Home Blog Page 43

अजितदादा.. के नाम पर दे दे बाबाऽऽ! माता बाल रुग्णालयासाठी डॉ .ढवळेंचे भीक मागो आंदोलन

0

बीड — सन २०१६-१७ मध्ये जिल्हा रुग्णालयाच्या आवारात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तब्बल २१ कोटी रुपये खर्चून उभारलेले माता व बाल रुग्णालय आजही निधीअभावी सुरू न होता धुळखात पडले आहे.

कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे २०२३ पर्यंत बांधकाम पूर्ण व्हायलाच उशीर झाला. आता गेल्या अडीच वर्षांपासून लिफ्ट, फायर फायटिंग, विद्युतीकरण व फर्निचरच्या कामांसाठी निधी न मिळाल्याने ही इमारत वाऱ्यावर पडली आहे. दरम्यान, याच्या निषेधार्थ रूग्णालय परिसरात लक्ष्यवेधी शेकोटी आंदोलन करण्यात आले.

या दुर्लक्षाविरोधात सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यातून फायर फायटिंग व विद्युतीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. तथापि, फर्निचर आणि लिफ्ट स्थापनेसाठी अद्याप निधी मिळालेला नाही. परिणामी ही १०० खाटांची आधुनिक इमारत आजही वापरात येऊ शकलेली नाही.

डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सध्या ३२० खाटांची क्षमता असून ४५० हून अधिक रुग्ण उपचार घेत असतात. प्रसूती व सिझेरियन प्रकरणांमध्ये बीड जिल्हा राज्यात अग्रस्थानी आहे. परंतु जागेअभावी अनेक गर्भवती महिलांना खाट मिळत नाही, ही प्रशासनाची लाजिरवाणी बाब आहे.

त्यामुळे फर्निचर व लिफ्टसाठी तातडीने निधी मंजूर करावा या मागणीसाठी दि.१० नोव्हेंबर (सोमवार) रोजी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात “अजितदादा के नाम पे दे दे बाबा” भिक मांगो लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा डॉ. ढवळे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी पालकमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर व जिल्हा प्रशासनाला निवेदनही दिले आहे.

केज : अल्पवयीन मुलीचे अपहरण

0

केज — ऊसतोड कामगाराच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच अपहरण करून मुलीच्या वडिलालाच तुमची मुलगी माझ्यासोबत आहे असं सांगितलं. या घटनेने खळबळ माजली आहे.
एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीचे वडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. शनिवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. मुलीच्या आई-वडिलांनी रात्री उशिरापर्यंत सर्व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, पण ती कुठेही आढळली नाही.दरम्यान
रविवार, दि.2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील केज येथे पाहुण्यांकडे मुलीचा शोध घेत असतानाच, गावातील ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या अविवाहित तरुणाने त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. आरोपीने अत्यंत बेधडकपणे सांगितले, “तुमची मुलगी माझ्यासोबत आहे!” यावर मुलीच्या पित्याने घाबरून, “गुपचूप माझ्या मुलीला घरी आणून सोड,” अशी विनवणी केली. मात्र, आरोपी तरुणाने मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या घटनेमुळे मुलीच्या वडिलांनी तातडीने रविवारी (दि. २) केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे अल्पवयीन मुलीचा आणि आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत

निवृत्त न्यायमूर्तींकडून डॉ ‌मूंडे आत्महत्या प्रकरणाची ‌चौकशी करा — खा. सुप्रिया सुळे

0

बीड — फलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.या भगिनीस न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरु राहील अशी ग्वाही या कुटुंबियांना दिली.तसेच निवृत्त न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे.


या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अशा संवेदनशील प्रकरणात सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी अतिशय जपून विधाने करणे आवश्यक असते. परंतु सत्ताधाऱ्यांकडून होणारी विधाने असंवेदशील, दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी आहेत.
डॉ संपदा यांच्या मोबाईलचा सीडीआर लीक कसा झाला हा प्रश्न आहे. त्यांचे आत्महत्या प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे का अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणाची पारदर्शक चौकशी होण्याची गरज असून त्यासाठी एसआयटीची स्थापना व्हावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्राच्या लेकीला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वशक्तीनिशी मुंडे कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहोत. महाराष्ट्राच्या लेकीवर अन्याय करणाऱ्याला जर कुणी वाचविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही अशी ग्वाही याप्रसंगी दिली.
यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे,आमदार संदिप क्षीरसागर, पृथ्वीराज साठे, रोहिणीताई खडसे, महेबूब शेख, डॉ नरेंद्र काळे, ॲड हेमा पिंपळे, मनाली भिलारे, अमृता काळदाते, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

भाजप व मित्र पक्षाला कर्जमाफी होत नाही तोपर्यंत मतदान करू नका — बच्चू कडू

0

अमरावती — शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत भाजप आणि मित्र पक्षाला आगामी निवडणुकीत मतदान करू नका, असे आवाहन प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करणारे बच्चू कडू मॅनेज झाल्याचा आरोप होतो आहे.त्यावरूनही बच्चू कडूंनी विरोधकांवर रविवारी (दि.2) पत्रकार परिषदेत निशाणा साधला. तुम्ही आंदोलन करा त्यात आम्हीही येऊ असे ते म्हणाले. 30 जून 2026 पर्यंत सरकारने कर्जमाफी केली नाही तर 1 जुलै रोजी हंगामा होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी अजूनही आमच्या बाजूने उभा आहे. त्याला विश्वास आहे. आम्ही आंदोलनादरम्यान भर पावसात ट्रॅक्टर खाली होतो. तेथेच झोपलो, त्याचं कौतुक झालं नाही. सात दिवस अन्नत्याग आंदोलन केलं त्याचंही कौतुक कोणी केलं नाही. दीडशे सभा संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या त्याचेही कौतुक झालं नाही. फक्त आमचं काय चुकलं हेच बघितलं जातं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवायला चाललो आहे. मात्र उद्या आमच्यावरच आत्महत्येची वेळ येईल,अशी अवस्था आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.30 जून पर्यंत कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलै रोजी चहू बाजूने हंगामा होईल. आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करू नका असे आवाहन त्यांनी केले.

भाजप नेते रावसाहेब दानवेच्या नातवावर नाशिक मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

नाशिक — माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचा नातू शिवम मुकेश पाटील यांच्यासह आठ जणांवर तब्बल 10 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपच्या ‘प्रामाणिक’ प्रतिमेला धक्का बसला आहे. तक्रारदार स्वतः भाजपचे पदाधिकारी आणि उद्योगपती कैलास अहिरे असल्याने प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला आहे.

कैलास अहिरे हे नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीत यशस्वी उद्योग चालवतात. २०१८ मध्ये रावसाहेब दानवे यांचे सहकारी गिरीश नारायण पवार आणि इतरांनी अहिरे यांच्याशी संपर्क साधला. मुंबईत दानवे यांची भेट घेतल्यावर त्यांनी आश्वासन दिले की, “मी मंत्री आहे, तुमच्या कंपनीला सरकारी कंत्राटे मिळवून देईन. कंपनीचा टर्नओव्हर २०० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढवून देईन. माझ्या नातूला तुमच्या व्यवसायात भागीदार करा.” दानवे यांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून अहिरे यांनी कंपनीतील १४ टक्के शेअर्स शिवम पाटील यांच्या गटाला देण्याचा २५ कोटी रुपयांचा करार केला.

सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटले. दानवे यांच्या सूचनेनुसार अहिरे यांनी दोन चेक प्रत्येकी ५० लाख रुपयांचे दिले. पण उर्वरित १० कोटी रुपये मिळाले नाहीत. शिवम पाटील आणि सहकाऱ्यांनी वारंवार आश्वासने दिली, पण पैसे कधीच हस्तांतरित झाले नाहीत. यानंतर अहिरे यांना संशय आला. कागदपत्रे तपासली असता, करारपत्रे बनावट आणि अपूर्ण असल्याचे उघड झाले. शिवम पाटील यांनी शेअर्स परस्पर त्यांच्या नावावर करून घेतले, पण बदल्यात काहीच दिले नाही. “तो मोठा माणूस असल्याने मी विश्वास ठेवला, पण नंतर फसवणूक झाल्याचे कळले,” असे अहिरे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

सातपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात शिवम मुकेश पाटील व्यतिरिक्त गिरीश पवार, सतीश अग्रवाल, संजय कतीर, सुभाष कतीरा, कौस्तुभ लटके, धीरेंद्र प्रसाद आणि मंदार टाकळकर यांचा समावेश आहे. हे सर्वजण स्वतःला व्यापारी म्हणून सादर करत होते. भारतीय दंड संहितेतील (BNS) फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक अनियमिततेशी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीत पोलिसांना अनेक आर्थिक अनियमितता आढळल्या आहेत. बँक ट्रान्झॅक्शन, करार दस्तऐवज, ईमेल आणि संवादांच्या नोंदी तपासल्या जात आहेत. तपास अधिकारी म्हणाले, “प्रकरण जटिल आहे, पण लवकरच आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाईल. यात सरकारी कंत्राटांच्या आमिषाचा वापर झाल्याचे दिसते.” सध्या कोणत्याही अटकेची माहिती नाही, पण तपासाचा व्याप्ती वाढवण्यात येत आहे.

गेवराईत एक कोटी 37 लाख रुपयांचा गांजा एलसीबीने पकडला

0

बीड — स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून तब्बल एक कोटी 37 लाख रुपयाचा 490 किलो गांजा शेतातून जप्त केला. ही कारवाई चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील धुमेगाव शिवारात करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे सुरू असले तरी त्याकडे ठाणे प्रमुखांकडून दुर्लक्ष होत आहे.परिणामी पोलिसांच्या नाकावर टिच्चून गांजा पिकवून त्याची सर्रास तस्करी केली जात असली तरी हप्ते खोरी पुढे कायदे धाब्यावर बसवण्याचं काम राजरोस सुरू आहे. दरम्यान
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी जिल्हयातील सर्वच प्रकारचे अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड. यांना आदेश दिलेले आहे. त्या अनुषंगाने दि. 1नोव्हें. रोजी पोनि. शिवाजी बंटेवाड यांना गोपनिय माहिती मिळाली की, मौजे धुमेगाव शिवारातील पिराचे शेतात नारायण मगर याने त्याचे आर्थीक फायद्यासाठी बेकादेशीररित्या अंमली पदार्थ गांजाच्या झाडाची लागवड केलेली आहे. त्यावरून ही माहिती पोलीस अधीक्षक, बीड व उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांना कळवुन त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पो.नि. शिवाजी बंटेवाड व प्रभारी अधिकारी पो.स्टे. चकलांबा यांचे संयुक्त पथक मौजे धुमेगाव शिवारातील पिराचे शेताजवळ गांजाची लागवड केलेल्या नारायण मगर यांचे शेतामध्ये छापा टाकला असता कापसाच्या पिकाच्या शेतामध्ये काही ठराविक ज्ञअंतरावर गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे दिसुन आले. शेत मालक नारायण शेषेराव मगर वय 44 वर्षे व्य. शेती, रा. धुमेगाव ता. गेवराई यांना विचारपुस केली असता त्याने सदर गांजाचे झाडे लागवड केल्याचे सांगितले. तसेच सदर शेताचे शेजारी असलेल्या परिसराची पाहणी केली असता तेथे आरोपी सुरेश सर्जेराव मगर याच्या शेतात देखील गांजाची झाडे मिळून आली. त्यावरुन सदर दोन्ही शेतातील सर्व गांजाच्या झांडाचा सविस्तर पंचनामा करुन आरोपी नारायण शेषेराव मगर याचे गट क्र. 109 मध्ये 44 गांजाची झाडे वजन 153.15 ग्राम याचे अंदाज किंमत 42 लाख 88 हजार 200 रू. व आरोपी नामे सुरेश सर्जेराव मगर याचे मालकीचे शेतामध्ये 131 गांजाची झाडे वजन 337.55. ग्राम कि.अं. 94लाख 51 हजार 400 असा एकुण 490.70 किलो ग्राम वजनाचा गांजा 1 कोटी 37 लाख39 हजार 600  रु अंमली पदार्थ गांजाचा मुद्देमाल मिळुन आला. आरोपी नारायण शेषेराव मगर रा. धुमेगाव ता. गेवराई याला ताब्यात घेण्यात आले असून दोन आरोपी विरुध्द पो.स्टे. चकलांबा गुरनं 376/2025 कलम 8 (ब), 20 (ब), 20 (ब) (1), 20 (ब) (2) गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये आज गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक  शिवाजी बंटेवाड (स्थागुशा), सपोनि गडवे, स्थागुशा पथकातील  गोविंद राख, अंकुश वरपे, विकास राठोड, युनूस बागवान, सुनिल राठोड तसेच चकलांबा पो.स्टे.चे पोना कैलास गुजर व अंमलदार व महसुल विभागाचे चकलंबा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मिळुन केली आहे.

अतिवृष्टीतील नुकसान पाहण्यासाठी केंद्राचे पथक सोमवारी राज्यात येणार

0

छ.संभाजीनगर : राज्यातील अतिवृष्टीग्रस्ताना केंद्र सरकारकडून मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाहणी पथक सोमवारी व मंगळवारी  दि. 3 व 4 नोव्हेंबर रोजी राज्यात येणार आहे. या पथकात सात अधिकारी असून चार नोव्हेंबर रोजी ते काही ठिकाणी नुकसानीची पाहणी करतील अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आल्या आहेत.

कृषी विभागाचे संचालक व कापूस विकास मंडळाचे डॉ. ए. एल. वाघमारे, जलशक्ती मंत्रालयाचे कंद्रप व्ही. पटेल, सत्येंद्र प्रताप सिंग, विशाल पांडेय, अभिषेक कुमार करण सरीन, डॉ. एसव्हीएसपी शर्मा असे या पथकातील अधिकाऱ्यांची नावे आहेत. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितल्यानंतर नुकसानीचे स्वरूप तपासणीसाठी हे अधिकारी येणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाड्यात या वर्षी झालेल्या पावसामुळे नदीचे प्रवाह बदलले. गावच्या गावे पाण्याखाली गेली. हजारो एकरावरील जमीन खरवडून गेली. त्यामुळे शेतकरी हैराण झाला. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ जाहीर केले असले तरी त्याची काही रक्कम केंद्र सरकारकडून मिळणार आहे. अशी मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. आता मदतीपूर्वी स्थितीची पाहणी करण्यासाठी किती घरांचे नुकसान झाले, किती विहिरी गाळाने भरल्या. किती शाळांना व आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नुकसान झाले, वीज वितरणाचे पायाभूत नुकसान झाले याचे आकडे राज्य सरकारकडे जिल्हा प्रशासनाने कळविले असले तरी त्याचे स्वरूप समजून घेण्यासाठी अधिकाऱ्याचे हे पथक येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हा दौरा होणार असला तरी त्याचे अधिकचे तपशील मिळणे अद्याप बाकी आहेत, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी आयपीएस तेजस्वी सातपुते तपास करणार

0

सातारा — फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. 24 ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी करणार आहे.

फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. तिने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यनंतर या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या नावांचा समावेश असल्याने पीडित डॉक्टरच्या कुटुंबासह विरोधकांनी सातत्याने या आत्महत्येच्या घटनेची एसआयटी चौकशी मागणी करण्यात येत होती. सातारा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास झाल्यास त्यांच्यावर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने नि:पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक नेमणे आवश्यक आहे, असे विरोधक म्हणत होते.

एका प्रकरणात महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीमध्ये वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद केले होते. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदाराचे सहाय्यक दबाव टाकत असल्याचा उल्लेख तिने केला होता. पण, पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. याच दबावामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचा संशय विरोधकांनी यावेळी व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. फलटणमधील अनेक घटना निंबाळकर आणि त्यांच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घडत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. असे असताना संबधित प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पोलीस महासंचालकांना एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले​​​​​​​ होते. अखेर एसआयटी स्थापन करण्यात आली असून IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे. तेजस्वी सातपुते या 2012 मधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

महिला बचत गटाच्या सोळा लाख रुपयावर फिल्ड ऑफिसर चा डाका!

0

केज — महिलांच सक्षमीकरण व्हावं यासाठी गावोगाव बचत गटाची संकल्पना राबविण्यात आली‌.याच बचत गटांना अल्प व्याजदराने कर्ज देणाऱ्या एका फायनान्स कंपनीच्या क्षेत्रीय अधिकाऱ्याने महिला बचत गटांकडून वसूल केलेली कर्जाच्या रक्कम हडपल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. 79 महिलांकडून तब्बल 16 लाखांपेक्षा अधिकची रक्कम वसूल केली मात्र ती कंपनीच्या खात्यावर जमा केलीच नाही.
केज येथील भारत फायनान्शियल इनक्ल्यूजन लि. या कंपनीच्या शाखेत अरबाज रशीदखाँ पठाण वय 27 वर्ष, रा. अजीजपुरा, केज हा फिल्ड ऑफिसर म्हणून काम करत होता.त्याने 23 ऑगस्ट2023 ते 3 मे 2024 या कालावधीत केज तालुक्यातील महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड म्हणून 79 महिलांकडून हप्त्यापोटी 16 लाख 9 हजार 863 एवढी रक्कम गोळा केली. मात्र, स्वतःकडे जमा करून घेतलेली रक्कम अरबाज पठाण याने कंपनीच्या खात्यावर जमाच केली नाही. या रकमेवर अरबाजने डल्ला मारल्याचे
फायनान्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
महिला बचत गट प्रामाणिकपणे वेळेवर हप्त्यांची परतफेड करत असताना, अरबाज पठाणने मात्र या पैशांचा अपहार करून कंपनीची फसवणूक केली. केज येथील कंपनीचे शाखाधिकारी श्रीहरी मुळे यांनी बुधवारी 29 ऑक्टोबर रोजी याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीवरून, फिल्ड ऑफिसर अरबाज रशीदखाँ पठाण याच्या विरुद्ध फसवणुकीचा कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अजित दादा…! नव्या बस स्टैंडच्या पत्र्याला आताच भोकं पडली; गुत्तेदाराला टायरात घालून मारणार का?

0

बीड — बीडला आले की पालकमंत्री अजित दादा पवार यांच्याकडून गुत्तेदारांना मोठ्या थाटात “काम नीट करा”नाहीतर टायर मध्ये घालून मारणार? असं बोलून दादागिरी चा रुबाब दाखवला जातो. हाच रुबाब बीडच्या 13 कोटी रुपये खर्चून नव्या बांधलेल्या बसस्थानकाच्या गुत्तेदाराच्या बाबतीत अमलात आणणार का? उद्घाटनापूर्वीच बीड बस स्थानकाला गळती लागली आहे‌. त्यामुळे बीडच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे.आपले बोल अजित दादा खरेच करून दाखवणार का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. ‌

अजित दादा…! तुमच्या बाबतीत बोलल ते तोललं काय? गरजेल ते पडेल काय? ही प्रचलित म्हण बीडकरांना आठवू लागली आहे. त्याला कारणही तसेच घडले आहे. जुन बस स्टॅन्ड पाडून नव बांधकाम करण्यात आलं. हे बांधकाम जून 2025 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र गुत्तेदाराने नेहमीप्रमाणेच कामात दिरंगाई केली. हरकत नाही केली तर केली. त्यातही बोगसपणाची हरामखोरी केली. काम इतकं निकृष्ट दर्जाचं झालं ‌की उद्घाटनापूर्वीच झालेल्या पावसात छताला गळती लागली. बस स्थानकातील प्रवाशांना छता खाली असताना देखील छत्रीचा आधार घ्यावा लागला. एवढेच नाही तर प्रवाशांची सोय व्हावी यासाठी बस स्थानक तात्पुरत्या सोय म्हणून वापर सुरू केला. मात्र अजूनही बस स्थानक आवारात पथदिवेच चालू नाहीत. एखादा अनुचित प्रकार सायंकाळ नंतर घडलाच तर त्याला जबाबदार कोण? महिला सुरक्षेचा प्रश्न राज्यात गंभीर झालेला असताना पुन्हा तशाच गंभीर प्रकरणांना आमंत्रण द्यायचं का? विशेष म्हणजे बीडचं बस स्थानक या एक महिन्याच्या काळात इतकं नावा रुपाला शिवाजीनगर पोलिसांनी आणला आहे की, प्रवासी लुटला नाही असा एकही दिवस जात नाही. कर्तव्यदक्ष शिवाजीनगर पोलिसांनी अख्ख बस स्थानक चोरांना अंदण दिलं आहे. दिवसाढवळ्या महिला व पुरुषांच्या गळ्यातलं सोन चोरीला जात असेल. खिसे कापले जात असतील पोलिसांकडून उलट तपासणी ज्याच सोनं चोरीला गेला आहे. ज्याचा खिसा कापला गेला आहे. त्याचीच केली जात असेल तर फिर्याद द्यायला पुढे कोण होणार? असा प्रश्न निर्माण होतोय. दिवसा जर हे बस स्थानक तुमच्या पोलिसांच्या जोरावर असुरक्षित असेल तर रात्रीच्या वेळी प्रवाशांची काय स्थिती होऊ शकते याचा एकदा तरी विचार करा.
बरं इतकच नाही तर बीड बस स्थानकाच्या स्वच्छतेचे देखील दयनीय अवस्था आहे. स्वच्छता गृह बांधली आहेत. पण ती सभोवताली पत्रे लावून बंदिस्त केली आहेत. मग प्रवाशांनी अडोसा गाठूनच नैसर्गिक विधीचा कार्यक्रम उरकायचा का? उद्घाटनापूर्वीच बसस्थानकाला गळती लागत असेल तर तुम्ही बीडमध्ये बोगस काम केलेले आढळल्यास टायर मध्ये घालून मी मारणार असा दम गुत्तेदारांना दिला होता. आता त्या शब्दाची अंमलबजावणी करणार का? गुत्तेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार का? दंडात्मक कारवाई करून सरकारने केलेल्या खर्चाची भरपाई त्या गुत्तेदाराकडून करून घेणार का? की “बोलाचाच भात बोलाचीच कढी ” या म्हणीची प्रचिती बीडकरांना देणार? असे एक ना अनेक प्रश्न बीडच्या जनतेतून विचारले जात आहेत.

आंदोलनाचा इशारा

गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत. संबंधित विभागीय नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत असून, गुणनियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.अजितदादा पवार “कामाचा गुणवत्ता दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे, निकृष्ट काम करणाऱ्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येईल” असा इशारा दिला होता. मात्र, एवढ्या कोटींचा खर्च करून बांधलेल्या बसस्थानकात उद्घाटनाआधीच गळती लागल्याने, पालकमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.