Home Blog Page 164

आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करावेत– आ.संदीप क्षीरसागर

0

बीड — इंग्लिश स्कूल तसेच खाजगी शाळेत आपल्या मुलांच्या मोफत शिक्षणासाठी बीड मतदारसंघातील पालकांनी शासनाच्या आरटीई योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

शासनाच्या आरटीई योजनेंतर्गत सर्व खाजगी शाळेत एकूण जागांपैकी २५ टक्के जागा सदरील योजनेसाठी राखीव असतात. या योजनेतून प्रवेश झाल्यावर विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत शिक्षण मिळते. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या आरटीई योजनेसाठी १४ जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ३ वर्षे ते ७ वर्षांपर्यंतच्या पाल्यांना अर्ज करता येणार आहे. तरी बीड विधानसभा मतदारसंघातील बीड शहर, बीड तालुका व शिरूर कासार तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

फवारणी पंप घोटाळा धनंजय मुंडें पुन्हा नव्या वादात;हायकोर्टाने विचारला राज्य सरकारला जाब

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोकोकाचा आरोपी वाल्मीक कराडची संबंध असल्याच्या कारणा वरूनअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षाचे नेते देखील ही मागणी करत आहेत. मागील महायुती सरकारमध्ये अजित पवार सामील झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी कृषी साहित्य खरेदीच्या धोरणात केलेल्या बदलामुळे धनंजय मुंडेंना हाय कोर्टाने फटकारले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून वादाच्या भोवऱ्यात धनंजय मुंडे अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

नागपूर खंडपीठामध्ये राजेंद्र मात्रे यांनी एक जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती. पण 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला. त्यांनी डीबीटी योजना बंद केली. स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र या निर्णयामुळे वाढीव खर्चामुळे जास्तीचे नुकसान झाल्याचा आरोप केला जात आहे.
याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला. बाजारात स्वस्त असलेले फवारणी पंप चढ्या दराने खरेदी केल्याचे दाखवले. त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आला. 12 मार्च 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार, बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी 1500 रुपये प्रतिपंप या दराने 80.99 कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित केले. परंतु शासनाने तीन लाख तीन हजार 507 पंप हे 104 कोटी रुपयांना खरेदी केले.

याचिकेतील दाव्यानुसार, सरकारला एक पंप हा 3,425 रुपयांना मिळाला. यवतमाळ येथील एका कृषी साहित्य विक्री दुकानात हाच पंप अवघ्य 2,650 रुपयांना मिळतो. सरकार एकदाच इतकी मोठी खरेदी करत असेल तर त्यांना सवलत मिळणे अपेक्षित होते. हा पंप अजून स्वस्तात मिळाला असता, मग चढ्यादराने ही खरेदी का करण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. हायकोर्टाने याबाबत तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना जबाव विचारला आहे. याप्रकरणात न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली असून त्यावेळी कृषी मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीचे धोरण बदलले असा सवाल कोर्टाने विचारला. तर राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.

“भय इथले संपत नाही”गोळीबाराच्या घटनेने अंबाजोगाई हादरले

0

अंबाजोगाई — शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगर येथे राहणाऱ्या नवनाथ कदम यांच्या घरासमोर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, मात्र शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश पंडित चव्हाण याचा कदम यांच्या पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू होता. मागील काही दिवसांपासून तो सतत धमक्या देत होता. याबाबत कदम कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वीच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.आज सकाळी चव्हाण कदम यांच्या घरी आला आणि वाद घालत त्यांच्या सिद्धेश्वर या मुलावर गोळीबार केला. सुदैवाने गोळी सिद्धेश्वर याला लागली नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. गोळी झाडण्यासाठी चव्हाण याने गावठी कट्ट्याचा वापर केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्याकडे शस्त्र परवाना नसल्याची माहिती मिळाली आहे.घटनेनंतर तपासासाठी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तपास करत आहेत. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी चार तासात आरोपीला जेरबंद केले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्याचा केज मध्ये आढळला मृतदेह

0

केज — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या अवादा पवन ऊर्जा कंपनीचा कर्मचारी केज मधील एका दारूच्या दुकानासमोर मृत अवस्थेत आढळल्यामुळे खळबळ माजली आहे.

पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज – अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.दरम्यान सदरील मृतदेह आढळल्यानंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. मात्र सदरील व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस आणि रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

आ. संदीप क्षीरसागरांची नवी संकल्पना; प्रशासन मतदारसंघातील प्रत्येक गावात जाणार

0

शासकीय योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कॅम्प

बीड — ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना शासनस्तरावरील योजनांची माहिती देण्यासाठी गावोगावी जाऊन प्रशासनाने शिबीर घ्यावेत आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांची माहिती द्यावी अशी नवीन संकल्पना आ.संदीप क्षीरसागर यांनी सुचवून याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन प्रशासनाकडून शिबीर घेण्यात येणार आहेत‌.
शासनाच्या योजना विविध योजना शेतकरी, दुर्बल घटक आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी अधिक प्रभावी मार्गाचा अवलंब केला जावा. या हेतूने आ.संदीप क्षीरसागर यांनी नवीन संकल्पना सूचविली. महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांसह इतर विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी गावोगावी जाऊन संयुक्तरित्या शिबीर घ्यावेत. या शिबीरांमध्ये प्रत्येक घटकातील लोकांसाठी असलेल्या योजनांची त्या-त्या लोकांना देऊन त्यांना असलेल्या शंका आणि समस्यांचे निराकरण करावे. असे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना दिले होते. यावर आता तहसिलदार यांनी आदेश काढले आहेत. दि.२२ जानेवारी ते ३१ जानेवारी या काळात बीड तालुक्यातील प्रत्येक गावात असे शिबीर घेण्यात येणार आहेत. दरम्यान आ.संदीप क्षीरसागरांच्या या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

भीषण हत्याकांडाने आष्टी हादरले; दोन सख्ख्या भावाची हत्या तिसरा गंभीर

0

आष्टी — तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी दि.16 जानेवारी रात्री दहाच्या दरम्यान जुन्या वादातून तीन सख्खा भावांवर त्यच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन चुलत सख्खा भावांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना अंभोरा पोलिस ठाणे हद्दीत घडली.

अजय विलास भोसले, भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले तिघे राहणार हतोळण ता. आष्टी हा गंभीर जखमी आहे आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवार (दि.१६) रोजी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी रॉड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही. दोन्ही मृतदेह आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

धनंजय मुंडेंचा परळीत जनता संवाद, जगमित्र कार्यालय गजबजले

0

परळी — नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघ बाहेरून आलेल्या नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत संबंधितांची कामे मार्गी लावली.

जागच्याजागीच काम मार्गी लावण्याचा शैलीमुळे धनंजय मुंडे यांच्या जनता संवाद उपक्रमास नेहमीच गजबजलेली गर्दी पाहायला मिळते. आजही धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात दाखल झाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर परळी व परळी बाहेरील नागरिकांनी जगमित्र हे धनंजय मुंडे यांचे कार्यालय गजबजलेले पाहायला मिळाले.

मंत्री धनंजय मुंडे हे परळीत असल्यानंतर नियमित प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला जातात. आजही घराबाहेर पडतात त्यांनी सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन करून विधिवत पूजन केले व त्यानंतर ते जनता संवाद उपक्रमासाठी त्यांच्या जगमित्र या कार्यालयात दाखल झाले.

वाल्मीक कराडवर संपत्ती जप्तीची टांगती तलवार !

0

बीड — सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे कराडची संपत्ती जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कराड यांने रिअल इस्टेटमध्ये कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक केली आहे, त्यामुळे कराडसह त्यांच्या भागाीदारांचे धाबे दणाणले आहेत.

डिसेंबर महिन्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यावेळी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलेला नव्हता, मात्र आता हा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याची संपूर्ण संपत्ती तपास अधिकार्‍यांच्या रडारवर आली आहे. त्यामुळे कराडच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस तसेच अंजली दमानिया यांनी केला आहे, यामुळे आता या संपत्तीवर जप्तीची टांगती तलवार आहे. वाल्मीक कराडवरील कारवाईने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे. वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील पार्किंगची सुविधा आहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पिंपरीच्या हायफाय फ्लॅटचा होणार लिलाव
पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या या अलिशान फ्लॅटचा मिळकत कर थकवल्याप्रकरणी लवकरच लिलाव होणार असल्याची माहिती आहे.पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार आहे, मग त्याचा लिलाव ही केला जाईल. 16 जून 2021ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झालेली आहे. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे. 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा हा मिळकत कर थकवला आहे.
मंत्री मुंडे आणि कराडांची एकत्र जमीन : दमानिया
विशेष म्हणजे वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच एक्सवर ट्विट करत पोस्ट केला. त्यात जवळपास 88 एकर जमीन मुंडे-कराड यांच्या नावावर असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

अंबाजोगाईत व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

0

अंबाजोगाई — दिवसभराचे काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुण व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. ही घटना अंबाजोगाई शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर बुधवारी (दि.१५) रात्री ९ वाजता घडली.

सुजीत श्रीकृष्ण सोनी (रा. अंबाजोगाई) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजीत सोनी दिवसभराचे कामकाज आटोपून दुचाकीवरून घराकडे निघाले होते. ते शासकीय विश्रामगृहासमोर आले असता अनोळखी तीन व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले.

सुजीत यांनी कसेबसे हल्लेखोरांच्या तावडीतून जीव वाचवून दुचाकीवरून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या सुजीत सोनी यांच्यावर अंबाजोगाईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, हल्लेखोर कोण होते आणि त्यांनी कोणत्या कारणास्तव हल्ला केला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन तपास सुरू केला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण:नाव ऐकताच गुन्हेगारांना भरती धडकी; कोण आहेत न्यायमूर्ती एम एल ताहलियानी ?

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्या.एम एल ताहलियानी न्यायालयीन चौकशी करणार आहेत. 26 /11 ला झालेल्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला  हल्ला प्रकरणी दोषी ठरवलं होतं. त्यांच्या कार्यशैलीत कर्तव्य कठोरपणा असल्यामुळे गुन्हेगारांना त्यांचे नाव घेताच धडकी भरते त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सत्य बाहेर येऊन गुन्हेगारांना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

निवृत्त न्या. एम. एल. ताहलियानींचा इतिहास

न्यायमूर्ती तहलियानी यांचा जन्म 23 डिसेंबर 1953 रोजी राजस्थान राज्यातील सरदार शहरात झाला. कायद्याची पदवी (एलएलबी) प्राप्त केल्यानंतर, त्यांनी मे 1977 मध्ये गोंदिया आणि चंद्रपूर येथे प्रॅक्टिस सुरू केली. 14 डिसेंबर 1979 रोजी त्यांची गडचिरोली येथे सहाय्यक सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. गडचिरोलीनंतर त्यांनी सिरोचना, दसाईगंज आणि वरोरा येथे वकिली केली आहे.
1987 मध्ये त्यांनी मुंबईचे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर, 1994 मध्ये, त्यांची मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि 1997 मध्ये त्यांना मुंबईतील मुख्य महानगर दंडाधिकारी म्हणून बढती मिळाली. 1997 मध्ये त्यांची मुंबई शहराच्या दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

त्यानंतर 2008 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार झाले. 2009 मध्ये त्यांची मुंबईच्या शहर दिवाणी न्यायालयात दुसरे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2009 मध्ये त्यांची पहिले अतिरिक्त मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि 2010 मध्ये त्यांना मुंबई शहर दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 18 मार्च 2011 रोजी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली होती. तसेच निवृत्तीनंतर त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती.26/11 च्या मुंबई हल्ल्यातील एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्या विरोधात जो खटला चालला होता त्यात ताहलियानी हे न्यायाधीश होते. त्यांनी कसाबला दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. याशिवाय गुलशन कुमार हत्या प्रकरणात देखील ते न्यायाधीशही होते.

याशिवाय सीबीआय प्रकरणे हाताळण्यासाठी एक विशेष न्यायाधीश देखील म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं होतं.

एक समर्पित न्यायाधीश अशी त्यांची ओळख आहे. ताहलियानी हे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत काम करत असत आणि न्यायालयीन सुनावणी नसतानाही ते रजा घेत नसत. ते खटल्याशी संबंधित प्रशासकीय काम पूर्ण करण्यासाठीही देखील कोर्टात येत असत.

न्यायमूर्ती ताहलियानी यांचे जवळून निरीक्षण करणारे लोक म्हणतात की ते शक्य तितक्या लवकर खटला पूर्ण करण्यास खूप उत्सुक असायचे.