गेवराई — किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणावरून दुकानदाराला धारदार शास्त्राने मारहाण केल्याची घटना बंगालीपिंपळा गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दुकानदार याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बंगाली पिंपळा दादासाहेब बबनराव तळतकर हे रविवारी सकाळी साडेआठ सुमारास आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता दुकानदार तळतकर यांनी ‘तुझ्या चुलत्याकडे माझी 900 रुपयांची उधारी आहे, ती आधी जमा कर.’ असे म्हणताच सिद्धार्थ माने संतापला.त्याने दुकानदार तळतकर यांना शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली. इतक्यात त्याचा चुलता सुधीर माने हा हातात धारदार `कत्ती घेऊन आला. दादासाहेब तळतकर यांच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली.या वेळी तळतकर यांचा भाऊ गणेश तळतकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही उजवा हातावर कत्तीचा वार करून जखमी केले. भगवान माने याने लाकडी काठीने तळतकरच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर (बंडु) माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला.गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून दुकानदार तळतकर व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडू माने सर्व रा. बंगाली पिंपळा यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
बीड — प्रेमाच्या त्रिकोणातून हत्त्ये सारखी घटना घडल्याने बीड पुन्हा हादरले आहे. एकाच बॉयफ्रेंडवरून दोन मैत्रिणींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच एका महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला. मृत महिलेचा मृतदेह नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मैत्रिणीसह चार जणांना अटक केली आहे. मृत महिलेचे नाव अयोध्या राहुल व्हरकटे वय 26, वर्ष रा. लुखामसला, ता. गेवराई असे आहे. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचा अपघातात मृत्यू झाला होता. तिला तीन वर्षांची मुलगी असून ती सध्या सासरी आहे. अयोध्या काही महिन्यांपूर्वी होमगार्डमध्ये भरती झाली होती आणि बीड शहरातील अंबिका चौक परिसरात राहून पोलिस भरतीची तयारी करत होती.
दरम्यान, अयोध्याची मैत्रीण फडताडे हिचे राठोड नावाच्या युवकासोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी राठोडची जवळीक अयोध्याशी वाढली. यामुळे फडताडे हिच्या मनात राग निर्माण झाला. दोन दिवसांपूर्वी तिने अयोध्याला घरात बोलावून घेतले. तेथे आपल्या मुलाच्या मदतीने अयोध्याचा गळा दाबून तिचा खून केला.
यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा डाव रचण्यात आला. मध्यरात्री मृतदेह एका खोक्यात ठेवून फडताडेच्या मुलाने आपल्या ओळखीच्या व्यक्तीची स्कूटी घेतली. त्यात मृतदेह ठेवून बीड शहरापासून जवळपास पाच किलोमीटर अंतरावर झाडीत असलेल्या नाल्यात फेकण्यात आला. गुरुवारी सकाळी हा मृतदेह आढळून आला आणि घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौघांना ताब्यात घेतले. फरताडे हिने खुनाची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासात या खून प्रकरणाचा उलगडा केला आहे.












