Home Blog Page 46

फलटण आत्महत्या प्रकरण: ही आत्महत्या नाही, तर व्यवस्थेने घेतलेला बळी — राहुल गांधीं

0

फलटण — उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या डॉक्टर तरुणीने स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहित दोन जणांवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला पोलीसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या या प्रकरणावर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधींनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया देत गंभीर आरोप केले आहेत. “ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे”, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. तसेच या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

“बलात्कार आणि छळाला कंटाळून महाराष्ट्रातील साताऱ्यातील फलटण येथील एका डॉक्टर तरुणीने केलेली आत्महत्या ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी आहे. इतरांच्या वेदना कमी करण्याची आकांक्षा बाळगणारी एक डॉक्टर मुलगी, भ्रष्ट शक्ती आणि व्यवस्थेत बसलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली. ज्याला गुन्हेगारांपासून जनतेचं रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्याने या निष्पाप मुलीवर सर्वात भयंकर गुन्हा केला, तिच्यावर बलात्कार आणि तिचं शोषण केलं”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

“भाजपाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेने संरक्षित असलेल्या गुन्हेगारी विचारसरणीचे हे सर्वात भयानक उदाहरण आहे. ही आत्महत्या नाही, तर ती संस्थात्मक हत्या आहे. जेव्हा सत्ता गुन्हेगारांना संरक्षण देते, तेव्हा आपण कोणाकडून न्यायाची अपेक्षा करू शकतो? या डॉक्टर तरुणीच्या मृत्यूने या भाजपा सरकारचं अमानवी आणि निर्दयी स्वरूप उघडकीस आलं आहे. न्यायाच्या या लढाईत आम्ही पीडितेच्या कुटुंबाबरोबर खंबीरपणे उभे आहोत. आम्हाला न्याय हवा आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

कांवत साहेब..! पांढऱ्या बगळ्याने सौंदर्य वाढवलं; पण माशांनी तलावाला नासवलं त्याचं काय?

0

बीड — एस पी साहेब..! पांढरा शुभ्र बगळा पाण्यात एका पायावर ध्यानस्थ उभा आहे. दुरून पाहिलं तर तलावाच्या सौंदर्यात कैकपटीने त्याने भर पाडली. पण तो नुसताच ध्यानस्थ आहे. त्याचं कर्म करायला विसरल्यामुळे तलावातील माशांनी अख्खा तलावच घाण करून टाकला आहे. निसर्ग चक्र बिघडलं तलावा ची दुर्गंधी‌ नाक मूठीत धरायला लावणारी असताना नुसताच सौंदर्यवान बगळा काय कामाचा असा प्रश्न जनतेतून विचारला जाऊ लागला आहे.ही स्थिती बीड शहरातील पोलीस दलाची बनली आहे.
एस पी साहेब…! तुम्ही प्रामाणिक आहात याबद्दल बीडकरांच्या मनात थोडी सुद्धा शंका येत नाही. तितका विश्वास जनतेचा तुमच्यावर आहे. पण बीड शहराची परिस्थिती तलावातल्या माशांनी वाईट करून ठेवली आहे. त्या तलावाची दुर्गंधी वरचे वर पसरू लागली आहे‌. या माशावर तुम्ही मनापासून प्रेम करत असाल ,त्यांच्यावर विश्वास असला तरी या दुर्गंधीचा त्रास सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात शहर पोलीस ठाणे हद्दीतील झमझम कॉलनीतील गुटखा गोदामावर धाड टाकली होती. याच प्रकरणात ज्या आरोपीचे हे गोदाम आहे. त्याच्याच माणसाला जवळपास महिन्यापूर्वी एका नव्या पोलीस कर्मचाऱ्याने पकडून शहर पोलीस ठाण्याला नेलं. तो मोटार सायकल वरून नगर रोड वरून गुटखा तस्करी करत होता.त्याला ‌ शहर पोलीस ठाण्यात घेऊन जाताच गोदाम मालकाने शहर पोलीस ठाणे गाठत ठाणे प्रमुखा पासून हप्ते गोळा करायला येणाऱ्या प्रत्येकाला शिव्यांची लाखोळी वाहीली. शेवटी या प्रकरणात मांडवली झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. मात्र याचा मास्टरमाइंड कोण ? याचा तपास करावा. कारवाई करावी हे “शितल”डोक्यात आलं नाही. शेवटी “मेहुणी बायको मिंधा संसार” यालाच म्हणतात. या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा देखील झाली.
याच मास्टरमाईंडच्या गोदामावर शेवटी एलसीबीला कारवाई करावी लागली.सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची तसदी एस पी साहेब आपण घेतली तर सत्य उघडकीस येईल. पण”शितल”डोक्याने आपल्याच म्हणण्याला “बल”लावत “लाळ” टपकवत यावर मधुर वाणीच्या चार शब्दांनी पांघरून घालण्याचं काम देखील ठाणे प्रमुखांकडून केलं जाईल.आजपर्यंत तेच केलं गेलं. त्यामुळेच बस स्थानकासमोरील भागात अवैध धंद्यांचा बाजार खुलेआम भरलेला आहे.
महिलांची लफडी असोत की आठवले गॅंगवर कारवाई करताना वायरल झालेले व्हॉइस काॅल रेकॉर्डिंग यासारख्या अनेक कुटान्यात वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलेल ते व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक वेळी पांघरून घालण्याची भूमिका वरिष्ठांनी घेतल्यामुळे आपलं काहीच वाकड होत नाही. दोन-चार गोड गोड शब्द बोलले की काम भागत हे चांगलं माहित आहे. त्यामुळेच की काय पत्रकारांना दिवाळीची भेट देण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांकडे स्पॉन्सरशिपची भीक मागितली. अर्थातच हे व्यापारी प्रामाणिक व्यापार करणारे निश्चितच नाहीत हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. “शितल” डोक्याने मागणी केली अन् ती पूर्ण होणार नाही. असं कसं शक्य होईल? इतकी वर्ष बीड मध्येच रहाण्याच्या अट्टाहासाचा उपयोग काय? नाड्या माहीत आहेत म्हणूनच ना! मग काय मुक्तहस्ताने पत्रकारांच्या नावावर भेट वस्तूंची उधळण झाली गेली.काही मर्जीतील पत्रकारांना ती वाटपही केली गेली असंही सांगितलं जात. गोळा झालेल्या भरमसाठ मलीद्यावर स्वतःच डावही साधला यापेक्षा आणखी वेगळं काय करावं? यामध्ये हकनाक पत्रकार बदनाम झाला. जे यांच्याकडे गेले त्या पत्रकारांना मात्र साहेब फार टाईट आहेत. यावेळी काहीच मिळणार नाही त्यांचे आदेश आहेत असं म्हणून तोंडाला नेहमीप्रमाणेच पान पूसली. पत्रकारांच्या नावावर वसुलीला मात्र चिल्लर पान टपरी यांनी सोडली नाही. पत्रकारांच्या नावावर घडलेल्या या कांडाची चर्चा शहरात चविने चर्चीली जात आहे.बारकाईने चौकशी केली तर या प्रकरणातील सत्यताही बाहेर येईल. पण अवैध धंद्यांचा नंगानाच सुरू असताना त्याकडे लक्ष द्यायला एसपींना वेळ नाही किंवा त्याची गरजही वाटत नाही तिथे असल्या फुटकळ गोष्टींकडे ते काय लक्ष देणार? तो आपला विषयच नाही म्हणून हात झटकले जाणार.
चक्री जुगार, गुटखा, मटका, पत्याचे क्लब, अवैध दारू विक्री, नशेली पदार्थ, यासारखे सगळेच अवैध धंदे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत तर पोलिसांनी गुन्हेगार हातात हात घालून काम करताना दिसत आहेत. कायदा सुव्यवस्था “मोडी”त काढून “राज” करण्याची वृत्ती बळावल्याने मोडीराज सुरू आहे. चक्री जुगार जोरात सुरू आहे. इथे सामान्यांच्या न्यायाला स्थान नाही अशी स्थिती बनली आहे.
ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतही अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. इथल्या ठाणे प्रमुखांनी कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढायला सुरुवात केली आहे. परिणामी मिसरूड न फुटलेली पोरं देखील गावठी कट्टे घेऊन फिरत आहेत. एसपी ऑफिस पासून हाकेच्या अंतरावर रहदारीच्या रस्त्यावर खून पडत आहेत. कायदा सुव्यवस्थेची विल्हेवाट लावून तलावात घाण करण्याची या बड्या माशांची जणू स्पर्धाच लागली आहे. नशेचा कारभार जोरात सुरू आहे. वर्तमानपत्राचे रकाने भरत असले तरी याकडे लक्ष द्यायला एसपींना देखील वेळ नाही‌‌. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली पिढी नशेच्या बाजारात झिंगत फिरत आहे. नशा युक्त फुलचंद पानावर बंदी असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. चार दोन फुटकळ कारवाया एसपींना दिसण्यापुरत्या झाल्या. एस पी खुश झाले. पुन्हा फुलचंद पानाचे तरुण चाहते झाले.अशीच स्थिती नेकनुर ची आहे. एकूणच जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यांची आहे.तलावातील बड्या माशांची पोट तुडुंब भरली जात असली तरी सर्वसामान्य जनतेचं मात्र अवघड होऊन बसल आहे. मग एस पी साहेब तुम्हीच सांगा या बड्या माशांचं करायचं काय? त्यांनी दुर्गंध पसरून खराब केलेल्या तलावाचं काय? ती तुमच्या पायाशी लोळण घेतात त्यांचा धिंगाणा सुरू असला तरी तुम्हाला त्या आवडतात. किती ती लीन आहेत? किती ते पायाशी लाडीक चाळा करत आहेत? किती मी ध्यानस्थ तपस्वी आहे की हे मासे माझ्या पायाशी लोळण घेत आहेत या भ्रमातून तुम्ही बाहेर कधी येणार?

कुठपर्यंत पांढऱ्या शुभ्र बगळ्याची भूमिका घेऊन ध्यानस्थ पायावर उभे राहणार? यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून त्यांना शिस्त कधी लावणार? कायदा सुव्यवस्थेने समाज व्यवस्थेच वाढणार सौंदर्य कधी पूर्ववत होणार? अशीच स्थिती कायम राहिली तर तुमच्या प्रामाणिकपणालाही कुठला आजचा अर्थ राहणार नाही. शेवटी तुमच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला वेळ लागणार नाही याची खबरदारी आता तरी घ्या?
या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला बीडच्या जनतेला द्यावीच लागणार

पोलीस चोर साटे लोटे; वर्दळीच्या ठिकाणीही सोने बिनधास्त लूटे

0

बीड — वर्दळीच्या ठिकाणी सोनसाखळी चोर बिनधास्त लूट करत असले तरी पोलीस यंत्रणा साट्या लोट्यातील व्यवहारामुळे हातबल असल्याचं चित्र निर्माण करताना दिसत आहे. जनता त्रस्त आहे तर पोलीस यंत्रणा व चोर मदमस्त असल्याचं पाहायला मिळत आहे.
चोरीच्या वेगवेगळ्या तीन घटनां मध्ये लाखोंचे सोने पळवण्यात आले असून याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. . गेवराई, पाटोदा आणि माजलगावमध्ये या घटना घडल्या आहेत.गेवराईत पहिली घटना घडली छत्रपती संभाजीनगरहून माहेरी बीडकडे येत असताना मोहन भास्कर रेनीवाल यांची दुचाकी अडवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे दागिने तीन अनोळखी इसमांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली.या प्रकरणी रेनीवाल यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरी घटना पाटोदा बसस्थानकात घडली. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश्री संदीपान आगाम यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रुपयांचे दागिने ओरबाडून नेल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली. या प्रकरणी आगाम यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.तर तिसरी घटना माजलगाव येथे दीपावली पाडव्याच्या दिवशी घडली. गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या ७७ वर्षीय वृद्ध महिला ललिताबाई गौतम मेहता यांच्या गळ्यातील सात तोळ्यांचे बोरमाळ व मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी अंधाराचा फायदा घेऊन हिसकावून नेले. त्या रस्त्यावर खाली पडल्यामुळे चोरट्यांनी दागिने लंपास केले. सलग तीन दिवसांत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी झाल्यामुळे परिसरा चोरांची दहशत पसरली आहे.

दामिनी पथकाची कॉफी शॉपवर कारवाई

0

बीड — ऐन दिवाळीच्या काळात दामिनी पथकाने कॉफी शॉप चेक करण्याची मोहीम सुरू केली आहे. आज दुपारी बीड शहर तसेच गेवराई मधे पेट्रोलिंग दरम्यान कॉफी शॉप चेक केले असता, कॉफी शॉप मधे गैरवर्तन करत असणाऱ्या ११ मुलांवर पोस्टे गेवराई येथे मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.                  जानेवारी २०२५ ते आज पर्यंत विविध कॉफी शॉपवर एकूण ८४ प्रतिबंधात्मक केसेस करण्यात आलेल्या आहेत. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेस व हॉस्टेलच्या बाहेर उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या इतर रोडरोमियोंवरही या अधिनियमान्वये केसेस करण्यात आलेल्या आहे. अशा एकूण १६८ प्रतिबंधात्मक कारवाया मुंबई पोलीस अधिनियम कलम ११०/११७ अन्वये करण्यात आल्या आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर , पोलीस हवालदार शोभा जाधव व पोलीस हवालदार अशोक शिंदे, पोलीस शिपाई उर्मिला म्हस्के सर्व नेमणूक दामिनी पथक बीड यांनी केली.

यूजीसी’ने जाहीर केली 22 बनावट विद्यापीठांची यादी; महाराष्ट्रातील विद्यापीठाचा समावेश

0

मुंबई — विद्यार्थी व पालकांची होणारी फसवणूक आणि शैक्षणिक-आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील २२ बनावट (मान्यता नसलेल्या) विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे.
या विद्यापीठांवर कारवाई करण्याच्या वारंवार निर्देशांनंतरही राज्य सरकारांकडून दुर्लक्ष होत असल्याने भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

यूजीसी कायदा, १९५६ नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेला ‘विद्यापीठ’ म्हणून संबोधण्यासाठी यूजीसीची मान्यता घेणे बंधनकारक आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांविरुद्ध कारवाईसाठी यूजीसीकडून दरवर्षी ऑक्टोबरमध्ये अशा विद्यापीठांची यादी जाहीर करून राज्य सरकारांना कारवाईचे निर्देश देण्यात येतात.

सर्वाधिक बनावट विद्यापीठे दिल्लीत; महाराष्ट्रातही एकाचा समावेश –
यंदा यूजीसीने जाहीर केलेल्या यादीनुसार, सर्वाधिक १० बनावट विद्यापीठे दिल्लीमध्ये आहेत, तर त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये चार, आंध्र प्रदेश, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन आणि महाराष्ट्र व पुद्दुचेरीमध्ये प्रत्येकी एका विद्यापीठाचा समावेश आहे. मागील पाच वर्षांत दिल्लीतील अशा विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली असून, उत्तर प्रदेशमध्ये मात्र घट दिसून आली आहे. महाराष्ट्रामध्ये ‘राजा अरेबिक युनिव्हर्सिटी’ हे बनावट विद्यापीठ असल्याचे या यादीत नमूद आहे.

यूजीसीने राज्य सरकारांना या बनावट विद्यापीठांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. अनेक वर्षांपासून ही विद्यापीठे कार्यरत असूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी यूजीसीच्या यादीची तपासणी करून काळजी घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

राज्य व बनावट विद्यापीठाचे नाव खालील प्रमाणे

दिल्ली (१०)

१. एआयपीपीएचएस विद्यापीठ (AIPPHS University)
२. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड (Commercial University Limited)
३. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी (United Nations University)
४. वॉकेशनल युनिव्हर्सिटी (Vocational University)
५. ए.डी.आर.- सेन्ट्रिक जुरीडीकल विद्यापीठ (A.D.R.-Centric Juridical University)
६. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अॅण्ड इंजिनीअरिंग (Indian Institute of Science & Engineering)
७. विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट (Vishwkarma Open University for Self-Employment)
८. आध्यात्मिक विश्वविद्यायल (Adhyatmik Vishwavidyalaya)
९. डब्ल्यूपीयूएन विद्यापीठ (WPUN University)
१०. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड इंजिनीअरिंग (Institute of Management & Engineering)
उत्तर प्रदेश (४)

११. गांधी हिंदी विद्यापीठ (Gandhi Hindi Vidyapeeth)
१२. महामाया टेक्निकल विश्वविद्यालय (Mahamaya Technical Vishwavidyalaya)
१३. नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ (Netaji Subhash Chandra Bose Open University)
१४. भारतीय शिक्षा परिषद (Bhartiya Shiksha Parishad)
केरळ (२)

१५. सेंट जॉन युनिव्हर्सिटी (St. John’s University)
१६. इंटरनॅशनल इस्लामिक विद्यापीठ (International Islamic University)
आंध्र प्रदेश (२)

१७. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी (Christ New Testament Deemed University)
१८. बाईबल ओपन युनिव्हर्सिटी (Bible Open University)
पश्चिम बंगाल (२)

१९. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसिन (Indian Institute of Alternative Medicine)
२०. इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टनेटिव मेडिसिन अॅण्ड रिसर्च (Institute of Alternative Medicine & Research)
महाराष्ट्र (१)

२१. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी (Raja Arabic University)
पुद्दुचेरी (१)

२२. श्री बोधि अॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन (Shri Bodhi Academy of Higher Education)

डॉक्टर महिलेच्या आत्महत्ये प्रकरणी प्रशांत बनकरला अटक

0

फलटण — येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती . अखेर प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल 24 तासांनी बनकर याला अटक केली आहे. मात्र या प्रकरणातील आणखी एक आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा अजूनही फरार आहे .पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
डॉक्टर महिलेने मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहीली होती. पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर 4 वेळा अत्याचार केल्याचं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. तर प्रशांत बनकर याने आपला मानसिक व शारीरीक छळ केल्याचा आरोप करत त्या तरूणीने आयुष्य संपवलं होतं. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली होती.
उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचे काल उघडकीस आले. मृत्यूपूर्वी तिने हातावर एक नोट लिहीली होती. या सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन जणांची नावं स्पष्टपणे स्पष्टपणे नमूद केली होती. पोलीस निरीक्षक गोपाल बदने हा माझ्या मरणासाठी जबाबदार आहे, त्याने माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला असं तिने लिहीलं होतं. तसंच प्रशांत बनकर यानेही गेल्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं तिने तिच्या नोटमध्ये लिहीलं होतं.
यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू होता. अखेर या मृत्यूप्रकरणातील पहिला आरोप प्रशांत बनकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या शोधासाठी पोलिसांची चार पथकं रवाना झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, फलटणमधील निंबोरे या गावातून रात्री उशीरा त्याला अटक केली, अशी माहिती समोर आली आहे.
तर दुसरा आरोपी PSI गोपाळ बदने हा अद्यापही फरार असून त्याचाही कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान ख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. ‘ सर्व शासकीय कामात सत्ताधारी आमदार सचिन कांबळे आणि अभिजित निंबाळकर यांनी हस्तक्षेप केला’ असा दाव दानवे यांनी केला असून याप्रकरणातील दोषींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली.

ओबीसी मराठा वाद डोक्यातून काढा – आ.संदीप क्षीरसागर

0

जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही बैठकीत आ.संदीप क्षीरसागरांची ग्वाही

बीड आणि शिरूर (का) तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

बीड — जोपर्यंत कार्यकर्त्याच्या निवडणूका होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही आणि अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर विसरणार नसल्याचे आ.संदीप क्षीरसागर यांनी बैठकीतून सांगितले.

बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.२४ (शुक्रवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद चंद्र पवार गट) च्या वतीने आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आ. संदीप क्षीरसागर यांनी बोलावलेल्या या बैठकीला पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबैठकीला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी उपस्थितांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर मार्गदर्शन केले.

यावेळी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर विसरणार नाही. विधानसभेच्या वेळी कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी काम केलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्यासाठी काम करणार आहे.
जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार नाहीत तोपर्यंत मी आराम करणार नाही. आताच्या घडीला तरी आपल्या समोर कोणीच दिसत नाही. कारण आपण रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत.त्यामुळे जनतेचा आपल्याला पाठिंबा आणि आशीर्वाद मिळतोय. आपल्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट आणि ठोस आहे. जवळची माणसं सोबत असल्याने ठोस आणि ठामपणे भूमिका घेतो. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ओबीसी मराठा वाद डोक्यातून काढला पाहिजे. सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करा. राज्य सरकारच्या पॅकेज ने शेतकरी बांधव संतुष्ट नाही. सरकारला देखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पराभव दिसत असल्याने नगरपालिकेची निवडणूक ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या अगोदर घेत आहेत. कार्यकर्त्यांना आवाहन करताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, कार्यकर्त्यांनो गुत्तेदारीसाठी निवडणुका लढू नका. अगोदरच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये प्रशासक असल्याने नागरिकांचे कामे रखडली आहेत. लोकांच्या कामासाठी रस्त्यावर उतरून प्रश्न मार्गी लावा. ही जनता काम करणाऱ्याच्या कायम पाठीशी उभी राहते. येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझ्या अडचणीच्या काळात सोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत विजय खेचून आणायचा आणण्यासाठी चेन पद्धतीने चालायाचे आहे. चेन पद्धतीने आपण मोठ्या फरकाने विजय मिळवू असा विश्वास देखील दिला. कार्यकर्त्यांनी देखील आ.संदीप भैय्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून जिल्हा परिषद व पंचायत समिती ताब्यात आणण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी माजी आ.सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, राज्याचे प्रवक्ते शिवराज बांगर, वैजनाथ तांदळे यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाहेरच्या लोकांनी बीड मध्ये जातीवाद करून अस्थिरता निर्माण करू नये – आ.संदीप क्षीरसागर

राज्यात किंवा बीड जिल्ह्यात एखादी वाईट घटना घडली की बीड पासून मोर्चे आंदोलने काढली जातात. हे मोर्चे आंदोलने काढणारे मुळात बीडचे नसतात. हे सर्व जातीवादी लोक बाहेरच्या जिल्ह्यातील असतात. त्यांच्याकडून बीडचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम, ओबीसी मराठा वाद निर्माण करायचा. यातून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असते. या बीडमध्ये आम्ही सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतो. त्यामुळे परळी सारखा पॅटर्न बीडमध्ये घडत नाही. बाहेरील जिल्ह्यातील लोकांकडून बीडचे वातावरण अस्थिर केले जात आहे. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सर्व समाजाने आंदनात राहून एकत्र असल्याचे दाखवून द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

मराठवाडा, विदर्भातील बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता

0

मुंबई — राज्यात कालपासून ढगाळ हवामानासह पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात पुढील ४ दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने आज मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात तसेच कोकणातील सिंधूदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.उद्या संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे. विजा आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे.सोमवारी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि गडिचिरोली तसेच बीड, अहिल्यानगर, पुणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानसह हलक्या सरींची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जरांगे पाटील मैदानात;बोलावली बैठक

0

जालना — शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार असून कर्जमाफी न करता नेते कसे हिंडतात हे बघतोच, असा इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. रविवारी २ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता अंतरवालीत शेतकरी नेते, शेतकरी संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकऱ्यांनी येऊ नये, असे जरांगेंनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की, शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी, शेती तज्ञ आणि अभ्यासक यांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये. कोणीही फोनची वाट बघू नका, सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटीत २ तारखेला या. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही मागे हटायचे नाही. ही ऐतिहासिक लढाई होणार आहे. कोणत्या विषयावर लढाई लढायची यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी शुक्रवार दि.24 आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

कर्जमाफी कशी होत नाही बघतोच –जरांगे संतप्त

या आंदोनाला तीन टप्प्यात जायचं आहे. २ तारखेला शेतकरी नेते, पदाधिकारी यांची बैठक होईल. नंतर आणखीन एक बैठक होईल. त्यात पुढील आंदोलन कधी करायचं याची तारीख जाहीर केली जाईल. सगळ्यांनी या लढ्यात इमानदारीने सहभागी व्हावं. कोणीही नेता बनण्याचा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांचा विजय करण्याचा उद्देश ठेवून एकत्र या. आंदोलनाला शेतकऱ्यांचे अर्धे लोकं उपस्थित राहतील आणि अर्धे लोकं शेतात राहतील. शेतकऱ्यांच्या पदरात न्याय पडणार असून शांततेत हे आंदोन होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

राजकीय नेते त्यांच्या प्रॉपर्टी व्यवस्थित राहण्यासाठी काम करतात. दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, आता कर्जमाफी कशी होत नाही, ते बघतोच, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार; 30 तारखेपासून नोंदणीस सुरुवात

0

मुंबई — अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पीक उध्वस्त झालेली असताना थोड्याफार पिकलेल्या सोयाबीनला देखील भाव मिळेनासा झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी होत होती. दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सोयाबीन खरेदीविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार राज्यात कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरु करणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३० ऑक्टोबरपासून नोंदणी करता येणार आहे. नोंदणी झाल्यानंतर हमीभावाने खरेदी सुरु होईल. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने कमी भावात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. तसेच जे शेतकरी हमीभावाने आले सोयाबीन विकू इच्छितात त्या सर्वांचे सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. राज्य सरकार, पणन विभाग, नाफेड आणि केंद्र सरकारने राज्यात खरेदीचे जाळे निर्माण केले आहे.सरकार शेतकऱ्याच्या सर्व सोयाबीनची खरेदी करेल. व्यापारी हमीभावाने खरेदी करणार असेल तरच शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना माल द्यावा. अन्यथा सरकारी खरेदी केंद्रांवर हमीभावाने सोयाबीनची विक्री करावी,” असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.