Home Blog Page 79

पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद

0

बीड — जिल्हयातील अवैध व्यवसायांच्या विरुध्द करण्यात येणाऱ्या कारवायांचाच एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणा-यांविरुध्द पोलीस अधिक्षक श नवनीत काँवत यांनी मोहिम उघडलेली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. सदर माहितीच्या आधारे दिनांक १६ मे रोजी सकाळी  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे अमोल रामहरी कांदे, वय ३२ वर्षे, रा. माणिकनगर, परळी , पांडूरंग प्रकाश शेंडगे, वय ३० वर्षे, रा. एलआयसी कॉलनी, रिंगरोड लातूर यांना पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये कमरेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला. तसेच त्यासोबत ०३ जीवंत काडतूस देखिल मिळून आले. दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा/पिस्टल (अग्नीशस्त्र) व ०३ जीवंत काडतूस असा एकूण ४३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर अवैध गावठी कट्टा/पिस्टल बाबत सदर अटक आरोर्पीकडे विचारपूस करता त्यांनी तो सतीष मुंडे, रा. डाबी, ता. परळी व मनोहर मुंडे, रा. बेलंबा, ता. परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले असून सदर चारही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ येथे पोलीस अंमलदार श्री विष्णू बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. १०४/२०२५, कलम ३, २५ भारताचा शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच गावठी पिस्टलसह पकडलेल्या वरील दोन इसमांना अटक करण्यात येऊन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली. पिस्टल विकणारे दोन आरोपी १) सतीष मुंडे व २) मनोहर मुंडे यांचा गुन्हयाचे तपासी अधिकारी  प्रविण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी हे शोध घेत आहेत. सदरील कारवाई  काँवत, पोलीस अधिक्षक बीड, मा. श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई, श्री शिवाजी बंटेवाड, प्रभारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे, पोह/विकास राठोड, पोलीस अंमलदार श्री विष्णू सानप, श्री नितीन वडमारे, विक्की सुरवसे यांनी केली आहे.

बीड: पाच लाखाच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण

0

बीड — वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे चौघांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी संगनमत करून अपहरण करत बेदम मारहाण केल्याची घटना गिरामनगर भागात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चार जणां विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
पंजाब पांडुरंग शिंदे वय 33, रा. गिरामनगर, पांगरी रोड, बीड यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड हे दोघेही रा. उखंडा, लिंबादेवी, ता. बीड, बालाजी बहिरवाळ रा. धानोरा रोड, बीड, मयूर खोमणे चऱ्हाटा फाटा, बीड अशी अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
रात्री सव्वा नऊला घरी असताना दिनेश पोपट ठोसर, विठ्ठल गायकवाड बालाजी बहिरवाळ व मयूर खोमने या चौघांनी घराबाहेर बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने त्यांच्या काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवून त्यांना नगर रोडवरील देवराज बारमध्ये नेण्यात आले. तेथे आरोपींनी पाच लाख रुपयांची मागणी करत पुन्हा एकदा मारहाण केली.यावेळी बालाजी बहिरवाळ याने बीअरच्या बाटलीने शिंदे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. मारहाण झाल्यानंतर शिंदे यांनी जीव वाचवण्यासाठी अंधाराचा फायदा घेत बारमधून पळ काढला व जवळील स्टोन क्रशरवर लपून बसले.काही वेळाने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणले. याप्रकरणी आरोपी दिनेश ठोसर, विठ्ठल गायकवाड, बालाजी बहिरवाळ व मयुर खोमणे यांच्या विरोधात अपहरण, मारहाण, जबरदस्ती, खंडणी मागणी व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

तिप्पटवाडी तलाव मावेजा वाटप घोटाळा प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशाला धुमाळांकडून केराची टोपली!

0

मावेजा दोनदा लाटला; नामदेव टिळेकर श्रीनिवास मुळे, निलेश बागडेंना वाचवण्याचे प्रयत्न

बीड — तालुक्यातील तिप्पटवाडी येथील गाव तलाव क्र–1 मधील जमीन संपादनाच्या एकाच प्रकरणात नियमबाह्य मावेजा वाटप करत दुहेरी लाभ देण्याचा प्रताप उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी केला. या प्रकरणात अव्वल कारकून श्रीनिवास मुळे तसेच कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी टिळेकरांना साथ दिली. या भ्रष्टाचार प्रकरणात समिती गठीत करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र तीन महिने होत आले तरी उपजिल्हाधिकारी धुमाळ आयुक्तांचा आदेश पादळी तुडवत त्रिमूर्तींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तिप्पटवाडी येथे गाव तलाव क्रमांक -1 साठी जमीन संपादित करण्यात आली होती. याप्रकरणी संबंधितांना भूसंपादन कायदा 1894 नुसार दिनांक 30 जानेवारी 2014 रोजी निधी वाटप केला होता. त्यानंतर भूसंपादन कायदा 2013 लागू झाला त्यामध्ये कलम 23 व 30 नुसार भूसंपादन कायदा 1894 नुसार वाटप केलेली रक्कम वजा करत 2013 च्या नवीन कायद्यानुसार निवडा केला अन् निधी मागणीसाठी उपजिल्हाधिकारी(रोहयो) यांचेमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला. शासनाने या अगोदर भूसंपादन कायदा 1894 नुसार निधी वितरित केला असल्याने 2013 नवीन कायद्यामध्ये सदर प्रकरण बसत नाही त्यामुळे निधी मागणी प्रस्ताव नाकारण्यात आला.
शासनाने निधी मागणी प्रस्ताव फेटाळल्यानंतर या प्रकरणी कार्यकारी अभियंता, ल.पा.जि.प. बीड यांच्याकडे निधी मागणी सादर करून शासनाची फसवणूक कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी केली अन् निधी मंजूर करून आणला त्यानंतर उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, अव्वल कारकून श्रीनिवास मुळे, कनिष्ठ लिपिक निलेश बागडे यांनी संगनमताने रक्कम रु.4925058/-चा निधी नियमबाह्य वितरित केला. या मावेजा वाटपातील भ्रष्टाचार प्रकरणी विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हाधिकारी बीड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करून तीन महिन्यात सखोल चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश सह–आयुक्त (पुनर्वसन) छत्रपती संभाजीनगर यांनी दिले आहेत.

उपजिल्हाधिकारी धुमाळ, यांच्याकडून विभागीय आयुक्ताच्या पत्राला केराची टोपली

विभागीय आयुक्तांनी 3 महिन्यात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही धुमाळ उपजिल्हाधिकारी (समन्वय) बीड हे संचिका लपवून ठेवत केराची टोपली दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. नामदेव टिळेकर व श्रीनिवास मुळे निलेश बागडे यांच्या भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचं काम करत आहेत.

मावेजा वाटपातील भ्रष्टाचारी अधिकारी–कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ नये यासाठी उपजिल्हाधिकारी धुमाळ प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे अद्यापपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या समक्ष तक्रारीच्या अनुषंगाने कसल्याही प्रकारची मांडणी न केल्याने प्रकरण निकाली निघण्यास विलंब होत आहे. सदर प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार आहे.

           अजय सरवदे ,जिल्हाध्यक्ष,

        वंचित बहुजन आघाडी बीड

भरधाव कंटेनर माणसं चिरडत जाऊन पलटला; एक ठार ,25 जखमी

0

केज — एक भरधाव कंटेनर जो समोर आला त्याला चिरडत गेला. युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला अखेरीस लोखंडी सावरगाव जवळ वळणावर तो पलटी झाला. या थरारक अपघातात 25 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. तर चिंचोली माळी येथील महिला मृत्युमुखी पडली आहे. जखमीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास केज शहरातील रस्त्यावर घडली ‌.


या बाबतची माहिती अशी की, 16 मे रोजी की, नेकनुरकडून एक भरधाव वेगात कंटेनर क्र.डी डी- 01/झेड-9771 येत असल्याची माहिती नेकनुर पोलिसांनी केज पोलिसांना दिली. ते कंटेनर अडविण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राकेश बनसोडे, वाहतूक शाखेचे शहा, पाशा, शिवाजी कागदे, आणि इतर पोलिस हे केज चौकात थांबले होते. मात्र भरधाव वेगातील कंटेनरने शिक्षक कॉलनी जवळ असलेल्या होंडा शो- रूम जवळ एका टमटम क्र. एम एच- 23/एच- 545 ला जोराची धडक दिली. त्यातील प्रवाशी जखमी झाले. त्या नंतर पुढे त्या कंटेनरने शासकीय विश्राम गृहा समोर उभ्या असलेल्या मोटार सायकल क्र.एम एच- 44/ए डी- 1460 आणि क्रएम एच- 44/ए सी- 5814 या दोन मोटार सायकलींना धडक दिली.

त्या नंतर जुन्या उपविभागीय पोलिस उपअधिक्षक कार्यालया समोर रस्त्याने चालत असलेल्या मीना प्रवीण घोडके वय 37 वर्ष रा. चिंचोलीमाळी ता. केज या महिलेला चिरडले. या दुर्घटनेत या महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर धारूर चौकात उभ्या असलेल्या एका कार क्र. एम एच- 23/ए एस- 0897 ला धडक दिली. त्या नंतर ते तसेच पुढे गेले. त्या नंतर चंदनसावरगाव येथेही दोघांना धडक दिली.


त्यानंतर युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, पो. उपनिरीक्षक राहुल पतंगे, बालासाहेब घोरपडे, राऊत, आतकरे, डोंगरे, जाधव, हनुमंत गायकवाड यांनी रस्त्यावर अडथळे लावून तो कंटेनर रोखण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्या नंतर सदर कंटेनर हा लोखंडी सावरगाव येथील कळंब कडे जाणाऱ्या चौकात पलटी झाला. कंटेनर पलटी होताच त्याला आग लागली.अपघातातील जखमीवर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे हलविले असून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत.

या अपघातातील जखमी
1) कृष्णा हरिदास कापरे वय 20 वर्ष, रा. कापरेवाडी ता. केज, 2) श्रद्धा मधुकर चिंचकर वय 18 वर्ष रा. येवता ता. केज,3) सुनील सुंदर घुले वय 59 वर्ष रा. केळगाव ता. केज, 4) बळीराम आप्पराव पांचाळ वय 40 वर्ष रा. ढाकेफळ ता. केज, 6) सोनू बाबु शेख वय 20 वर्ष रा. केज, 7) विकास वसुदेव काकडे वय 22 वर्ष रा. कापरेवाडी ता. केज, 8) कुमार गायकवाड 55 वर्ष रा. देवगाव ता. केज, 9) शेषेराव मारुती चंदनशिवे वय 55 वर्ष रा. शिरपुरा ता. केज, 10) सरिता रावसाहेब मुंडे 57 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 11) फुलाबाई धोंडीराम सावंत वय 60 वर्ष रा. तुगाव ता. अंबाजोगाई, 12)रावसाहेब यादवराव मुंडे वय 79 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 13) विद्या विलासराव सूर्यवंशी वय 30 वर्ष, रा. पिसेगाव ता. केज, 14) विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी वय 40 वर्ष रा. पिसेगाव ता. केज, 15) सिद्धेश्वर वसुदेव कापरे वय 22 वर्ष रा. युसुफवडगाव ता. केज, 16 )पोलिस कॉन्स्टेबल सिद्धार्थ शिंदे वय ३० वर्ष रा. युसुफवडगाव ता. केज, 17) अतुल बाबुराव कुलकर्णी, वय 40 वर्ष रा. तांबवा ता. केज, 18) आशालता मुंडे वय 50 वर्ष रा. चारदरी ता. धारूर, 19) बाबासाहेब देशमुख वय 45 वर्ष रा. बोरीसावरगाव ता. केज, 20) सौ. देशमुख बाबासाहेब देशमुख यांची पत्नी वय ४० वर्ष रा. बोरीसावरगाव ता. केज आणि 21) शेख वय 30 वर्ष रा. केज

पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे थोडक्यात बचावले
अपघातातील भरधाव वेगातील कंटेनर हे केज येथील धारूर चौकात येत असल्याची माहिती मिळताच त्याला अडविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे हे रोडवर येऊन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ते कंटेनर सरळ अंगावर येत असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून चपळाईने बाजूला झाले त्यामुळे ते थोडक्यात बचावले !

केजला रिंग रोडची गरजेचा
केज शहरातून दोन हाय- वे जात असल्याने आणि शहरात मोठी गर्दी असते. तसेच वाहने व दुचाकी रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. यामुळे अशा घटना टाळण्यासाठी शहरा बाहेरून एखादा रिंग रोडची आवश्यकता आहे.

कंटेनर चालक जखमी

कंटेनर पलटी.झाल्या नंतर त्याचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

मराठा आरक्षण: स्वतंत्र खंडपीठ स्थापन करण्याचे सर्वोच्च आदेश

0

नवी दिल्ली — मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना निर्देश दिले आहेत की, या याचिकांवर तातडीने सुनावणी करण्यासाठी एका नवीन खंडपीठाची स्थापना करावी. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला.
सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SCBC) प्रवर्गांतर्गत वैद्यकीय प्रवेशांसाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर त्वरित नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत.

या याचिकांवर वेळेत सुनावणी न झाल्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वर्षी जानेवारी महिन्यात तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर या याचिकांवर सुनावणी होऊ शकली नाही. याच कारणास्तव याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

यापूर्वी, जानेवारी महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाली. न्यायमूर्ती उपाध्याय हे पूर्ण किंवा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा भाग होते, जे गेल्या वर्षी एप्रिलपासून सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) कायदा, २०२४ च्या विरोधातील याचिकांवर सुनावणी करत होते. त्यांच्या बदलीमुळे सुनावणी रखडली होती.

याचिकाकर्त्यांनी आगामी शैक्षणिक सत्राची निकड आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्णय घेण्यास होणारा विलंब याकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. वैद्यकीय प्रवेशाला उशीर होण्याची शक्यता सुनावणीदरम्यान स्पष्टपणे मांडण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य ते निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती.

याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पूर्ण झाला होता. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या जवळपास एक तृतीयांश असलेल्या मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारा २०२४ चा कायदा गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. आता या प्रकरणावर लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे.

तेलंगणाकडे गाई घेऊन जाणारा टेम्पो पकडला

0

बीड — दहा गाईसह दोन वासरे घेऊन जाताना बुधवारी रात्री बीड शहरात टॅम्पो पकडण्यात आला. यातील जनावरे व टेम्पो असा जवळपास 11 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेम्पो क्र.एम.एच.17 सीव्ही.7664 यामधून अवैध रित्या दहा गाई आणि दोन वासरे हैद्राबादकडे नेली जात होती. हा टेम्पो शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला. यातील जनावरे व टेम्पो असा एकूण 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी माधव कारभारी खेमणर रा. चन्नेगाव ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, संकेत बाळासाहेब लांबगे रा.लोणी प्रवरा ता. राहता जि. अहिल्यानगर, असनगरी श्रीसाई लांब रा. इल्ली मेंदू, इब्राहीम पटनम रा. तेलंगणा, उपारी सतई रा. जहगा इलिमेंदू इब्राहीम पटनम रा. तेलंगणा, मल्लया असनगरी रा. जहगा इलिमेंदू रा. तेलंगणा
या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरे शिवाजी नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वैभव जाधव यांच्या फिर्यादीवरून हि कारवाई करण्यात आली आहे.

प्रेयसीने फोन उचलला नाही; पहाटेच घरात घुसून केली मारहाण

0

बीड — खासगी रुग्णालयात काम करणारे दोघे जण तीन वर्षे रिलेशन शिपमध्ये राहिले. परंतु आता तरूणीने फोन न उचलल्याने तिला पहाटेच्या सुमारास घरात घुसून गळा दाबत मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या दाजीला ही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार 12 मे रोजी पहाटेच्या सुमारास स्वराज्यनगर भागात घडला. याप्रकरणी दारूड्या तरूणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लक्ष्मण सपकाळ (वय 25 रा. सुर्डी ता. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. पीडिता ही वडवणी तालुक्यातील रहिवासी असून लक्ष्मण व ती एकाच खासगी रूग्णालयात काम करतात. तीन वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे फोनवर ही बोलणे होत असे. लक्ष्मण हा पीडिता सध्या बीडमध्ये राहत असलेल्या किरायाच्या घराकडेही चकरा मारत असे. 12 मे रोजीही तो दारूच्या नशेत होता. मला तुझ्या रूमवर यायचे आहे, असे म्हणत तो पीडितेला त्रास देत होता. तिने सकाळी ये म्हणल्यानंतर ही लक्ष्मणने ऐकले नाही.पहाटे 4 वाजताच तो पीडितेच्या रूमवर गेला. तिला जातीवाचक शिवीगाळ करत गळ्याला पकडून मला चापटाने मारहाण केली. तू माझा फोन उचलत का करत नाहीस, असे म्हणून मला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडितेने तिच्या दाजीला बोलावून घेतले. यावेळी त्यांनाही तुझा काय संबंध आहे आमच्यामध्ये का बोलतोस, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हेड कॉन्स्टेबलना मिळणार गुन्ह्याच्या तपासाचे पीएसआय चे अधिकार; गृह विभागाचा मोठा निर्णय

0

मूंबई – राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही झपाट्याने वाढत असताना, पोलीस यंत्रणेवरचा ताणही वाढतो आहे. विशेषतः ग्रामीण भागांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने अनेक गुन्ह्यांचे तपास रखडत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलनाही आता गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी केवळ पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच तपासाचे अधिकार होते. मात्र, आता गृहविभागाने एक अधिकृत राजपत्र जारी करत हेड कॉन्स्टेबलनाही तपासाचा अधिकार दिला आहे.
हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा,
किमान 7 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असावी,
गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथे 6 आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण करून परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी,
हे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांना तपास देण्यात येईल.
शहरी भागात अधिकारी संख्या तुलनेत चांगली असली तरी ग्रामीण भागात ती अपुरी आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे अनेक प्रकरणांचा ताण येतो. याच गोष्टींचा विचार करून सरकारने सुशिक्षित हेड कॉन्स्टेबलच्या अनुभवाचा वापर करून छोट्या गुन्ह्यांचे तपास त्यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह खात्याच्या मते, यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील ताण कमी होईल आणि गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

भारतावर नवं संकट! शक्ती चक्रीवादळाचा ‘या’ राज्यांना तडाखा बसणार

0

नवी दिल्ली — भारतावर नवं संकट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात एक नवीन वादळ तयार होत आहे. याला शक्ती असे नाव देण्यात आले आहे.

ते दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 ते 28 मे दरम्यान ते चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. याचा परिणाम अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह भारतातील विविध राज्यांवर होऊ शकतो.

24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्याला धडकणार

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ 23 मे ते 28 मे दरम्यान धोकादायक रूप धारण करू शकते. यामुळे पूर्वेकडील राज्यांच्या किनारी भागात आणि बांगलादेशातील खुलनामध्ये मोठे नुकसान होऊ शकते. याबाबत हवामान विभागाने आधीच लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार हे चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान किनाऱ्यावर आदळू शकते, यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

या राज्यांना सर्वाधिक धोका

शक्ती चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा, बंगाल आणि बांगलादेशातील किनारी भागावर होऊ शकतो. हे चक्रीवादळ बंगालच्या किनारी भागातून बांगलादेशातील खुलना येथे पोहोचू शकते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या महिन्यात तीन कमी दाबाची प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, त्यापैकी एक चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. त्यामुळे किनारी भागात मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि वादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सरकारने स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्यास सांगितले आहे

किनारी भागांना सर्वाधिक धोका

शक्ती चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात तसेच बांगलादेशातील खुलना आणि चितगाव प्रदेशात ते धडकण्याची शक्यता आहे. आयएमडीने या भागांसाठी येलो इशारा जारी केला आहे आणि रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्व-मध्य आणि दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे क्षेत्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात ढगदाळ वातावरणाची शक्यता आहे.

समुद्रात न जाण्याचे आवाहन

हवामान विभागाने किनारी भागातील रहिवाशांना समुद्रात न जाण्याच व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

आई गेल्यानंतर गतिमंद मुलीला बापाकडून घृणास्पद वागणूक; गोठ्यात डांबले, केळीची टरबुजाची साल खायला दिली

0

गेवराई — एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली आहे. शेजारील महिलेच्या जागरुकतेमुळे या मुलीची सुटका झाली असल्याचे समोर आले आहे.


गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली. सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आली आहे. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील दारूच्या आहारी गेलेले आहेत. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवले होते.

गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेने या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली. त्यांना या मुलीची दया आल्याने त्यांनी छ. संभाजीनगर येथील हिना शेख हज हाऊसजवळील खालिद अहमदच्या अनाथाश्रमात नेत
तिची सुटका केली आहे. त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आले. छ.संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने हे सर्व कार्यवाही करण्यात आली. महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची सुटका होऊ शकली आहे.