Home Blog Page 85

देशात यंदा धो-धो पाऊस कोसळणार; महाराष्ट्रात काय स्थिती, पहिला अंदाज समोर

0

 नवी दिल्ली — यावर्षी राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे, या संदर्भात स्कायमेटचा एक रिपोर्ट आता समोर आला आहे. यावर्षी राज्यात पडणाऱ्या मान्सूनसंदर्भात स्कायमेटकडून पहिला पू्र्व अंदाज जारी करण्यात आला आहे.स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनची सुरुवात संथ गतीनं होईल.

जूनमध्ये मान्सूनचं आगमन होईल, मात्र तो संथ गतीने पुढं सरकरणार आहे. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा देशभरात पावसाचं प्रमाण सामान्य राहणार असून, 103 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो असं स्काय मेटनं म्हटलं आहे.

याबाबत माहिती देताना स्काय मेटच्या तज्ज्ञांनी सांगितलं की, ला लीनाची स्थिती बदलली आहे, मात्र तरी देखील यावेळी देशात मान्सून सामान्य स्थितीमध्ये राहणार आहे, यावेळी देशभरात सरासरीच्या 103 टक्के इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक जून ते तीस सप्टेंबर या काळात देशभरात 895 मिमी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा देशात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज 40 टक्के इतका आहे, तर सामान्य पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता 30 टक्के असून, अतिवृष्टीची शक्यता दहा टक्के इतकी आहे.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी 158.7 मीमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक 286.1 मीमी इतक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात 275.3 मिमी तर सप्टेंबर महिन्यामध्ये 174.6 मिमीटर पाऊस पडू शकतो.

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आसाम, अरुणाचल प्रदेश, आणि जम्मू -काश्मीरमध्ये यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर्षी पाऊस चांगला पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहणार आहे.

चौसाळा ग्रामीण रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी २४ कोटींचा निधी मंजूर

0

प्रशासकीय मान्यता मिळाली; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मानले आभार

बीड — तालुक्यातील चौसाळासह परिसरातील आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून २४ कोटी ४५ लक्ष ६३ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून बुधवारी (दि.९) अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

चौसाळा येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी आणि जागा उपलब्धतेसाठी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली निधीसाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला आहे. भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे चौसाळा परिसरातील हजारो नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच मिळू शकणार आहेत. आतापर्यंत अनेकवेळा रुग्णांना प्राथमिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गाठावे लागत होते. मात्र, ग्रामीण रुग्णालय स्थापन झाल्यानंतर विविध उपचार, तपासण्या व तातडीच्या सेवा याठिकाणीच उपलब्ध होतील. या रुग्णालयासाठी निधी मिळवण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी ही मागणी शासनदरबारी मांडली होती. त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले असून, त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे चौसाळा परिसरातील आरोग्यसेवा क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून, गावातील नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या भागातील लोकांनाही त्याचा लाभ मिळणार आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असून, येत्या काही महिन्यांत ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम व सुविधा उभारणीचे काम वेगात सुरू होईल, अशी माहितीही मिळत आहे.

पा”ठक” साहेब…!जनाची नाही मनाचीही नाही किमान खूर्चीची तरी लाज बाळगा;पवन कंपन्यांचे दलाल ही प्रतिमा पुसून काढा

0

बीड — बीड जिल्ह्याची अर्थव्यवस्था ऊसतोड कामगारांच्या घामावर अवलंबून आहे. मात्र ती पवन ऊर्जा कंपन्यांच्या जीवावर असल्याचा आभास निर्माण करत कंपन्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन शेतकऱ्यांना दमदाटी करणे, धमक्या देणे, गुन्हे दाखल करणे एवढेच नाही तर न्याय हक्कासाठी 70 दिवसापासून आंदोलन करत विष पिण्याची वेळ अंबाजोगाई तालुक्यातील जवळगावच्या शेतकऱ्यावर आणली आहे. शेतकऱ्यांपाशी वाघाची भूमिका घेणारे अविनाश पाठक त्याचवेळी पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाची जागा बळकावून पवनचक्की कंपनीने पाच कोटी रुपये खर्चून विद्युत उपकेंद्र उभे केले आहे. त्याची चौकशी करताना “शेळ “पटाची भूमिका का घेत आहेत. चौसाळ्याच्या शेतकऱ्याने पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाला आहात का असा प्रश्न उपस्थित केला होता. कमीत कमी हा लागलेला कलंक पुसायचं काम करा. तुमचं द्या हो सोडून किमान जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीची तरी इभ्रत राखा अशी मागणी जोर धरू लागली आहे.


पा “ठक” साहेब…! जिल्ह्यात तुम्ही अनेक वर्ष सेवा बजावली आहे. राजकारण्यांसह जनमानसाची नाडी एवढ्या वर्षाच्या सेवेच्या कारकिर्दीत समजली आहे. आपल्यातलाच एक माणूस जिल्हाधिकारी पदावर विराजमान झाला याचा आनंद जिल्ह्यातील जनतेला झाला. पण तो तुम्ही क्षणीक ठरवला. पवन ऊर्जा कंपन्यांनी सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचं जीन हराम केलं‌‌. कंपन्यांच्या काळ्या गाड्यांच्या दहशतीत वावराव लागतं. कधी कुठून आपल्या शेतावर आक्रमण होईल याची सतत धास्ती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करू, तुरुंगात टाकू, वेळप्रसंगी खंडणी सारखे गुन्हे दाखल करू, कंपन्यांच्या गुंडा मार्फत दमदाटी करणे ,खोटे धनादेश देणे, संपादित जमिनीपेक्षा अधिकच्या जमिनीवर कब्जा करणे यासारख्या एक ना अनेक घटनांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरू लागले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय भूमिका घेत शेतकऱ्यांना अश्वस्त करणं हे काम करायचं सोडून शेतकरी कसा अस्वस्थ राहील याकडे तुमचं प्रामाणिक लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पदाची खुर्ची देखील कलंकीत होऊ लागली आहे. यापूर्वी तुमची गाडी माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने जप्त झाली. ती मावेजा न दिल्यामुळेच झाली होती. एवढंच नाही तर बीडच्या दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तराने शेतकऱ्यांचा मावेजा न्यायालयीन निर्णयानंतर देखील दिला नव्हता म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना कैद करा असे आदेश दिले होते. खरे तर त्यावेळीच सगळी इभ्रत गेली होती. कुठेतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. पण जुनी म्हण आहे “नाक कापलं तरी भोक तयार”या म्हणीचीच “रि ” पुन्हा ओढली गेली. हे कमी की काय म्हणून‌ चौसाळ्याच्या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या उद्घाटनाला आलेले असताना पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? असा प्रश्नही उपस्थित केला होता. याच्या बातम्या ही माध्यमांनी लावल्या होत्या. पण छेऽऽ! धृतराष्ट्राची एकदा भूमिका घेतल्यावर शेतकऱ्यांचं काहीही होऊ द्या आपण कंपनीशी प्रामाणिक राहायचं याचा एकदा चंग बांधल्यावरच काय करणार?
‌. अंबाजोगाई तालुक्यातल्या जवळगाव येथील सरकारी जमिनीवर भूमिहीन शेतकरी 1981 पासून उपजीविका करत आहेत. या सरकारी जमिनीवर सोलार प्लांट करण्यात येत आहे. हा प्रकल्प रद्द करून अन्यत्र स्थलांतरित करावा या मागणीसाठी गेल्या 70 दिवसापासून भूमीहीन शेतकरी जवळगाव येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत. लोकशाही मार्गाने चाललेल्या या आंदोलन पोलीस बळाचा वापर करत त्यांच्या राहत्या झोपड्यावर जेसीबी चालवून चिरडण्याचा प्रकार आठ एप्रिल रोजी झाला. या घटनेच्या निषेधार्थ चार गायरान धारक शेतकऱ्यांनी उपजीविकेचे साधन जाणार जगून तरी काय करायचं म्हणून विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस बळाचा वापर करून वाघाची भूमिका निभावली. पण त्याचवेळी विरोधाभासी भूमिका पाटोदा तालुक्यात घेतली. खेडवळ भाषेत बोलायचं तर शेळपटपणाचा कळस गाठला. धनगर जवळका येथील शासकीय साठवण तलावाच्या जागेवर पवनचक्की कंपनीने अतिक्रमण करून पाच कोटी रुपये खर्च होऊन विद्युत उपकेंद्र तयार केले आहेत. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक बीड यांना लेखी तक्रारी केल्या. या शिवाय महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या पुण्यनगरी नावाच्या दैनिकाने आठ भागांची मालिका छापली. पण वातावरणुकूलित केबिन मध्ये बसलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. त्याची दखल देखील घ्यावी या प्रकरणाची चौकशी करावी. याची हिम्मत झाली नाही. जणूकाही कंपन्यांचे ताटा खालचे मांजर आहोत. एकादा घास आपल्याला मिळेल अशी अपेक्षा ठेवून वाट पाहत बसल्यासारखी स्थिती साहेब तुमची झाली आहे. असा आरोप आता शेतकरी वर्ग करू लागला आहे. पा“ठक” साहेब..! आयुष्यात पैसा मिळेल हो पण तळतळाटाने कमावलेला पैशाची परतफेड वार्धक्य करावी लागते हो ऽऽऽ! किमान याची तरी जाणीव ठेवा असं शेतकरी म्हणू लागला आहे. कमीत कमी जनाची नाही मनाची नाही किमान खुर्चीची तरी इभ्रत राखा होऽऽ! अशी अर्त हाक तळतळलेला शेतकरी मारू लागला आहे याची जाणीव ठेवा. कुठेतरी याला पाय बंद घाला आपलं इमान जनतेशी आहे याची जाणीव होऊ द्या? असं देखील जनतेत बोललं जाऊ लागला आहे.

बुजगावणं उपयोगाच नाही
जिल्हाधिकारी, पोलीस यंत्रणा पवन ऊर्जा सौर ऊर्जा कंपन्यांच्या बाजूने सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत. काय चुकलं त्या चौसाळ्याच्या शेतकऱ्याचं ज्याने जिल्हाधिकाऱ्यांना तोंडावर पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल आहात का? असा प्रश्न विचारला. मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून फिरताना गोरगरीब शेतकरी किती बेंबीच्या देठापासून तळतळाट देत आक्रोश करतोय तो आक्रोश आता कानालाही ऐकावा वाटेना. पण आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना याचं काहीच कसं वाटेना याचा विचार करतोय. तळतात फेडावा लागतो म्हणतात. ते भेडतील ही पण गोरगरीब शेतकरी आज भरडला जातोय त्याचं काय? पवनचक्की सौर ऊर्जा कंपनी यांनी हे पाठक नावाचं बुजगावणं उभा करून पोटाच्या मागे लागलेल्या जनतेला भेडवायचं काम सुरू केलेला आहे. लक्षवेधी आंदोलन करून देखील त्याचा फायदा झाला नाही. जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे त्या खुर्चीची “पत” ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या काळात ताटा खालचं मांजर असल्यासारखी भूमिका एका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नव्हती. ती आता घेतली जात आहे. पालकमंत्री अजित दादा पवार यांनी असल्या माणसा विरोधात कारवाई करून हकालपट्टी करावी.
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

आ.संदीप क्षीरसागरांच्या दूरदर्शी प्रयत्नाला यश;बिंदुसरा नदीवरील पूल कम बंधार्‍याचा केला शुभारंभ

0

बंधारा कम पुलामुळे बीड शहरासह परिसरातील गावांची भूजल पातळी वाढणार

बीड —  शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात पूल कम बंधारा बांधणीच्या कामाला अखेर सुरूवात झाली असून आ.संदीप क्षीरसागरांनी गुरूवारी (दि.३) रोजी या कामाचा शुभारंभ केला. आ.क्षीरसागर हे काम होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या कामाची सुरूवात झाली असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. या पूल कम कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍यामुळे बीड शहर आणि परिसरातील आसपासच्या गावांमध्ये भूजल पातळीत मोठी वाढ होणार आहे. ही आनंदाची बाब आहे.
बीड शहरातील बार्शी नाक्याजवळील असलेल्या बिंदुसरा नदी पात्रात पूल कम कोल्हापूरी बंधारा तयार करावा. जेणेकरून बिंदुसरा नदीतून वाहून जाणारे पाणी अडविले जाईल. हे काम करण्यासाठी आ.संदीप क्षीरसागरांनी गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय लावून धरला. अशा स्वरुपातील हे काम असणार आहे. या कामाच्या मंजूरीसाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी अनेक वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आणि अखेर आ.संदीप क्षीरसागरांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आहे. बिंदुसरा नदीवरील बंधार्‍यामुळे बीड परिसरात सिंचन आणि पाणी उपलब्धतेसाठी मोठा फायदा होणार आहे. आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांतून बीडसाठी अतिशय फायदेशीर असलेले हे काम लवकरच पूर्ण होणार आहे.

पूल कम बंधार्‍याचा सिंचन आणि पाणी साठवण्यासाठी मोठा फायदा

शुभारंभ झालेल्या बिंदुसरा नदीवरील पूल कम कोल्हापूरी बंधार्‍यामुळे बीड शहर आणि आजूबाजूच्या साधारण ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात भूजल पातळीत वाढ होणार आहे. बीड जिल्ह्यात पावसाची अनियमितता असल्याने प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होते. परंतु या कोल्हापूरी बंधार्‍यामुळे पाणी साठवणूक होईल. परिणामी पाणी उपलब्धता आणि शेती सिंचनासाठी याचा खूप मोठा फायदा या पूल कम बंधार्‍याचा होणार आहे. बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल ही संकल्पना मोठी दूरदर्शी होती. ती आ.संदीप क्षीरसागर यांनी डोळ्यासमोर ठेवून हे काम होण्यासाठी निरंतर प्रयत्न केले. शासन आणि प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. अनेकवेळा अधिवेशनातही हा मुद्दा मांडला. दरम्यान आता आ.संदीप क्षीरसागरांच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच हे काम पूर्ण झालेले असेल.

ज्या झाडाखाली भावाने आत्महत्या केली त्याच झाडाखाली आरोपी ठेचून मारला

0

बीड —  जिल्ह्यातील गुन्हेगारीने कळस गाठला असून आणखी एक हत्या झाल्यानंतर खळबळ माजली आहे.या हत्याप्रकरणाचा तपशील लक्ष वेधून घेणारा आहे. बीड जिल्ह्यातील शिरसाळा परिसरानजीक कान्हापूर गावात जुन्या वादातून स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याची हत्या करण्यात आली. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते.
बीडच्या धारुर तालुक्यातील कान्हापूर हे गाव शिरसाळाजवळ येते. येथील स्वप्नील उर्फ बबलू देशमुखचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी स्वप्निल देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातीलच किराणा दुकानदार अविनाश देशमुख यांनी मार्च 2023 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी बबलू देशमुख याच्यावर कलम 306, कलम 504, कलम 506, कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठीच संतोष देशमुख यांच्यावर आरोपी स्वप्नीलकडून वारंवार दबाव आणला जात होता. या त्रासाला कंटाळून संतोष देशमुख आणि त्यांची पत्नी सोनाली देशमुख यांनी बबलू देशमुख याच्यावर हल्ला करुन त्याला संपवले.
या हल्ल्यात संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पाठीवर बबलू देशमुख याने वार केले आहेत. पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेली गुप्ती घटनास्थळावरुन जप्त केली आहे. बबलूची हत्या केल्यानंतर संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख दोघेही स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. त्यांनी पोलिसांत स्वप्निल देशमुख विरोधात फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे ज्या झाडाला लटकून अविनाश देशमुख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली संतोष देशमुख यांनी बबलू देशमुख याची हत्या केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

वाल्मीकच्या इशाऱ्यावरून आम्हाला मारहाण महादेव गीतेचा आरोप;चार आरोपी हर्सुल कारागृहात पाठवले

0

बीड — जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारीची घटना घडली.सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराडला महादेव गीते आणि अक्षय आठवलेने मारहाण केल्याची चर्चा होती.मात्र, असा प्रकार घडला नाही. सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली. परंतू, सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना वेगळे केले, असा खुलासा कारागृह प्रशासनाने केला आहे. दरम्यान सायंकाळी महादेव गीते याच्यासह चार बंदींना हार्सुल कारागृहात हलवण्यात आले.

बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे न्यायालयीन कोठडीत आहेत. याबरोबरच बापु आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते, मुकूंद गिते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे देखील याच कारागृहात आहेत. याबरोबरच बनावट नोटा प्रकरणातील आरोपी अक्षय आठवले हा देखील याच ठिकाणी आहे. सोमवारी सकाळी महादेव गीते व अक्षय आठवले याने मिळून सुदर्शन घुले याला मारहाण केली तसेच वाल्मीक कराडला देखील मारहाण केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर दुपारी कारागृह प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण देत सुदीप सोनवणे व राजेश वाघमोडे यांच्यात झटापट झाली परंतु सुरक्षा रक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, मुकूंद गिते, राजेश वाघमोडे या चार जणांना हर्सुल कारागृहात हलवण्यात आले आहे.
एकीकडे वाल्मीक कराड व सुदर्शन घुले याला मारहाण झाल्याची चर्चा होत असताना दुसरीकडे महादेव गीते याच्यासह अन्य चार कैद्यांना छ.संभाजीनगरच्या हार्सुल कारागृहात हलवण्यात आले. त्यांना कारागृहाबाहेर आणण्यात आल्यानंतर उपस्थित काही जणांसमोर त्यांनी आम्हाला वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरुन मारहाण होत असून कारागृहातील सीसीटीव्ही चेक करा, अशी मागणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे जिल्हा कारागृहाची लक्तर टांगली गेली आहेत.

वाल्मीक कराडच्या मुस्काटात मारली, सुदर्शन घुलेही बदडला; कारागृहात राडा

0

बीड — जिल्हा कारागृहात वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आहेत, त्याच जेलमध्ये राडा झाला आहे. या भांडणांमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याची माहिती आहे.
जेल प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीही माहिती दिलेली आहे. मात्र वाल्मिक कराडला महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांकडून मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. दोन गटात राडा झाला त्यामुळे जेलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

महादेव गित्ते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराडने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवल्याचा राग असू शकतो, अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे. लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार कराडने केलेले आहेत. त्यामुळे चार दोन झापडी मारल्याच ते म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना अमरावती आणि नागपूरच्या जेलमध्ये हलवावे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. जेलमध्ये राडा झाल्याच्या बातमीला सुरेश धस यांनी एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे. जेलमध्ये मारहाण होत असेल तर जेल सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळी नाष्ट्याच्या वेळी गित्ते आणि आठवले हे दोघे कराडच्या अंगावर धाऊन गेले. त्यावेळी सुदर्शन घुले तिथेच होता. तो मध्ये पडला, त्यामुळे महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराडसह सुदर्शन घुलेला झोडपल असल्याची माहिती मिळत आहे. जेल प्रशासनाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

पा’ठक’ साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का? शेतकऱ्याच्या प्रश्नाने जिल्हाधिकारी हडबडले!

0

चौसाळा — जिल्हाधिकारी अविनाश पाठक चौसाळा येथे महाराष्ट्र बँकेच्या शाखा उद्घाटनाला आले असताना चौसाळा परिसरात पवन ऊर्जा कंपन्यांच्या टॉवर लाईनच्या कामाची पाहणी त्यांनी केली. अर्धवट काम पाहताच लवकर तारा ओढून घ्या असा आदेश देताच एका शेतकऱ्याने पुढे येत साहेब आमची कैफियत ऐका! असं म्हणत पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का असा प्रश्न शेतकऱ्यांने विचारताच जिल्हाधिकारी हडबडल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह शेतकरी उभा करू लागल्याचे पाहायला मिळत आहे.
जनता आणि शासन यांचा समन्वय साधून विश्वासाच नातं‌ तयार करत कायदा सुव्यवस्था स्थापन करताना न्याय भूमिका घेण्याची अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते. मात्र या सगळ्या गोष्टीला बीड जिल्ह्यात सुरुंग लावण्याचे काम जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. पवन ऊर्जा ,सौर ऊर्जा कंपन्यांची काम मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात केली जात आहेत. हा विकासाचा भाग असला तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत न्याय भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी कधीच घेतली नाही. कायदा सुव्यवस्था फक्त कंपन्यांच रक्षण करण्यासाठी आहे. शेतकरी हा कायदा सुव्यवस्था बिघडवणारा आहे अशी प्रतिमा निर्माण करत आदेशांची सरबत्ती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनावर केली. पवनचक्की, सौरऊर्जा प्रकल्प उभा करताना संपादित जमीनीचा मावेजा शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळाला आहे की नाही हे पाहण्यासाठी स नियंत्रण समिती स्थापन करण्याचे निर्देश असताना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना कंपन्यांच्या आर्थिक खळखळाटा पुढे गरज वाटली नाही. त्या दिशा निर्देशांच पालन त्यांनी केलं नाही. परिणामी बाधित शेतकऱ्यांना मावेजा व्यवस्थित मिळाला नाही. शेतकऱ्यांना दांडगाई करून धमकावणे, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देणे, वेळप्रसंगी ठाण्यात नेऊन डांबणे यासारख्या अनैतिक मार्गाचा वापर कंपन्यांनी केला.
या उपरही एखादा शेतकरी स्वतःच्या शेतात कंपनीला पाय ठेवण्यास मज्जाव करत असेल तर पोलीस यंत्रणेचा वापर करून एखाद्या दहशतवाद्याला पकडायला पोलीस यंत्रणा आली आहे की काय? अशी वातावरण निर्मिती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बनली गेली. शेवटी “राजा बोले दल हाले” याचा प्रत्यय येऊ लागला. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी देखील बऱ्याच ठिकाणी कंपन्यांना संरक्षण देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र शेवटी” बॉस इज ऑलवेज राईट” असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन त्यांनाही करावं लागलं.
सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेश कर यांनी आंदोलन केले. माध्यमांनी बोंब केली. पण याचा आवाज जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर गेलाच नाही. कंपन्यांच्या आर्थिक खनखनाटाने जिल्हाधिकाऱ्यांचे कान बहिरे झाले. शेतकऱ्यांची आर्त हाक त्यामुळे ऐकू आली नाही परिणामी जिल्ह्यात रझाकारी सुरू असल्याचं चित्र निर्माण करण्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीने यश आलं. शेतकऱ्यांनी मावेजा मिळावा यासाठी अर्ज विनंत्या केल्या पण त्याची दखल देखील जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नाही. शेवटी शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी आपल्याला न्याय देतील अशी आशा मावळली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अशाच मस्तवालपणाचा परिणाम जनतेचा जिल्हाधिकाऱ्यांवरचा विश्वास उडाला. त्यातच प्रकल्प बाधितांना मावेजा मिळाला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त होण्यासारखे प्रकार घडले त्यामुळे शेतकरी विरोधी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांची आहे अशी प्रतिमा अविनाश पाठक यांची निर्माण झाली. त्यामुळे जिल्हाधिकारी चौसाळा येथे गेल्या सप्ताहात ( 20 मार्च रोजी )महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा उद्घाटनाला आले होते. यावेळी त्यांनी टॉवर लाईनचे काम कुठपर्यंत आले आहे याची स्पॉटवर जाऊन माहिती घेतली. अर्धवट काम दिसताच तात्काळ काम करा असा आदेश देखील दिला. परिणामी चिडलेल्या शेतकऱ्यांनी ” पाठक साहेब तुम्ही कंपनीचे दलाल का?”शेतकऱ्यांची बाजू कधी ऐकणार?
असा प्रश्न विचारला. या प्रश्नाने मात्र जिल्हाधिकारी हडबडले, थोडेसे भानावर आले. भानावर येताच तुमच्या मावेजाचा प्रश्न मिटवून टाकू असं तोंडी बोलून शेतकऱ्यांच्या “तोंडाला पान पुसली” त्यानंतर देखील सनियंत्रण समिती स्थापन करून न्याय पद्धतीने मावेजा वाटप करावा याची सद्बुद्धी जिल्हाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या धृतराष्ट्रा सारख्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन प्रशासनाची विश्वासार्हताच धोक्यात आली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

कुंपणच शेत खातय; शेतकऱ्यांना वाली नाही

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने दि.२१ आक्टोबर २०२३ रोजी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संनियंत्रण समित्यांची स्थापना केली असुन पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित असलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासणे, जमिनीच्या व्यवहारांमध्ये योग्य व्यावहारिक मोबदला मिळत असल्याबाबत खात्री करणे.पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत समितीकडे आलेल्या तक्रारींची चौकशी करून त्यावर योग्य कारवाई करणे.शेतकरी आणि ग्रामस्थ आणि प्रकल्प विकासक यांच्यामध्ये समन्वय ठेवणे आदि त्यांची कामे असुन जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष तर पोलिस अधीक्षक सदस्य आहेत.मात्र या समित्या केवळ कागदावर कार्यरत असुन जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक पवनचक्की कंपन्यांचीच पाठराखण करत असुन पिडीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. चौसाळ्यात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नात गैर काहीच नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह का उभे करू नये?
जिल्हा प्रशासनाची भूमिका कुंपनच शेत खातंय
       डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर,                  सामाजिक कार्यकर्ते

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे निलंबन; कोविड काळातील भ्रष्टाचार भोवला

0

मूंबई : बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचे निलंबन केले जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली आहे. कोविड काळात घोटाळा केल्याचा भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करावी अशी घोषणा केली आहे.

कोविड काळात बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला. या घोटाळ्यात डॉ. थोरात दोषी आढळले होते. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची बीडहून नाशिकला बदली करण्यात आली. परत पुन्हा बीड जिल्ह्यात बदली का? दोषी असतील तर डॉ अशोक थोरात वरती गुन्हा दाखल करणार का? असा सवाल नमिता मुंदडा यांनी केला. तसेच प्राथमिक चौकशीमध्ये डॉ. अशोक थोरात औषध खरेदीमध्ये प्रथमदर्शनी अनियमित्ता आढळून आली, असे भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.

या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधिमंडळात निलंबन करण्यात येईल तसेच तीन महिन्यात विभागीय चौकशी पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. या मध्ये जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा आरग्यमंत्र्यांनी केली.

कोण आहेत डॉक्टर अशोक थोरात?

डॉ. अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. त्यानंतर पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत. या पूर्वी देखील बीडमध्ये ते जिल्हा शल्य चिकित्सक होते. दरम्यान, मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अशोक थोरात यांनी दिला होता. अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेल चर्चेत आले होते. त्यानंतर डॉ. अशोक थोरात यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

“सह्याद्री माझा इफेक्ट: खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे पोलीस निलंबित!

0

बीड — खोक्या उर्फ सतीश भोसले याला अमानुष मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यावेळी कारागृह आवारात पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं वृत्त “सह्याद्री माझा” ने व्हिडिओसह प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे जाहीर करून कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर अमानुष मारहाणी सोबतच त्याच्या घरात वन्य जीवांची हत्या केल्याचे अवशेष सापडले. मारहाण प्रकरणात त्याला शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आले. याबरोबरच खंडीभर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला उपस्थित होते. खोक्याचे जेवण झाल्यानंतर मिनरल वॉटर हातावर ओततताना कार्यकर्ता दिसत आहे. राजा महाराजाला शोभेल अशी बडदास्त त्याची ठेवण्यात आली होती. या संदर्भातला कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने सह्याद्री माझा ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबनाच्या आदेश दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे ‌