Sunday, February 1, 2026
Home Blog Page 2

लाच घेताना माजलगाव शहर पोलीस एसीबीने पकडला; पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी

0

माजलगाव — वाळूचे टेंडर होऊन चार दिवसही होत नाही तोच वाहने सुरळीत चालू देण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला लाच घेताना खाजगी इसमासह जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलीस अधीक्षकांनी शहर पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना नियंत्रण कक्षात हलवले आहे.
माजलगाव पोलिसांची वाळू वाहतुकीत हप्तेखोरी सुरू झाल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने समोर आले. माजलगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी अमोल कदम याने एका तक्रारदाराकडे वाळू वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम खासगी इसम तात्यासाहेब आर्डे याच्यामार्फत स्वीकारली जाणार होती. जालना एसीबीचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या पथकाने बुधवारी माजलगाव बायपास रोडवरील लेंडाळ हॉस्पिटलसमोर सापळा रचला. यावेळी अमोल कदम याच्या सांगण्यावरून आर्डे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. लाच घेताच पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात माजलगाव शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेने पोलीस प्रशासनात खळबळ माजली.दरम्यान लाचखोरी चे प्रकरण उघडकीस येताच पोलीस अधीक्षक नवनीत प्राबत यांनी तत्काळ कारवाईचे आदेश देत. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांची माजलगाव शहर ठाण्यातून नियंत्रण कक्षात उचलबांगडी केली आहे. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्याकडे माजलगाव शहर पोलीस ठाण्याचा नवीन पदभार सोपवण्यात आला आहे.

अजित दादांना शासकीय इतमामात दिला जाणार निरोप, कुठे होणार अंत्यसंस्कार?

0

बारामती — मुंबईहून बारामतीकडे जाणारे त्यांचे लिअरजेट ४५ (Learjet 45) हे विमान उतरत असताना कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातात विमानातील वैमानिकांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. सध्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर असंख्य कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. आता त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन कुठे करता येणार आणि त्यांचे अंत्यसंस्कार कुठे होणार याची माहिती कुटुंबाकडून देण्यात आली आहे. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या पार्थिवावर बारामतीमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. आज बुधवारी संध्याकाळी ४ वाजल्यापासून त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्या नगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.

यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा विद्या प्रतिष्ठान चौक आणि भिगवण रोड सेवा रस्त्यावरून मार्गक्रमण करेल. यानंतर सकाळी ११ च्या दरम्यान विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी सध्या बारामतीमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासकीय आणि कौटुंबिक पातळीवर वेगाने तयारी सुरू आहे. एकीकडे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात नियोजनाची तयारी केली जात असताना, दुसरीकडे अजित दादांचे मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही हालचालींना वेग आला आहे. काटेवाडीतील त्यांच्या निवासस्थाना शेजारील स्वतःच्या शेतात संपूर्ण जमीन नांगरून आणि सपाटीकरण करून जागा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेमकी कोणती जागा निवडायची याबाबतचा अंतिम निर्णय पवार कुटुंब घेणार आहे.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच लोकसभेत दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे बारामती आणि बीड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून सर्व सरकारी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू

0

बारामती — उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. विमान लँडिंग करत असताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार विमानात अजित पवारांसह एकूण 6 जण प्रवास करत होते, त्यापैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना अजित पवार यांचे छोटे विमान बारामतीच्या धावपट्टीवर लँडिंगच्या वेळी अपघातग्रस्त झाले.
सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले. अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली.
आज अजित पवार यांचे बारामतीत एकूण 4 ठिकाणी नियोजित कार्यक्रम होते. या कार्यक्रमांसाठीच ते मुंबईहून बारामतीत दाखल होत होते.विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि वैद्यकीय पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. लँडिंगदरम्यान तांत्रिक बिघाड झाला की हवामान अथवा धावपट्टीवरील अडथळ्यामुळे हा प्रकार घडला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

ऊसतोड मजुराच्या अंगावरून वाहन गेलं मजूरासह पाळीव श्वानाचाही मृत्यू

0

आष्टी — तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे वय 35 वर्ष या ऊसतोड मजुराचा करमाळा बायपासवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला.त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला त्यांचा पाळीव श्वानही या अपघातात ठार झाला असून, या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
बाळासाहेब नरवडे हे अनगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते. 26 जानेवारी रोजी काही कामानिमित्त ते आपल्या पाळीव श्वानासह दुचाकीवरूनआंबेवाडीकडे निघाले होते. दुपारी 4 वाजेच्या सुमारास करमाळा बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. या भीषण अपघातात बाळासाहेब आणि त्यांच्या गळ्यात साखळी असलेल्या पाळीव श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

लोकांची काम का करतोस असं म्हणून धनंजय गुंदेकर यांना पं.स. कार्यालयात मारहाण

0

बीड — जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा देणारे धनंजय गुंदेकर यांना आमच्या गावातले लोकांचे प्रश्न का सोडवतो आमच्या गावात का येतो असे प्रश्न विचारून पंचायत समिती कार्यालयात “मौज”चा सरपंच संदीप डावकर याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. शासकीय कार्यालयात सुद्धा अशा घटना घडत असल्याने बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.
बीडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून धनंजय गुंदेकर काम पाहतात. सोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नाविरोधात जनजागृतीचं काम देखील ते सातत्याने करत आहेत. मात्र त्याच्या याच कामामुळे झारीतले शुक्राचार्य बेचैन असल्याच पाहायला मिळत आहे. धनंजय गुंदेकर हे लोकांचे प्रश्न घेऊन पंचायत समितीत गेले असता त्या ठिकाणी “मौज” गावचे सरपंच संदीप डावकर हा देखील तिथेच होता. धनंजय गुंदेकर यांना तू आमच्या गावात का येतोस? लोकांचे प्रश्न का सोडवतोस? असा जाब विचारून मारहाण करण्यास सुरुवात केली. गुंदेकर यांना मारहाण होत असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी डावकर याला आवरण्याचा प्रयत्न केला. सोबतच घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर देखील व्हायरल केला. या घटनेमुळे खळबळ माजली असून बीडच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुंड प्रवृत्तीची लोक बाहेरच नाही तर शासकीय कार्यालयात देखील कायद्याचा धाक नसल्यामुळे मारहाण करत असल्याचं चित्र पाहायला मिळू लागला आहे. याप्रकरणी धनंजय गुंदेकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.

बीड न.प. सभापती निवड : आ. विजयसिंह पंडितांकडून समान संधी; विनोद मुळूक पाणीपुरवठा तर बांधकाम संजय उडानकडे बांधकाम

0

बीड — बीड नगर परिषदेच्या सभापतीपदाची निवडणुक बिनविरोध पार पडली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीकडून उपाध्यक्ष विनोद मुळूक यांना पाणीपुरवठा, बांधकाम सभापतीपदी संजय उडान, स्वच्छता सभापतीपदी शेख निजाम, नियोजन सभापतीपदी बाळासाहेब गुंजाळ, महिला व बालकल्याण सभापतीपदी आरती बनसोडे, उपसभापती पदी शेख शबनम बिलाल, शिक्षण व विद्युत सभापतीपदी मोमीन सिमा जकी सौदागर तर स्थायी समितीवर अमर नाईकवाडे यांना संधी देण्यात आली. आ. विजयसिंह पंडित यांनी या निवडणुकीत सर्वांना समान संधीचा फॉर्म्युला आणून प्रत्येक समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्यांना काम करण्याची संधी मिळेल अशा पध्दतीने समित्यांची रचना केली आहे. सभापती पदाच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शिवछत्र कार्यालयात नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

बीड नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवडणुक प्रक्रिया मंगळवार, दि.२७ रोजी संपन्न झाली. पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी काम पाहिले. विषय समित्यांची सदस्य संख्या १४ करण्याचा ठराव करून उपाध्यक्षांना पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिध्द सभापती म्हणून निवड करण्याचा निर्णय पहिल्या बैठकीत करण्यात आला. विषय समित्यांवर नगर परिषद सदस्यांचे नामनिर्देशन झाल्यानंतर समितीच्या सभापती पदासाठी निवडणुक प्रक्रिया पार पडली. विहित मुदतीत केवळ शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले, त्यामुळे ही निवडणुक प्रक्रिया बिनविरोध संपन्न झाली. आघाडीचे गटनेते फारुक पटेल यांनी प्रत्येक विषय समितीसाठी सात सदस्यांच्या नावांची शिफारस पिठासीन अधिकारी यांच्याकडे केली. स्थायी समितीसाठी ज्येष्ठ व अनुभवी नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली.

शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी संजय उडान, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी शेख निजाम, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी धर्मराज उर्फ बाळासाहेब गुंजाळ, शिक्षण, विद्युत, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी मोमीन सीमा परवीन अब्दुल रशिद उर्फ सीमा जकी सौदागर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी आरती रंजित बनसोडे, उपसभापती पदी शेख शबनम बिलाल यांना संधी देण्यात आली आहे. नवनिर्वाचित सभापतींचा ‘शिवछत्र’ येथे यथोचित सन्मान करून त्यांना भविष्यकालीन वाटचालीसाठी आ. विजयसिंह पंडित यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगर परिषद निवडणुकीचे निरीक्षक तथा माजी आमदार संजय दौंड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, स्वप्निल गलधर, राष्ट्रवादीचे माध्यम प्रमुख भागवत तावरे, बीड बाजार समितीचे उपसभापती शामराव पडुळे, नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, गटनेते फारुक पटेल, दै.सिटीझनचे संपादक शेख मुजीबभाई यांच्यासह आघाडीचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

शिवसेनेला बांधकाम सभापती पदाची संधी

बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत शिवसेना व शिवसंग्राम यांनी युती करून ही निवडणुक लढविली होती. शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर-मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीची नोंदणी करताना बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी शिवसेनेचा यथोचित सन्मान होईल असा शब्द दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे आ. विजयसिंह पंडित यांनी शिवसेनेच्या संजय उडान यांना बांधकाम समितीच्या सभापतीपदी काम करण्याची संधी दिली. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप आणि स्वप्निल गलधर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी या निवडीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

फळं झाड उपटली, बांध उध्वस्त करून उभ्या पिकाचा सुफडा साफ केला; ओटू पॉवर कंपनी विरोधात शेतकऱ्याची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार

0

बीड — पवन ऊर्जा कंपन्यांनी व त्यांच्या गुंडांनी बालाघाटावर नंगानाच सुरू केलेला असल्याने सर्वसामान्य शेतकरी मात्र हैराण झाला आहे. कंपन्यांचे गुंड शेतकऱ्यांच्या शेतात घुसून अनाधिकृत रीतीने पोल उभे करून पिकांची नासधूस करू लागले आहेत. याप्रकरणी ओ-टू पाॅवर कंपनी विरोधात घारगाव येथील शेतकरी ओंकार इंद्रभूषण गिरी यांनी एस पी सह जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे‌‌. ‌
गेल्या दीड वर्षापासून पवनचक्की कंपन्यांनी बीड जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण करून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत. शेतकऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी स्वतःचे गुंड कंपन्यांनी पाळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. कोणाच्याही शेतात अनाधिकृतपणे घुसायचे शेतकऱ्याची संमती न घेता अनाधिकृत रीत्या वीज वहनासाठी पोल उभे करायचे एखाद्या शेतकऱ्याने काम अडवलंच तर दादागिरी करून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरवायची एवढा एकमेव उपक्रम कंपन्यांनी सध्या सुरू केला आहे. घारगाव शिवारात देखील हाच प्रकार सर्रास सुरू आहे. गट क्रमांक 60 मध्ये पवनचक्की उभारली आहे. येथे निर्मिती झालेली वीज वहनासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पोल उभे करण्यात आले आहेत. लोखंडी पोल घेऊन जाण्यासाठी उभ्या पिकांची वाहन घालून नासधूस करायची, बांधावर असलेली फळझाडं तोडून टाकायची. पुन्हा दादागिरी करायची असा प्रकार ओंकार इंद्रभूषण गिरी या शेतकऱ्याच्या शेतात केला गट नंबर 61मधील पूर्वीचे डोक्या एवढाले उंचीचे बांध कंपनीने निस्तनाभूत केले. 14 फळझाड उपटून काढली. शेतात आस्ताव्यस्तपणे पोल टाकून दिले. या संदर्भात कंपनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता तुला काय करायचे ते कर असं म्हणून दादागिरी करत दहशतीचे वातावरण निर्माण केले. नुसते दहशतीचे वातावरण निर्माण केले नाही तर स्थानिक पोलीस देखील कंपनीच्या गुंडांनाच संरक्षण देण्याचे काम करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कंपनी गुंडांनी शेतकरी इतका दहशतीत आणला की जीवाला धोका निर्माण होईल या भीतीपोटी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना ओंकार गिरी यांनी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. कामाला माझा विरोध नाही मात्र योग्य तो मोबदला देण्यात यावा. मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे झालेली नुकसान भरून द्यावी तसेच नुकसानीला जबाबदार असणाऱ्या कंपनी अधिकारी कर्मचारी तसेच कंपनी गुंडांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील ओंकार गिरी यांनी केली आहे.

🇮🇳🇮🇳. बीड की बिहार? चौघांची लोखंडी राॅड, काठ्या, चाकूने तरुणाला मारहाण 🇮🇳🇮🇳

0

शिरूर कासार  — तालुक्यातील खालापुरी येथील एका हॉटेलमध्ये ४ जणांनी एका तरुणावर लोखंडी रॉड, चाकू व लाकडी काठ्यांनी हल्ला चढविला. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ माजली आहे.

या हल्ल्यात नितीन लोंढे (वय ३२) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण मारहाण हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत चारही आरोपी एकाच व्यक्तीवर अमानुषपणे हल्ला करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या प्रकरणी रोहित गायकवाड, शुभम लोंढे, आसिफ शेख आणि साहिल पठाण या चार जणांविरोधात शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याचा अधिक तपास शिरूर कासार पोलिस करत आहेत.

🇮🇳🇮🇳 माजलगावात सराफा व्यापाऱ्याचे 60 लाखाचे सोन्या चांदीचे दागिने लुटले 🇮🇳🇮🇳

0

माजलगाव — व्यापार करण्यासाठी मोटरसायकलवरून खेडे गावाकडे जात असलेल्या सराफा व्यापाऱ्याला लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या दुचाकीचा पाठलाग करत शस्त्राचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडील 50 लाख रुपये किमतीचे साडेतीनशे ग्रॅम सोने तसेच दहा लाख रुपये किमतीतीची तीन किलो चांदी लुटली आहे. नेकनूरच्या आठवडी बाजारातून देखील 11 जानेवारी रोजी सराफा व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती ‌

माजलगाव शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आज सकाळी 9 वाजता अमोल गायके माजलगाव शहरातून व्यवसाय करण्यासाठी मोटारसायकलवरून खेडेगावला जात होते. तालखेड फाट्याजवळ त्यांची मोटारसायकल आली असता पाठीमागून अज्ञात चोरटे चार चाकी वाहनातून त्याचा पाठलाग करत आले.यावेळी त्यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलच्या समोर गाडी लावून कोयता, शस्त्राचा धाक दाखवला. जीवे मारण्याची धमकी दिली. व्यापाऱ्याच्या हातातील सोन्या चांदीची बॅग हिसकावली. ज्यात साडेतीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने होते. ज्याची अंदाजे किंमत ५० लाख रुपये तर तीन किलो चांदीचे दागिने ज्याचे अंदाजे किंमत १० लाख रुपये असल्याची माहिती आहे.अज्ञात चोरट्यांनी लागलीच घटनास्थळावरून पलायन केले. दिवसाढवळ्या घडलेल्या या रोड रॉबरीच्या (दरोडा) घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नेकनूरच्या आठवडी बाजारातून 11 जानेवारी रोजी सराफा व्यापाऱ्याची 15 किलो चांदी असलेली पेटीसह 50 हजार रुपयांची रोकड डल्ला मारून चोर घेऊन गेला असल्याची घटना घडली होती.

🇮🇳🇮🇳 अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर 🇮🇳🇮🇳

0

नवी दिल्ली — चित्रपट सृष्टीतले दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना त्यांच्या कला क्षेत्रातील गौरवाबद्दल पद्म विभूषण या सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. धर्मेंद्र यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांच्यासह शिबू सोरेन यांना राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्याच प्रमाणे अलका याज्ञिक यांनाही पद्म भूषण पुरस्कार दिला जाणार आहे. तर जाहिरात लेखक पियुष पांडे यांनाही मरणोत्तर पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.धर्मेंद्र. १९६० च्या दशकात तो आला. ‘दिल भी तेरा हम भी तेरे’, ‘शोला और शबनम’, ‘अनपढ’, ‘शादी’, ‘बंदिनी’, ‘बेगाना’, ‘आयी मिलन की बेला’, ‘पुर्णिमा’, ‘फुल और पत्थर’, ‘देवर’, ‘अनुपमा’, ‘आये दिन बहार के’ या सिनेमांमधून त्याच्या अभिनयाची जादू दाखवत राहिला. ‘मेरा नाम जोकर’मधला त्याने साकारलेला सर्कसचा मालक आठवा. ‘यादो की बारात’ सिनेमातला शंकर आठवा. अजितच्या पायात ८ आणि ९ नंबरचा बूट पाहून चिडणारा. लहानपणी ताटातूट झालेल्या भावांची ओळख ‘यादो की बारात निकली है आज’ गाणारा शंकर, आपल्या भावांना, कुटुंबाला वाचवण्याची धडपड करणारा शंकर सगळ्यामध्ये धर्मेंद्र अगदी चपखल बसला आहे. ‘ड्रीम गर्ल’, ‘सीता और गीता’, ‘चुपके चुपके’ या सिनेमातल्या त्याच्या भूमिकाही खास गाजल्या. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जया भादुरी, शर्मिला टागोर, ओमप्रकाश अशी तगडी स्टार कास्ट असलेल्या ‘चुपके चुपके’ सिनेमात धर्मेंद्रने त्याच्यात विनोदी अभिनेताही लपला आहे हे दाखवून दिलं. ऋषिकेश मुखर्जींचं दिग्दर्शन आणि इतक्या सगळ्या कलाकारांची फौज यात ओम प्रकाशची जिरवताना ‘प्यारे मोहन’ बनून त्याने जी काही धमाल केली आहे ती केवळ अविस्मरणीय. त्यांच्या या सगळ्या योगदानाचा गौरव भारत सरकारने केला आहे. त्यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

२०१२ मध्ये सिनेसृष्टीतल्या कारकिर्दीबाबत पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं. मात्र फिल्मफेअर किंवा अगदी सहाय्यक अभिनेता म्हणूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही. आता त्यांना मरणोत्तर पद्म विभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.