Home Blog Page 77

स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक थांबणार का? सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

0

नवी दिल्ली — महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रक्रियेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सोमवार 17 नोव्हेंबर रोजी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला इशारा दिला आहे.
न्यायमूर्ती सूर्या कांत आणि ज्योमल्या बाघची यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, ‘कोर्टाच्या अधिकारांची परीक्षा घेऊ नका. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडता येणार नाही.

2022 च्या जे.के. बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीची स्थिती कायम राहील.’ या निर्णयामुळे 30 ते 40 नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षण 50 टक्के पेक्षा जास्त गेले असल्यास ते रद्द होण्याची शक्यता आहे.

कोर्टाने म्हटले की, राज्य सरकार आणि आयोगाने घटनापीठाच्या 6 मे 2025 च्या आदेशाचा विपर्यास करू नये. चालू निवडणूक प्रक्रियेचा हवाला देऊन मर्यादा ओलांडता येणार नाही. जर असे केले तर कोर्ट निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करेल आणि थांबवेल. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या विनंतीवर पुढील सुनावणी 19 नोव्हेंबरला ठेवण्यात आली असून, राज्य सरकारने दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे कोर्टाने सांगितले.

सुप्रीम कोर्टाने मे 2025 मध्ये ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली होती, पण आयोगाच्या अहवालानुसार 27 टक्के कोटा लागू करण्यासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ पाळणे आवश्यक आहे. यापूर्वी 2021-22 मध्ये कोर्टाने आरक्षण थांबवले होते, यामुळे निवडणुका रखडल्या. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या पुढे गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये गडचिरोली, हिंगोली, वर्धा, चंद्रपूर, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, नांदेड, नाशिक या जिल्ह्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
आता राज्य सरकारची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास

0

बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

बीड — अल्पवयीन मुलीचा 31 ऑगस्ट 2023 व एक सप्टेंबर 2023 रोजी लैंगिक छळ करणाऱ्या शिरूर तालुक्यातील नराधमास वीस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश – 1 एस एस घोरपडे यांनी दिली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी 2 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घरी आले. यावेळी नातवंडामध्ये भांडण झाली होती. यावेळी नातवाने थांब तू काल काय केले होते हे घरच्यांना सांगतो अशी बहिणीला धमकी दिली. यावेळी नातीला याबाबत विचारणा केली असता ती मोठ्याने रडू लागली. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने सांगितले की,31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दीड वाजता शाळा सुटून घरी आले असता आरोपी दारामध्ये बसलेला होता. त्यावेळी दुसऱ्या आरोपीने त्याच्या घरासमोर उभे राहून मला बोलावून घेतले. माझ्या अंगाला हात लावला. नेमका त्याच वेळी भाऊ बोलवायला आला त्याने दारातून आवाज दिल्यामुळे आरोपीने मला सोडले व मी घरी आले. पीडीतेने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 376 अ, 376 ड, भा द वि तसेच 5 (ग),6,11(1)12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डीपी कोळेकर यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 मा. एस एस घोरपडे यांच्या न्यायालयापुढे झाली. दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्ष तर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडिता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी यांचा पुरावा व सहा. सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम सहा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अन्वये दोषी ठरवून वीस वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ईकेवायसीला 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ

0

मुंबई –विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारकडून ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. या ईकेवायसीची मुदत उद्या संपणार होती.मात्रअद्यापही २ कोटी ५४ लाख महिलांपैकी केवळ दीड कोटी महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. एक कोटींवर महिलांचे ईकेवायसी अद्याप झालेले नसल्याने ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

राज्यात अडीच कोटी महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दरमहिना १५०० रुपये जमा केले जातात. अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असताना या योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी तसेच अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या महिलांकडून घेतला जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे अशा बोगस लाभार्थींना या योजनेतून वगळण्यासाठी ईकेवायसीची अट घालण्यात आली.

१८ नोव्हेंबरपर्यंत असलेली ही मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. ईकेवायसीत येणाऱ्या अडचणी, संगणकीय सर्व्हरमध्ये येणाऱ्या समस्यांमुळे ही मुदत वाढविण्यात येत असल्याचे मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ज्या महिलांच्या पती आणि वडिलांचे निधन झाल्यामुळे तसेच घटस्फोटीत असल्याने संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक होते. अशा महिलांनी संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

अनेक महिलांचे उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहेत. त्याचप्रमाणे अनेक महिला किंवा त्यांचे पती हे सरकारी सेवेत आहेत. त्यामुळे अशा महिला ईकेवायसीसाठी पुढे येत नसल्याचे महिला व बालविकास विभागाच्या निदर्शनास आले आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची प्रकरणे पुढे आली असून त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले. अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या अशा सुमारे ५० ते ६० हजार महिला या ईकेवायसीच्या माध्यमातून या योजनेतून वगळल्या जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढील 48 तास धोक्याचे, 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरणार!

0

पुणे — राज्यातील तापमान सतत घसरत असून थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात आणखी मोठी घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विशेषतः 16 नोव्हेंबर रोजी शीतलहरीचा इशारा दिल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढणार आहे. आज मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अधिकृतपणे ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप अधिक जाणवणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान साधारण 29 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकते, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. या सर्व भागांमध्ये आकाश पूर्णपणे स्वच्छ राहणार असून, दिवसभर गारवा टिकून राहील.

हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांनाही कोल्ड वेव्हचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही ठिकाणी तापमानात झपाट्याने घट होऊन थंडीसह कोरडे वातावरण जाणवेल. पुढील तीन दिवस या भागातील तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हाडं गोठवणारी थंडी वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी रात्री बाहेर पडताना आणि सकाळी लवकर बाहेर जाताना विशेष काळजी घ्यावी.

लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हवामान कोरडेच राहणार आहे. लातूरमध्ये दिवसाचे तापमान साधारण 28 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर रात्रीचे तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरू शकते. या भागांतही तापमानातील घट कायम राहिल्यामुळे थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.

एकूण पाहता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या सहा जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून शीतलहरीचा इशाराही दिला आहे. ही परिस्थिती किमान पुढील 48 तास कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर साधू हत्याकांड: मुख्य आरोपीचा ठपका ज्याच्यावर ठेवला त्यालाच भाजपने पक्षात प्रवेश दिला

0

पालघर — कोरोना काळात 2020 मधील एप्रिल महिन्यात पालघरच्या गडचिंचले येथे काही साधूंचा मारहाणीत मृत्यू झाला आणि संपूर्ण देश या घटनेने हादरला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपने हे प्रकरण चांगलेच लावून धरले होते. यावेळी  काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. या साधू हत्याकांडमध्ये काशिनाथ चौधरी हे मुख्य आरोपी असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात येत होते. पण, आता त्याच काशिनाथ चौधरी यांनी रविवारी (16 नोव्हेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण आता भाजपनेच केलेल्या आरोपांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उपस्थित करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक नेते काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात गंभीर आरोप केले होते. यावेळी भाजपने तत्कालीन ठाकरे सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर साधू हत्याकांड सहन झाले नसल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षफुटी केली. असे असतानाही रविवारी पालघर जिल्ह्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत चौधरी यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. खासदार हेमंत सावरा आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत डहाणू येथे चौधरी यांनी शक्तिप्रदर्शन करत कमळ हाती घेतले. काशिनाथ चौधरी यांच्यासोबत 3 हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

नेमकं प्रकरण काय?

16 एप्रिल 2020 रात्री सुरतच्या दिशेने निघालेल्या दोन साधू आणि त्यांचे वाहनचालक निघाले होते. दरम्यान, पालघरमध्ये काही गावांत लहान मुले पळवण्याची टोळी फिरत असल्याची बातमी पसरली होती. असे असताना गडचिंचले येथे जमावाने सुरतकडे निघालेल्या त्या दोन साधूंची गाडी अडवली आणि त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांना संशय आला आणि त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तब्बल 200 जणांना अटक केली होती. या प्रकरणात एकूण 108 साक्षीदारांचा जबाब नोंदवला गेला. त्यावेळी ठाकरे सरकारवर भाजपने गंभीर आरोप केले होते.

डॉ. योगेश क्षीरसागर भाजपात, बीडच्या न.प‌.निवडणुकीला कलाटणी

0

बीड —  नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर व डॉ.सारिका क्षीरसागर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे भाजपात रविवारी (दि.१६) प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तसेच राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. क्षीरसागर दाम्पत्याने घेतलेला निर्णय ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बीड नगरपालिकेच्या राजकारणाला डॉ. योगेश क्षीरसागर यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे कलाटणी मिळाली आहे. न प निवडणुकीत बीडमध्ये व्हेंटिलेटर वर असलेली भाजपा पक्षप्रवेशामुळे प्रबळ बनली आहे. याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपला याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.डाॉ. क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशावेळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण व पशुसंवर्धन पंकजाताई मुंडे यांनी क्षीरसागर दाम्पत्याचे भाजपात स्वागत केले. कार्यक्रमाला भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगरसेवक शुभम धूत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. भाजपमध्ये प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, “पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजाताई मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू होती. आता आम्ही भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार आहोत. बीड नगरपरिषदेसाठी जागा महिलांसाठी राखीव आहे, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एकत्रितपणे काम करतील.” राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणे होती, आता मोकळा श्वास घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले, “बाहेरचे लोक बीडमध्ये येऊन वेगवेगळ्या निवडणुकीत प्रयोग करत आले, परंतु बीडकरांनी ते सातत्याने हाणून पाडले. हा प्रयोगही बीडकर हाणून पाडतील आणि स्वाभिमान जपतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी भाजप संपूर्ण ताकद देणार

डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या संपूर्ण ताकद देणार असून खंबीरपणे पाठीशी उभा राहणार असल्याचा शब्द देखील त्यांनी दिला आहे.

माजलगाव: डांबलेल्या जळगावच्या 30 मजुरांची सुटका

0

माजलगाव — जळगाव जिल्ह्यातील सुमारे 30 ऊसतोड मजुरांना माजलगाव तालुक्यातील कवडगावथडी येथे डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मजुरांकडून जबरदस्तीने वेठबिगारी करून घेतली जात होती आणि त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
जळगावच्या मजुरांना डांबून ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळताच त्यांच्या निर्देशानुसार तातडीने मोहिम राबवून सर्व मजुरांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदार सखाराम तुकाराम सोनवणे वय 25 वर्ष, रा. धरणगाव जि. जळगाव, सध्या रा. कवडगावथड यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते पत्नी, दोन मुली, आई यांच्यासह मजुरी करून उपजीविका चालवतात. दसऱ्यानंतर दोन दिवसांनी ऊसतोड मुकादम बाळु मगरे रा. पाथरवाडा, जि. जालना यांनी त्यांचा भाऊ देवाजी सोनवणे याला ऊसतोडीसाठी नेले. त्यानंतर सखाराम यांना फोन करून “तुम्ही कवडगाव येथे लगेच या, नाही आलात तर तुमचा भाऊ सोडणार नाही.”अशी धमकी दिली. यानंतर सखाराम यांच्यासह कुटुंबातील ज्योती, संगीता, पद्माबाई, दिपाली, रुपाली सोनवणे यांसह इतर 8-10 जणांनी 6 ऑक्टोबर रोजी कवडगावथडी गाठले. तिथे आधीपासून देवाजी सोनवणे आणि इतर 20-22 जणांसह एकूण तीस मजूर डांबून ठेवलेले होते.तेथे सोमेश्वर आबा आणि त्याचा मुलगा गणेश यांनी “ट्रॅक्टर भरा, काम करा, नाही तर हातपाय बांधून गंगेत फेकून देऊ.” अशा धमक्या देत शिवीगाळ केली. मजुरांना जेवणही दिले नाही. फड मालकांनी दिलेलेच जेवण खाऊन त्यांना काम करावे लागत होते. मुकादम बाळु मगरे उचल रक्कम न देता मजुरांना सतत कामाला लावत होता. सोबत असलेल्या लहान मुलांनाही ऊसतोडीचे काम करायला लावण्यात आले.
दरम्यान 14 नोव्हेंबर रोजी काम सुरु असताना तहसिलदार, पोलीस अधिकारी, जळगावमधील अधिकारी तसेच महिला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीसही मजूरांची सुटका करून तहसील कार्यालयात सुरक्षितपणे हलवले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम बाळु मगरे, ट्रॅक्टर मालक सोमेश्वर आबा, त्याचा मुलगा गणेश अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.

ग्रामपंचायत कार्यालयात घुसून कागदपत्र अज्ञाताने जाळली!

0

आष्टी — ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कागदपत्र पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे उघडकीस आली. या आगीत महत्त्वाचे दस्तऐवज फाईल व 40 ते 45 रजिस्टर जळून खाक झाले. दारूच्या नशेत हा प्रकार घडला असल्याचं सांगितलं जात असून अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे ‌
सुलेमान देवळा येथील एका दारूने झिंगलेल्या व्यक्तीने शुक्रवारी रात्री हातात कुर्‍हाड घेऊन ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला.महत्त्वाचे दस्तऐवज अस्ताव्यस्त करत पेटवून दिले. या लावलेल्या आगीत 40ते 45 रजिस्टर व महत्वाचे दस्तऐवज,फाइल जळून खाक झाले. अशी माहिती गावकऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी त्र्यंबक मुळीक यांना दिली.दरम्यान, आज ग्रामविकास अधिकारी मुळीक, सरपंच दादा यदु घोडके, अतुल पोपट घोडके, भिमराव सुखदेव भादवे, सचिन भगवान खोरदे, नवनाथ,एकनाथ भोजे या पंचाच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मुळीक यांनी सांगितले.सरपंचाकडून आर्थिक पिळवणूक
येथील सरपंच हे वैयक्तिक कामासाठी व घरकुलाच्या हप्त्यापोटी पैशाची मागणी केल्याशिवाय हप्ता देत नाहीत. त्याच्याकडून सातत्याने मनमानी कारभार सुरू आहे. तसेच गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा न झाल्यामुळे, आपली व्यथा मांडायची कोणापुढे या भावनेतून कदाचित एखाद्या ग्रामस्थांने हि घटना केली असावी, असे समाजसेवक परमेश्वर घोडके यांनी सांगितले.

डॉ. योगेश क्षीरसागरांचा (ना)राजीनामा

0

बीड — न.प‌ निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दोन दिवसांवर आलेली असतानाच अजित पवारांची राष्ट्रवादी बंडाळीच्या फेऱ्यात अडकली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याच्या कारणावरून डॉ. योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात बंडाळीचे ग्रहण लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची 17 नोव्हेंबर शेवटची तारीख असली तरी बहुतांश राजकीय पक्षांनी आपले उमेदवार निश्चित केले नाहीत.त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अमरसिंह पंडितांच्या शिवछत्र मधून हलवली जात आहेत. त्यातूनच क्षीरसागर मुक्त नगरपालिका असा नारा ही समाज माध्यमातून दिला जात आहे. अशावेळी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून देखील वगळण्यात आले.
डॉ. योगेश क्षीरसागर यांना साईडलाईन करत न.प. निवडणुकीची रणनीती आणि उमेदवार निश्चिती पंडितांच्या शिवछत्र च्या मार्गदर्शनाखाली सुरु केली आहे. या सर्व अन्यायाची माहिती डॉ .योगेश क्षीरसागर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना वारंवार सांगितली. मात्र तरीदेखील यामध्ये कुठलाच बदल झाला नाही. परिणामी फेसबुक वर “विकास हाच धर्म, विकास हीच जात” असा नारा देत कव्हर फोटो बदलला आहे. यामध्ये दिवंगत केशरबाई क्षीरसागर, डॉ. भारतभूषण क्षीरसागर व चुलते जयदत्त क्षीरसागर यांचे फोटो ठेवले आहेत.
एवढ्यावरच ते डॉ. योगेश क्षीरसागर थांबले नाहीत तर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून डावलल्याची खंत व्यक्त करत बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे दिला आहे. दरम्यान बीड नगरपालिकेवर क्षीरसागर घराण्याचं आज पर्यंत वर्चस्व राहिलेलं आहे.डाॅ. भारत भूषण क्षीरसागर व नगराध्यक्षपद इतकं समीकरण जुळलं होतं की त्यांचं नावच जनतेने अध्यक्ष साहेब असच ठेवलं होतं. डॉ. योगेश क्षीरसागर बीड नगरपालिकेत “एकला चलो “ची भूमिका घेतात की भाजपची वाट पकडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दीड लाखाच्या बैलचोरीचा बनाव अंगलट, तक्रारदारच बनला आरोपी

0

बीड — बैलजोडी चोरीला गेली आहे असा बनाव तयार करून पोलिसात खोटी तक्रार देणाऱ्या पिंपरखेड येथील दोन भावा विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. जिल्ह्यात खोट्या तक्रारी देऊन पोलिसांना कामाला लावण्याचे प्रकार उघडकिस आल्यानंतर पोलिसांनीही फिर्यादीवरच गुन्हे दाखल केल्यामुळे अशा प्रकारांना आळा बसला होता. दरम्यान वडवणी पोलिसांमध्ये पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे. पिंपरखेड येथील संपत त्रिंबक निपटे व त्याचा भाऊ मदन निपटे यांनी दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली. चोरीची घटना घडून इतके दिवस तुम्ही तक्रार देण्यासाठी का आला नाहीत तसेच बैल जोडी संदर्भात आर्थिक व्यवहार काही होता का? अशी विचारणा देखील एपीआय वर्षा व्हगाडे यांनी वारंवार तक्रारदाराकडे केली होती.
पोलिसांनी याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता सदर बैलजोडी ही श्रीकांत चंद्रकांत मगर, राहणार भावठाणा , तालुका आंबेजोगाई,बीड या शेतकऱ्याकडे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी त्यास समक्ष पोलीस ठाणे येथे बैल जोडीसह आणले. यावेळी श्रीकांत मगर यांनी ही बैल जोडी बाबाराव डाके, राहणार टकारवाडी, तालुका माजलगाव, याचे कडून विकत घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री टकारवाडी,येथे जावून बाबाराव डाके यांचेकडे चौकशी केली असता, त्याने ही बैल जोडी तक्रारदार संपत निपटे
राहणार पिंपरखेड,यास पैसे देऊन विकत घेतली, असे सांगितले त्यानंतर पोलिसांनी पुन्हा विश्वासात घेऊन तक्रारदाराची चौकशी केली असता त्यानेच हा बैलचोरीचा खोटा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सदर तक्रारदार संपत नीपटे व त्यांचे भाऊ मदन निपटे यांचे विरोधात पोलीस ठाणे वडवणी येथे पोलीस अंमलदार नितीन काकडे यांचे सरकारतर्फे फिर्यादीवरून “सर्व परिस्थिती माहिती असताना देखील पोलिसांचे कायदेशीर अधिकाराचा गैरवापर करण्यासाठी पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांची दिशाभूल करने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी श्रीकांत मगर या शेतकऱ्यास ही बैलजोडी परत केल्याने त्याने त्यांनी व त्यांचे कुटुंबीयांनी वडवणी पोलिसांचे आभार मानले व कोणत्याही नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करू नये, असे आवाहन वडवणी पोलिसांनी केले आहेत.