीड तालुक्यातील अंजनवती गावातील पोष्ट मास्तर भाऊसाहेब शिवलिंग शेटे यांनी बनावट पासबुक तयार करून चौसाळा उप डाकघरातील कार्यालयात पैसे जमा न करता जवळपास ५० लाख रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप अंजनवती आणि घारगाव येथील ग्रामस्थांनी केला असुन यामध्ये रॅकेट कार्यरत असुन चौसाळा डाकघरातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांचीच सखोल चौकशी करून गोरगरिबांच्या खात्यावरील पैसे परत करावेत अशी मागणी सरपंच कैलास येडे,रेवण येडे, वैभव येडे, सुधीर सोनवणे, महादेव माळी,बाळु शिंदे,मारोती वारकरी, बन्सी शिंदे आदींनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाऊसाहेब शेटे याने बनावट पासबुक तयार करून जनतेसह पोस्ट खात्याची फसवणूक केली. या प्रकरणात फसवणूक झालेले अनेक जण आपली कैफियत मांडू लागले आहेत.मालक वारल्यानंतर , मेंढ्या सांभाळणं होईना मग त्या विकुन दीड लाख रुपये पोस्टात टाकले. बटईने दिलेल्या जमिनीतुन मिळणाऱ्या पैशातून पोटापाण्याचं भागतं. काल गावात कालवा झाला तेव्हा कळलं पोष्ट मास्तरनं घोटाळा केलाय.आता आम्ही काय करावं असा प्रश्न ७५ वर्षीय अनुसया कोंडिबा कर्डुले हताश होऊन विचारताहेत.अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे पपिता प्रभाकर थोरात, मुक्ताबाई श्यामराव सोनावणे यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या आखत्यारीत पोस्ट खाता येत  असल्याने याची विश्वासाहर्ता होती म्हणून गोर गरीब शेतमजुर यांनी पोष्टात पैसे जमा केले.२ वर्षांपूर्वी भाऊसाहेब शेटे पोष्ट मास्तर म्हणुन आल्यावर गोंधळ सुरू झाला. एका माणसाचे काम नसुन चौसाळा डाकघरातील अधिकारी व कर्मचारी यांचा सुद्धा यामध्ये सहभाग असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि खातेदारांचे पैसे परत करावेत अशी मागणी सरपंच कैलास येडे यांनी केली आहे.

चौसाळा डाकघराचे निरीक्षक जाकोरे यांनी अंजनवती गावात ग्रामस्थांशी चर्चा करत.खातेदारांनी त्यांच्याकडे असलेल्या खात्याचे पुरावे द्या पुढील कारवाई करण्यात येईल तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.असे जाकोरे यांनी सांगितले.

बीड एमआयडीसीबाबत आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट

0

बीड — बीडच्या एमआयडीचा विकास व्हावा याकरिता गेल्या अनेक दिवसांपासून आ.संदीप क्षीरसागर शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यातच गुरूवारी (दि.६) रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधीमंडळात महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली.

बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा याकरिता बीड शहरात स्थित असलेल्या औद्योगिक वसाहतीचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून त्याठिकाणी मोठमोठे उद्योग येतील आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल तसेच आर्थिक स्थिती सुधारेल. ही बाब लक्षात घेऊन आ.संदी प क्षीरसागर गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या एमाआयडीसीच्या विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांची भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक अधिकारी आदी वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेतही बैठका घेतल्या होत्या. आता पुन्हा यासंदर्भात, मुंबई येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.संदीप क्षीरसागर यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेतली आहे. दरम्यान याविषयी ना.सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच सविस्तर बैठक लावण्याचे सांगितले आहे.

वडवणीत पंतगे ट्रेडर्सला भीषण आग; लाखोंचे फर्निचर, प्लायवूड, कलर जळून खाक

0

वडवणी — चिंचवण रोडवर असलेल्या पतंगे ट्रेडर्स या दुकानाला गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दल वेळेवर पोहोचू न शकल्याने दुकानातील फर्निचर, प्लायवूड, कलर आणि अन्य बांधकाम साहित्याचा मोठा साठा आगीत जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास तीन मजली दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच दुकान मालक विशाल पतंगे आणि नागरिकांनी चिंचवण रोडवरील दुकानाकडे धाव घेतली. मात्र, शहरात केवळ अग्निशमन गाडी असून प्रशिक्षित कर्मचारीच नसल्याने आगीत दुकानाची राख होताना नागरिक आणि दुकान मालकाला दुसरे गत्यंतर राहिले नाही.
कलर आणि प्लायवूडने आगीचे रौद्ररूप
दुकानामध्ये खालच्या मजल्यावर फर्निचर तर वरच्या मजल्यावर सनमाईक, प्लायवूड, कलर यासह अन्य बांधकाम साहित्य आहे. हे साहित्य ज्वलनशील असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. त्यात अग्निशमन यंत्रणा तोकडी पडल्याने संपूर्ण दुकानास आगीने कवेत घेतले. दरम्यान, तेलगाव, माजलगाव आणि बीड येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान नगरपंचायत चे अग्निशमन दल शोभेची वस्तू बनले आहे. अग्निशमन दलाची वेळेवर मदत न मिळाल्यामुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले यामुळे व्यापारी वर्गात संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश

0

बीड —  सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात संतापाची लाट उसळली आहे.त्यातच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले धक्कादायक फोटो समोर आल्यावर काल रात्री उशिरा राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. देवगिरी बंगल्यावर सोमवारी रात्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे माहिती समोर येत आहे. त्यानुसार आज धनंजय मुंडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीतील प्रचाराची आणि त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कारभाराची सूत्रे हाताळत होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केवळ चर्चाच सुरु होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे भाग पडल्याचे म्हटले जात आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी 12 मार्चला होणार !

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. त्या प्रकरणी वाल्मीक कराड यांच्यासह आठ जणांवर दाखल करण्यात आलेल्या खंडणी, खून आणि ॲट्रॉसिटी प्रकरणाची पुढील सुनावणी 12 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात होणार आहे.

सरपंच संतोष देशमुखांनी आवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या कंपनीत खंडणी मागणाऱ्यांचा विरोध केला होता. म्हणून त्यांचे दिनांक 6 डिसेंबर रोजी टोल नाक्यावर वरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सीआयडीने अवघ्या 80 दिवसांत पूर्ण करून दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयात सादर केले आहे.

या हत्या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक बाबुराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्या विरुद्ध दि. 28 फेब्रुवारी रोजी दीड हजार पानांचे दोषारोप-पत्र विशेष मकोका न्यायालयाचे दुसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात दाखल झालेले आहे.

दि. 1 मार्च रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयात ठेवली आहे. राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील ॲड उज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. बाळासाहेब कोल्हे हे काम पहात आहेत.

पाटबंधारे विभागाचे नशेडी कर्मचारी माजले; शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करू लागले

0

लिंबागणेश –– जास्त प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने कालवा फुटून पाणी सरळ शेतकऱ्यांच्या शेतात घुसले यामुळे जमीन वाहून गेल्याने तसेच सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. याबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यावरच पाटबंधारे विभागाने गुन्हा दाखल केला असल्याचाप्रकार उघडकीस आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बीड तालुक्यातील मसेवाडी येथील तलावातून कालव्याद्वारे शेतीला पाणी देण्यात येते, पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे मसेवाडी लघु सिंचन तलावातून जास्त पाणी सोडण्यात आले. यामुळे अंजनवती शिवारात कालवा फुटला हे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसले, यामुळे कैलास येडे रा. अंजनवती, स्वामी येडे यांचे सिमला मिरचीचे मोठे नुकसान झाले. सत्यभामा येडे यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे ज्वारीचे चिपाड देखील जागेवर राहिलं नाही. याशिवाय श्रीराम वारकरी भास्कर येडे गणेश येडे या शेतकऱ्यांच्या शेतासह पिकांचे नुकसान झाले.कालवा फुटल्याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आली पण कोणीच फिरकले यामुळे पाण्याची तर नासाडी झालीच पण शेतकऱ्यांचे पिकांचे आणि माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. हा सततचा प्रकार असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केला. तसेच झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी केली असता पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. 24 तास नशेत असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नुकसान झालं तरी जाब विचारायची सोय राहिली नाही. उलट बाई माणसाला दमदाटी करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले जात असल्याची कैफियत आशाबाई येडे यांनी मांडली. याबरोबरच पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांची तक्रार केली त्यामुळे कैलास येडे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्याचा प्रकार उघडकीस आला.यामुळे घटनेचा निषेध करीत पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देऊन पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा शिवशक्ती भीमशक्ती विचार मंचचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिला आहे.