बीड — स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख उस्मान शेख यांची लातूरच्या प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्ती होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणादरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे परळी पोलीस स्टेशनला होते. पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांची बदली वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप झाला होता.आ. सुरेश धस यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई यांनीही गंभीर आरोप केले होते. उस्मान शेख यांची स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी अतिशय खराब राहिली. स्थानिक गुन्हे शाखा नावाचा प्रकार पोलीस दलात असतो याचा विसर देखील जनतेला पडला होता. किरकोळ गुन्ह्याची प्रकरणा हाताळून माध्यमामधून त्याची हाकाटी मारण्याचे काम केलं जात होतं. गंभीर व दरोड्या सारखे मोठमोठे गुन्हे उघडकीस आणायचं हे कर्तव्य आहे याचा विसर पडला होता. परिणामी स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारीवरचा अंकुश पूर्ण नाहीसा झाला होता. उस्मान शेख यांना कर्तव्याचा विसर पडत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे येत होत्या. एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेत असताना साजेस काम होत नसल्याने त्यांनीच पोलीस अधीक्षकांकडे बदलीची विनंती केली होती.दरम्यान उस्मान शेख यांची लातूरच्या प्रशिक्षण केंद्रावर बदली झाली आहे.यांच्या जागी पोलीस अधीक्षक कोणाची नियुक्ती करतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सूमार कामगिरीनंतर एलसीबी चे उस्मान शेख यांची बदली
अनैतिक संबंधाचा संशय; झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
केज — तालुका पुन्हा एकदा गंभीर घटनेने हादरला आहे. युसुफवडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकाला त्याची मोटार सायकल अडवून शेतात नेवून झाडाला बांधून केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे.
केज तालुक्यातील केज येथील दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे वय 27 वर्ष रा. भाटुंबा ता. केज व त्याचा मित्र सचिन करपे याला दि. 26 मे रोजी दुपारी 4:30 वा. च्या सुमारास सावळेश्वर ता. केज येथील रोहन मरके, सोन्या मस्के तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी अडवून त्याला रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात घेऊन गेले. तेथे त्याला शेतातील झाडाला बांधून त्या सर्वांनी लाकडी काठी आणि बेल्टने अमानुष मारहाण केली आणि त्या नंतर त्याला जखमी अवस्थेत पावनधाम जवळ असलेल्या रस्त्यावर टाकून दिले. तसेच याची माहिती मारहाण करणार्यांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे याच्या मोबाईल वरून त्याचा भाऊ सिद्धेश्वर धपाटे याला दिली. त्या नंतर सिद्धेश्वर धपाटे आणि गावातील लोकांनी दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे आणि त्याचा मित्र सचिन करपे याला अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले. त्या नंतर काही वेळाने दगडू उर्फ अण्णा उर्फ ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे हा मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी सिद्धेश्वर धपाटे याच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. 103(1), 140(2), 115(3), 118(1), 189(2), 190, 191(2), 191(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे करीत आहेत.
गढी जवळील भीषण अपघाताने गेवराई हादरली; सहा तरुणांचा मृत्यू
गेवराई — महामार्गाच्या दुभाजकात अपघात ग्रस्त अडकलेली गाडी काढत असताना भरधाव कंटेनरने जोराची धडक दिली. यात सहा तरुण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री गढी येथील उड्डाणपूलावर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री सुमारे ८.३० च्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी कारखान्यासमोर बाळासाहेब आतकरे यांच्या एक्सयूव्ही गाडीचा किरकोळ अपघात झाला होता. यात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली अपघातग्रस्त गाडी बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब आतकरे आणि त्यांचे काही सहकारी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी आले. दुभाजकात अडकलेली गाडी काढत असतानाच अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सूरय्या, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, माहिती मिळताच गेवराई पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आष्टी: जीप झाडाला धडकून तीन ठार
आष्टी — मुकादमासह दोघेजण जीपमधून गावाकडे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने जीप झाडावर आदळली.यात दोघांचा जागीच, तर अन्य एकाचा दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अकोले बुद्रुक येथील तानाजी संभाजी माने हे ऊसतोड मुकादम म्हणून काम करत होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील काही मजूर त्यांच्याकडे काम करतात. 21 रोजी एका मजुराच्या घरात लग्न असल्याने मुकादमासह संतोष नवले, बापू जाधव हे तिघेजण जीप क्र. एमएच 45 एझेड 5077 पाथर्डीला आले. लग्न लावले, नवीन मजूर बघून इसार देऊन माने रात्री एक ते पावणेदोनच्या सुमारास घराच्या दिशेने निघाले.पाथर्डी-अहिल्यानगर महामार्गावरील आष्टी तालुक्यातील मराठवाडी शिवारातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडावर जीप आदळली. यात संतोष साहेबराव नवले, बापू राजेंद्र जाधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर जीप चालक मुकादम तानाजी संभाजी माने हे गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 24 मे रोजी अंभोरा पोलिस ठाण्यात रामचंद्र साहेबराव नवले यांच्या फिर्यादीवरून भरधाव वाहन चालविताना निष्काळजीपणा करून दोघांच्या व स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी मयत चालक संभाजी माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजरसुंब्यात ट्रकने दुचाकी स्वाराला दिली धडक; एक ठार
बीड – भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्देवी घटना आज सोमवारी सकाळ च्या सुमारास मांजरसुंबा उड्डाणपुला जवळील सर्व्हिस रोडवर घडली.
सविस्तर माहिती अशी कि, बीड तालुक्यातील येळंबघाट येथील बाबूशा रामभाऊ कदम वय 53 वर्ष ह.मु.कृषि कॉलनी, बीड हे आज सकाळी 9 च्या सुमारास माजरसुबा मार्गे येळंबघाटकडे दुचाकी क्रमांक एम.एच.12. एच.ई. 7090 ने जात असतांना मांजरसुंबा येथील उड्डाणपुला जवळील सर्व्हिस रोडवर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात बाबूशा कदम हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; कारागृह अधीक्षकाची उचल बांगडी
बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट दिलं जात असल्याचा गंभीर आरोप बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याने केला होता. कराडसाठी तुरुंगात विशेष चहा आणि चांगल्या प्रतीच्या चपात्यांची व्यवस्था केली जाते. इतकंच नव्हे, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावाही कासलेने व्हिडिओ व्हायरल करत केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता वाल्मिक कराडला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपानंतर कारागृह अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्यासह देशमुख कुटुंबातील सदस्यांनी वाल्मिक कराडसह इतर आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप केला होता. यानंतर कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी हे चर्चेत आले होते. आता कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली झाली. आता कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याने केलेल्या आरोपानंतर तत्काळ कारागृह अधीक्षकांची बदली झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला होता. जामीन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्याने आपले आरोप सत्र सुरू ठेवले आहे. शनिवारी (25 मे) रणजित कासले याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओत त्याने म्हटले होते की, कराडला तुरुंगात खास चहा दिला जातो, तसेच त्याच्या जेवणात चांगल्या प्रतीच्या चपात्यांची विशेष व्यवस्था केली जाते. इतकंच नाही, तर तो स्वतःसह इतर कैद्यांच्या नावावर तुरुंगातील कँटीनमधून दरमहा तब्बल 25 हजार रुपयांची खरेदी करत असल्याचा दावा त्याने केला आहे. त्याचबरोबर, इतर कैद्यांना केवळ पांघरण्यासाठी कपडे पुरवले जात असताना, कराडला एक नव्हे तर तब्बल सहा ब्लँकेट दिले गेले असून, त्याचा वापर तो गादीसारखा करतो. कँटीन खरेदीसाठी इतर कैद्यांवर कडक निर्बंध असतानाही कराडकडून स्वतंत्रपणे 10 हजार आणि इतर कैद्यांच्या नावावरून आणखी 10 ते 15 हजारांची खरेदी होत असल्याचा आरोपही त्याने व्हिडीओत केला आहे.
सुसंस्कृत राजकीय चेहरा हरवला; माजी आ. आर.टी. देशमुख यांचं अपघाती निधन
बीड — माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते आर टी देशमुख यांची गाडी लातूर औसा रस्त्यावरील बेलकुंडी गावाजवळ अपघातग्रस्त झाली. उपचारासाठी त्यांना लातूर येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचे निधन झाले.

माजलगाव चे माजी आमदार आर.टी.देशमुख हे सोमवारी गाडी क्रमांक एम एच 44 ए डी 27 97 ने लातूर औसा या मार्गावरून प्रवास करत होते. दुपारच्या वेळी बेलकुंड गावाजवळ गाडी आली असता रस्त्याच्या कडेला जमा झालेल्या पाण्यामुळे गाडी स्लीप होऊन चालकाचे नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेला गाडीने पलटी मारली. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत अंगरक्षक व चालक हे प्रवास करत होते. या रस्ता अपघातात तिघेही जखमी झाले. जखमी आर् टी. देशमुख यांना लातूर येथील खाजगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे ते निकटवर्तीय मानले जात होते. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांनी केलेले संघटनात्मक कार्य मोलाचे ठरले पंचायत समिती सदस्य, प.स.सभापती, जि प सदस्य भाजपचे प्रदेश सरचिटणीस आदी पदावरही त्यांनी काम केले 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना प्रकाश सोळंके यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत प्रकाश सोळंके यांचा पराभव करून त्यांनी पराभवाची परतफेड केली होती. राज्याच्या पंचायत राज समितीचे सदस्य देखील आर टी देशमुख आहेत. राजकारणातला सुसंस्कृत चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे, माजी आमदार विनायक मेटे यांच्यानंतर माजी आमदार आर टी देशमुख यांचे देखील रस्ता अपघातात निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून शोक कळा पसरली आहे.
परिवारातला सदस्य गमावला – धनंजय मुंडे
माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत जिजा भाऊंचे एक अढळ स्थान आहे. मुंडे आणि देशमुख कुटुंबाचे पिढीजात नाते आहे. आज त्या नात्यातील आणखी एक छाया आम्हाला पोरके करून गेली. जिजा भाऊंच्या अकाली निधनाने आम्ही एक मार्गदर्शक नेतृत्वास मुकलो आहोत, त्याचबरोबर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली…!
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गेवराई — दहा हजार रूपयांच्या खऱ्या नोटा देऊन वीस हजार रूपयांच्या पाचशेच्या बनावट नोटा घेतल्या.याच नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बालाप्रसाद बाहेती रा.गेवराई (लाड गल्ली)नासेर शेख रा.बोधेगाव जि.अहिल्यानगर अशी आरोपीची नावे आहेत.बालाप्रसाद बाहेती याने चलनातील दहा रुपयांच्या ख-या नोटा देत नासेर शेख याच्याकडून विस हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेतल्या. त्या नोटा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चलनात वापरत असल्याचा प्रकार काल धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई बायपास रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर उघडकीस आला. पोलीस हवालदार राजु भिसे यांच्या तक्रारीवरून आरोपी बालाप्रसाद बाहेती व नासेर शेख याच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एपीआय दिपक लंके हे करित आहेत.
27 मे पासून राज्यात कोरडे हवामान राहण्याची शक्यता ?
मुंबई — नैऋत्य मान्सून केरळनंतर आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. पुढील 2-3 दिवसांत तो मुंबई आणि इतर काही भागात पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मान्सून साधारणपणे 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात पोहोचतो आणि 11 जूनदरम्यान मुंबईत दाखल होतो.मात्र या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे, तो 25 मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा 10 दिवस आधीच आहे. हवामान खात्याने म्हटले होते की, 16 वर्षांच्या अंतरानंतर केरळमध्ये मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे. शनिवारी, मान्सून एकाच वेळी केरळ, कर्नाटक आणि ईशान्येकडील राज्य मिझोरामच्या काही भागात दाखल झाला. मुंबईस्थित प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी यांनी शनिवारी सांगितले होते की, मान्सून केरळमध्ये पोहोचला आहे आणि त्याच्या पुढील प्रगतीसाठी हवामान अनुकूल आहे.
तो हळूहळू महाराष्ट्राकडे सरकत आहे. कोकण प्रदेशात, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. त्यामुळे दक्षिण कोकण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, जिथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र 27 मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे, राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. सध्याच्या अंदाजानुसार 27 मे पासून राज्यातील हवामान हळू हळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात वाढ देखील होईल. मे महिन्याच्या शेवटपर्यंत कोकण वगळता बहुतांश भागात प्रामुख्याने कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे, आणि किमान 5 जूनपर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
यामुळे किमान 5 जूनपर्यंत तरी राज्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल होण्याची आणि मान्सूनच्या पावसाची शक्यता दिसत नाही या दरम्यान देशातील इतर भागात सुद्धा मान्सूनचा प्रवास तात्पुरता थांबू शकतो. या वर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे. आपल्या भागात मान्सून लवकरच दाखल होईल अशी अपेक्षा करून, अथवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. हवामान कोरडे होणार असल्यामुळे जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.











