Home Blog Page 54

लग्नात बदनामी होईल या भीतीने नवरदेवानेच मित्राचा काढला काटा

0

बीड — पाटोदा तालुक्यातील डोंगरदेवी दगडवाडी शिवारात सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी वय 30 वर्ष याचा मृतदेह आढळून आला होता.या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चांदचा मित्र अतिक गुलाब तांबोळी रा. इस्लामपुरा पेठ बीड यानेच दीड लाख रुपयांच्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी त्याला मध्यरात्री बीड शहरातून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत चांद याचे आरोपी अतिककडे १ लाख ५० हजार रुपये होते. तो या पैशांचा सतत तगादा लावत होता. विशेष म्हणजे, आरोपी अतिक याचे सोमवारीच लग्न होणार होते. पैसे दिले नाहीत तर तुझ्या लग्नात येऊन गोंधळ घालेन, असा इशारा चांदने दिला होता. यामुळे चिडलेल्या आणि लग्नात बदनामी होईल या भीतीने ग्रासलेल्या अतिकने रविवारी रात्री चांदला गाठले आणि दगडाने ठेचून हत्या केली.
सोमवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचे वातावरण होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपनिरीक्षक श्रीराम खटावकर व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या २४ तासांत आरोपी अतिक तांबोळीला बेड्या ठोकल्या.
चांद रविवारी बीडला आला होता, तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्याने पुतण्याला फोन करून गाडी हॉटेलवरून घेऊन जा, मला उशीर होईल, असे सांगितले होते. ही त्याची शेवटची विचारपूस ठरली. आरोपी अतिक तांबोळी यास तपासासाठी पाटोदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे,अशोक दुबाले,सोमनाथ गायकवाड,बाळु सानप, राहुल शिंदे,मारूती कांबळे,युनुस बागवान, यादव, सुरवसे, अशफाक, परझणे,शेख, हराळे यांनी केली आहे.

बीड व पुणेच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवार

0

मुंबई — अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर आली. शनिवारी त्यांनी शपथही घेतली. त्यानंतर आज बीड तसेच पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीनंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर बीड आणि पुणे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद अजित पवार सांभाळायचे. आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. ही जबाबदारी कोणाला मिळणार, याची चर्चा रंगली होती. परंतु तेव्हा अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वत:कडेच ठेवले होते. ते अगोदर पुण्याचे पालकमंत्री होते. अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता हीच जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

परळीतील पाटबंधारे सर्कल कार्यालय परभणीला जाणार

4

 परळी — येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून परळी येथे आणलेले व गेल्या 30 वर्षापासून सुरू असलेले  पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल कार्यालय आता परभणी  येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

सर्कल कार्यालयाच्या माध्यमातून बीड, लातूर आणि परभणी या तीन जिल्ह्यांतील पाटबंधारे प्रकल्पांचा कारभार चालवला जातो. परळी हे तिन्ही जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रशासन, शेतकरी आणि संबंधित अधिकाऱ्यांसाठी हे कार्यालय परळीत असणे अत्यंत सोयीचे मानले जात होते. मात्र, असे असतानाही प्रशासकीय आस्थापना पुनर्रचनेच्या नावाखाली हे कार्यालय परळीतून हटवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे.काही दिवसांपूर्वीच परळीतील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यानंतर आता पाटबंधारे सर्कल कार्यालयही परळीतून हलवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व जाणीवपूर्वक कमी केले जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

पाटबंधारे विभागाचे कार्यालय इथून हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याआधी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, प्रीतम मुंडे यांनी हे कार्यालय येथेच थांबवण्याचा प्रयत्न केला. पाटबंधारेचे सर्कल ऑफिस हलवण्यात येणार असल्याने परळीचे प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप होऊ लागला आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे सर्कल ऑफिस पळवण्यात येत असल्यामुळे खळबळ माजली आहे.

खाकीचा धाक इतका की…! घटना तशीच,नावात ,जागेत बदल पुन्हा 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या !!

0

शिरूर का.– बीड जिल्ह्यात फक्त आरोपींच्या नावात, घटना स्थळांच्या, पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये बदल होतो आहे. मात्र हत्येचे सत्र दररोज सुरू आहे. पोलीस अधीक्षकांनी इतकी कायद्याची जरब ईतकी बसवली आहे की गुन्हेगारांना कमी आणि जनतेलाच कधी कुठे काय घडेल म्हणून धास्ती बसली असल्याचं पाहायला मिळत आहे. शिरूर तालुक्यातील खोकरमोह शिवारात एका 30 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवार दि.२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

शिरूर का.तालुक्यातील खोकरमोह शिवारात रायमोह येथील कलरचे काम करणारा चांद उर्फ (गुड्डू) अलाउद्दीन तांबोळी वय 30 वर्ष या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी शिरूर पोलीस ठाण्याचे पोनि.प्रवीण जाधव व रायमोह पोलीस चौकीचे रवी उबाळे व अन्य कर्मचारी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

लाचखोर सहकार अधिकारी संतोष भंडारी 25 हजार घेताना एसीबीने पकडला

0

बीड –पतसंस्थे विरुद्धच्या तक्रारी मिटवण्यासाठी 50 हजारांची लाच मागणारा सहकार अधिकारी संतोष भंडारी 25 हजारांचा पहिला हप्ता घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ जाळ्यात पकडले आहे.
अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संतोष भंडारी यास 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडून मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई येथील एका पतसंस्थेविरुद्ध विरोधात निबंधक कार्यालयात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि अहवाल अनुकूल देण्यासाठी संतोष भंडारी याने संस्थेच्या सचिवाकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 25हजार रूपये देण्याचे निश्चित झाले होते.या प्रकरणी पतसंस्थेच्या सचिवांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने आज दुपारी अंबाजोगाई येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सापळा रचला. लाचेच्या एकूण 50 हजार रुपयांपैकी 25 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारताना पथकाने संतोष भंडारी यांना पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संतोष भंडारी याच्यावर अंबाजोगाई येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर ,निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग झालं

1

नवी दिल्ली — अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. हा त्यांचा सलग नववा केंद्रीय अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पासह त्यांनी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री यांनी रविवारी सकाळी 11 वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पासह, त्या सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या जगातील पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या. मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून लोकांच्या अनेक अपेक्षा आहेत. काय स्वस्त होईल आणि काय महाग होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “विशेषतः भारतात उत्पादित होणाऱ्या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. काही वस्तूंचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, चामडे आणि कापडांची निर्यात देखील शुल्कमुक्त असेल आणि या वस्तूंवरील सीमाशुल्क कमी केले जात आहे. संरक्षण क्षेत्रात मूलभूत सीमाशुल्क माफ केले जातील.”

काय स्वस्त 

कपडे

चामड्याच्या वस्तू

सिंथेटिक पादत्राणे

चामड्याचे उत्पादने

17 कर्करोग आणि मधुमेहावरील औषधे शुल्कमुक्त

लिथियम-आयन बॅटरी

मोबाइल बॅटरी स्वस्त होणार

सौर ग्लास स्वस्त होणार

मिश्र वायू सीएनजी

ईव्ही

मायक्रोवेव्ह ओव्हन

विमान इंधन

परदेश प्रवास

काय महाग

याव्यतिरिक्त, ज्या क्षेत्रांमध्ये कस्टम ड्युटी वाढवल्या गेल्या आहेत, म्हणजेच ज्या वस्तू अधिक महाग होणार आहेत त्यामध्ये दारू, भंगार, सिगारेट खनिजे आणि पीव्हीसी फ्लेक्स शीट यांचा समावेश आहे.

संसदेत अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “आत्मनिर्भरता हे आपले मार्गदर्शक तत्व असल्याने, आम्ही देशांतर्गत उत्पादन क्षमता, ऊर्जा सुरक्षा आणि आवश्यक आयातीवरील अवलंबित्व कमी केले आहे. त्याच वेळी, आम्ही सरकारच्या प्रत्येक कृतीचा नागरिकांना फायदा मिळावा याची खात्री केली आहे. रोजगार निर्मिती, कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी, घरगुती खरेदी शक्ती सुधारण्यासाठी आणि लोकांना सार्वत्रिक सेवा प्रदान करण्यासाठी सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे सुमारे 7% उच्च विकास दर झाला आहे आणि गरिबी कमी करण्यास आणि आपल्या लोकांचे जीवन सुधारण्यास लक्षणीय मदत झाली आहे.”

ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणांना बेदम मारहाण

0

केज — तालुक्यातील पारधी समाजाचे ऊस तोड मजूर हे पश्चिम महाराष्ट्रातील एका कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले असताना त्यांना एका वाहनातून अज्ञात ठिकाणी नेऊन जबर मारहाण केली आहे. त्यांच्या सर्वांगावर मारहाणीचे वळ उठलेले असून भेदरलेले हे युवक गावाकडे पळून आले आहेत.या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

केज तालुक्यातील केवड येथील श्रावण महादेव काळे आणि राहुल विलास काळे हे पारधी समाजातील दोन तरुण नागझरी येथील ऊसतोड मुकादम सोबत पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. दि. ३० जानेवारी, शुक्रवार रोजी त्या दोघांना एका पिक-अप मधून अज्ञात ठिकाणी घेऊन जात सुमारे १० ते १२ लोकांनी त्यांना अमानुष व बेदम मारहाण केली. बेदम मारहाण झाल्या नंतर श्रावण महादेव काळे, राहुल विलास काळे हे त्यांच्या केज तालुक्यातील केवड या गावी आले.
त्या नंतर दि. ३१ जानेवारी रोजी ते अशिक्षित असल्या कारणाने त्यांना झालेल्या मारहाणीची माहिती देण्यासाठी ते दोघे त्यांच्या नातेवाईक सोबत केज येथील पोलिस ठाण्यात आले आहेत. मात्र सदरील मारहाणीची घटना केज पोलिस ठाणे हद्दीच्या बाहेर आणि जिल्ह्या बाहेर असल्या कारणाने गुन्हा नोंदवून घेण्या संदर्भात अडचणी येत आहेत.

सदर मारहाण झालेल्या युवकांशी आणि त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला असता त्यांनी ऊसतोड मुकादम यांनी त्यांना एका वाहनाने धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील साखर कारखान्याच्या परिसरात आणून रात्री बेदम मारहाण केली असे सांगितले आहे. तर ऊस तोड मुकादमाशी संपर्क साधला असता तो म्हणत आहे की, या मारहाणीशी त्याचा संबंध नसून त्या दोघांना त्यांच्या जात पंचायती मध्ये मारहाण झाल्याचे सांगत आहे.

म्हातारचळ..!चॉकलेटच आमिष देऊन अल्पवयीन मुलीवर वृद्धाचा अत्याचार

4

माजलगाव — चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध नराधमाने नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना दि.२८ जानेवारी रोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली.पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस तत्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते, त्यांची इयत्ता चौथीत शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि. 28 जानेवारी रोजी सकाळी शाळेत जात असताना मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली. यावेळी रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. दरवाजाची कडी लावून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून अत्याचार केला.त्यानंतर मुलगी शाळेत गेली, घरी आल्यापासून ती शांत शांत राहत असल्याने दि.२९ रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अंबाजोगाई येथून फरार आरोपीस जेरबंद केले. आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी दिली आहे.

सोयाबीन दरात तब्बल 35% वाढ. पुढे कशी राहणार स्थिती?

0

येवला — कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरांनी गेल्या दोन महिन्यांत लक्षणीय वाढ नोंदवली आहे. १ डिसेंबर २०२५ ते २९ जानेवारी २०२६ या कालावधीत सोयाबीनच्या सरासरी बाजारभावात तब्बल ३५.५६ टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे दीर्घकाळ कमी दरांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक गणित जुळवतांना मेटाकुटीला येत होते.
उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारात कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. मात्र डिसेंबरनंतर हळूहळू परिस्थितीत बदल दिसू लागला आणि जानेवारी महिन्यात दरांनी वेग घेतला.

डिसेंबरच्या सुरुवातीला येवला बाजार समितीत सोयाबीनचा सरासरी दर प्रतिक्विंटल सुमारे ४,३०० रुपये होता. त्या तुलनेत २९ जानेवारी २०२६ रोजी हा दर थेट ५,८२९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या ६० दिवसांत प्रतिक्विंटल तब्बल १,५२९ रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.२९ जानेवारी रोजी सोयाबीनला प्रतिक्विंटल ५,८५१ रुपये इतका उच्चांकी कमाल दर मिळाल्याची नोंद आहे. डिसेंबर महिन्यात बाजारात दर तुलनेने स्थिर होते. मात्र जानेवारीत जागतिक बाजारातील घडामोडी, सोयाबीनची वाढलेली मागणी आणि मर्यादित उपलब्धता यांचा परिणाम थेट स्थानिक बाजारावर दिसून आला.

महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ७,०७७ रुपये दराची शिफारस केली आहे. सध्याचा बाजारभाव या शिफारस केलेल्या दराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. जर ही वाढ टिकून राहिली, तर येत्या काळात शेतकऱ्यांना आणखी चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरातील टप्प्याटप्प्याने झालेली वाढ पाहिली असता, १ डिसेंबर २०२५ रोजी किमान ४,००० रुपये, कमाल ४,४४१ रुपये आणि सरासरी ४,३०० रुपये दर होता. १ जानेवारी २०२६ रोजी सरासरी दर ४,६०० रुपयांपर्यंत पोहोचला. २४ जानेवारीला सरासरी दर ५,३७५ रुपये झाला, तर २९ जानेवारीला तो ५,८२९ रुपयांवर स्थिरावला

माजलगाव मध्ये सराफा व्यापाऱ्याला 60 लाखाचे दागिने लुटणाऱ्या चौघांना एलसीबीने ठोकल्या बेड्या

0

बीड — आठवडी बाजाराला निघालेल्या सराफा व्यापाऱ्याचे साठ लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लुटल्याची घटना माजलगाव‌ मध्ये घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18 तोळे सोने व एक किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.
सराफा दुकानदार अमोल पंढरीनाथ गायके वय ३१ वर्ष रा. भाट वडगाव ता. माजलगाव) हे त्यांचे माजलगाव येथील अमोल ज्वेलर्स या दुकानातून आठवडी बाजारात खेर्डा येथे सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी २५ जानेवारी रोजी त्यांच्या दुचाकीवर पुतण्यसाह जात होते. यावेळी पाठीमागून दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांना बाजूला थांबण्यास भाग पाडले. गायके यांनी गाडी थांबविल्यावर त्यांना तीन आरोपींनी सत्तूरचा धाक दाखवून त्यांचेकडील सोन्या-चांदी दागिन्याची पिशवी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला. त्यावरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

वरील प्रमाणे गुन्हा घडल्यापासून बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला यांना आदेशीत केले की दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील गेला माल सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करावे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तीन वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला.तपासात तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर असे निष्पन्न झाले की, यातील फिर्यादी गायके यांचा माजलगाव शहरातून रेकी करून पाठलाग केला असून आरोपींनी दुचाकींची अदला बदली करून पोलीसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बारकाईने तपास करून यातील आरोपीं निष्पन्न केले. यातील आरोपी हे सध्या बीड येथील शांताई हॉटेलच्या पाठीमागील गल्लीत आहेत, अशी माहिती मिळताच पथकांनी आरोपी एकनाथ ऊर्फ नारायण अरुण कपाले वय ३५ वर्ष, रा. पाटोदा ता. परतूर जि.जालना ह.मु. बीड, कृष्णा तुकाराम निरडे वय २२ वर्ष, अभिषेक अशोक शिंदे वय २२, दोघेही रा. माजलगाव यांना ताब्यात घेतले.

आरोपींतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांना अधिक विचारपूस करता एकनाथ कपाले याने सांगितले की, तो सराफा कारागिर असून त्याने पूर्वी माजलगाव येथे वेगवेगळे ठिकाणी कारागिरीचे काम केले होते व त्याला माजलगाव येथील सोनार दुकानदार यांच्या आठवडी बाजारात जाण्याचे वार व वेळ माहिती होती. तसेच तो सध्या खूप कर्जबाजारी झालेला होता. त्यामुळे नारायण याने माजलगाव येथील सराफा दुकानदार यास आठवडी बाजारास जाताना लुटण्याचे ठरवले. एकनाथ कपाले याने रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णा निरडे व अभिषेक शिंदे यांना त्याचा प्लॅन सांगितला. त्यानुसार त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदार मित्र संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे वय २८ वर्ष, रा. उमरगा मन्त्रा ता. उदगीर जि.लातूर ह. मु. पुणे), व विशाल सूर्यकांत सुळ(रा. माजलगाव ह.मु. पुणे) यांना कटात सामील केले.
आरोपींचे प्लॅन नुसार २५ जानेवारी रोजी एकनाथ कपाले व संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यांनी फिर्यादी यांचे रेकी करून ते आठवडी बाजारास निघाल्यानंतर त्यांचा पाच आरोपीतांनी दोन दुचाकीवर पाठलाग करून शस्त्राचा धाक दाखवून गुन्हा केला आहे. आरोपीतांचे ताब्यातून १८ तोळे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी असा एकूण ३० लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच संजीव ऊर्फ संजय विष्णूदास कांबळे यासही ताब्यात घेतले असून एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व एक फरार आरोपीचा शोध सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव हे करीत आहेत.