Home Blog Page 76

बिबट्याची दहशत संपेना बीड अहिल्यानगर महामार्गावर पुन्हा दिसला

1

सांगवी पाटण गावातही बिबट्या दिसला

आष्टी — ग्रामीण भागात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झालेले आहे. यातच बीड अहिल्यानगर महामार्गावर म्हसोबावाडी ते घाटपिंपरी घाटात दुसऱ्यांदा बिबट्याचं 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा दर्शन झालं. याबरोबरच सांगवी पाटण गावातील सुदर्शन विद्यालयाच्या गेट समोरच बिबट्या दिसल्याने वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त ताबडतोब करावा अशी मागणी केली जात आहे.
सांगवी पाटण गावातील सुदर्शन विद्यालयासमोर बिबट्या वावरताना दिसला. त्यामुळे खिळद, डोईठाण, कोहिनी, किनी, बेलगाव, बावी, दरेवाडी,कारखेल, धामणगाव परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगांवी रात्रीच्या वेळी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, दोन-तीन जनाची सोबत असेल तरच फिरावे, सोबत टॉर्च काठी यासारख्या सुरक्षा साधनांचा वापर करून बिबट्या दिसल्यास वनविभागाला कळवण्यात यावे असे आवाहन केले आहे.


पाटण सांगवीत बिबट्या दिसलेला असतानाच बीड अहिल्यानगर महामार्गावर देखील 15 नोव्हेंबर रोजी बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा 19 नोव्हेंबर रोजी म्हसोबावाडी ते घाट पिंपरी घाटामध्ये रात्रीच्या दरम्यान पुन्हा बिबट्या दिसला. याचा देखील व्हिडिओ प्रवाशांनी चित्रित करून समाज माध्यमावर व्हायरल केला आहे. आष्टी वनपरिक्षेत्र हद्दीत गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्खा वाढल्याचे दिसून येत आहे. शेतातसह, लोकवस्ती व आता रस्त्यावर त्याचा बिनधास्त संचार सुरू आहे. बिबटे निशाचर प्राणी आहेत, त्यामुळे त्यांची बहुतेक क्रियाकलाप आणि शिकार रात्रीच्या वेळीच होते. दिवसा ते विश्रांती घेतात. डोंगरपट्यात दडण असल्याने व रस्त्यावर आणि लोकवस्तीकडे बिबटे वळलेले असल्यामुळे यांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.

मालेगाव चिमुकली हत्या प्रकरण: संशयीताला कोर्टात का आणले नाही, जनता आक्रमक

0

मालेगाव — डोंगराळे येथील साडेतीन वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या घटनेचे गुरुवारी न्यायालय परिसरात तीव्र पडसाद उमटले. संशयीताची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.मात्र, न्यायालय परिसरात संतप्त महिला व तरुणांचा मोठा जमाव जमला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला आताच फाशी द्या, असा हेका धरत हा जमाव आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले. जवळपास दोन-अडीच तास हा आक्रोश सुरू होता.

रविवारी रात्री चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी रवींद्र खैरनार (२४) या संशयीताला तात्काळ अटक केली. यानंतर न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपत असल्याने दुपारी अडीच वाजेनंतर त्याला न्यायालयात आणण्यात येणार होते.

खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालय परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला होता. यावेळी संतप्त महिला व तरुणांची न्यायालय आवारात मोठी गर्दी उसळली. जमावाचा संताप बघता कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, अशी शक्यता गृहीत धरत पोलिसांनी संशयीताला न्यायालयात आणणे टाळण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वेळ टळून गेल्यावरही संशयीताला न्यायालयात आणले जात नसल्याचे बघून जमाव आणखी आक्रमक झाला. त्यानंतर महिला पुरुषांनी न्यायालय आवारात ठिय्या मांडत घोषणाबाजी सुरू केली.

काही वेळानंतर संतप्त महिला व तरुणांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कॅम्प रस्त्यावर ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन केले. नंतर मोसम पुलाजवळ जाऊन काही काळ तेथील वाहतूक रोखून धरली. लोकांचा हे रौद्ररूप बघता संशयीताला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याला हजर केले गेले. संशयीताने हत्येसाठी वापरलेले हत्यार काढून दिले नाही, गुन्ह्याचा सूक्ष्म तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय सोनवणे यांनी न्यायालयात केला. त्यानुसार न्यायालयाने सात दिवसांकरिता त्याची पोलीस कोठडी वाढवली आहे.

या प्रकरणाचे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध नोंदविला जात आहे. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचा रेटा वाढला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी यापूर्वीच निर्देश दिले आहेत.

घटनेची माहिती मिळताच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गावी भेट देऊन मृत चिमुकलीच्या पालकांचे सांत्वन केले. तसेच मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी होण्याच्या दृष्टीने शासन पातळीवरून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी गावकऱ्यांना दिले. त्यानंतर गेल्या दोन दिवसात भाजप नेत्या चित्रा वाघ, किरीट सोमय्या, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राम भदाणे, खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी डोंगराळे गावी भेट देऊन मृत चिमुकली व गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. गुरुवारी सायंकाळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी डोंगराळे येथे भेट दिली. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा द्या तसेच या घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी मालेगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर कारवाई 12 लाखाचा मुद्देमाल जप्त

0

बीड — अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर दिंद्रुड पोलिसांनी कारवाई करत तब्बल 12 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 नोव्हेंबर रोजी हॉटेल बप्पाश्री जवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर पांढऱ्या रंगाचे क्रमांक नसलेले पिकअप वाहनात  जितीन राजेभाऊ पौळ, वय 32 वर्षे, रा. खरात आडगाव हा एक ब्रास वाळू 6000 रुपये किमतीची ची अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातील पिकअप व एक ब्रास वाळू असा एकूण चार लाख सहा हजार रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा नोंद करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत लोनगाव चौकाजवळ, आनंदगाव ते लोनगाव रोड वर आरोपी जीवन काशिनाथ साळवे, वय 30 वर्षे, रा. खरात आडगाव, ता. माजलगाव हा त्याच्या ताब्यातील वाहन क्रमांक 407 टेम्पो क्र. एम एच 21 एक्स 0353 मध्ये अवैधरीत्या नऊ हजार रुपये किमतीची दीड ब्रास वाळू वाहतूक करतांना मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील आठ लाख रुपयाचा टेम्पो वाहन  दिड ब्रास वाळू  8 लाख 9 हजार रुपये किमतीचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध  दिंद्रुड पोलीस ठाण्यात कलम: 303(2) बीएन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात सपोनि. महादेव ढाकणे, पोउपनि. पवनसिंग जंघाळे,भराडे,सचिन गायकवाड यांनी केली आहे.

सरकार गुटखा विक्रीवर बंदीच नाही, थेट मकोका लावण्याच्या तयारीत!

0

मुंबई — गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असली तरी देखील गुटखा होत असल्याने याला आळा घालण्यासाठी गुटखा विक्री करणारा वर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकार विचार करीत असल्याच अन्न आणि औषध प्रशासन (एफ डी ए) मंत्री नरहरी झिरवाल यांनी सांगितलं

या प्रकरणी एफडीए मंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, गुटख्याच्या उत्पादन आणि विक्रीवर सध्या बंदी असूनही तंबाखूयुक्त उत्पादनाची बेकायदेशीर खेप बाहेरून राज्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांचे नुकसान होत आहे. मंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात झिरवाल यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार गुटखा कंपन्यांचे मालक, प्रमुख संचालक आणि या बेकायदेशीर व्यापारामागील सूत्रधारांविरुद्ध मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे.ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याच्या वाहतूक आणि विक्रीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, बेकायदेशीर गुटखा व्यापारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हे नोंदवता येतील का, याबाबत मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल.मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल म्हणाले की, राज्य सरकार गुटखा बंदीची अधिक कडक अंमलबजावणी करेल आणि विविध विभागांमार्फत जिल्हा पातळीवर कर्करोग निर्माण करणाऱ्या उत्पादनाविरुद्ध जागरूकता मोहिमा राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात भगवान फुलारी व नागनाथ शिंदे निलंबित

0

बीड — शिक्षक भरती घोटाळ्यात झालेल्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्या प्रकरणी बीडचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे या भ्रष्ट जोडगोळीचं निलंबन करण्यात आलं आहे. बुधवारी या दोघांच्या निलंबनाचे आदेश प्रधान सचिव रणजीसिंह देओल यांनी दिले आहेत.
नागपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती घोटाळा झाला. त्यानंतर शासनाने चौकशी समिती स्थापन करून दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल केले. बीडमध्ये देखील माध्यमिकचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे व प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी या जोड गोळीने शिक्षण विभागात गैरव्यवहाराचा कळस गाठला. शिक्षक भरती प्रकरणात 500 कोटीचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांनी केला होता. या सदर्भात  तक्रार करून सतत त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. दरम्यान विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या समितीमार्फत बीडच्या शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यात आली.समितीने येथील काही संचिका चौकशीसाठी हस्तगत केल्या होत्या. प्राथमिक चौकशीमध्ये भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे उघडकीस आले. गेल्याच म्हणजे ऑक्टोबर मध्ये अहवाल सादर करून निलंबनाची शिफारस करण्यात आली. यावरून नागनाथ शिंदे व भगवान फुलारी या दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

बीडचे जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर:241 कोटीचा भूसंपादन घोटाळा, 73.4 कोटींचा अपहार; 10 जणांविरोधात फौजदारी

0

बीड — जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट आदेश व जुन्या तारखांच्या आधारे
राष्ट्रीय महामार्गाच्या 154 प्रकरणातील लवाद प्रकरणात 241.62 कोटी रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर केला. यामध्ये 73.4 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांनी दिली आहे.याप्रकरणी दहा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आहेत.तर तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी अप्पर जिल्हाधिकारी, तहसलीदार महसूल आणि भूसंपादन कार्यालय बीड कार्यालयास भेटी दिल्या. तसेच जायकवाडी प्रकल्प भूसंपादन आणि उपविभागीय अधिकारी बीड ही कार्यालये तपासली.या दरम्यान काही संचिकांची तपासणी करण्यात आली. भूसंपादन लवाद प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचे नाव व पदनाम लिहून वाढीव भूसंपादनाचे आदेश मंजूर केले. त्यावरच्या तारखाही जुन्या होत्या.भ्रमणध्वनी वरील संभाषणातून ही बाब उघडकीस आली.

जुन्या तारखेची 40 प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या.1मार्च ते 17 एप्रिल 2025 दरम्याच्या 154 बनावट आदेशाव्दारे 241.62 कोटी रुपयांची वाढीव रक्कम मंजूर असल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. या कागदपत्राच्या आधारे छत्रपती संभाजीनगरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातून 73 कोटी रुपयांचा निधी मिळवून त्याचे वितरण करण्यात आले. 17 एप्रिल रोजी असे 50 बनावट आदेश मंजूर करण्यात आले. त्यादिवशी कोणताही पक्षकार हजर नव्हता. त्यामुळे हा प्रकार संशास्पद असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आले.भूसंपादनातील अधिकारी, कर्मचारी, वकील यांनी संगनमताने हा कोट्यावधीचा घोटाळा केल्याचे दिसून आल्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या घोटाळ्याची व्याप्ती पाहता बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणात महसूल मधील गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या घोटाळ्यात परळी तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे , अविनाश चव्हाण (कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर, भूसंपादन समन्वय कार्यालय), शेख अजहर शेख बाबू (कंत्राटी ऑपरेटर भूसंपादन जायकवाडी प्रकल्प कार्यालय) व त्रिबंक पिंगळे (सेवानिवृत्त कंत्राटी कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यालय बीड), पांडुरंग पाटील (सहायक महसूल अधिकारी, भूसंपादन समन्वय कार्यालय) राऊत (राष्ट्रीय महामार्ग कार्यालय), ॲड. एस. एम. नन्नवरे, ॲड.नरवडकर,ॲड. पिसूरे, ॲड.प्रवीण राख यांची नावे आहेत.

अ‍ॅड. असिम सरोदेंवरील कारवाईला स्थगिती! बार काऊन्सिल ऑफ इंडियाचा निर्णय

0

नवी दिल्ली — मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्याच्या आदेशाला बार काऊन्सिल ऑफ इंडियानं स्थगिती दिली आहे. त्यामुळं अॅड. सरोदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी असीम सरोदे यांच्यावर माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केल्याप्रकरणी कारवाई केली होती. पण ही कारवाई अत्यंत टोकाची असल्याचा आरोप यापूर्वी सरोदे यांनी केला होता. पण हे प्रकरण खरोखरच वकिली व्यवसायाच्या गैरवर्तवणुकीचं आहे का? याबाबत सखोल चौकशी करुनच सनद निलंबित करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता, असं मत या निर्णयाला स्थगिती देताना बार काऊन्सिल ऑफ इंडियानं व्यक्त केलं आहे. तसंच यावर पुढील सुनावणी लवकरच घेण्यात येईल असं जाहीर केलं.बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या या स्थगिती आदेशावर व्यक्त होताना अॅड. असिम सरोदे यांनी ट्विट केलं असून “सत्य परेशान हो सकता है, पराभूत नही. सत्याचा विजय होण्याची सुरुवात कधीतरी होत असते. बार काऊन्सिल ऑफ इंडियाचे आभार! मी पुन्हा येतोय… असं त्यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेच्या पक्ष चिन्हाच्या खटल्यात उध्दव ठाकरे यांची बाजू मांडणाऱ्या असीम सरोदे यांची सनद अचानक 3 नोव्हेंबर 2025 रोजी तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली होती. 12 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी असताना या सुनावणीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आल्यानं यामागे राजकीय कट-कारस्थान असल्याचा संशय खुद्द सरोदे यांनी व्यक्त केला होता. महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनने हा निर्णय घेतला होता. सरोदे यांनी शिवसेनेच्या व्यासपीठावरुन आपल्या केसबाबत बोलताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानसभा अध्यक्षांविषयी टीकात्मक विधान केलं होतं. त्यांच्या या विधानामुळं वकिलांच्या व्यवसायाला धक्का बसल्याचं कारण देत त्यांची सनद रद्द करण्यात आली होती.

“शितल” छत्रछायेत अवैध धंद्यांना ऊत; डीवायएसपी पवार यांच्याकडून हवाला रॅकेट उध्वस्त

0

बीड — अवैध धंद्यांच्या बाबतीत “शितल” भूमिका घेत हप्ते खोरीत “बल”लावत “लाळ टपकवणाऱ्या ठाणे प्रमुखाच्या कारभारामुळे एलसीबी असो की डीवायएसपी यांच्यावर अवैध धंद्यांच्या बाबतीत कारवाई करण्याची वेळ आली आहे. डीवायएसपी पूजा पवार यांनी हवाला रॅकेटवर कारवाई करत 17 लाख रुपयांची रोकड शहर पोलीस ठाणे हद्दीत जप्त केली आहे.ऐन निवडणुकीच्या कालावधीमध्ये पूजा पवार यांनी ही मोठी कारवाई केल्याने शहरात मोठया प्रमाणावर शहर ठाणे प्रमुखाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
बस स्थानकासमोर सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात डी वाय एस पी ना दोन वेळा कारवाई करावी लागली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने झमझम कॉलनीत कारवाई करून लाखोंचा गुटखा जप्त केला. या तीन कारवाया चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. मात्र तरीही अवैध धंद्यांना आपल्या छत्रछायेत बळ देण्याचं काम शहर पोलीस ठाणे प्रमुखांकडून होत आहे. तर याच ठाणे प्रमुखावर पोलीस अधीक्षकांचा प्रचंड विश्वास तर आहेच शिवाय आशीर्वाद देखील आहेत. असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. बीडमध्ये ठाणे प्रमुखांची खांदेपालट झाली. मात्र शहर पोलीस ठाणे प्रमुखाची खुर्ची यामुळेच बळकट राहिली की काय? असा प्रश्न त्यावेळी उपस्थित केला जात होता. दरम्यान नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना देखील अवैध धंद्यांना आळा घालावा गुन्हेगारी कमी करावी याची उपरती शहर पोलीस ठाणे प्रमुखाला झाली नाही. त्यामुळे आजही राजरोस अवैध धंदे सुरूच आहेत. जर डीवायएसपींनी, स्थानिक गुन्हे शाखेंच्या पथकानेच कारवाया करायच्या अवैध धंद्यांना आळा घालायचा प्रयत्न करायचा तर ठाणे प्रमुख बुजगावण्याचीच भूमिका घेत राहणार का? नुसता अवैध धंद्यांनाच ते आशीर्वाद देणार का ? हप्ते खोरीतच आत्म मग्न राहणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठाणे प्रमुखाच्या बुजगावण्या भूमिकेचाच  परिपाक म्हणून निवडणुकीच्या रणधुमाळीत हवाला रॅकेट उध्वस्त करण्याची गरज डी वाय एस पी पूजा पवार यांना वाटली.मसरत नगरमधील एका अपार्टमेंटमध्ये पैशांचा बाजार भरवून हवाला सुरु असल्याची माहिती डीवायएसपी पूजा पवार यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी त्यांच्या टीम ने छापा मारला असता घरात 17 लाखांची रोकड आढळून आली आहे. यावेळी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून सध्या शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक पूजा पवार, एपीआय पुजारी, सचिन आगलावे, मनिषा केदार यांनी केली आहे.

पोलीस आपल्या बांधावर हि एसपींची संकल्पना हवेतच विरली; उदंड वडगावातील रक्तरंजित थराराने जनता हादरली!

0

बीड — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी “पोलीस आपल्या बांधावर”ही संकल्पना नेहमीसारखीच तोंडातून निघालेल्या वाफेसारखीच ठरली. शेतीच्या वादातून चौघा जणांना लोखंडी पाईप, रॉड आणि लाठ्या काठ्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना उदंड वडगाव येथे घडली.
संतोष देशमुख हत्याकांडाने राज्य हादरले गेले. त्यानंतर पोलीस दलाचा भार पोलीस अधीक्षक नवनीत कांवत या प्रामाणिक अधिकाऱ्यावर सोपवण्यात आला.ते प्रामाणिक जरी असले तरी पोलीस दलातील अधिकाऱ्यावरचा अतिविश्वास कायदा सुव्यवस्थेला घातक ठरवू लागला आहे. मारहाणीच्या घटनांचे अनेक व्हिडिओ संतोष देशमुख प्रकरणानंतर देखील समोर आले. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असले माध्यमामधून याची वाच्यता केली जात असली तरी माध्यमांकडे दुर्लक्ष करण्याचं धोरण सर्वसामान्यांच्या अंगलट येऊ लागला आहे. नेकनूर सारख्या ठिकाणी तर पोलीस यंत्रणेवरचा विश्वास देखील ठाणे प्रमुखाच्या कार्यशैलीमुळे उडाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या पोलीस अधिकाऱ्यांवरच्या दुर्लक्षामूळे आराजकतेला खतपाणी घातले जात आहे. परिणामी “पोलीस आपल्या बांधावर”हा उपक्रम पोलीस अधीक्षकांनी राबवला संवादातून शेतीचे वाद विवाद मिटवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन देखील केले. मात्र जिथे ठाणे प्रमुखानेच विश्वास गमावला तिथे शेतकरी जाणार कसा? यातूनच उदंड वडगाव मध्ये शेतीच्या वादातून रक्त रंजीत थरार घडला गेला. याचा व्हिडिओ समाज माध्यमात सध्या धुमाकूळ घालत आहे.जमिनीची मोजणी चव्हाण कुटुंबीयांनी केली. भावकीतीलच शेजाऱ्याकडे एक एकर शेती जास्तीची असल्याचे यात स्पष्ट झाले. तुम्हीही जमिनीची मोजणी करून आमचं क्षेत्र आम्हाला परत द्या असं सांगितलं गेलं. तोपर्यंत जास्तीचं तुमच्याकडे गेलेल क्षेत्र वहिवाटू नका असही सांगितलं मात्र यातून वाद उफाळला गेला.सात-आठ लोकांच्या गटाने चार जणांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाणीसाठी लोखंडी रॉड लाठ्या काठ्या धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. हा वाद पाहून गावातील बरेच जण घटनास्थळी धावून आले. या मारहाणीत एकाच्या कानाजवळ तेरा टाके पडले आहेत. हात मोडल्यामुळे हातात राॅड टाकावे लागल्याच सांगितलं जात आहे. ‌समाधान चव्हाण, मनोज चव्हाण, जीवन चव्हाण आणि सुदाम चव्हाण हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड मधील जीवन ज्योती खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नेकनूर पोलीसात तक्रार देऊन देखील फारसा प्रतिसाद तक्रारदाराला मिळाला नाही. माणसं मरणाच्या दारात पोहोचली तरी पोलिसांना जवाब घ्यायला लवकर वेळ मिळाला नाही. कसंतरी जखमींचा जवाब नोंदवला मात्र एफ आय आर दाखल करून घेत कारवाई करण्यास वेळ मिळाला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

माजलगावात होलसेल दुकान फोडून दहा लाखाच्या सिगरेट पळवल्या

0

माजलगाव — जिल्ह्यात सर्वत्र चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.गजानन नगर रोडवर असलेल्या श्रीकृष्ण ट्रेडर्स या होलसेल दुकानाचे शटर वाकून चोरट्याने आतील दहा लाख रुपये किमतीचे सिगारेटचे आठ बॉक्स व नगदी 75 हजार रुपये लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चार चोरट्याविरुद्ध माजलगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गजानन रोडवर श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांचे श्रीकृष्ण ट्रेडर्स हे होलसेल दुकान असून ते नेहमीप्रमाणे रविवारी रात्री लवकर दुकान बंद करून गेले होते. सोमवारी त्यांना सकाळी सात वाजता शेजारील दुकानदाराने फोन करून सांगितले की तुमचे दुकान फोडले असून तुम्ही तात्काळ इकडे या, यावर ते दुकान कडे गेले असता त्यांना दुकानचे शटर वाकलेले दिसले.

आत प्रवेश केला असता दुकानातील सिगरेटचे दहा लाख किमतीचे आठ बॉक्स व गल्ल्यातील नगदी 75 हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले. तर दुकानातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर ही चोरट्याने तोडून नेल्याचे दिसले. यावरून त्यांनी बाजूला असलेल्या बँकेचे सीसीटीव्ही चेक केले असता दुकान समोर सकाळी पाच वाजता स्विफ्ट गाडीत आलेल्या चार चोरट्यांनी सिगरेट बॉक्स पळवल्याचे दिसून आले.शहर पोलीस आणि घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी करत शहरात अनेक ठिकाणी या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. याप्रकरणी दुकान मालक श्रीकांत श्रीनिवास रुद्रवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत