Home Blog Page 155

नावच बल्लाळ म्हणून “अर्थ”कारणाची टपकते लाळ;दस का दम जोरात शहर पोलिसांना नजराना लाखात

0

बीड — कर्तव्यदक्षतेचा आव आणून किती जरी भूशारक्या मारल्या तरी “अर्थ” चक्रीतील फायद्याची टपकणारी लाळ उघडकीस येऊ लागली आहे. लाखोंच्या मिळणाऱ्या नजराण्यामूळे बीड शहर ठाणे प्रमुखाच्या नियतीचे बिंग फुटले आहे.

बीड शहर पूर्वीपासून संवेदनशील मानलं जातं त्यामुळे कायदा व्यवस्थेकडे पोलीस यंत्रणेला काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते. सध्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंदे बंद करण्यात यावेत असे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिलेले आहेत.मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्याचे काम बीड शहर पोलीस ठाण्याचे स्वतःला कर्तव्यदक्ष समजणारे प्रमुख शितल कुमार बल्लाळ यांनी केले आहे. बीड शहरात बस स्थानकासमोर अवैध धंद्यांची जत्रा भरलेली असतानाच शहरात दहा ते बारा ठिकाणी ऑनलाइन “बिंगो ” चक्री जुगार जोरात सुरू आहे.यातून लाखोंचा नजराना ठाणे प्रमुखांना मिळत आहे. पूर्वी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चांगलं काम केल्यामूळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून बल्लाळांनी आपली प्रतिमा उंचावली. मात्र सध्या याउलट स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. कर्तव्यदक्षतेच्या प्रतिमेचा वापर करून अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात त्यांनी आश्रय देऊन स्वतःची तुंबडी भरण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे त्यांच्या मनाला शीतलता मिळत असली तरी गोरगरिबांच्या संसाराची राख रांगोळी होऊ लागली आहे. सध्या निवडणूकीच वातावरण असल्यामुळे गुन्हेगारीला वाव मिळणं बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने धोक्याच ठरू शकत त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करून बल्लाळांच्या मुजोरपणाला आळा घालावा अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

मी निवडणूक लढवणार नाही; शरद पवारांचे राजकीय निवृत्तीचे संकेत

0

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे संकेत दिले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, या प्रचारसभेत बोलताना शरद पवारांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत.वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार राजकारणात सक्रिय असताना पाहायला मिळत आहे, तरीही शरद पवारांनी असं का म्हटलं आहे?

यावेळी शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत देताना म्हटलं की, इशारा देत आता नव्या लोकांना निवडून द्यावे, असे म्हटले आहे. यावेळी शरद पवार यांनी म्हटलं की, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या असंही यावेळी शरद पवारांनी म्हटलं आहे.
निवृत्तीचे संकेत देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आम्हाला कुठेतरी थांबावे लागेल, “मला आता कोणतीही निवडणूक लढवायची नाही. आता मला निवडणुका थांबवाव्या लागतील आणि नवीन लोकांना पुढे यावे लागेल.” मला जनतेची सेवा करायची आहे. सरकार आल्यास आम्ही सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.

“मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. आता मी निवडणुका लढवणार नाही, 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा युगेंद्र पवार यांना आहे, एक नवीन नेतृत्व आहे त्यांना साथ द्या”.

या वर्षाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला
होता आणि या वयात त्यांनी घरीच राहावे, ते कधी निवृत्त होतील हे माहीत नाही, असे म्हटले होते. यानंतर शरद पवारांनीही प्रत्युत्तर दिले. “अजित पवार माझ्या वयाबाबत वारंवार विधाने करतात. माझ्या राज्यसभेच्या कार्यकाळात अजून वेळ आहे. तोपर्यंत मी सेवा करेन. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही.”

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर होणार “या” दिवशी सुनावणी

0

नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर सुनावणी कधी होणार याबाबत सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती.

आता यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सुनावणी होणार आहे. कामाच्या शेवटच्या दिवशी तरी सरन्यायाधीश काही महत्त्वाचे निर्देश देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे येत्या 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यादिवशी ते काही महत्वाचे निर्णय घेणार आहेत. यातीलच एक अत्यंत महत्वाचा निर्णय म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर असलेली सुनावणी. या निर्णयाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला अल्पसंख्याक दर्जा, मदरसा कायद्याची वैधता, सरकारी संपत्तीचे पुनर्वितरण, वाहन परवाना कायदा तसेच सरकारी नियुक्ती प्रक्रियेतील नियमांबद्दलच्या विषयांवर निर्णय देणार आहेत.

हे तर नाक कापून अवलक्षण;बस स्थानकासमोरील अवैध धंदे बल्लाळांना आंदण

0

बीडलक्ष्मी दर्शनामुळे “कुमार” असलेला इतका “शितल” झाला की गावोगावच्या लोकांच्या वर्दळीच्या ठिकाणी अवैध धंद्यांची बस स्थानकासमोर भरलेली जत्रा जहागिरीत आंदण मिळाली आहे. अशा अविर्भावात सगळा कारभार राजरोस सुरू आहे. बल्लाळांच्या शीतलतेमुळे गोरगरिबांचे संसार मात्र उध्वस्त होत आहेत. हा कारभार म्हणजे आपलं नाक कापून दुसऱ्याला अवलक्षण दाखवणारा असल्याच पाहायला मिळत आहे.

बीड बस स्थानकासमोरचा परिसर म्हणजे इतर शहरातील प्रवाशांच्या वर्दळीचं ठिकाण त्यामुळे या भागात व्यवसाय देखील चांगली कमाई करून देतात. याच ठिकाणी अवैध धंद्यांनी शितल कुमार बल्लाळ यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर बस्तान बसवले आहे. मटका, जुगार, दारू, अवैध प्रवासी वाहतूक, चक्री, ऑनलाइन लॉटरी,गुटखा यासारख्या धंद्यांनी जोर धरला आहे. बस स्थानक भागात चालणाऱ्या या धंद्यामुळे बीडच्या कायदा सुव्यवस्थेच्या इज्जतीची लक्तर मराठवाड्याच्या वेशीवर टांगली जात आहेत. एकीकडे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अवैध धंद्यावर करडी नजर ठेवत असताना दुसरीकडे मात्र राजरोस अवैध धंदे चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. थोडक्यात सांगायचं तर बीड शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी शितल कुमार बल्लाळ यांनी नाकातलं काढून ओठावर मांडत बीडच्या इज्जतीचे धिंडवडेच काढले आहेत. एकीकडे कायदा सुव्यवस्था बळकट होत असताना दुसरीकडे “बल्लाळ“व्यवस्थेच नाक कापून अपशकुन घडवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी या प्रकाराची दखल घेऊन बीडच्या इभ्रतीच होणार वस्त्रहरण श्रीकृष्णासारखं रोखावं अशी मागणी होऊ लागली आहे.

संगीता ठोंबरे यांची माघार; साठेंना दिला पाठिंबा

0

केज — उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले होते. केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आता संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपाला आव्हान दिले आहे.

केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे. 2014 मध्ये संगीता ठोंबरे केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु 2019 मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी उमेदवारी मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. केज विधानसभा मतदार संघात 25 उमेदवार लढतीत उतरलेले आहेत. मात्र भाजपाच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पृथ्वीराज साठे यांच्यात सरळ सामना होणार आहे

धनंजय मुंडेंचा परळी मतदारसंघात प्रचाराचा झंझावात; परळीच्या मैदानात अकरा उमेदवार

0

अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, परळीत आ.इंद्रिस नायकवडी यांच्या समवेत अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन

बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रात घेणार सभा

परळी — परळी विधानसभेच्या लढतीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांच्यासह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. लढतीचे चित्र स्पष्ट होताच राज्याचे कृषिमंत्री तथा महायुतीचे परळी विधानसभेचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे यांचा परळी मतदारसंघात उद्यापासून प्रचाराचा झंजावात सुरू होत असून, उद्या सकाळच्या सत्रात अंबाजोगाई तालुक्यात गाव भेट दौरा, दुपारच्या सत्रात राष्ट्रवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या समवेत परळी शहरात अल्पसंख्यांक मेळावा तर सायंकाळी व्यापारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महायुतीचे अधिकृत उमेदवार धनंजय मुंडे उद्या (दि.05) सकाळी आठ वाजता अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथून गाव भेट दौऱ्यात सुरुवात करतील. त्यानंतर सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीस ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहतील, पुढे सकाळी साडेनऊ वाजता दैठणा राडी व त्यानंतर मुडेगाव आणि राडी तांडा येथील ग्रामस्थांशी संवाद साधतील.

धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या उपस्थितीत परळी शहरातील व्हीआयपी फंक्शन हॉल येथे दुपारी दोन वाजता अल्पसंख्यांक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यास अल्पसंख्याक समाज बांधव तसेच महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

सायंकाळी साडेपाच वाजता अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे ग्रामस्थांशी संवाद साधून सायंकाळी आठ वाजता श्री मुंडे हे भागवत मंगल कार्यालय परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या व्यापारी मेळाव्यास उपस्थित राहणार असून या मेळाव्यास परळी शहरासह तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान धनंजय मुंडे हे स्वतःच्या परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असून राज्यभरातही धनंजय मुंडे यांच्या सभांना प्रचंड मागणी आहे. त्या सर्व ठिकाणी धनंजय मुंडे हे सभा घेणार असल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

बीडमध्ये दुरंगी लढत होणार; क्षीरसागर बंधू आमने-सामने

0

बीड — बीड विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर बीडची निवडणूक भावाभावातच दुरंगी लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप यांच्यासह ज्योती मेटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज ठेवला असला तरी लढत संदीप व योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे.

बीड विधानसभेच्या मैदानात रंगत कोण भरणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. विशेषतः माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या भूमिकेवरच सगळी दारोमदार अवलंबून होती. मात्र त्यांनी माघार घेतल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होऊन लढत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातच होणार आहे. शेवटच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. तरी देखील बीड विधानसभेच्या निवडणूक रिंगणात या दोघांशिवाय 29 उमेदवार लुटूपूटूची का होईना लढाई लढणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे अनिल जगताप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ज्योती मेटे यांनी बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून कायम ठेवले आहेत. आता जयदत्त क्षीरसागर आपली ताकद कोणत्या पुतण्या च्या मागे लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या विजयासाठी अमरसिंह पंडित यांनी डॉ.योगेश क्षीरसागरांना दिल्या शुभेच्छा

0

बीड — महायुतीचे बीड विधानसभेचे अधिकृत उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांनी शहरातील शिवछत्र निवासस्थानी भेट देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित यांना दीपावली पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या व आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी डॉ.योगेशभैय्यांचा सत्कार करून निवडणूक जिंकण्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, नगरसेवक शुभम धुत, नबील जमा, शुभम कातांगळे, रौफ मोमीन, बाबा खान, सागर वाव्हुळ, अभिनंदन सारडा आदी उपस्थित होते. अमरसिंह पंडित यांनी बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असून पक्षाला मानणारा वर्ग असल्याचे सांगितले. आगामी काळात ना.अजितदादा पवार, ना.धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड विधानसभा निवडणुकीत विजय मिळविण्याच्या दृष्टीने रणनीती कशी असावी, यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांची निवडणुकीतून माघार

0

बीड — बीड विधानसभा निवडणुकीची समीकरण बदलणारी घडामोड घडली आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.या निवडणुकीत क्षीरसागर कुटुंबातील तिघांनी अर्ज भरले होते. मात्र आता माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी काहीवेळापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज माघारी घेत असल्याचे कळविले आहे. त्यामुळे आता निवडणुकीची समीकरण प्रचंड वेगाने बदलत असून निवडणूक रिंगणात कोणते उमेदवार राहतील याकडे संपूर्ण जिल्हा वासियांचे याकडे लक्ष लागले आहे.

निवडणुकीची समीकरणं बदलणार; मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार? 

0

जालना ‌– मराठा आरक्षणासाठी आंदोलन लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन 15 ते 20 जागांवर लढायचं तर उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे असल्याचे सांगितले होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा सोमवारी केली आहे.यावेळी त्यांनी सर्व उमेदवारांना माघार घेण्याचे आवाहन केले. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही असेही त्यांनी सांगितले.

काल जरांगे पाटील यांनी 25 मतदारसंघांवर चर्चा झाली आहे. ज्या मतदारसंघाची नावे येणार नाहीत तेथे आपले अर्ज काढून घ्या. आपल्याला आपल्या स्वार्थासाठी लढायचं आहे. आपल्याला आपल्यासाठी दहा ते पाच असेनात, पण निवडून आणायचं आहे. गोरगरीब उमेदवाराला पैशाचा ताकदीवर दमदाटी केली तर आम्ही आमच्या मतदानातून तुम्हाला ताकद दाखवणार. दुसऱ्या जिल्ह्यात तुमच्या पक्षाचा उमेदवार पाडलाच म्हणून समजावे, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. पण, मित्रपक्षाची यादी न आल्यामुळे एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी ही माघार घेतल्याचे सांगितले.
राज्यात या विधानसभा मतदार संघात उमेदवार देणार होते
१) केज – बीड जिल्हा –
२) बीड – बीड जिल्हा –
३) दौंड – जिल्हा पुणे –
४) पार्वती- जिल्हा पुणे –
५) परतूर – जालना जिल्हा –
६) फुलंब्री – छत्रपती संभाजीनगर जिल्हा –
७) हिंगोली – हिंगोली जिल्हा –
८) पाथरी, परभणी जिल्हा –
९) हदगाव – जिल्हा नांदेड –
१०) कळंब – जिल्हा धाराशिव –
११) भूम-परांडा – जिल्हा धाराशिव –
१२) करमाळा – जिल्हा सोलापूर-
१३) निलंगा – जिल्हा लातूर –

तर या मतदार संघावर चर्चा सुरु होती
पाथर्डी – जिल्हा नगर
कोपरगाव – जिल्हा नगर
पाचोरा – जिल्हा जळगाव
करमाळा – -जिल्हा सोलापूर
माढा -जिल्हा सोलापूर
धुळे शहर -जिल्हा धुळे
निफाड -जिल्हा नाशिक
नांदगाव – जिल्हा नाशिक