Home Blog Page 55

ओला दुष्काळ जाहीर करा ;शेतकऱ्यांना नुकसान भरपाई , कर्जमाफी द्या — लिंबागणेश मध्ये रास्ता रोको

0

लिंबागणेश – मागील आठवडाभरापासून बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, अतिवृष्टी व ढगफुटी झाली. जिल्ह्यातील तब्बल ७ लाख ८९ हजार ६७६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची नोंद झाली असून ती सरासरी पेरणीच्या ९७.६ टक्के इतकी आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यातील २९ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, त्यापैकी लिंबागणेश महसूल मंडळात सर्वाधिक १०७.३ मि.मी. पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके वाहून गेली, शेतजमिनी तळाला गेल्या, घरांची पडझड झाली, तर कापूस, सोयाबीनसह इतर पिके पाण्यात बुडल्यानं शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा, यासाठी आज मंगळवार दि. २३ रोजी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाळासाहेब मुळे, कृष्णा पितळे, रमेश गायकवाड आदींची भाषणे झाली.तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना फोनवरून संवाद साधला, मंडळ अधिकारी जायभाये,तलाठी पोतदार,कृषी सहाय्यक आनंद वाघ, नेकनुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे, सहाय्यक फौजदार बाबासाहेब राख, बाबासाहेब ढाकणे आदींना निवेदन दिले.यावेळी आंदोलनात राजेभाऊ गिरे, कल्याण वाणी,सरपंच बालासाहेब जाधव, दामोदर थोरात, सुरेश निर्मळ,श्रीहरी निर्मळ, ,अँड.गणेश वाणी, बाळासाहेब मुळे, पांडुरंग वाणी, संजय घोलप, शंकर वाणी, श्रीहरी कोटुळे,खंडू वाणी, भगवान मोरे आदी ग्रामस्थ सहभागी होते.

डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की,“आता कसला पंचनामा आणि कसली नोंद? शेतकऱ्यांचं सगळंच वाहून गेलं आहे. प्रशासनाने औपचारिकता न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई व कर्जमाफी करावी. अन्यथा शेतकरी आत्महत्यांकडे ढकलले जातील.”

लिंबागणेश – बोरखेड पुल खचला

लिंबागणेश ते बोरखेड मार्गावरील पूल मुसळधार पावसामुळे खचला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यासंदर्भात आठवडाभरापूर्वी तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. मात्र, अद्याप दुरुस्ती न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने पूल दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गोदावरीच्या पुराचा पोहनेरला वेढा;धनंजय मुंडेंनी केली पूर परिस्थितीची पाहणी

0

यंत्रणा सज्ज; कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी तयार राहण्याच्या प्रशासनास सूचना

परळी — गोदावरी नदी प्रवाहास प्रचंड पूर आलेला असून, परळी तालुक्यातील पोहनेर गावास पुराचा वेढा पडला आहे, याठिकाणी आज परळीचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी चक्क होडीतून (चप्पू) जात गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर व दिलासा दिला.

धनंजय मुंडे यांनी या संपूर्ण भागातील गावांच्या स्थितीचा प्रशासनाकडून आढावा घेत प्रशासनास कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी व सर्व प्रकारच्या यांत्रणांसह सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळित होऊन संसारोपयोगी साहित्य, अन्न धान्य आदींचे नुकसान झाले असून, स्थानिक आपत्ती निवारण निधीतून तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सूचना श्री मुंडे यांनी महसूल प्रशासनास केल्या आहेत.

पोहनेर सहित आजूबाजूच्या बऱ्याच गावांना पाण्याचा वेढा पडलेला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रशासनाशी किंवा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान राज्य सरकार या भीषण परिस्थिती मध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील व १००% नुकसानीची भरपाई दिली जाईल, अशी अपेक्षा देखील धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे. यावेळी ॲड गोविंदराव फड, राजाभाऊ पौळ, लक्ष्मणराव पौळ, प्रभाकर पौळ, विशाल श्रीरंग पाटील, चंद्रकांत कराड, माऊली तात्या गडदे, बाबासाहेब काळे, नितीन निर्मळ, राम किरवले यांसह ग्रामस्थ तसेच तहसीलदार व्यंकटेश मुंडे, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांसह महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आदी विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. योगेश क्षीरसागरांनी चौसाळा पूरग्रस्त भागाची केली पाहणी

0

बीड — विधानसभा मतदारसंघातील हिंगणी खु., चौसाळा, वाढवणा पूल, बोरखेड, शिंदेवस्ती पूल (बोरखेड) आदी गावांमधील पूरग्रस्त भागात मंगळवारी (दि. २३) राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पाहणी केली. याच वेळी डॉ.सारिका क्षीरसागर यांनीही बीड व शिरूर कासार तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. दाम्पत्याने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेती उभी करणे कठीण झाले आहे. या नुकसानीची माहिती डॉ. क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना सादर केली आहे. आज (दि.२४) अजितदादा पवार यांचा दौरा होण्याची शक्यता असून ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तातडीने मदत जाहीर करण्यासंदर्भात ते निर्णय घेतील, अशी माहिती डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिली. त्यांनी पुढे म्हटले की, पूरस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी सरकार हालचाल करत आहे. ऑगस्टमधील नुकसानीसाठी ५६ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला मिळाले आहे. सप्टेंबर मधील पंचनामे पूर्ण होताच मदत दिली जाणार आहे, असेही डॉ.क्षीरसागर म्हणाले.

डॉ.सारिका क्षीरसागर यांची बीड, शिरूर कासार तालुक्यातील गावांमध्ये पाहणी

डॉ.सारिका क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील राजुरी, बहादरपूर, साक्षाळपिंपरी तसेच शिरूर कासार तालुक्यातील कमलेश्वर धानोरा आदी गावांमध्ये नुकसानग्रस्त शेती, रस्त्यांची पाहणी केली. दरम्यान, आज (दि. २४) त्या गात शिरापूर, हाजीपुर, गाजीपूर, आर्वी, फुलसांगवी व मार्कडवाडी या गावांना भेट देणार आहेत.

कल्पतरू’चा दांडिया कार्यक्रम पुढे ढकलला

जिल्ह्यातील सलग पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असल्याने बीड शहरातील ‘कल्पतरू’ आयोजित ‘नवजलसा दांडिया’ कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम २५ सप्टेंबर रोजी होणार होता. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सचिव डॉ.सारिका क्षीरसागर यांनी दिली.

आ.संदीप क्षीरसागर पुन्हा नागरिकांच्या मदतीला धावले; अनेक ठिकाणी नुकसानीची केली पाहणी

0

प्रशासकीय विभागाला तातडीने उपाय योजना करण्याचे दिले निर्देश

बीड —  बीड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने नुकसान झाले असून आ.संदीप क्षीरसागर पुन्हा एकदा नागरिकांच्या मदतीला धावून गेले. मंगळवार (दि.२३) रोजी त्यांनी मतदारसंघातील अनेक ठिकाणी जाऊन नुकसानीची पाहणी केली.

मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यासह तालुक्यात देखील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आणि नागरिक संकटात सापडले आहेत. अशा नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर हे सातत्याने अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करता आहेत. शेतकऱ्यांना, नागरिकांना मदत करताना पाहावयास मिळत आहेत. शासनाच्या वतीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.शासन दरबारी पत्र व्यवहार करून तातडीने उपाय योजना करण्याची मागणी करत आहेत. मंगळवार (दि.२३) रोजी देखील आ. संदीप क्षीरसागर नुकसानीची पाहणी करायला पोहचले. बीड मतदारसंघातील लिंबा-रूई येथे अतिवृष्टीमुळे पुलाला मोठे भगदाड पडल्यामुळे मुर्शदपूर, लिंबा-रूई, रुई-लिंबा, तांदळवाडी भिल्ल, रुद्रपुर, केतूरा या गावांचा संपर्क तुटला आहे.

बीड तालुक्यातील पारगाव सिरस गावाला भेट देऊन अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली. उमरद जहांगीर येथील नदीवरील पूल अतिवृष्टीने वाहून गेला आहे. याठिकाणी देखील आ.संदीप क्षीरसागर यांनी गावकऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी संवाद साधून प्रशासकीय विभागाला योग्य कार्यवाहीच्या सुचना दिल्या

आ.क्षीरसागरांकडून जलमय झालेल्या धांडे नगर परिसरात पाहणी

आ. संदीप क्षीरसागर हे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ग्रामीण भागासह शहरात देखील अनेक भागात पाहणी करत आहेत. नुकसान झालेल्या ठिकाणी जाऊन संकटात सापडलेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने मदत करत आहे. बीड शहरातील बार्शी रोडवरील कै. शिवाजी धांडे नगर परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे हा परिसर जलमय झाला आहे. आ.संदीप क्षीरसागर यांनी धांडे नगर भागात जाऊन नागरिकांशी आणि महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांसोबत संपूर्ण परिसरात जाऊन पाहणी केली.पाहणी दरम्यान त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना वाढलेली पाणीपातळी कमी करण्यासाठी तात्काळ उपाय योजना करण्यास सांगितले.

मराठवाडयात सुर्यघर योजनेतून 46 हजार 688 घरे प्रकाशाने उजळली

0

छ. संभाजीनगर — घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्हयात 46,688 घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने मोफत विजेचा लाभ मिळून शुन्य विजबिलाचे लाभार्थी झाले असून ही घरे प्रकाशाने उजळली आहेत. या लाभार्थी ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर उर्जा पॅनलच्या माध्यमातून 173.91 मे.वॅट वीज निर्मिती होत आहे.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे.
ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मर्यादित आहे.

मराठवाडयात सुर्यघर योजनेचे लाभार्थी

मंडल कार्यालय लाभार्थी
नांदेड मंडल — 3,905
परभणी मंडल — 3,929
हिंगोली मंडल — 1,726
नांदेड परिमंडल — 10,560
लातूर मंडल   — 7,264
बीड मंडल   — 3,702
धाराशिव मंडल — 1,942
लातूर परिमंडल —  12,908

छ. संभाजीनगर — 13,571
शहर
छ. संभाजीनगर —  5,339
ग्रामीण
जालना मंडल — 4,310
छ.संभाजीनगर
परिमंडल —  23,220

छ. संभाजीनगर
प्रादेशिक कार्यालय — 46,688

या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. 300 युनिट पर्यंत वीज वापरणा—या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे. यासाठी ही योजना सुरू केलेली आहे.

वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने यांनी केले आहे.

आ.संदीप क्षीरसागर नागरिकांना वाचविण्यासाठी सरसावले

0

अजित पवारांना संपर्क करून आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत उपलब्ध केली

बीड — बीड जिल्ह्यासह तालुक्यात अतिवृत्ती झाल्याने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे बीड मतदार संघात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती झाल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या पूरजन्य ठिकाणी बीड विधानसभेचे आ.संदीप क्षीरसागर हे नागरिकांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

बीड शहरातील इस्लामपुरा अतिवृष्टीमुळे रस्ता वाहून गेला होता. त्याभागातील शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण येत होती. त्या भागातील नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी घटनास्थळी उभे राहून बीड नगरपालिकेच्या यंत्रणेकडून प्रत्यक्षात काम करून घेतले. बीड मतदार संघातील साक्षाळपिंपरी येथील सिंदफणा नदीला मोठा पूर आला होता. संदीप भैय्यांनी त्याठिकाणी जाऊन गावातील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर देऊन या अतिवृष्टीच्या काळात कोणताही धोकादायक प्रवास न करण्याचे आवाहन केले. शिरापूर गात या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाल्याने पूर आला होता. या पुरात काही नागरिक अडकले होते. याची माहिती मिळताच संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने पुरात अडकलेल्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केले. या आपत्तीमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासन व कार्यकर्त्ये अहोरात्र प्रयत्न करत आहेत.संकटाच्या काळात धीर सोडू नका मी आपल्या सोबत असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी नागरिकांना धीर दिला.
घटनास्थळावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांना तातडीने केला संपर्क
या सर्व परिस्थितीची गंभीरता पाहून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना संदीप क्षीरसागर यांनी तातडीने संपर्क करून परिस्थितीबद्दल माहिती देत आपत्ती व्यवस्थापनाकडून मदत देण्याची विनंती केली. अजित दादांनी पण परिस्थितीचे गांभीर्य समजून बीडच्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना आदेश देऊन व्यवस्थापनाची टीम उपलब्ध करून दिली.
संदीप भैय्यांमुळे आईसह एका लहान बाळाचे सुरक्षितस्थळी स्थलांतर
बीड मतदार संघातील शिरापूर गात येथे पुराच्या पाण्यात काही नागरिक अडकले होते. त्यामध्ये एका महिलेसह लहान बाळ अडकल्याची माहिती मिळताच आ.संदीप क्षीरसागर हे तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपत्ती निवारण विभागाच्या मदतीने सर्व नागरिकांसह पुरात अडकलेल्या एक महिलेसह तिच्या लहान बाळाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले.

श्रीमती पुष्पाताई पांगारकर यांचे निधन

0
बीड — माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मोठ्या भगिनी श्रीमती पुष्पाताई श्रीधरराव पांगारकर यांचे सोमवार दि.22 रोजी प्रदीर्घ आजाराने  निधन झाले. त्या 79 वर्षाच्या होत्या.
माजी नगरसेवक सुनिल पांगारकर आणि डॉ.गणेश पांगारकर यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पाताई श्रीधरराव पांगारकर या काही महिन्यांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर बीड येथेच उपचार सुरू होते. सोमवार दि.22 रोजी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात दोन मुलं, पाच मुली, सुना नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर सोमवारी बार्शी रोडनजीक श्री भगवान बाबा प्रतिष्ठान जवळील अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्रीमती पुष्पाताई या स्व.केशरकाकू क्षीरसागर यांच्या बरोबरच, राजकीय. धार्मिक. सामाजिक आणि सांप्रदायिक कार्यक्रमात सहभागी असायच्या त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पांगरकर कुटुंबीयांच्या दुखात “सह्याद्री माझा” सहभागी आहे

२२ सप्टेंबरपासून या वस्तू होणार स्वस्त

0

नवी दिल्ली: महागाईच्या झळा बसलेल्या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो उद्या, २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणार आहे. यामुळे घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य, शिक्षण साहित्य तसेच औषधे यांची किंमत कमी होणार आहे.

साबण, शॅम्पू, टूथपेस्ट

रोजच्या वापरातील या वस्तूंवर जीएसटी १८% वरून ५% पर्यंत कमी

एसी, फ्रिज, टीव्ही यांसारख्या वस्तूंवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कपात.

घरबांधकामासाठी अत्यावश्यक असलेल्या सिमेंटवर २८% ऐवजी फक्त १८% जीएसटी.

जीवनरक्षक औषधे, निदान किट्स व हेल्थ उपकरणांवर आता १२% किंवा १८% ऐवजी फक्त ५% किंवा शून्य टक्के जीएसटी.

पेन्सिल, क्रेयॉन, खोडरबर, कॉम्पास बॉक्स, नोटबुक यावर १२% जीएसटी थेट ५% किंवा शून्यावर.

३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेची दुचाकी व छोट्या कारवरील दर २८% वरून १८%.

तूप, लोणी, चीज आणि पॅकेज्ड खाद्यपदार्थ आता १२% ऐवजी ५% जीएसटीवर उपलब्ध.

जीएसटी कपातीचा परिणाम थेट एसी, डिशवॉशर, फ्रिज यांसारख्या वस्तूंवर दिसून येणार आहे. व्होल्टास, डायकिन, गोदरेज अप्लायन्सेस, पॅनासोनिक, हायर आदी एसी कंपन्यांनी २ ते ८ हजार रुपयांपर्यंत किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे. बॉशसारख्या कंपन्या डिशवॉशर व इतर उपकरणांवरील दरही कमी करत आहेत. कपातीमुळे ऑक्टोबर महिन्यात ग्राहकांच्या खिश्यावरचा भार कमी होऊन खरेदी अधिक परवडणारी होणार आहे.

घरासाठी आईच्या डोक्यात दगड घालून मुलाने केली हत्या

0

परळी — राहते घर माझ्या नावावर का करून देत नाहीस असं म्हणत मुलाने आईच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना भोजनक वाडी येथे शनिवारी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चंद्रकांत कांगणे वय अंदाजे 26 वर्ष हा आपली आई (मयत सुनंदा ज्ञानोबा कांगणे, वय अंदाजे 50 वर्ष, रा. भोजनकवाडी हिच्याकडे सतत घर नावावर करून देण्याची मागणी करत होता. मात्र,आईने घर तिच्या नावेच ठेवले. त्यामुळे आरोपी चंद्रकांत याने रागाच्या भरात दि. 20 सप्टेंबर रोजी सकाळी आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड घालून गंभीर दुखापत केली. जखम गंभीर असल्याने त्यातच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 103 (1) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाला पोलीसांनी अटक केली आहे. अधिक तपास पो.नि. सय्यद हे करीत आहेत.
दरम्यान, जन्मदात्री आईसारख्या मायेच्या व्यक्तीची केवळ मालमत्तेच्या वादातून घडलेली हत्या ही समाजातील नैतिक अधःपतनाचे उदाहरण असुन, या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या -आ.संदीप क्षीरसागर

0

मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री, कृषिमंत्र्यांना दिले पत्र

बीड — अतिवृष्टीमुळे पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

बीड विधानसभा क्षेत्रासह (बीड व शिरूर का. तालुका) जिल्हा व महाराष्ट्रामध्ये गत तीन महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. गत ऑगस्ट महिन्यात व दि.१३ सप्टेंबर २०२५ पासून सातत्याने अतिवृष्टी पाऊस होत आहे. या पावसामुळे सर्वच पिके व फळबागांचे शतप्रतिशत नुकसान झाले आहे. महसुल, कृषी विभाग तथा तत्सम विभागाला सरसकट शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार, महसूलमंत्री
ना.चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री ना.दत्तामामा भरणे, राज्याचे मा.मुख्य सचिव, मा.विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आणि बीड चे जिल्हाधिकारी यांच्याकडे आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.

यामध्ये बीड विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर का. तालुक्यात सर्वच महसुल मंडळात अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. मुख्य नदी व उप नद्यांना पुर येवून शेतकरी बांधवांच्या जमिनी खरडुन गेल्या आहेत. शेतामध्ये पुराचे पाणी शिरून पिक व फळबागाचे नुकसान झाले आहे. दीर्घकाळ पाणी जमिनीवर राहिल्याने पिकांचे नुकसान होऊन घरांची पडझड झाली आहे. सार्वजनिक मालमत्ता रस्ते व पुल खरडुन जाणे, शाळा व शासकीय इमारतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, पशुधन मृत्युमुखी पडणे, विजेच्या तारा तुटणे, खांब मोडणे, रोहित्र खराब होणे व त्यामध्ये जिवीतहानी होणे, बंधारे फुटल्यामुळे शेती वाहुन जाणे, तलाव फुटण्याची शक्यता असणे व कपिलधार ता.बीड, भानकवाडी (वरची) ता.शिरूर का. याठिकाणी भुस्खलन होणे या सर्व बाबींची सकारात्मक दृष्टीकोनातून नुकसानीचे सर्वेक्षण व वस्तुनिष्ठ पंचनामा करावा. शेतकरी बांधव,नागरिक यांना सरसकट नुकसान भरपाई देवून मदत करावी. तसेच मागील तीन महिन्यापासून होत असलेल्या पावसामुळे सर्वत्र जमीन, नदी, नाले, बंधारे, तलाव पाणीमय झालेले आहेत. त्यामध्ये सर्व पिकांचे व फळ बागांचे शतप्रतिशत नुकसान झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यासर्व बाबींचे निकष पाहता तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार शेतकरी बांधव, ग्रामस्थ व नागरिकांना सर्वरित्या सक्षम साथ व सहकार्य होणेसाठी ओला दुष्काळ जाहिर करून सर्वोतोपरी मदतीची गरज आहे. त्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे केली आहे.