बीड — बैलजोडी चोरीला गेली आहे असा बनाव तयार करून पोलिसात खोटी तक्रार देणाऱ्या पिंपरखेड येथील दोन भावा विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. जिल्ह्यात खोट्या तक्रारी देऊन पोलिसांना कामाला लावण्याचे प्रकार उघडकिस आल्यानंतर पोलिसांनीही फिर्यादीवरच गुन्हे दाखल केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसला होता. दरम्यान वडवणी पोलिसांमध्ये पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. पिंपरखेड येथील संपत त्रिंबक निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांनी दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली. चोरीची घटना घडून इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाहीत तसेच बैल जोडी संदर्भात आर्थिक व्यवहार काही होता का? अशी विचारणा देखील एपीआय वर्षा व्हगाडे यांनी वारंवार तक्रारदाराकडे केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता सदर बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर, राहणार भावठाणा , तालुका आंबेजोगाई,बीड या शेतकऱ्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास समक्ष पोलीस ठाणे येथे बैल जोडीसह आणले. यावेळी श्रीकांत मगर यांनी ही बैल जोडी बाबाराव डाके, राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, याचे कडून विकत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री टकारवाडी,येथे जावून बाबाराव डाके यांचेकडे चौकशी केली असता, त्याने ही बैल जोडी तक्रारदार संपत निपटे
राहणार पिंपरखेड,यास पैसे देऊन विकत घेतली, असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैलचोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तक्रारदार संपत नीपटे व त्यांचे भाऊ मदन निपटे यांचे विरोधात पोलीस ठाणे वडवणी येथे पोलीस अंमलदार नितीन काकडे यांचे सरकारतर्फे फिर्यादीवरून “सर्व परिस्थिती माहिती असताना देखील पोलिसांचे कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभूल करने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी श्रीकांत मगर या शेतकऱ्यास ही बैलजोडी परत केल्याने त्याने त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले व कोणत्याही नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू नये, असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहेत.
दीड लाखाच्या बैलचोरीचा बनाव अंगलट, तक्रारदारच बनला आरोपी
दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडला
सोने चांदी नगदी सह साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त
बीड — दिवसाढवळ्या घरफोडीसह दरोडा चोरी खून यासारख्या 20 हून अधिक गुन्हे दाखल असलेला अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. त्याच्याकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड झाले असून चोरीचा साडेपाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला तसेच यापूर्वी मकोका अंतर्गत कारवाई झालेला आरोपी संदीप ईश्वर भोसले रा. बेलगाव ता. कर्जत जि.अहिल्यानगर हा गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन फाटा येथील हॉटेलवर जेवणाचे पार्सल घेण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांना मिळाली. तात्काळ त्यांनी पोउपनि. श्रीराम खटावकर यांची टीम रवाना केली. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला असता संदीप भोसले हा जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आला. मात्र पोलिसांचा संशय आल्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ झडप घालत त्याला जेरबंद केले.परंतु संदीप भोसले याला मोटार सायकल वरून घेऊन आलेला भगवान ईश्वर भोसले याने उसाच्या शेताचा आधार घेत पळून जाण्यात यश मिळवले. पकडलेल्या संदीप भोसले ला पोलिसांनी विचारणा केली असता पिंपळनेर, नेकनूर व शिरूर भागात आपला भाऊ भगवान भोसले च्या मदतीने दिवसा घरफोडी केल्याचे कबूल केले. आरोपी संदीप भोसले याच्याकडून चोरून नेलेल्या मुद्देमाला पैकी चार लाख 41 हजार 100 रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने व नगदी तसेच गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली. पुढील तपास कामी पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पिंपळनेर पोलीस ठाण्यात संदीप भोसले याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत पोलीस उपाधीक्षक सचिन पांडकर, पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल,पोनि श्रीराम खटावकर, पोह. सोमनाथ गायकवाड अशोक दुबाले बाळू सानप राहुल शिंदे विकास राठोड अंकुश वरपे आश्पाक सय्यद मनोज परजणे विकी सुरवसे नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कामगिरी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस करत आहेत.
15 लाखाची लाच घेताना लिपिकाला अटक; न्यायाधीशही अडकले
माझगाव — दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाने 15 लाख रुपयांची लाच स्वीकारली. याशिवाय लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना काॅल करून रक्कम स्वीकारू का विचारलं, त्यावर न्यायाधीशांनी देखील संमती दिली.यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव याला 15 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. तक्रारदाराच्या बाजूनं निकाल लावण्यासाठी क्लार्कने 25 लाखांची मागणी केली होती. त्यानं पैसे घेताच फोन लावला आणि न्यायाधीशांनीही ते घेण्यासाठी संमती दिली. आता या प्रकरणी न्यायाधीशांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.
तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीची जागा बळजबरीने ताब्यात घेतल्याचा वाद गेल्या 10 वर्षांपासून न्यायालयात चालू आहे. याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे पण केस दिवाणी सत्र न्यायालयात वर्ग केली होती. 9 सप्टेंबरला कोर्टात गेल्यावर लिपिकानं तक्रारदाराशी संपर्क साधला. यानंतर निकाल बाजूने लावण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी केली.
न्यायाधीशांच्या माध्यमातून निकाल तुमच्या बाजूने लावतो म्हणून २५ लाख मागितले. यातले १० लाख मला आणि १५ लाख न्यायाधीशांना द्यावे लागतील असं सांगितलं. यानंतर सतत कॉल करून पैशांची मागणी केली. पण इतके पैसे देणं शक्य नसल्यानं तक्रारदाराने थेट एसीबीकडे तक्रार केली.
लिपिक वासुदेव यानं शेवटी 25 ऐवजी 15 लाखांवर तडजोड केली. यासाठी सापळा रचून 11 नोव्हेंबरला त्याला अटक केली. अटकेनंतर वासुदेवनं न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी यांना कॉल करत लाचेची रक्कम स्वीकारल्याचं सांगितलं. न्यायाधीशांनी संमती दर्शवताच पोलिसांनी वासुदेवसह काझींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी न्यायाधीशांच्या अटकेसह घराची झडती घेण्यासाठी परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे
जमीन हरवलेल्या अशोक लोढांच्या हातात भाजपाची मदार; कसा मिळणार भाजपाला जनाधार?
बीड — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट वगळता भाजपची स्थिती दयनीय आहे. अशावेळी स्वतःची राजकीय जमिन हरवलेल्या अशोक लोढांच्या हातात निवडणुकीची मदार सोपवल्यामुळे दयनीय स्थितीत आणखीनच भर पडली आहे. आशा अवस्थेत भाजपाला नगरपालिकेत कितपत जनाधार मिळेल याबाबत मात्र शाशंकता व्यक्त केली जात आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणुकांमधून भाजप विजय मिळवत असला तरी बीडमध्ये मात्र फारशी परिस्थिती चांगली असल्याचं दिसत नाही. अनेक वार्डांमधून उमेदवार मिळेल की नाही याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातच बीड नगरपालिकेत क्षीरसागर घराण्याचं वर्चस्व राहिलेला आहे. अशावेळी इच्छुक उमेदवारांचा कल देखील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडेच आहे. विशेष म्हणजे शहराची जबाबदारी देखील भाजपने स्वतःचीच राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात दिली आहे. एक तर भाजपाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांची वाणवा त्यातच अशोक लोढा सारख्या माणसाच्या हातात निवडणूक सोपवली अथवा तसा निर्माण केलेल्या आभासामुळे या दयनीय परिस्थितीत आणखीनच भर पडली आहे. त्यातच पुन्हा जैन धर्मियांच्या धार्मिक कार्यक्रमात धुडगूस घालून जितेंद्र बोरा यांना केलेली मारहाण भाजपच्या संस्काराला न शोभणारी असल्याने बीड शहरातला शांततेचा स्वीकार करणारा वर्ग भाजपपासून या निवडणुकीत दुरावला जाण्याची शक्यता आणखी वाढली आहे. चौसाळा जिल्हा परिषदेतून प्रबळ उमेदवार लढतीला नसल्यामुळे नाविलाजास्तव म्हणून जनतेने अशोक लोढा यांच्या पदरात विजयाचं माप टाकलं होतं. विजयानंतर त्यांची पाच वर्षाची वाटचाल देखील विकासाच्या दृष्टीने निराशाजनकच ठरली. त्यामुळे त्यांच्या चौसाळा भागातच जनतेत फारसं स्थान राहिलेलं नाही.अशा राजकीय जमीन हरवलेल्या व्यक्तीच्या हातात भाजप नेतृत्वाने मदार सोपवली असेल तर ती भाजपाच्या भवितव्याला घातक ठरणारी असेल असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
वाळू माफियांचा महसूल पथकावर हल्ला; दोन आरोपींना अटक
आष्टी — हिंगणी जवळील सिना नदीपात्रात महसूल पथकाने छापा टाकल्यानंतर आणि बेकायदेशीर उत्खननात सहभागी असलेल्या वाहनांना जप्त केल्यानंतर वाळू माफियांनी एका महिला अधिकाऱ्यासह महसूल विभागाच्या पथकावर हल्ला केला आहे.बुधवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोरांनी एका अधिकाऱ्याला लोडर वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वेळीच वाचवले. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील हिंगणीजवळील सीना नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी त्यांच्या पथकासह छापा टाकला. कारवाईदरम्यान, एक बॅकहो लोडर मशीन, तीन ट्रॅक्टर, एक ट्रॅक्टर ट्रॉली आणि ३० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. ज्यांची एकूण किंमत ५१ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. जप्त केलेल्या वस्तू महसूल विभागाचे पथक तहसील कार्यालयात नेत असताना, आष्टी शहरात एका पांढऱ्या कारने त्यांचा मार्ग अडवला.
जप्त केलेली वाहने आणि साहित्य परत मिळवण्यासाठी तीन जणांनी गाडीतून उतरून तहसीलदार पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. एका हल्लेखोराने बॅकहो लोडर वाहन चालवणाऱ्या तलाठी सचिन तेलंग यांना ढकलले. तर, दुसऱ्याने साक्षीदार सूरज कोकणे यांना ढकलले. त्यानंतर त्यांच्या तिसऱ्या साथीदाराने लोडर वाहन थेट तेलंगकडे वळवून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तथापि, महसूल पथकाच्या इतर सदस्यांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी नेल्याने ते वाचले.
दरम्यान, दोन कारमधून आणखी चार जण घटनास्थळी पोहोचले आणि जप्त केलेले ट्रॅक्टर रोखण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या गोंधळात हल्लेखोरांनी तलाठी प्रवीण शिंदे यांच्याकडून जप्त केलेला एक ट्रॅक्टर जबरदस्तीने घेऊन जाण्यात यश मिळवले. पोलिसांच्या माहीतीनुसार, महसूल पथकाला अखेर बॅकहो लोडर वाहन आणि त्याचा चालक महेश आसावर यांना पकडण्यात यश आले. याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा;निवडणूक आयोगानं ‘पिपाणी’ चिन्ह वगळलं
मुंबई — लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना देण्यात आलेल्या “पिपाणी”(ट्रंपेट) या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा फटका बसला होता. दरम्यान शरद पवार यांनी या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हांच्या यादीतून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मशाल आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह कायम ठेवण्यात आले आहे. या निवडणुकी दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत राजकीय पक्षांसह मान्यता असलेल्या चिन्हांची यादी जारी केली आहे. त्यातून पिपाणी चिन्ह हटवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले होते. पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसला होता. अपक्षांना दिलेल्या पिपाणी चिन्हामुळे साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला होता. विधानसभा निवडणुकीतही पिपाणी आणि तुतारी चिन्हांमध्ये मतदारांचा घोळ झाल्याने 9 ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार पराभूत झाल्याचीही चर्चा त्यावेळी रंगली होती.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं…! पण असो! देर आए दुरुस्त आए..!” असे रोहित पवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळं असतं.
शेवटी, उशिरा सुचलेलं शहाणपण अस याला म्हणावं लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
अजित पवार व मुलांच्या 69 कंपन्यांचा पर्दाफाश — अंजली दमानिया
मुंबई — महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार विरोधात वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यामधील वादग्रस्त जमीन व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या कार्यक्षेत्रातच हा गैरव्यवहार झाला असल्याने चौकशी निष्पक्ष होणार नाही,” असा ठाम आरोप करत त्यांनी प्रशासनालाही धारेवर धरले आहे.
दमानिया म्हणाल्या, “मुंढवा येथील जमीन ही गायकवाड कुटुंबाची महार वतन जमीन होती. नोंदणी न झालेल्या पॉवर ऑफ ॲटर्नीवरून शितल तेजवानीने केलेला व्यवहार बेकायदेशीर आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती, पण त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे निलंबन व्हायला हवे.त्यांनी पुढे सांगितले की, “खोट्या कागदपत्रांच्या आधारे व्यवहार करणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकरणात सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे. ‘आमेडिया’ ही लिमिटेड लायबलिटी पार्टनरशिप कंपनी असून पार्थ पवार यांचा त्यात ९९ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे त्यांना सर्व माहिती असणे स्वाभाविक आहे. मात्र एफआयआरमध्ये त्यांचे नावच नाही, हे त्यांना वाचवण्याचे डावपेच असल्याचे स्पष्ट दिसते.
आता या प्रकरणावरून राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून, दमानिया यांनी अजित पवार-पार्थ पवार यांच्या ६९ कंपन्यांच्या सर्व जमीन व्यवहारांचा तपशील “मालिका स्वरूपात” उघड करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘पवार विरुद्ध दमानिया’ अशी नवी राजकीय लढाई पेटण्याची चिन्हे दिसत आहेत
ठाकरे पवारांचा पक्ष चिन्हाचा निकाल पुढच्या वर्षी
मुंबई — खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची तसेच राष्ट्रवादी शरद पवार यांची की अजित पवार यांची हा प्रश्न प्रलंबित असताना सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांमधील निवडणूक चिन्हाच्या वादावरील अंतिम सुनावणी 21 जानेवारी 2026 पर्यंत पुढे ढकलली आहे.
21जानेवारी 2026 रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल असे खंडपीठाने सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी असेही निर्देश दिले की दुसऱ्या दिवशी इतर कोणत्याही तातडीच्या बाबींची यादी करू नये, जेणेकरून आवश्यक असल्यास 22 जानेवारी रोजी सुनावणी सुरू राहू शकेल. शिवसेना (यूबीटी) कडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत उपस्थित राहिले तर दुसऱ्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी आणि एन.के. कौल उपस्थित राहिले.
शिवसेना (UBT) या याचिकेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर टीका करण्यात आली आहे. 2022 मध्ये शिवसेनेतील राजकीय संकटानंतर, निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने आदेश जारी केला.
उद्धव ठाकरे गटाचा असा युक्तिवाद आहे की केंद्रीय निवडणूक आयोग पक्षातील बहुमत निश्चित करण्याची खरी चाचणी घेण्यात अयशस्वी ठरला आणि निवडून आलेल्या आमदारांमध्ये शिंदे गटाची संख्या जास्त होती. सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाला हे प्रकरण प्रलंबित असताना शिवसेना (UBT) आणि मशाल जाळण्याचे चिन्ह वापरण्याचे निर्देश देणारी नोटीस जारी केली.
त्याचप्रमाणे, शरद पवार गटाने फेब्रुवारी 2024 मध्ये अजित पवारांना घड्याळ चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले. या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार गटाला तुतारी असलेल्या व्यक्तीला चिन्ह म्हणून वापरण्याची अंतरिम व्यवस्था दिली. अजित पवारांना त्यांच्या निवडणूक चिन्ह घड्याळाच्या वापराबद्दलचा खटला न्यायालयात प्रलंबित असल्याचा प्रचार करण्यास सांगितले होते.
घराच्या बांधकामासाठी बँकेतून काढलेले अडीच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केले
गेवराई — घराच्या बांधकामासाठी बँकेत जमा केलेली अडीच लाख रुपयाची रक्कम काढून घेऊन जात असताना हातातली पिशवी हिसकावून घेत अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरून पळ काढला या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
गेवराई तालुक्यातील सेलू येथील रहिवासी दादासाहेब प्रभाकर यादव हे मंगळवारी घराच्या बांधकामासाठी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियामधून 2 लाख 50 हजार रुपये काढून घेऊन जात होते. ते रस्त्याने जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका स्पोर्ट्स बाइकवरून दोन जण भरधाव वेगाने आले. या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दादासाहेब यादव यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून दोघांनी बीडच्या दिशेने सूसाट पळ काढला. भरदिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. हातातील पिशवीची चोरी होताच दादासाहेब यादव यांनी तातडीने गेवराई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली आहे. बीडकडे पळून गेलेल्या चोरट्यांचा आणि त्यांच्या स्पोर्ट्स बाइकचा शोध पोलिस घेत आहेत. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे गेवराई शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हत्येचा कट रचल्या प्रकरणी कांचन साळवीला अटक
जालना — मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी कांचन साळवी याला पोलिसांनी अटक केली आहे. दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा पीए असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता याच प्रकरणाचा अधिक तपास करत रात्री (11 नोव्हेंबर) उशिरा कांचन साळवी याला जालना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन, चौकशी अंती त्याला अटक केलं आहे.
अटकेपूर्वी कांचन साळवीने आपली बाजू मांडली होती, ‘गरडसाहेब माझा अर्था अर्थी संबंध नाहीये. जे पण काही चौकशी असेल, नार्कोटिक्स असेल, त्याला मी पूर्णपणे समोर जायला तयार आहे.’ या अटकेमुळे आता पोलीस तपासात साळवी, गरड आणि अमोल खुने यांच्यातील संबंधांची चौकशी केली जाईल.दरम्यान, कालच माध्यमांसमोर येऊन कांचन साळवी याने आपण अमोल खूनेला ओळखतो. मात्र दादा गरडशी आपला कसलाही संबंध नव्हता, तोच आपल्याला काही रेकॉर्डिंग देण्याच्या बदल्यात पैसे मागत होता, असा आरोप कांचन साळवी याने केला होता.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं आहे.











