Home Blog Page 65

अजितदादा बीड नगरपालिका भंगार चोर आणि वृक्षतोड्या निघाली ! सरकारी दवाखान्यातील भंगार उचल व वृक्षतोड प्रकरण तापले 

0

बीड — नगरपालिकेतील कथित भ्रष्टाचाराची ‘भागवत कथा’ आता उघडकीस येण्याच्या मार्गावर असून, या प्रकरणामुळे नगरपालिका व आरोग्य विभागाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी दवाखान्यातील भंगार अवैधरीत्या उचलण्यात आल्याचा तसेच परिसरातील झाडांच्या मोठ्या फांद्यांची बेकायदेशीर तोड करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.

या प्रकरणात नगरपालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभाग एकमेकांकडे बोट दाखवत असून, नगरपालिका मुख्याधिकारी आणि सिव्हिल सर्जन दोघेही ‘तोंडावर बोट’ ठेवून गप्प बसल्याची स्थिती असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. नेमकी परवानगी कोणी दिली? भंगार कुठे नेण्यात आले? त्याची नोंद कुठे आहे? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप होत आहे.

रात्रीच्या अंधारात भंगार उचल; तीन दिवसांचा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सरकारी दवाखान्याच्या मागील बाजूचे लोखंडी शेड उघडून भंगार टेम्पोमध्ये भरून नेले. विशेष म्हणजे हा प्रकार सलग तीन दिवस रात्रीच्या वेळी करण्यात आला. यासाठी दवाखान्याच्या मागील गेटचा वापर करण्यात आला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी पालिका भांडार विभाग सांभाळणारे भागवत जाधव यांचे नाव सांगितले. जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुख्याधिकारी यांचे नाव पुढे केले. मात्र, अधिक तपासात मुख्याधिकाऱ्यांनी कोणताही लेखी आदेश दिलेला नसल्याचे स्पष्ट झाले.

भंगाराबरोबर वृक्षतोड; परवानगी कुणाची?

या प्रकरणात केवळ भंगार उचलच नव्हे, तर दवाखान्याच्या परिसरातील अनेक वर्षे उभ्या असलेल्या वडाच्या झाडाच्या मोठमोठ्या फांद्याही तोडण्यात आल्याचा आरोप आहे. यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली होती का, हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

एकीकडे शासन वृक्षलागवडीला प्रोत्साहन देते आणि दुसरीकडे सरकारी कर्मचाऱ्यांकडूनच वृक्षतोड होत असेल, तर पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

कारवाई का होत नाही? जनतेत संशय

या प्रकरणाला आठवड्याहून अधिक काळ उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारी कर्तव्यदक्ष व कडक प्रशासक म्हणून ओळखले जात असतानाही या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याची चर्चा आहे.

ज्या दवाखान्याच्या परिसरातून भंगार उचलले गेले, त्या दवाखान्याचे प्रशासनही मौन बाळगत आहे. त्या वेळी असलेले सिव्हिल सर्जन बदलीवर गेले असून, नवीन सिव्हिल सर्जन यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. दोन्ही यंत्रणा गप्प असल्याने जनतेत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

डॉ.गणेश ढवळे यांची पालकमंत्री अजितदादा यांना लेखी तक्रार

या संपूर्ण प्रकरणावर सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी पालकमंत्री अजितदादा पवार यांना लेखी तक्रार केली असुन प्रशासनाला दिलेल्या निवेदनात थेट सवाल उपस्थित केले आहेत –

> “सरकारी माल म्हणजे कुणाच्या खासगी मालमत्तेसारखा उचलायचा का?
झाडांची तोड कुणाच्या आदेशाने झाली?
आणि हे सगळे घडत असताना प्रशासन गप्प का?”

जय भवानीला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय पुरस्कार जाहिर; तांत्रिक उत्कृष्टतेचा शिक्कामोर्तब

0

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सभेत होणार सन्मान

गेवराई  — वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या सहकार आणि साखर उद्योगातील मातृ संस्थेकडून राज्यातील साखर कारखान्यांचे तांत्रिक कार्यक्षमतेचे मुल्यमापन करून सर्वोत्कृष्ट कार्यक्षमते बाबतचे पुरस्कार दिले जातात. सन २०२४-२५ च्या हंगामाकरीता जय भवानी सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. जय भवानी पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांना मिळालेला हा पुरस्कार जय भवानीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरत असून तांत्रिकदृष्ट्या जय भवानीने स्वतःला सिध्द केले असून हा पुरस्कार कारखान्याचे कामगार, कर्मचारी, इंजिनिअर्स, अधिकारी, संचालक मंडळ, सभासद यांना समर्पित असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांनी केले आहे. सोमवार, दि.२९ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. यामुळे सर्व स्तरातून जय भवानीचे कौतुक होत आहे.

गेवराई तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या सहकार आणि साखर उद्योगातील मातृ संस्थेकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जय भवानीला जाहिर झाला आहे. कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात जय भवानीने तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टतेवर शिक्कामोर्तब केला आहे. राज्यातील साखर कारखानदारीतील तांत्रिक कार्यक्षमतेचे मुल्यमापन करून वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटकडून हे मानाचे पुरस्कार दिले जातात. जय भवानीने अलिकडच्या काळात तांत्रिकदृष्ट्या स्वतःला सिध्द केले आहे. गेल्या हंगामात कारखान्याची कामगिरी सरस ठरली आहे, जयभवानीला मागील हंगामात शुन्य टक्के ब्रेकडाऊन, तांत्रिक कारणांसाठी कारखाना बंद राहण्याचे प्रमाण ०.५५% राखण्यात यश आले असून ते अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेच्या वापरामध्ये ५.७८% ची वाढ झाली असून कारखान्याने १०.४१% साखर उतारा मिळविला आहे. साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर केवळ २९.८१% इतका मर्यादित ठेवण्यात कारखान्याला यश आले असल्याची माहिती चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली आहे.

चेअरमन अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली जय भवानी कारखान्याने गाळप क्षमता वाढीसह स्वतःला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहेत. जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे देश पातळीवर जय भवानीच्या कामाची दखल घेण्यात आली. सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक ८४.०९% तर रिड्युस्‌‍ड मिल एक्स्ट्रॅक्शन ९५.२६% राखले गेले. प्रायमरी एक्स्ट्रॅक्शन ७३.८५% तर बगॅसची बचत १२.३०% झाली आहे. जय भवानीच्या तांत्रिक कौशल्याची दखल सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी घेतली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या मातृ संस्थेने केलेल्या मुल्यमापनात जय भवानीची कामगिरी सरस ठरल्यामुळे या कारखान्याला सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमते बाबतचा तृतीय पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून सोमवार, दि.२९ डिसेंबर रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या पुरस्काराचे वितरण करून जय भवानीचे कौतुक करण्यात येणार आहे.

जय भवानीच्या यशाबद्दल संस्थापक चेअरमन शिवाजीराव (दादा) पंडित, विद्यमान चेअरमन अमरसिंह पंडित, माजी चेअरमन जयसिंग पंडित, व्हा.चेअरमन भाऊसाहेब नाटकर, आ. विजयसिंह पंडित, जनरल मॅनेजर दत्तात्रय टेकाळे, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडप, संचालक मंडळ, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊसतोडणी मजुर, वाहतुक कंत्राटदार व हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

वन जमिनीवर शेती करता येणार नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

0

नवी दिल्ली — वन जमीन शेतीसाठी वापरण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे वन जमीन वापराबद्दल कायद्याचे उल्लंघन करू नये, असा संदेश सर्वोच्च न्यायालयाने निकालातून दिला आहे.
कर्नाटकमधील गांधी जीवन सामुहिक शेती सहकारी संस्थेला कर्नाटक सरकारने १३४ एकर राखीव जंगलाची जमीन शेतीसाठी भाडेपट्ट्याने दिली होती. हा भाडेपट्टा बेकायदेशीर असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्याची मुदतवाढ मागण्यात आली. परंतु याबाबतची याचिका फेटाळत वनजमिनींवर कोणाचीही खाजगी मालकी सांगता येणार नसल्याचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, “यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालांतून वन आरक्षण रद्द करण्यास प्रतिबंध करणारे बंधनकारक निर्देश दिले आहेत. वनजमिनीवर शेती करण्यासाठी जंगल साफ करणे अपरिहार्य ठरते. परंतु अशी कार्यवाही ही वन (संवर्धन) कायदा, १९८० च्या कलम २ अंतर्गत येते. या कायद्यानुसार केंद्र सरकारची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही वनजमीन बिगर- वनीकरणासाठी वापरता येत नाही.”

खाजगी हक्काला प्रतिबंध

खाजगी व्यक्ती वा संस्था वा पक्षाला बेकायदेशीररीत्या देण्यात आलेली राखीव वन परत मिळवावीत. वनावर कोणाचाही खासगी हक्क असू शकत नाही, असे न्यायालयाने या निकालात राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत. तसेच याचिका फेटाळत भाडेपट्ट्याची मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

झाडे लावण्याचे सर्वोच्च निर्देश

या प्रकरणाचा निकाल लिहिताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, संबंधित वन क्षेत्रात स्थानिक प्रजातींची झाडे लावून पुन्हा वनीकरण करावे. तसेच सहकारी संस्थेने १० वर्षांहून अधिक काळ या वनजमिनीवर शेती करून ताबा ठेवला असला तरी त्यामुळे त्यांना बेकायदेशीररीत्या दिलेल्या भाडेपट्ट्याची मुदतवाढ मिळण्याचा कोणताही अधिकार निर्माण होत नाही.” असेही नमूद केले.
शेतीसाठी परवानगी नाही

सध्याच्या कायद्यांनुसार वनजमिनींचा वापर बिगर-वनीकरणासाठी करता येत नाही आणि त्यात शेतीचाही समावेश होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या परवानग्या देणे कायद्याच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

तर कर्नाटक सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे मान्य केले होते की, सदर जमीन ‘वन’ श्रेणीत येते. तसेच सदर जमीन राज्य वन विभागाच्या मालकीची व ताब्यातील आहे.दरम्यान,सर्वोच्च न्यायालयाने यावेळी २००० साली दिलेल्या एका जुन्या निकालाची आठवण करून दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणत्याही जंगलाचे, अभयारण्याचे किंवा राष्ट्रीय उद्यानाचे आरक्षण रद्द करता येणार नाही, असे जुन्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने देशातील 20 मुलांचा सन्मान;छ. संभाजीनगरच्या अर्णव महर्षीचा समावेश

0

नवी दिल्ली —  वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 20 मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्काराने(2025) सन्मानित करण्यात आले.विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील अर्णव महर्षीला गौरविण्यात आले.


महिला व बालविकास मंत्रालयातर्फे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सात क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातील 20 बालकांना २०२५ या वर्षासाठीचे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.
रुग्णांच्या हातांसाठी AI-आधारित पुनर्वास उपकरण आणि अॅक्टिव्ह हँड रिस्ट बँड तयार करणाऱ्या अर्णव महर्षी याने स्मार्टफोन किंवा लॅपटॉपच्या मदतीने हे नवोन्मेषी उपकरण विकसित केले आहे.या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.

पुरस्कृत बालक भारताच्या अमृत पिढीचे प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करून ही बालके भारताच्या अमृत पिढीचे खरे प्रतिनिधी आहेत. शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि इतर आव्हानांवर मात करून शौर्य, कला-संस्कृती, पर्यावरण, नवाचार, विज्ञान, समाजसेवा व क्रीडा अशा विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. हा पुरस्कार युवा पिढीतील शौर्य, धैर्य आणि संवेदनशीलतेला प्रोत्साहन देणारा ठरेल, असे त्यांनी सांगितले.या मुलांच्या संकल्प आणि प्रयत्नांमुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल असा विश्वास राष्ट्रपती यांनी यावेळी व्यक्त केला.

पुरस्कार विजेत्यांची नावे

व्योमा प्रिया – शौर्य – तमिळनाडू (मरणोत्तर)
कमलेश कुमार – शौर्य – बिहार (मरणोपरांत)
मोहम्मद सिडान पी – शौर्य – केरळ
अजय राज – शौर्य – उत्तर प्रदेश
एस्थर लालदुहोमि – कला संस्कृती – मिझोरम
सुमन सरकार – कला संस्कृती – पश्चिम बंगाल
पूजा – पर्यावरण – उत्तर प्रदेश
शवन सिंह – सामाजिक सेवा – पंजाब
वंश तायल – सामाजिक सेवा – चंदीगड
आइशी प्रिशा – विज्ञान तंत्रज्ञान – आसाम
अर्णव महर्षि – विज्ञान तंत्रज्ञान – महाराष्ट्र
शिवानी उपारा – क्रीडा – आंध्र प्रदेश
वैभव सूर्यवंशी – क्रीडा – बिहार
योगिता मंडावी – क्रीडा – छत्तीसगड
लक्ष्मी प्रगयिका – क्रीडा – गुजरात
ज्योति – क्रीडा – हरियाणा
अनुष्का कुमारी – क्रीडा – झारखंड
धिनिधि देसिंगु – क्रीडा – कर्नाटक
ज्योषणा सबर – क्रीडा – ओडिशा
विश्वनाथ कार्तिके – क्रीडा – तेलंगणा

बीडची सह्याद्री–देवराई सुरक्षित आगीच्या बातम्या अफवा ठरल्या

0

बीड —  गेल्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील काही दैनिके व युट्यूब चॅनेलवर “सह्याद्री–देवराई येथे भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा नष्ट” झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र या बातम्या पूर्णतः चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्यक्षात सह्याद्री–देवराईला कोणतीही आग लागलेली नसून, देवराईपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील पिंपळवाडी येथील वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आग लागली होती. या आगीत सुमारे २० गुंठे वनक्षेत्र बाधित झाले असून फक्त हाळ जळाली आहे, झाडांचे नुकसान झालेले नाही, अशी अधिकृत माहिती आहे.

देवराई ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य व वृक्षप्रेमी श्रीकृष्ण उबाळे यांनी सह्याद्री–देवराई येथे प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आग आटोक्यात आणणाऱ्या वनकर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये शेख अकबर, जयराम काळे, वनरक्षक अशोक केदार, विजय केदार, पद्माकर मस्के, अर्जुन साळुंखे, मधुकर नैराळे व विलास नवले यांचा समावेश होता.

बीड शहरात रॉबरी व मोबाईल चोरी करणारा आरोपी पकडला

0

बीड — शहरातील बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरी पैसे काढून घेणे, खिशातून पैसे लंपास करणे, मारहाण तसेच खून प्रयत्नासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक संतोष भोरे, रा. खडकपुरा पेठ, बीड,असे आहे.या आरोपीवर यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी व चोरी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी हा विशेषतः मोबाईल चोरी करण्याच्या सवयीचा सराईत गुन्हेगार असून तो बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटलसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहून गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे.गुन्हे करून हा आरोपी नाशिक येथे पळून जाऊन तेथे वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने त्याचा माग काढून अटक केली आहे.या कारवाईमुळे बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात होणाऱ्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे.वारंवार गुन्हे करणाऱ्या अशा सराईत आरोपींवर तडीपारीसारखी कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पो हेकॉ संदीप आघाव, मनोज जायभाय, गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी पार पाडली.

कापूस सोयाबीन तुर पीक भाव वाढीसाठी बीडच्या रस्त्यावर शेतकऱ्यांचा आक्रोश

0

बीड — कापूस, सोयाबीन, तूर आदी शेतमालाची भाववाढ करावी या मागणीसाठी शेतकरी पुत्र आज बीडच्या रस्त्यावर उतरलेले दिसले. शेतकरी हक्क मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले

बीडच्या रस्त्यावर शेतमालाला बाजार भाव मिळावा यासाठी शेतकरी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
कापसाला 12 हजार, सोयाबीन 7 हजार, तूर 12 हजार प्रतिक्विंटल भाव द्यावा, कापूस 8 हजार 100 तर सोयाबीन 5 हजार 328 रुपये पेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, सी.सी. आय कडून होणारी अडवणूक थांबवुन खरेदी सुरळीत करण्यात यावी, विदेशातुन होणारी कापूस व सोयाबीन पिकांची आयात बंद करावी या सारख्या अनेक मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आज गुरुवारी सकाळी शेतकरी हक्क मोर्चा काढला.हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मागील जवळपास महिनाभरापासून तयारी सुरू होती. सोशल मीडिया तसेच गावागावात बैठका घेऊन शेतकरी पुत्रांची जनजागृती सुरू होती. याचा मोठा फायदा मिळाला असून शेतकरी पुत्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

नगरसेवकाच्या मुलाची आत्महत्या

0

बीड — राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक अशोक काळे यांचे पुत्र पवन अशोक काळे (वय 32) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवन काळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच घरात एकच गोंधळ उडाला. तातडीने शेजाऱ्यांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घरासमोर जमा झाले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला श.

पवन काळे यांचे वडील अशोक काळे हे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून तुतारी या चिन्हावर निवडून आले आहेत. या निवडणुकीत पवन यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी प्रचारात मोठी भूमिका बजावली होती आणि तरुणांची फळी उभी करून घरोघरी जाऊन प्रचार केला होता. पवन यांचा स्वभाव मनमिळाऊ होता आणि सामाजिक कामात त्यांना विशेष रस होता. त्यामुळे मित्रपरिवारात आणि परिसरात ते परिचित होते.

अशा परिस्थितीत पवन यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळली नसून, कौटुंबिक किंवा वैयक्तिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत.

भरधाव वाहनाची बैलगाड्यांना जोराची धडक; 14 ऊसतोड मजूरासह 5 बैल जखमी;तर एका बैलाचा मृत्यू

0

आष्टी  — तालुक्यातील शेंडगेवाडी (सावरगाव गड), येथील ऊसतोडणी कामगारांच्या बैलगाड्यांना गुरुवारी पहाटे जोराची धडक दिली. या दुर्घटनेत 14 जण गंभीर जखमी झाले असून एका बैलाचा मृत्यू झाला आहे. पाच बैल देखील जखमी झाले आहेत.
वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे ऊस तोडणीसाठी जात असताना तिसगाव-शेवगाव मार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाने अचानक विरुद्ध दिशेने येऊन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बैलगाड्या तब्बल 200 फूट फरफटत गेल्या. या घटनेत पाच बैलांचे हाडे मोडली असून एक बैल जागीच ठार झाला.मजुरांची उपजीविका उद्ध्वस्त करणारी ही गंभीर हानी मानली जात आहे.

14 ऊसतोडणी मजूर जखमी

गंभीर जखमी मध्येपूजा नाना शेंडगे (30)शरद शेंडगे (40) दोघांना पुढील उपचारासाठी इंपल्स हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. उर्वरित 12 मजूर त्यात अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगल, राणी ठेंगल, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे,अशोक ठेंगल, तुळजाई शेंडगे यांच्यावर हॉस्पिटल,तिसगाव येथे उपचार सुरू आहेत.

आमदार सुरेश धस घटनास्थळी दाखल

पहाटे सहाच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तातडीने माहिती देत जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले.आमदार धस यांनी तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन उपचारांची माहिती घेतली. तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.उ.नि.पुजारी यांच्याकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच या मार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवले जावे, दोषी वाहनचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाली तर अधिकाऱ्याचे थेट निलंबन

0

मुंबई — बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला असून  बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला .

अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले.

या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.