Home Blog Page 79

तिरुपती लाडूसाठी २५० कोटींचं बनावट तूप! दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा अटकेत

0

मुंबई — तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या प्रसिद्ध लाडूसाठी वापरले जाणारे तूप शुद्ध नसून बनावट असल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भोले बाबा डेअरी नावाच्या कंपनीने तब्बल पाच वर्षांपासून (२०१९ – २०२४) तिरुमला तिरुपती देवस्थानला  २५० कोटींचे बनावट तूप पुरवल्याचं सीबीआय – एसआयटी तपासात स्पष्ट झालं आहे.याप्रकरणी दिल्लीतील व्यापारी अजय कुमार सुगंधा याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या डेअरीने खऱ्या दुधाऐवजी पाम ऑईल आणि केमिकल्सपासून बनवलेलं मिश्रण तूप म्हणून पुरवलं. हे मिश्रण सुगंध आणि रंगासाठी कृत्रिम पदार्थ वापरून तूपासारखं दिसेल अशा पद्धतीने तयार केलं जात होतं. सीबीआय – एसआयटीने केलेल्या लॅबोरेटरी चाचणीत उघड झालं की तूपामध्ये दुधातील कोणतंही फॅट नव्हतं. त्यामुळे हे पूर्णपणे बनावट असल्याचं सिद्ध झालं.

सध्या या प्रकरणात भोले बाबा डेअरीचे मालक, पुरवठा साखळीतील काही अधिकारी आणि तिरूमला तिरूपती देवस्थानच्या  खरेदी विभागातील काही कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. सीबीआय – एसआयटीने आर्थिक अनियमितता, फसवणूक आणि धार्मिक भावनांचा अपमान या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

या घोटाळ्यामुळे लाडू प्रसादाची शुद्धता आणि श्रद्धाळूंचा विश्वास दोन्ही प्रश्नचिन्हाखाली आले आहेत. तिरूमला प्रशासनाने सांगितलं की, या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि पुढे सर्व तुपाच्या बॅचेसची स्वतंत्र लॅबमध्ये चाचणी केली जाईल.सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एस आय टे ने सत्य समोर आणले आहे. दोषींना कायद्याचा फटका बसणार आहे. हे केवळ भेसळ प्रकरण नाही, तर हिंदूंच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे, आपल्या विश्वासाचा अपमान आहे आणि भारताच्या आत्म्याविरुद्धचा गुन्हा आहे. पवित्रतेशी खेळ करणाऱ्यांना आता त्याची किंमत चुकवावीच लागेल.

शिवसेना अन् धनुष्यबाणाचा निकाल निवडणुकी पूर्वीच — असीम सरोदे

0

मुंबई — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात दाखल याचिके संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.मागील काही महिन्यांपासून ही याचिका सुनावणीच्या प्रतिक्षेत आहे. आता त्यावर 12 नोव्हेंबरला बुधवारी सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू लढविणारे वकील असीम सरोदे यांनी ही माहिती सोशल मीडियातून दिली आहे. सरोदे यांची सनद महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने तीन महिन्यांसाठी रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही कोर्टात केस लढता येणार नाही. कोर्टाविषयी केलेल्या विधानावर ठपका ठेवत असोसिएशनने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, सरोदे यांनी सोशल मीडियातून दिलेल्या माहितीनुसार, धनुष्यबाण पक्षचिन्ह प्रकरणी 12 नोव्हेंबरला 19 नंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या बेंच समोर सुनावणी होईल, असे कामकाज यादीवरून दिसते. पक्षचिन्ह आणि अपात्रतेबाबत याचिकांची सुनावणी एकत्र होईल, असेही दिसते.
असीम सरोदे यांनी याचिकेवरील सुनावणी लांबत असल्याने नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुन्हा पुन्हा तारीख मिळणे व या संविधानिक विषयांवरील सुनावणी पुढे ढकलली जाणे दुःखद आहे. सर्वोच्च न्यायालयात वारंवार तारीख मिळणे याचा अर्थ कोणतीच न्यायिक-शिस्त नसणे असा आहे.

‘तारीख पे तारीख’ च्या ऐवजी ‘तारीख पे न्याय’ असे झाले तर न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास टिकून राहील. काय द्यायचा तो निर्णय द्या. निकाल देतांना सकारण आणि स्पष्टीकरणांसह द्यावा, हे न्याय तत्व नक्की पाळा, अशी अपेक्षा असीम सरोदे यांनी सोशल मीडियातील पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबतही उद्याच सुनावणी होण्याची शक्यता सरोदे यांनी व्यक्त केली आहे. ही याचिका ठाकरेंच्या सेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पात्र ठरविल्याविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदेंच्या सेनेकडूनही ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरविल्याविरोधात नार्वेकरांच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे.

सर्वसामान्य लोकांची कामे करायचीत असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा — आ.संदीप क्षीरसागर

0

नगरपालिकेच्या अनुषंगाने आ.क्षीरसागरांनी घेतली पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक

बीड —  सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठीच आपण निवडणूक लढत आहोत. शहरातील नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावर आपल्याला काम करायचे आहे. निवडून आल्यानंतरही आपल्याला लोकांची कामे करायचे आहेत, असा निर्धार करून निवडणुकीला सामोरे जा. आपल्या पक्षाच्या पुरोगामी विचारधारेनुसार आपल्याला काम करायचे. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले. मंगळवारी (दि.११) रोजी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी संवाद साधताना ते बोलत होते.


नगरपालिका निवडणूक प्रक्रिया चालू झाली आहे. या निवडणुकीतील रणनीती आखण्यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि.११) रोजी राष्ट्रवादी भवन बीड, येथे आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार यांनी आपापली मते मांडली. दरम्यान हि बैठक केवळ चर्चा करण्यासाठी असतानाही, या बैठकीला अक्षरशः सभेचे स्वरूप आले. या बैठकीत गर्दीने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. जनतेच्या आशा-अपेक्षांचा वेध घेत, विकास आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय लिहिण्याची तयारी सर्वांना सोबत घेऊन केली आहे असे आ.क्षीरसागर यांनी सांगितले. या बैठकीस माजी आ.सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

न.प. निवडणुकीतच भाजपच्या नौकेला पाडलं भोक; अशोक लोढांच धार्मिक गोष्टीत नाक खूपसून दिसलं माणुस की धरून‌ ठोक

0

बीड शहर ठाण्यात गुन्हा दाखल

बीड — शांतीचा संदेश देत “जिवो जीवस्य जीवनम्” म्हणजेच मानवी जीवनात समानता, सहाय्य आणि परस्पर आदराचे महत्त्व शिकवत सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या जैन धर्मगुरू समोरच भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा यांनी गुंडगिरी करत एकाला मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न.प‌.निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप शहराध्यक्षांने धार्मिक कार्यक्रमात घातलेल्या धुडगुसामूळे चर्चेला उधाण आले आहे.
सत्ता, पद, पैसा आला की माणूस किती मस्तवाल होतो. याची प्रचिती आज आली गेली.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या जैन धर्मगुरूंचा प्रवचन कार्यक्रम बीड शहरात सध्या सुरू आहे. मंगळवार दि 11 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फुलाई नगर भागात जैन मुनिं च्या प्रवचन कार्यक्रमास जवळपास 50 ते 60 लोकांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम मंगलमय वातावरणात शांततेत सुरू होता. एका संस्थेच्या माध्यमातून गरीब व गरजू व्यक्तींना मदत करण्याच्या कामासंदर्भात चर्चा सुरू झाली.या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा देखील उपस्थित होते.यावेळी अशोक लोढा यांचा कुठलाही संबंध नसताना तुम्ही फार मोठे लागून गेला का? तुम्ही लोकांना मदत काय करता? यासारखे प्रश्न उपस्थित करून अरेरावी ची भाषा वापरण्यास सुरुवात केली. यावेळी जितेंद्र सुखराज बोरा वय 50 वर्ष व्यवसाय व्यापारी रा. सारडा रेसिडेन्सी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. धार्मिक कार्यक्रमात असा मारहाणी सारखा प्रकार नको कार्यक्रम शांततेत व्हावा यासाठी म्हणून जितेंद्र बोरा यांचे मोठे बंधू पारस बोरा हे देखील हस्तक्षेप केला. पारस बोरा यांना देखील ढकलून देत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी जितेंद्र बोरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात अशोक लोढा विरोधात बीएनएस कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भारती करत आहेत.दरम्यान भाजप सारख्या संस्कारक्षम पक्षाच्या शहराध्यक्षांनीच धार्मिक कार्यक्रमात असा धुडगूस घातला या बातमीनेच सर्वत्र खळबळ माजली आहे.ऐनन.प निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा घेण्यास नकार

0

मुंबई — सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच ही बाब उघड सांगितली. त्या म्हणाल्या की, काही विश्वसनीय सूत्रांकडून “माझा गेम केला जाणार” असा गंभीर इशारा मिळाल्याची माहिती त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, “मी अमेरिकेत असताना मला एका सीनियर अधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट मिळाले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे. काही लोकांना वाटतंय की ‘यांच अति होतोय, यांचा गेम करायचाच’, अशा चर्चा त्यांच्या कानावर आल्या आहेत.” त्या पुढे म्हणाल्या की, “मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं, असे स्पष्ट निर्देश मला देण्यात आले.”

या प्रकरणाची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिली असून त्यांनी तत्काळ राज्य सरकारला याबाबत सावधगिरीचे निर्देश दिल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पुढे उघड केले की, “सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता.”

धमकीचे गांभीर्य लक्षात घेता अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षा घेण्याचा सल्ला दिला असला तरी दमानिया यांनी ती नाकारली आहे. त्या म्हणाल्या, “मला सिक्युरिटी घ्यायला सांगितलं आहे. मी एकदा नाही, दोनदा लिहून दिलं आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी सिक्युरिटी घेणार नाही. मी माझं काम सुरू ठेवणार.”

दिल्लीचा लाल किल्ला परिसरात कार मध्ये स्फोट; नऊ जणांचा मृत्यू

0

नवी दिल्ली — राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात उभ्या असलेल्या कार मध्ये झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला गेला. बाजूला उभ्या असलेल्या सात ते आठ कारला यामुळे आग लागली. त्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले. ही घटना सायंकाळी 6:45 च्या सुमारास घडली.


या स्फोटामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरलं आहे. दिल्ली पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

मिळालेली माहिती अशी, की दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबर ) संध्याकाळी लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या कार मध्ये .
भीषण स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की स्फोटानंतर या पार्किंगमध्ये असलेल्या सात ते आठ गाड्यांनी पेट घेतला, कार जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून, हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली पोलिस आणि बॉम्ब शोध पथक त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. तपास सुरू करण्यात आला आहे. गॅस सिलिंडरचा किंवा कारच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे.

भावा विरोधात विधानसभेला काम करणारे हेमंत क्षीरसागर भाजपात काय दिवे लावणार ?

0

बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांनी एकाकी लढा दिला. त्यात विजय देखील मिळवला. मात्र त्यांचे सख्खे भाऊ हेमंत क्षीसागर यांनी त्यांच्यापासून चार हात लांब रहात चुलत भाऊ योगेश क्षीरसागर यांना मदत केली.त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.हेच हेमंत क्षीरसागर आता भाजपमध्ये जाऊन काय दिवे लावणार? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे.
संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात वडील रवींद्र क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, चुलते जयदत्त क्षीरसागर यांनी एकत्रित मोट बांधत योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी आपली ताकद विधानसभेत उभी केली. या एकाकी लढाईत संदीप क्षीरसागर यांनी विजय अक्षरशः खेचून आणला. बीडची राजकारणाची समीकरणं आता पूर्वीची राहिली नाहीत हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. त्या उलट योगेश क्षीरसागर यांनी कुटुंबीयाची मोट बांधत भक्कम पाठिंबा या निवडणुकीत मिळवला. हेमंत क्षीरसागर यांनी देखील जी काही थोडीफार ताकद होती ती पणाला लावण्याचे काम केलं. मात्र तरीही बदललेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे पराभव वाट्याला आला गेला.सामाजिक विजनवासातून हेमंत क्षीरसागर यांनी थेट आता नगरपालिका निवडणुकीत भाजपमधून मैदानात उतरायचा निर्णय घेतला. बीडमध्ये भाजपची परिस्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. योगेश क्षीरसागर असो की संदीप क्षीरसागर या दोघांना जितका इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद मिळत आहे. तशी स्थिती भाजपची नसल्याचं सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत मागील पंचवार्षिक काळात बीड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राहिलेले हेमंत क्षीरसागर पुन्हा भाजपमधून कितपत उभारी घेऊ शकतील याबाबत प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. हेमंत क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशाने मात्र गेल्या चाळीस वर्षापासून नगरपालिकेत एक हाती सत्ताधीश राहिलेल्या क्षीरसागर घराण्यामध्ये पडलेली ही फुट संदीप क्षीरसागरंपेक्षा योगेश क्षीरसागर यांना नुकसानकारक ठरेल असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे.

न.प.निवडणुकीत आधी ओबीसींना प्राधान्य अन्यथा मगच…! — शरद पवार

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीत नगरपरिषद निवडणुकीत मूळ ओबीसींना प्रथम प्राधान्य देऊन नंतरच कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवाराचा विचार करावा असे स्पष्ट आदेश शरद पवार यांनी दिले आहेत.
या निर्णयामुळे ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला असून, मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्रधारकांना मात्र पक्षातर्फे उमेदवारी मिळणं कठीण झालं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांनी आमदार-खासदारांना स्पष्ट सूचना दिल्या की, “जिथे मूळ ओबीसी उमेदवार उपलब्ध असेल, तिथे त्यालाच तिकीट द्या. केवळ जिथे मूळ ओबीसी मिळणारच नाही, तिथेच पर्याय म्हणून कुणबी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुकाला संधी द्या.” याशिवाय बैठकीत पुन्हा एकदा “कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको” असा निर्धार व्यक्त झाला. यापूर्वीच्या बैठकीत पक्षानं “जास्तीत जास्त तरुण-नव्या चेहऱ्यांना संधी” असा निर्णय घेतला होता. आता ओबीसी प्राधान्य आणि तरुण उमेदवार अशी दुहेरी रणनीती अवलंबली आहे.

हैदराबाद गॅझेटमुळे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं असलं, तरी ओबीसी समाजाचा “मराठा आरक्षण ओबीसीमधून नको” असा विरोध कायम आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटानं ओबीसींच्या बाजूनं ठाम भूमिका घेऊन समाजाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्यातील नगर पंचायत-नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आता ओबीसींचा ‘मुख्य आधार’ आणि तरुणांचा ‘नवा चेहरा’ घेऊन मैदानात उतरणार आहे. पवारांच्या या दोन मोठ्या निर्णयांमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणंही बदलणार असून, भाजप-महायुतीला थेट आव्हान मिळणार हे निश्चित झालं आहे.

सर्व्हेक्षण पथक येणार म्हणताच बुड झटकून कर्मचारी बस स्थानक स्वच्छतेच्या कामाला लागले 

0

बीड — शहरातील नव्या मध्यवर्ती बसस्थानकातील अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची वानवा, पत्र्याच्या शेडमधील बंद शौचालये, बंद अवस्थेतील पथदिवे आणि पावसाळ्यात छताला होणारी गळती या कारणांमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेश) यांनी थेट पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार देत आंदोलनाचा इशारा दिला होता.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळातर्फे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबविण्यात येत आहे. बीड विभागातील ‘ब’ आणि ‘क’ वर्ग बसस्थानकांचे तिसरे सर्व्हेक्षण १० ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, नाशिक येथील मुल्यांकन समिती हे सर्व्हेक्षण करणार आहे.

या पार्श्वभूमीवर, एरव्ही झोपी गेलेले बीड आगार प्रशासन आता जागे झाले असून स्थानक परिसराची धूळ झटकण्यासाठी स्वच्छतेच्या कामाला लागले आहे. स्वच्छतागृहांची सखोल साफसफाई, परिसरातील गवत काढणे आणि पथदिव्यांची दुरुस्ती अशी कामे गतीने सुरू आहेत.

विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी बीड, गेवराई, परळी, माजलगाव, अंबेजोगाई, धारूर, पाटोदा आणि आष्टी येथील आगार प्रमुखांना स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व्हेक्षण समितीला सादर करण्यासाठी मास्टर कंट्रोल चार्ट, नोंदवही, बसस्थानक भेट नोंदवही आणि इतर संबंधित कागदपत्रांची तयारी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही स्वच्छता केवळ सर्व्हेक्षण समितीच्या भेटीपूर्वीचा दिखावा आहे का? की आता पुढेही नियमितपणे बसस्थानक स्वच्छ ठेवले जाणार आहे?”
 डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर

न.प.निवडणूक: राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळावी यासाठी मुलाखतीला इच्छुकांची तोबा गर्दी

0

बीड — शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रविवारी (दि.९) नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी दोनशेहून अधिक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या मुलाखती रात्री उशिरापर्यंत सुरूच होत्या. पक्षाला मिळालेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी निवडणुकीत पक्षाची ताकद दाखवणारा ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर विशेष लक्ष असणार आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पक्षाच्या मुलाखत मंडळात जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, राज्य प्रवक्ते भागवत तावरे, युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते, शहराध्यक्ष अमर नाईकवाडे, अशोक हिंगे, फारूक पटेल यांचा समावेश होता. या मंडळासमोर रात्री उशिरापर्यंत नगरसेवक पदासाठी दीडशेहून अधिक तर नगराध्यक्ष पदासाठी १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. याप्रसंगी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रज्ञा खोसरे, तालुकाध्यक्ष ॲड.राजेंद्र राऊत, कार्यालय चिटणीस महादेव धांडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगराध्यक्ष पदासाठी १६ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी ३५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले होते. त्यापैकी १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये प्रणिती राजेंद्र पवार, सारिका विकास जोगदंड, पूजा भीमराव वाघचौरे, मीना भिमराव वाघचौरे, पूजा गणेश वाघमारे, क्रांती बाबुराव वडमारे, वंदना शरद साळवे, मीना अशोक वाघमारे, क्रांती प्रेम चांदणे, सविता मनोज मस्के, संगीता सुरेश वाघमारे, लता अविनाश शिरसट, छाया अशोक वीर, सुनिता उत्तम पवार, सुप्रिया माणिक वाघमारे, राधा चंद्रकांत थोरात यांचा समावेश आहे.

पक्ष कार्यालय परिसरात तोबा गर्दी

मित्रनगर चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत मुलाखती सुरूच होत्या, ही प्रक्रिया संपवून जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण हे पक्षश्रेष्ठींना अहवाल सादर करणार होते.

माहोल बदलने वाला है! मुस्लिम उमेदवारांकडून जोरदार तयारी

बीड शहरात सुमारे ४० टक्के म्हणजेच तब्बल ६५ हजार मुस्लिम मतदार आहेत. आजवर या मतदारांना गृहीत धरून मते घेतली गेली; मात्र यापुढे तसे होणार नाही. अजितदादा पवार यांची भूमिका आणि विकासाचा मुद्दा लक्षात घेता मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत राहणार असल्याचे अनेक मुस्लिम बांधवांनी स्पष्ट केले.