Home Blog Page 165

बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविली

0

केज — महामार्गावर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून एक लाख 78 हजार रुपये किमतीची विदेशी दारू लंपास केली असल्याची घटना केज मध्ये घडली आहे.

अधिक माहिती अशी की, केज केज-मांजरसूंबा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी वर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या शेजारी रघुनाथ अभिमान थोरात यांचे रेणू बियर बार व हॉटेल आहे. शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ वा. च्या सुमारास हॉटेलचे मॅनेजर गौरव महिंन्द्र दास व ७ ते ८ कामगार हॉटेलची दारे कुलूप लावून हॉटेलच्या स्टाफरुमध्ये झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे दोन्ही बाजूची कुलुपे कटरने कापून बियरबारच्या असलेल्या गोदामातील विदेशी मद्याचे १ लाख ७८ हजार ५८० रूपये किमतीचे २७ बॉक्स चोरून नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दोन्ही दरवाजे बाहेरून बंद केले होते. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रघुनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस पुढील तपास करत आहेत.

होम मिनिस्टर कार्यक्रमास बाराव्या दिवशीही महिलांचा प्रचंड उत्साह कायम

0

धांडे गल्लीतील रस्ता महिलांच्या सहभागाने फुलून गेला .

बीड — गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी २०२४ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची लोकप्रियतेची महिलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. पैठणी जिंकण्यापेक्षा चार भिंतीच्या आतील जीवन काही क्षण स्वतःच्या आनंदासाठी, दसऱ्याच्या घर कामाच्या व्यस्ततेतुनही या कार्यक्रमाचा आंनद घेण्यासाठी महिला दिवसेंदिवस या कार्यक्रमास प्रचंड उत्साहाने सहभागी होत आहेत.हिरीरीने सहभागी होत आहेत.
धांडे गल्ली प्रभाग क्रमांक 14 धांडे गल्ली चौक या ठिकाणी आज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कार्यक्रमाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.हजारोच्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिभा विनोद धांडे, सौ.शकुंतला बद्रीनाथ शिंदे,सौ.यमुना लक्ष्मण सुस्कर,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.स्वाती सदाशिव धांडे,महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. जयश्रीताई विधाते,माजी सभापती सौ.उषाताई सरवदे,सौ.प्रेमलताताई चांदणे,सौ.किर्तीताई पांगारकर- साळुंके,सौ. भारतीताई राजेश क्षीरसागर, डॉ सौ.अंजलीताई पांगारकर,सौ.शारदा डुलघज सौ. संजीवनी ताई पौळ सौ. सिंधुताई पौळ,सौ.गीता ताई जयंत वाघ,सौ.डोंगर ताई आदी मान्यवर महिलांची उपस्थितीत पारपडले.होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे 18 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या कार्यक्रमाने दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.लोकप्रिय होत आहे.याचे सर्व श्रेय काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित आणि माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर महिला आघाडी विचारमंच यांच्या सूत्रबद्ध नियोजनातून ही स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

या कार्यक्रत भाग्यवान मानाच्या पैठणीची विजेती सौ.राजश्री अविनाश पिंगळे द्वितीय इमिटेशन ज्वेलरीच्या मानकरी विजेत्यां वाघोले तर तृतीय विजेत्या चौरंगाच्या मानकरी सौ.अर्चना सुरेश गिराम.या ठरल्या आहेत.तर उर्वरित सात महिलांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.यामध्ये सौ.सुवर्णा नागनाथ धांडे,सौ.स्वाती सतीश गायकवाड,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.श्रद्धा धर्मेश पिंगळे,सौ.शोभा विकास मुळे,सौ.सोनाल विकास साळवे,सौ सपना गणेश धर्माधिकारी या मानकरी ठरल्या कार्यक्रमात बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विजेत्या सर्व महिलांची 7 ऑक्टोबर रोजी बीएच.एम.एस.कॉलेज येथे होणाऱ्या खेळ पैठणीचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रांती नाना माळेगावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे,यासाठी सर्व महिलांची निवड झाली आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदत्त अण्णा क्षीरसागर विचार मंचाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक सुरेश साळुंकेंनी केले,या कार्यक्रमास महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

नारायण गडावर होणार मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा!

0

बीड — दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून शिवसेनेचा मेळावा व पंकजा मुंडे यांचा मेळावा तर राज ठाकरे यांचा मेळावा याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते यावर्षीपासून मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार आहे. आज या अनुषंगाने नियोजन बैठक नारायण गडावर पार पडली. या बैठकीला मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

घेण्यात आलेल्या बैठकीत कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचे गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. बीडच्या सावरगाव घाट मधील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.
आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते. त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज जरांगे सज्ज होत असल्याचे स्पष्ट होत आहे

कापूस, सोयाबीनचं अनुदान सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार !

0

मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान देणार असल्याची घोषणा केली असली तरी सरकार कडून टोलवा टोलवीचा खेळ सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे. सोमवारी दि. 30 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच मुंडे यांनी, सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार दिले जातील, असेही म्हटले आहे. तर याचा फायदा सुमारे ६५ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे.

राज्य सरकाराच्या कृषी विभागाकडून रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले.यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल. प्रतिहेक्टरी ५ हजार २ हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २ हजार ५०० कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.यावेळी मुंडे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आनंदात आपला आनंद असून आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषिमंत्र्यालयाची जबाबदारी दिली. यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या. तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषि राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर गुन्हा नोंदवण्याचे लोक अदालतीचे निर्देश

0

बंगळुरू — इलेक्ट्रॉल बॉण्डच्या माध्यमातून खंडणी उकळल्याच्या तक्रारी वरून कर्नाटक च्या बंगळुरू येथील विशेष लोकअदालतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक नेत्यांवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

जनाधिकार संघर्ष परिषदेचे (जेएसपी) सह-अध्यक्ष आदर्श अय्यर यांनी बेंगळुरू येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली होती आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मागितले होते. याप्रकरणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र, भाजप नेते नलिन कुमार कटील, केंद्रीय आणि राज्य भाजप कार्यालये आणि ई.डी. विभागाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की एप्रिल 2019 ते ऑगस्ट 2022 पर्यंत, उद्योजक अनिल अग्रवाल यांच्या फर्मकडून सुमारे 230 कोटी रुपये आणि अरबिंदो फार्मसीकडून 49 कोटी रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून वसूल करण्यातआले.इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून धमकी देऊन खंडणी वसूल करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती.या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने बेंगळुरूमधील टिळक नगर पोलिस स्टेशनला इलेक्टोरल बाँडद्वारे खंडणीच्या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. एसीएमएम कोर्टाने आदेश काढून तक्रारीची प्रत आणि रेकॉर्ड पोलिस स्टेशनला पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रलंबित एफआयआरमुळे सुनावणी 10 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजना महिलांच्या हितासाठी नाही तर नेत्यांच्या स्वार्थासाठी –राज ठाकरे

0

अमरावती — लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

लाडकी बहिण योजनेवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी नेत्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचीही भर पडली आहे. अशा योजना म्हणजे राज्याला खड्ड्यात घालण्याचे उद्योग आहेत.
त्यामुळे जानेवारी महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही तिजोरी पैसे शिल्लक राहणार नाहीत, अशा शब्दात ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कठोर टीका केली.
समाजातील कोणताही घटक काहीही फुकट मागत नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटण्यापेक्षा राज्यात उद्योगधंदे आणा. उत्पन्नाची साधने वाढवा, असा सल्लाही ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जनतेच्या, महिलांच्या हितासाठी राबवल्या जात नसून राज्यकर्त्यां च्या स्वार्थासाठी राबवल्या जात असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भाजपला पर्यायाने महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्या दृष्टीने दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. सरकारच्या कामामुळे ज्यांच्या पोटात दुखते असेच नेते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या महत्वकांक्षी योजनांवर टीका करत असतात, असे पटेल म्हणाले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितली संभाव्य वेळ!

0

मुंबई — महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकी च्या तारखांबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकी च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संभाव्य वेळ दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. निवडणुकीत शहरी मतदारांच्या उदासीनतेबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

मुंबईत निवडणूक तयारीचा आढावा घेताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. यामध्ये एसटी मतदारसंघ 25 आणि एसटी मतदारसंघ 29 यांचा समावेश आहे. राज्यात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 4.59 कोटी तर महिला मतदार 6.64 कोटी आहेत. 18-19 वर्षे वयोगटातील प्रथमच मतदारांची संख्या 19.48 लाख आहे. त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई आणि त्याच्या आसपासच्या कुलाबा-कल्याणसारख्या भागात लोकसभा निवडणुकीत सर्वात कमी मतदान झाले आहे. यासाठी रोजंदारीवर काम करणारे आणि असंघटित क्षेत्रातील इतर लोकांनी मतदानाच्या दिवशी पगारी रजा मिळेल, असे प्रशासनाला सांगावे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवारी आणि मतदान व्हावे यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले. सध्याच्या पोस्टिंगमध्ये तीन वर्षांहून अधिक काळ सेवा केलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी आम्ही महाराष्ट्र सरकारला केली आहे. त्याचा अनुपालन अहवाल मागविण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे की नाही हे जाणून घेणे हा मतदारांचा अधिकार आहे. अशा उमेदवारांना उभे करण्याचे कारण राजकीय पक्षांनीही जनतेला सांगावे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारादरम्यान वापरण्यात आलेल्या सर्व हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

कापूस व सोयाबीन अनुदानासाठी ई-पीक पाहणी अट रद्द

0

मुंबई — राज्य शासनाने सन 2023 च्या सोयाबीन कापूस अनुदानासाठी ई पीक पाहणी नोंदीची अट रद्द केली आहे त्या संबंधित शासननिर्णय दि. 27 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

सन 2023 च्या सोयाबीन व कापूस अनुदानासाठीराज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीमध्ये नोंद नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ई-पीक पाहणीची अट रद्द करून संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर सोयाबीन व कापूस या पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना ही अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केली आहे व ई- पीक पाहणीमध्ये पोर्टलवर नोंद नाही; परंतु संबंधित तलाठ्यांकडे 7/12 उताऱ्यावर या पिकाच्या लागवडीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
राज्यातील सन 2023 च्या खरीप हंगामातील ई पीक पोर्टलवर नोंद असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5000 रु. 2 हेक्टरच्या मर्यादेत इतके अर्थसहाय्य मंजूर करण्याचा शासन निर्णय 29 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला होता. मात्र 27 सप्टेंबर 2024 च्या शासननिर्णयानुसार पिकाच्या ई-पीक पाहणी नोंदीची अट रद्द करण्यात आली आहे.

एसडीएम कार्यालयातील कर्मचारी लाच घेताना पकडला

0

बीड — येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारा निलेश धर्मादास मेश्राम याला ७ हजार रूपयांची लाच घेतांना आज दि. २७ शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील कौटूंबिक

न्यायालयातील जुनी इमारत उपविभागीय कार्यालय रूम नं १०९ या ठिकाणी ७ हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.

या संदर्भात माहिती अशी की, गेवराई हद्दीतील राक्षसभूवन रोड व जयहिंद नावाचे हॉटेल असून सदर हॉटेलवर दारूबंदी विभागाकडून व गेवराई पोलिस ठाण्याकडून ६५ ई प्रमाणे २ गुन्हे दाखल होते. त्या गुन्ह्यात त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई – करण्यासाठी त्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड येथून कलम ९३ ब प्रमाणे त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई – करण्यासाठील नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने बंदपत्र लिहून देण्यासाठी व सदर प्रकरण बंद – करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे याने स्वतःसाठी २ हजार रूपये व महिला उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी ५ हजार रूपये अशी एकूण ७ हजार रूपये लाचेची मागणी पंचासक्षम करून सदर

लाच पंच साक्षीदारासमक्ष स्विकारली आहे. या संदर्भात मेश्राम यांना ताब्यात घेतले असून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई संभाजीनगर येथील लाचलुचपत पोलिस निरीक्षक शिवाजीनगर हरिदास डोळे पोलिस निरीक्षक, वाल्मिक कोरे लाचलुचपत प्रतिबंधक संभाजीनगर पोलिस निरीक्षक यांनी संदिप आटोळे पोलिस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूंद आघाव अप्पर पोलिस अधीक्षक, सुरेश नाईकनावरे पोलिस उपअधीक्षक, पोलिस हवालदार साईनाथ तोडकर, पोह. राजेंद्र ननदिले, चालक सी.एन. बागुल छत्रपती संभाजीनगर यांनी कारवाई केली.

बजरंग सोनवणेंची खासदारकी धोक्यात ? खंडपीठाची नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर — बीड चे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका माजी नगरसेवक अमर नाईकवाडे, नारायण शिरसाट यांनी ॲड. शशिकांत ई शेकडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 27 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती ए.एस.वाघवसे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश न्यायमूर्तींनी दिले.

अधिक माहिती अशी की, बीड लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा लोकसभेत 6553 मतांनी पराभव केला होता. बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेली होती. प्रतिवादी बजरंग सोनवणे यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आलेली आहे. दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की काही मतदान केंद्रावरील मतांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. तसेच पोलिंग बूथ केंद्रांची संख्या वाढवताना राजपत्रानुसार प्रसिद्ध करणे गरजेचे असताना सुद्धा निवडणुकीच्या ऐन तीन दिवस अगोदर पोलिंग बुथ केंद्र वाढवलेले असून त्यामुळे ४२६१ लोक मतदानापासून वंचित राहिलेले आहेत. ते बुथ कायद्याच्या दृष्टीने बेकायदेशीर आहेत तसेच सदरील पोलिंग बुथचे मतदान हे मतमोजणी करताना मोजता येणार नाही. ते मतदान हे अवैध असून त्याच्यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. माजलगाव शहरांमधील बूथ क्रमांक ६८ केंद्रावरील ईव्हीएम मशीनमधील घोळामुळे ७७४ मतदान हे मोजण्यात आलेले नाही. व वैध असणारे ११५६ पोस्टल मतदान हे बेकायदेशीरपणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद केलेले आहेत. तसेच निवडणूक निर्णय घोषित करताना 909 मतांचा फरक आढळून येत आहे. हे सर्व सर्व मतदान निवडणुकीच्या निकालावर परिणामकारक ठरणारे आहे. तसेच प्रतिवादी बजरंग सोनवणे नामनिर्देशन फॉर्म भरताना शपथपत्रात खोटी माहिती पुरवलेली आहे. या आदी मुद्द्यावर खंडपीठाने याचिका दाखल करून घेतलेली आहे . व प्रतिवादींना चार आठवड्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. तर याचीकाकर्त्याच्या वतीने ॲड शशिकांत ई. शेकडे यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. पृथ्वीराज ए. ढाकणे, ॲड. बी. एस. बोडखे ,ॲड. विशाल थावरे, ॲड.आर.जी.नरवडे व एन.एस. राठोड यांनी सहकार्य केले. चौकट उत्पन्नाचे स्त्रोत फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय बजरंग सोनवणे यांनी आपल्या उत्पन्नाचा सोर्स शेती आणि दुग्ध व्यवसाय असल्याचे निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथ पत्रात नमूद केले आहे. शेती आणि दुग्ध व्यवसाय असताना त्यांनी दाखवलेली संपत्ती मात्र 200 कोटी रुपयांच्या पुढे आहे. ते येडेश्वरी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर असताना त्यांनी शपथ पत्रात तसा उल्लेख केला नाही. त्यामुळे यावर देखील याचिकेतून आक्षेप घेण्यात आला आहे. एकूण झालेले मतदान आणि मोजलेले मतदान यात फरक बीडमध्ये मतदानाच्या दोन दिवस अगोदर बूथ क्रमांक 86 ए, 130 ए, 139 ए,140 ए, 170 ए, 190 ए, 12 ए असे एकूण 7 बूथ अचानक वाढविण्यात आले. त्यामुळे 4261 मतदारांना मतदान करता आले नाही. तर माजलगाव मधील बूथ क्रमांक 68 वरील 774 मतदान मोजण्यात आलेलं नाही. याशिवाय वैध असलेले पोस्टल मतदानात एकूण 1156 मतदान बाद करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजले गेलेले मतदान यांच्यात जवळपास 909 मतांचा फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.