Home Blog Page 49

आष्टी- बिबट्याच्या हल्ल्यात बावी दरेवाडी येथील तरुणाचा मृत्यू

0

आष्टी — जनावर चारण्यासाठी शेतात गेलेल्या बावी शिवारातील दरेवाडी येथील तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे
राजू विश्वनाथ गोल्हार वय 35 वर्ष हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावर चारण्यासाठी गेले होते. मात्र संध्या काळ झाल्यानंतर बैल घरी येऊनही तो घरी आला नाही‌. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना त्यांच्या टॉवेलवर रक्ताचे डाग तसेच शेत परिसरात रक्ताचे चिन्ह आढळले. त्यामुळे गावकऱ्यांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनासह वन विभागाला दिली. दरम्यान शोध घेतल्यानंतर राजू गोल्हार यांचा मृतदेह सापडला. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर रात्री अपरात्री कोणीही घराबाहेर पडू नये शक्यतो समूहाने वावर ठेवावा असा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या घटनेमुळे बावी परिसरासह आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाचेगाव येथील चोरीचा आरोपी गुन्हे शाखेने पकडला

0

बीड — गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे दीड महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा पर्दाफाश करण्यात पोलीस दलाला यश आले असून, या प्रकरणी एका आरोपीला जेरबंद करुन त्याकडून चोरलेले दागिने जप्त करण्यात आले आहेत. तर त्यांने चोरीची कबुली दिली आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. पाचेगाव (ता. गेवराई) शिवारातील एका वस्तीवरील बोराडे फार्म हाऊसवर चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आदी ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना काल शनिवारी (दि.११) स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त खबऱ्या मार्फत पाचेगाव चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा गेवराई येथे जातेगाव फाट्यावर उभा असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरलेली दागिने जप्त करण्यात आली आहेत. त्याकडे चौकशी केली असता आरोपीने पाचेगाव येथून वस्तीवर चोरी केल्याचे कबूल केले. एक आरोपी निष्पन्न झाला असून इतरांचा शोध स्थानिक गुन्हे शाखा घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार विकास राठोड, अंकुश वरपे, राहुल शिंदे, दिपक खांडेकर, आश्पाक सय्यद, मनोज परजणे, विकी सुरवसे, चालक पोलीस हवालदार नितीन वडमारे यांनी केली आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला

0

शिरूर (का) — तालुक्यातील तहसील समोर गायरान परिसरात सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. मध्यरात्री साडेअकरा वाजता दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी पारधी वस्तीवर हल्ला केला.या हल्ल्यात चार महिला गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यापैकी एका महिलेची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणात मध्यरात्री साडेअकरा वाजता एक दोन नाही तर तब्बल 10 ते 15 जणांच्या टोळक्याने अचानकपणे हल्ला केला. टोळक्याच्या हातात लाकडी दांडके, कोयते, कुऱ्हाडीसारखी धारदार शस्त्रांचा वापर करत कुटुंबातील महिलांवर अमानुषपणे धारदार शस्त्राने हल्ला चढवला.या प्रकरणात महिलांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. पण टोळक्याने कसलाही विचार न करता डोक्यावर तसेच पाठीत आणि पायावर सपासप वार करण्यात आले होते. या हल्ल्यात महिला रक्तबंबाळ झाल्या होत्या. जखमी महिलांनी कशीबशी शिरुर पोलीस ठाण्याची वाट धरली आणि तक्रार दाखल केली. तेव्हा पोलिसांनी परिस्थिती पाहता तातडीने कारवाई करत जखमी महिलांना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.टोळक्यांनी सतीश भोसलेच्या आईला इथं का राहता? असा प्रश्न करत कुटुंबाला मारहाण केली. यामूळे घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिरुर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणात आरोपीचा शोध सूरू आहे.

बीड शहरातील बायपास वळणावर दोन पुलांची बांधणी आणि स्लिप सर्विस रस्ता जोडणीच्या कामाला सुरुवात

0

आ. संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश

बीड — बीड शहरातून जात असलेल्या आणि उत्तर दक्षिण जोडणारा धुळे सोलापुर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यात जड वाहतकीचे प्रमाण देखील जास्त असते. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बायपास रस्त्यावरील शहरात वळणावर नेहमी अपघात होत होते. यामुळे संभाव्य अपघात टळले पाहिजेत आणि नागरिकांचे जीव वाचले पाहिजेत त्यामुळे या वळणावर पुलांची बांधणी आणि स्लिप सर्विस रस्त्याची जोडणी अत्यंत महत्त्वाची होती.
त्या दोन्ही ठिकाणी पुलांची बांधणी व १२ किलोमीटर च्या रस्त्यावर स्लिप सर्व्हिस रस्ता जोडणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली. या कामासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
बीड विधानसभेचे आ.संदीप भैया क्षीरसागर यांनी या सुरू झालेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामासंदर्भात संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना करत व सुरू झालेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.

आ.संदीप भैया आणि सय्यद सलीम यांनी खंडपीठात पिटीशन केली होती दाखल

आ.संदिप क्षीरसागर व माजी आमदार सय्यद सलीम यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये यासंदर्भात पिटीशन दाखल केली होती.संदीप क्षीरसागर यांनी या कामाच्या मंजुरीची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी अशी वारंवार मागणी केली होती.तसेच माजी आ.सय्यद सलीम यांनी दोन्ही उड्डाणपूल आणि स्लिप सर्विस रोड मंजुरीसाठी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ११७६/२०२४ व पीटिशन क्रमांक ८८०८/२०२४ दाखल केली होती. याठिकाणी होत असलेले अपघात बघता आणि सुरक्षेच्या प्रश्नांची गंभीर दखल घेत डिसेंबर २०२४ मध्ये तिन्ही कामांना मंजुरी द्या असे निर्देश दिले होते.त्यांच्या या निर्णयाने बायपास वरील सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार असून आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

केंद्राच्या ‘धन धान्य’ योजनेत बीड सह 9 जिल्ह्यांची निवड; शेतकऱ्यांना होणार लाभ

0

मुंबई — केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात घोषित पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेची अंमलबजावणी उद्या (शनिवारी) देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत योजनेचा शुभारंभ होणार आहे.

कमी उत्पादकता, अपुरी सिंचन सुविधा आणि कृषी कर्जाच्या उपलब्धतेत अडचणी असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य देत ही योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राबवली जाणार आहे. शेती सुधारणा, पीक विविधीकरण, उत्पादनवाढ आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. पुढील सहा वर्षांसाठी राबवल्या जाणाऱ्या या योजनेसाठी दरवर्षी २४,००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

जिल्हानिहाय विशेष उपाययोजना –
निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये धान्य साठवणूक, प्रक्रिया, सिंचन सुधारणा आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीवर विशेष भर दिला जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या ११ विभागांतील ३६ योजनांचे एकत्रीकरण करून ही योजना राबवली जाईल. ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्रे, बाजार समित्या, किसान समृद्धी केंद्रे आणि सहकारी पतपुरवठा संस्थांमार्फत योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.

शेतकऱ्यांना दिलासा –
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी योजनेचे स्वागत करताना सांगितले, “ही योजना शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी आहे. शाश्वत शेती, पाणी बचत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. ही योजना म्हणजे शेतीला बळ आणि शेतकऱ्यांना दिलासा आहे.”

योजनेचे वैशिष्ट्य –

-कमी उत्पादकता असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य
-सिंचन सुविधा आणि धान्य साठवणुकीवर भर
-स्थानिक रोजगार निर्मितीला चालना
-आधुनिक तंत्रज्ञान आणि पीक विविधीकरणाला प्रोत्साहन

या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास आणि शाश्वत शेतीला गती मिळण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

परळीच्या गुरुकुलात धिंगाणा 11 विद्यार्थ्यांना बेदम मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक

0

परळी — परीक्षेचा पेपर का दिला नाही अशी विचारणा करत शाळेतून गुरुकुला कडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन तरुणांनी धक्काबुक्की केली. याबरोबरच सिद्धेश्वर नगर मध्ये असलेल्या नर्मदेश्वर गुरुकुलात शिरून अकरा विद्यार्थ्यांना बेल्ट तसेच बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना परळी मध्ये घडली आहे.


एवढेच नाही तर याच तरुणांनी गुरुकुल चालकाचे वडिल बालासाहेब शिंदे यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला आहे.अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार
परळी येथील सिद्धेश्वरनगर येथे नर्मदेश्वर गुरूकुलम् नावाचे निवासी गुरुकुल असून या गुरुकुलात विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेत आहेत. या सोबतच ते शाळेत देखील जातात. सध्या सहामाही परीक्षा सुरू असून पेपर देण्यासाठी गुरुकुलातली मुलं शाळेत गेले. मात्र, परीक्षा देऊन मुलं गुरुकुलाकडे परत येत असताना रस्त्यात त्या मुलांना दोन जणांनी अडवले आणि परीक्षेचे पेपर द्या म्हणत मुलांना तंबी दिली. भयभीत मुलं त्यांना विरोध करत गुरुकुलात दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ हे दोन तरुण देखील गुरुकुलात धडकले. या गुरुकुलाचे चालक अर्जुन बालासाहेब शिंदे परळीतील सिध्देश्वर नगर येथे राहतात.’श्री क्षेत्र वारकरी शिक्षण संस्था’ चालवत आहेत. मात्र या घटनेवेळी ते गुरुकुलात‌ उपस्थित नव्हते.श्री नर्मदेश्वर गुरुकुलमध्ये 42 विद्यार्थी आध्यात्माचे शिक्षण घेतात. गुरकुलाचे चालक अर्जुन शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माझी भावजयी रेणुका सोपान शिंदे यांनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे फोन करून कळविले. यावेळी दिनेश रावसाहेब माने, रा. चाळीस पुटी रोड जवळ परळी,बाळु बाबुराव एकिलवाळे रा. सिध्देश्वर नगर परळी ह्यानी विद्यार्थ्यांचे परीक्षा पेपर बघू द्या असे म्हणाले.परंतु विद्यार्थ्यांनी परीक्षा पेपर दिले नाही, याचा राग मनात धरून या दोन आरोपींनी गुरूकुलामधील विद्यार्थ्यांना त्यांनी जबर मारहाण केली आहे. यामध्ये अनेक मुलांना हाताला, पायाला, डोक्याला मारहाण झाली आहे.दरम्यान काही विद्यार्थी तक्रार देण्यासाठी संभाजीनगर पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हा वरील दोघे आरोपींनी परत गुरुकुलात जाऊन शिवीगाळ व धिंगाणा केला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादीचे वडिल बालासाहेब शिंदे हे लागलीच गुरूकुलकडे गेले. यावेळी दिनेश रावसाहेब माने याने फर्शीचा तुकडा त्यांच्या डोक्यात मारला.बाळु बाबुराव एकिलवाळे याने शिवीगाळ करत लाथाबुक्याने मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीचे वडीलांना (बालासाहेब शिंदे) भाऊ सुदाम बालासाहेब शिंदे यांनी मोटार सायकलवर परळीतल्या सरकारी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी त्यांना अॅडमिट केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.याप्रकरणी, परळीच्या संभाजीनगर पोलिसांत दिनेश माने आणि बाळू एकीळवाले या दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

बांधकाम मजुरांचे भले जमले नाही “कोनाले”; दमडीच्या कर्मचाऱ्यांनी “नीती” न ठेवता बांधले कोटीचे बंगले ?

0

बीड — बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. कामगार कल्याण अधिकारी यांनी सवयीप्रमाणे (सू) केल्याने धाक “करा”यचाच राहून गेला. हाताखालचा दीड दम डीचा कर्मचारी “नीती”न ठेवता “चव्”हाण(त) कोपरापासून ढोपरापर्यंत ओघळ येईपर्यंत पैसा लुटण्याच काम करत आहे. गोरगरिबांची तोंड मारताना कुठलाही अपराधीपणाचा लवलेश देखील चेहऱ्यावर नाही.”कोनाले” च जमलं नाही ते या पठ्ठ्याने केलं. कोट्यावधीचं घबाड बुडाखाली दाबलं असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना शासनामार्फत राबवल्या जात आहेत. पण याची फळ कामगारांना कमी आणि कुत्रेच जास्त चाखत असल्याचं बीडमध्ये तरी चित्र आहे‌. कामगार कल्याण अधिकारी सुधाकर कोणाले यांनी कॉन्ट्रॅक्ट बेस वर कर्मचारीच असा निवडला आहे की कल्याणकारी योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना होण्याऐवजी एजंटासह समन्वयक असलेल्या नितीन चव्हाणलाच जास्त होत असल्याचं दिसत आहे. दमडीचा पगार मिळत असताना कोट्यावधी रुपयांचे बंगले बांधकाम कामगारांचं शोषण करून उभा करण्याचं काम या पठ्ठ्याने केल असल्याचं उघड झालं आहे. खायला महाग असलेल्या या “महा”भागांने एखाद्या कुबेराला लाजवेल अशी संपत्ती गोळा केली आहे. यांने जमवलेल्या मायेचा स्त्रोत हा गुढ आहे. ही माया गोळा करताना अनेक ग्रामपंचायतींचे बनावट सही शिक्के तयार करून घेतले गेले. या सही शिक्यांचा भरमसाठ वापर करत बनावट कागदपत्र तयार केली. यामध्ये शेकडो लोक बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या योजनांचा बोगस लाभ घेत आहेत.धन दांडग्यांच्या घरात देखील कामगारांना वाटप केलेल्या भांड्याचे किट या माध्यमातून गेले. खरा गरजवंत बांधकाम कामगार मात्र यांच्या या काळ्या कारणाम्यामूळे योजना पासून कोसो दूर राहू लागला आहे. तीच स्थिती सध्या कामगारांच्या सुरू असलेल्या प्रशिक्षणाची आहे. फोटो काढायचं प्रशिक्षण दिले हे दाखवायचं. त्यातून मिळणारं 5 हजार रुपयाच अनुदान खिशात घालायचं. यामध्ये देखील सगळाच बोगस प्रकार सध्या तरी घडत आहे. याच कमाईचा काही भाग कामगार कल्याण अधिकारी सुधाकर कोणाले यांच्यासह राजकीय व्यक्तींना देखील पोहोच होत असल्याने या विरोधात कोणी “ब्र” काढायला देखील तयार नाही. बांधकाम कामगारांशी निगडित हा विषय असल्याने माध्यमही याकडे फारसं लक्ष देत नाही. याच बोगसगिरीचा भांडाफोड गेवराई मध्ये झाला होता. याच्या चौकशीचा ससेमिरा काही जणांच्या पाठीशी लागला आहे. बीडचे हा महानग मात्र महागडा फ्लॅट, ग्रामीण भागात शेती, स्वतःच्या नावावर चार चाकी गाडी घेऊन मजा मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. निती “न”सलेला चव्हाण  एवढ्या धन दांडग्या बापाचं पोर आहे तर दहा हजार रुपयाच्या दमडीवर काम का करत आहे असा प्रश्न त्यांच्या संपत्तीकडे पाहून पडू लागला आहे. या विरोधात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन कारवाई करणार का?  नितीन च्या संपत्तीची चौकशी करणार का? बोगस बांधकाम कामगार शोधून त्यांच्यावर कारवाई करणार का? गोरगरीब बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तरी पदाच्या अधिकाराचा वापर जिल्हाधिकारी करणार का? असेच बांधकाम कामगार उपाशी अन् बोगस पणे फसवणारे तुपाशी यात बदल होणार का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या जनतेतून विचारले जात आहेत.

न.प. निवडणूक:प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार – आ.संदीप क्षीरसागर

0

बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष आणि सर्व जागेवर नगरसेवक निवडून आणणार – आ.संदीप क्षीरसागर

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

बैठकीला हजारो पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

बीड — बीड नगर पालिकेच्या निवडणुकीत आपलाच उमेदवार नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला.

आगामी बीड नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.११ (शनिवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मोठी गर्दी पाहावयास मिळाली. हजारोच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. या बैठकीत आ. संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर  मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना म्हणाले की,अतिवृष्टीच्या पावसामुळे अनेक ग्रामीण भागात नुकसान झाल्यामुळे नगर पालिकेची निवडणूक अगोदर होणार आहे. येणाऱ्या निवडणुकीत विरोधक जातीचे राजकारण करतील. त्यांना न जुमानता जोमाने कामाला लागा. लोकांना काम करून दाखवायचे आहे. लोकांचे काम केले तर लोक डोक्यावर घेतील. लोकांशी संवाद साधून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर रहा. प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांनी समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीत पक्ष प्रामाणिक आणि निष्ठावंतांनाच संधी देणार असल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. तसेच बीड नगर पालिकेत नगराध्यक्ष पदाचा आपलाच उमेदवार हा १० हजार मताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच सर्व जागेवर नगरसेवक निवडून येतील. आमदारकीच्या निवडणुकीत सोबत राहिलेल्या आणि माझ्यासाठी एकनिष्ठ प्रामाणिक राहून काम करणाऱ्या  जिवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी घरातला सदस्य समजून काम करून निवडून आणणार ते असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना बळ दिले यावेळी आ.संदीप क्षीरसागरांना देखील कार्यकर्त्यांनी देखील आ.संदीप भैय्या जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याच  प्रभागामध्ये साखळी तुटता कामा नये -आ.संदीप क्षीरसागर

शहरातील कोणत्याच प्रभागामध्ये साखळी तुटली नाही पाहिजे. साखळी जर तुटली नाही तर नगर पालिका आपल्याच ताब्यात येणार. जर का कोणी उमेदवार साखळी तोडून गेला तर लोकांना तो माझा उमेदवार नाही असे सांगेल. साखळी तोडणाऱ्याला  निवडणुकीत धडा शिकवण्यासाठी जनताच पुढाकार घेईल असा इशारा देखील आ.संदीप क्षीरसागरांनी बैठकीत दिला.

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत येणाऱ्या रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती करणार — डॉ.क्षीरसागर

0

चौसाळा ते वाढवणा रस्त्यावर दोन पूल होणार

बीड  —  बीड व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांसह पुलांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बीडमध्ये गुरुवारी (दि.९) चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी दि.२५ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीग्रस्त भागांचा पाहणी दौरा करून चौसाळा परिसरातील पुलांच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आढावा घेऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील यांना परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे सादर करण्यास सांगितले. या प्रस्तावात चौसाळा–पिंपळगाव घाट–वाढवणा रस्ता (इजिमा-४८) येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामाचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रस्ते व पुलांच्या तातडीच्या देखभाल आणि दुरुस्तीबाबत बैठकीत सूचना देण्यात आल्या. या बैठकीत प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता एम.एम. पाटील, उपअभियंते पी.बी. जोगदंड, एच.डी. शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघातील एनएच-५६१ ते एसएच-५९ —नवगण राजुरी ते सोनगाव रोड, एमआरएल-१३ – नाळवंडी ते ढेकणमोहा, व्हीआर-१२ —लक्ष्मीआई तांडा, एमडीआर-३१ —बीडजवळ, आहेर धानोरा ते वरवटी, भाळवणी ते बेलेश्वर, एसएच-५५ — म्हाळसजवळा, राजापूर, वाकनाथ रोड, एसएच-५६ —म्हाळसापूर ते पिंपळगाव, राक्षसभुवन, कुक्कडगाव, एसएच-५६ —लिंबागणेश, काटवटवस्ती, अंजनवती, घारगाव, एनएच-२११ —मोरगाव ते देवऱ्याचावाडा, एमएसएच-१६ —ढेकणमोहा ते कारळवाडी, निर्मळवाडी, एनएच-२११ — कर्झनी (ब) ते कर्झनी (क), एसएच-६३ — आर्वी, तरडगव्हाण ते गाजीपूर रोड, गात शिरापूर, एसएसएच-१६ —ढेकणमोहा ते आंबेसावळी, मन्यारवाडी रोड, एसएच-५५ — उमरद (क) ते नागापुर बुद्रुक, ब्रन्हानपूर रोड, एसएच-६४ —देवीबाभुळगाव रोड, एमएसएच-१६ —काळेगाव हवेली रोड, एसएच-५५ —गंगनाथवाडी रोड, एमएसएच-१६ —काठोडा ते वांगी रोड, एसएच-५६ —मुळूकवाडी ते मसेवाडी रोड, ओडीआर-५० —नरनाळे ते डोईफोडेवस्ती रोड, एसएच-५५ —इट तांडा रोड, ओडीआर-११३ —मेंगडेवाडी रोड, ओडीआर-११३ — धुमाळवाडी रोड, ओडीआर-४८ —तेलपवस्ती ते मानेवाडी रोड, एमडीआर-१९ —रुपेवाडी रोड, ओडीआर-४७ —मांडवजाळी ते भाळवणी रोड, एसएच-२६ —खंडाळा ते ढाळेवस्ती रोड, एनएच-२११ —धनगरवाडी रोड, ओडीआर-११५ —फुकेवाडी रोड, वंजारवाडी ते भगवाननगर रोड, आहेर धानोरा ते राममंदिर इंगोळे पूर्व वरवटी रोड, एमएसएच-१६ —वंजारवाडी चऱ्हाटा रोड —तांदळवाडी ते सिसरटवस्ती, एसएच-२११ —कोळवाडी, एसएच-२११ —वानगाव पाईसावस्ती, बोरखेडवस्ती ते बोरखेड–गोलांग्री, एमडीआर-२८ —शाहाबाजपूर सानपवस्ती, एनएच-२११ —आहेरवडगाव ते काटवडा रोड, खांबालिंबा पौंडूळ ते नारायणगड, केतुरा रोड, एमडीआर-२८ —गाजीपूर, एमएसएच-१६ — मैंदा, एमडीआर-२८ —वासनवाडी ते लक्ष्मीनगर, एसएच-२३२ —परभणी ते केसापुरी, एमडीआर-३२ —बोरफडी ते मोहगीरवाडी, लक्ष्मीनगर, एमडीआर-१८ —चव्हाणवाडी, एमडीआर-१८ —खुंड्रस, ओडीआर-५१ —चांदेगाव, ओडीआर-५१ — जाधववस्ती, एसएच-५५ —खांडेपारगाव, एसएच-५५ —अंधरवनपिंप्री, एमडीआर-२८ —गाजीपूर ते शिरूर (कासार) या रस्त्यांसह पुलांची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा दळणवळणाचा मार्ग सुकर होणार आहे.

देखभाल निकषामध्ये न बसणाऱ्या
रस्त्यांसाठी निधी मागणीचा प्रस्ताव

प्रलंबित कामांना गती देण्यासाठी तसेच देखभाल निकषात न बसणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाकडे निधीसाठीचा प्रस्ताव देण्याच्या सूचना डॉ.योगेश क्षीरसागर यांनी दिल्या. त्याअनुषंगाने अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

शिवाजीराव दादांनी विविध क्षेत्रात भरीव काम केले —- राज्यपाल हरिभाऊ बागडे

0

गेवराईत शिवाजीराव पंडित यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

गेवराई — शिवाजीराव (दादा )पंडित यांनी शिक्षण आणि सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रात भरीव काम केले. मंत्री असताना रोजगार हमी योजना खाते त्यांनी यशस्वीपणे सांभाळत ग्रामीण भागाचा विकास केला. त्याचबरोबर ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारून आपल्या भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन घराघरात शिक्षण पोहचविले असल्याचे गौरवोद्गार राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काढले. माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कीर्तन महोत्सवाचा समारोप ह.भ.प. महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. या कार्यक्रमात तालुक्यातील संत महंतांचा सत्कार करण्यात आला. शिवछत्र परिवारावर प्रेम करणारे हजारो लोक यावेळी उपस्थित होते.

गेवराई येथे शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या ८८ व्या अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, श्रीक्षेत्र नारायणगडाचे महंत ह.भ.प. शिवाजी महाराज, श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज, माजी आमदार विलासराव खरात, अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रारंभी गेवराई तालुक्यातील सर्व संत महंतांचा जयसिंग पंडित, पृथ्वीराज पंडित, रणवीर पंडित यांच्यासह सोहळा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गेवराई तालुक्यातील विविध संस्थानचे संत महंत, नागरिक आणि अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य अभिष्टचिंतन सोहळ्या नंतर काल्याचे कीर्तन संपन्न होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी बोलताना हरिभाऊ बागडे म्हणालेकी, दादांचे ८८ वर्ष वय झाले असतानाही दादा आज तीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. म्हणून शिवाजीराव (दादा ) यांची शताब्दी याच ठिकाणी साजरी व्हावी व या कार्यक्रमाला माझ्यासह राज्याचे मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळ हजर राहून त्यांना शुभेच्छा देतील असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलतांना बागडे म्हणाले की, शिवाजीराव (दादा) चा राजकीय परिचय म्हणजे मी गेल्या ५० ते ६० वर्षांपासून त्यांची कारकीर्द पाहत आलो आहे. दादा राजकारणात आले आणि गेवराई तालुक्याचा कायपालट केला. दादांनी ४० वर्षाच्या राजकारणात विविध विकास कामे आणून गेवराई तालुक्याचा तर विकास केलाच पण मराठवाड्याच्या विकासातही त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजही दादांच्या नेतृत्वाखाली त्यांचे मुलं या तालुक्याच्या राजकारणात सक्रिय काम करत असून त्यांचा यशस्वी वारसा चालवत आहेत. सहकार क्षेत्रात दादांचे मोठे काम आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दादांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊसाचे क्षेत्र वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मराठवाड्यात सहकार क्षेत्रात आदराने दादांचे नाव घेतले जाते. शिक्षण क्षेत्रातही दादांचे मोठे योगदान आहे. गेवराई तालुक्यातील ग्रामीण भागात दादांनी शिक्षण संस्थाचे जाळे निर्माण करून शेतकऱ्यांची मुले साक्षर केली. शिवाजीराव दादा मंत्री आसतांना मी पण सभागृहात होतो. त्यांनी रोजगार हमी खाते यशस्वीपणे सांभाळले. या खात्यातून ग्रामीण भागातील जेवढा विकास झाला तेवढा विकास कोणत्याच खात्यातून झाला नाही. या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रस्ते, पाझर तलाव झाले. अन त्याच काळात झालेल्या जलसंधारणाची कामे आज राज्यातील अनेक भागात सुपीकता दिसून येत आहे. मराठवाड्यातून वाहणाऱ्या कालव्यातही दादांचा मोठा वाटा आहे. राजकारणातील स्वच्छ चरित्र अन चांगली प्रतिमा असलेल्या नेत्याममध्ये दादांचे नाव अग्रक्रमाने येत आहे. राजकीय निवडणुकीतही दादांनी कधी कोणाचा द्वेष न करता एकोप्याने राजकारण केले. शेवटी दादांना उदंड अन निरोगी आयुष्य लाभावे आशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

दादांनी सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले —- ह.भ.प. शिवाजी महाराज
यावेळी आशीर्वादपर बोलताना ह.भ.प. शिवाजी महाराज म्हणाले की, शिवाजीराव दादांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. त्यांनी भक्तीचा ध्वज उभारला. त्यांना साधुसंतांचे आशिर्वाद मिळाले, त्यामुळे त्यांचे आरोग्य आणि शिवछत्र परिवार सुखात आहे. दादांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार केल्यामुळे ते पुढे उत्तम आणि जनकल्याणचे काम करत आहे. नगदनारायण महाराजांचा त्यांना आशिर्वाद आहे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

शिवाजीराव दादांचे जीवन लोकसमर्पीत आहे —–ह भ.प. महादेव महाराज
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कीर्तन महोत्सवाचा समारोप श्री क्षेत्र चाकरवाडी संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवाजीराव पंडित यांनी समाजाला प्रगत करण्यासाठी काम केले. त्यांचे जीवन लोकसमर्पीत आहे. शिक्षण आणि सहकार क्षेत्रात काम करुन त्यांनी लोकांच्या जीवनात अर्थक्रांती आणली. अनेक परिवार सुखी झाले, त्यांना साधुसंत आणि गोरगरीब जनतेचे आशीर्वाद आहेत असेही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल —- अमरसिंह पंडित
यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले, राज्यपाल बागडे साहेब यांच्या शब्दाला महाराष्ट्र शासनाकडे मोठी किंमत आहे, त्यामुळे विनंती करतो की, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने मोठी मदत केली, भरघोस पॅकेज दिले आहे‌, पण आपल्या प्रमुख कापुस या पिकाला बागायतीचा दर्जा दिला नाही. तो मिळाला तर आपल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. मराठवाड्यात सर्वाधिक क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते, त्यामुळे या बाबत पुढाकार घेण्याचे आवाहन अमरसिंह पंडित यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांना केले.

दादांचा वारसा यशस्वीपणे पुढे चालवणार– आ. विजयसिंह पंडित
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, दादांनी उपेक्षीत घटकाच्या विकासासाठी, दिन दलीत आणि सामान्य माणसांसाठी काम केले‌ तोच वारसा घेऊन आम्ही काम करत आहोत. गेवराई विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला भरभरुन आशिर्वाद दिल्यामुळे मी विधिमंडळात दहा महिन्यांत चांगले काम करु शकलो. यापुढेही अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे करण्यासाठी कमी पडणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.