Home Blog Page 153

पायाखालची वाळू सरकताच प्रकाश सोळंके मगरीचे अश्रू ढाळू लागले!

0

बीड — जनता वाऱ्यावर सोडून स्वतःचा केलेला विकास, मतदारसंघाचा विकासाचा उडालेला बोजवारा, पुतण्याला दिलेला दगा, मराठा आरक्षण काळात घेतलेली वादग्रस्त भूमिका यामुळे प्रकाश सोळंके यांच्या पायाखालची जमीन सरकली असून मगरीचे अश्रू ढाळत सहानुभूती मिळविण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागल्याचं पाहायला मिळत आहे.

माजलगाव मतदार संघ तसं पाहिलं तर बागायतदारांचा भाग मात्र रस्त्या अभावी अनेकांची हाड खिळखिळी झाली आहेत. ऊस बागायतदार कारखान्याच्या माध्यमातून अक्षरशः चरखा मध्ये घालून पिळून काढण्याचं काम आज पर्यंत सोळंके यांनी केलं. पेशवाईच्या राजवस्त्रासाठी (आमदारकी)रघुनाथराव पेशव्यांसारखं पुतण्याचाच राजकीय केलेला घात. इतकी वर्ष निर्विवाद आमदारकी भोगल्यानंतर देखील खुर्चीची न सुटलेली हाव या प्रकाराला कारणीभूत ठरली, मराठा आरक्षण आंदोलनात वापरलेली मग्रुरी ची भाषा यासारख्या अनेक घटनांमुळे प्रकाश सोळंकेच्या पायाखालची जमीन ऐन निवडणूक काळात सरकली आहे. मागच्या निवडणुकीत रमेश आडसकर यांच्याकडून थोडक्यात पराभूत होता होता वाचले. या निवडणुकीत मात्र प्रकाश सोळंकेच्या कारनाम्यांनी कळस गाठला. एवढंच नाही तर पत्रकारांच्या बाबतीत देखील त्यांनी आपली मग्रुरी दाखवण्याचं काम केलं.त्यामुळे प्रकाश सोळंके आता तरी नको रे बाबा असं मतदार म्हणू लागले आहेत.
वातावरण विजयासाठी अनुकूल बनत नसल्याने शेवटी अश्रू गाळत दुःख व्यक्त करण्याचं मोठ भावनिक हत्यार त्यांनी बाहेर काढला आहे. पण आतापर्यंत त्यांच्या कारभारामुळे जनतेच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंच काय? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला मी विरोध केला नव्हता मी एकाही आंदोलका विरोधात तक्रार दिली नव्हती. माझं घर जाळलं असं म्हणत भावनिक मुद्दे उपस्थित करून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र या भावनिकतेला भरडली गेलेली माजलगावची जनता भिक घालणार नसल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे.

योगेश भैयांना बळ द्या ;बीडला विकासाच्या वाटेवर घेऊन चालणार — अजित पवार

0

बीड — जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसे महायुतीच्या बाजूने चांगले वातावरण तयार होत असून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने २३ तारखेला जेव्हा निकाल लागेल, तेव्हा महायुतीचे सरकार पुन्हा एकदा या राज्यामध्ये आलेलं असेल. बीडमधून डॉ.योगेश क्षीरसागर यांना तुम्ही निवडून द्या. बीड विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ ते ४ हजार कोटींची विकासकामे आपण करून दाखवू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.

बीडमध्ये पारस नगरी येथील मैदानावर महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.१३) भव्य सभा पार पडली. यावेळी अजित दादा पवार बोलत होते.

व्यासपीठावर अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा पालकमंत्री ना.धनंजय मुंडे, आमदार बाळासाहेब आजबे, रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार जनार्दन तुपे, राज्य प्रवक्ते महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा खोसरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनिल तुरुकमारे, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास गुजर, युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख सुमित कोळपे, अजय सुरवसे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संगीता धसे, ज्येष्ठ बबनराव गवते, रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस राजू जोगदंड, रिपाइं गवई गटाचे जिल्हाध्यक्ष माणिक वाघमारे, डॉ.दिपा क्षीरसागर, माजी नगरसेवक फारूक पटेल, अमर नाईकवाडे, माजी सभापती गंगाधर घुमरे, जगदीश काळे, विलास बडगे, अरुण डाके, डॉ.सारिका क्षीरसागर यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे विविध सेलचे राज्य, जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू -फुले -आंबेडकर यांच्या विचारधारेने पुढे जात आहोत आणि याच्यामध्ये तसूभरही अंतर येणार नाही. धरणे भरलेली असताना पाणी उशाशी आणि लोक तहानलेली हे चित्र बरोबर नाही. मी योगेश आणि इतर सहकाऱ्यांना बरोबर घेईन आणि तुम्हाला पुरेसे पाणी मिळवून देईल असा शब्द या निमित्ताने देतो. खासबाग ते मोमीनपुराला जोडणारा बिंदुसरा नदीवरील जो पूल किंवा पूल कम बंधारा बांधून द्यायचा आहे ते काम पूर्ण केले जाईल. मी उमेदवारी देत असताना मुस्लिम समाजाला दहा टक्के जागा दिलेले आहेत आणि चांगल्या जागा दिलेले आहेत. आपण बार्टी सारथीच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजासाठी मार्टी स्थापना केली. छत्रपती संभाजी नगर मध्ये भव्य अल्पसंख्यांक आयुक्तालय उभे केले. मौलाना आझाद महामंडळाचे भांडवल १ हजार कोटीपर्यंत वाढवले. मुस्लिम समाजाच्या संरक्षणाची सर्व जाती धर्माच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. डॉ.योगेश यांना तुम्ही निवडून द्या, या विधानसभा मतदारसंघांमध्ये ३ ते ४ हजार कोटींची विकासकामे आपण करून दाखवू. योगेश उच्चशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत आणि त्यांना जयदत्तअण्णांनी देखील पाठिंबा दिलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. आम्ही सर्वजण मिळून या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असा शब्द देतो आणि काही झालं तरी २३ तारखेला योगेश आमदार झाले पाहिजेत, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. बीड जिल्हा भाजपच्यावतीने चंद्रकांत फड यांच्या पुढाकारातून डॉ.योगेश क्षीरसागर यांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी ना.धनंजय मुंडे, पप्पू कागदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी नगरसेवक विलास विधाते, विनोद मुळूक, गणेश वाघमारे, भीमराव वाघचौरे, विकास जोगदंड, सादेक जमा सुभाष सपकाळ, राणा चव्हाण, मुखिद लाला, इकबाल शेख, गणेश तांदळे, इलियास मेंबर यांच्यासह सर्व माजी नगरसेवक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचलन पांडुरंग सुतार यांनी केले. आभार डॉ.सारिका क्षीरसागर यांनी मानले. या सभेला महिलांची लक्षणीय गर्दी होती.

धनंजय मुंडे यांची आमदारांवर सडकून टीका; योगेशभैय्यांना निवडून देण्याचे केले आवाहन

आजच्या या सभेतली खामोशी २३ तारखेला योगेशभैय्यांच्या विजयाचा तुफान आहे हे यानिमित्ताने सांगतो. मागची पाच वर्ष इथल्या विद्यमान आमदारांमुळे बीड विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला जो काही त्रास झाला, त्याबद्दल मी माफी मागतो. योगेशभैय्यांची उमेदवारी आल्यानंतर जयदत्त अण्णांनी त्यांना आशीर्वाद दिला याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. बीड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अहंकाराविरुद्ध संयमाची आहे. हा दीप असा विझणार आहे की पुन्हा राजकारणामध्ये कधीही पेटू शकणार नाही, अशा शब्दात आमदारांवर टीका केली. अजितदादांनी शेवटच्या अर्थसंकल्पांमध्ये एक अभूतपूर्व योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी आणली. दादांनी शेतकऱ्यांसाठी योजना आणली. तरी विरोधक टीका करत आहेत. विरोधकांसाठी सुद्धा एखादी लाडकी योजना दादांनी आणावी. मला खात्री आहे, बीडला हवा तशा प्रकारचा विकास योगेशभैय्या हेच करू शकतात. त्यांच्याकडून कुणावर कसलाही भेदभाव होणार नाही, विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही आणि सर्वांचा सन्मान होणार याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे आणि दादांसमोर मी देखील घेतो. आपण योजना जाहीर केली काम सुरू केलं. नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला आणि काम सुरू झालं. ही योजना पूर्ण झाली की बीड जिल्ह्यामध्ये सर्व लहान-मोठे तलाव पाऊस नाही पडला तरी भरतील आणि बीड जिल्हा ७० टक्के बागायती होईल. सरकार महायुतीचा येणार आहे आणि महायुतीचे सरकार असताना आपल्या भागाचा आमदार आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉ.योगेश क्षीरसागर असावा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

रिपाइं कधीही संविधानाला धक्का लागू देणार नाही-पप्पू कागदे

महायुतीचे नेते, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांचा आदेश मानून रिपाइं पूर्ण ताकतीने कामाला लागली आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या रूपाने उच्चशिक्षित, संयमी नेतृत्व आपल्याला आमदार म्हणून लागणार आहे, असा विश्वास रिपाइंचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, रिपाइं हा पक्ष सत्तेत असून कधीही संविधानाला धक्का लागू देणार नाहीत, अशी ग्वाही देत असतानाच विरोधकांच्या अफवांना बळी न पडण्याचा आवाहन त्यांनी केले.

दुर्दैवाने बीडने निष्क्रिय आमदार निवडून दिला, एकदा मला संधी द्यावी -डॉ.योगेश क्षीरसागर

काहीही न काम करणारा आमदार म्हणून बीडच्या आमदाराची ख्याती आहे. दुर्दैवाने बीडने निष्क्रिय आमदार निवडून दिला. या आमदारामुळे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी असे सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. अशा आमदाराला आता घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. भविष्यात मी सर्वांना सोबत घेऊन काम करेल. बीडचा विकास करण्यासाठी मला एकदा संधी द्या, अशी कळकळीचे आवाहन डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केले.

अनेक नेत्यांच्या पक्षप्रवेशाने वाढले बळ

मराठा समाजाचे नेते अशोक हिंगे, माजी नगरसेवक आमेर आण्णा, छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पी.वाय.जोगदंड, नवीद दुज्जमा, ज्येष्ठ नेते सयाजी शिंदे, पंकज बाहेगव्हाणकर, श्रीमंत सोनवणे, शिकुर सौदागर, राष्ट्रवादीचे (शरद पवार गटाचे) शहराध्यक्ष सुधीर नाईकवाडे, जेबापींप्रीचे सरपंच श्रीकृष्ण चौधरी, देवीबाभूळगावचे सरपंच सचिन जोगदंड, वाडवनाचे सरपंच बाळासाहेब हगारे, उमेश आंधळे, संजीव माने, दादाराव कळासे, संभाजी जोगदंड, विलास सोनवणे, जफर भाई, कामरान खान, नजीर खान, चंद्रकांत चौधरी, अमर जोगदंड, उमेश जोगदंड, राजेंद्र व्यवहारे, सोमिनाथ कवडे, साहेबराव काटे, रत्नाकर जोगदंड, बाळासाहेब हगारे, साहेबराव काटे आदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षार जाहीर प्रवेश केला.

सासऱ्याच्या हातात कासरा; केजकरांनो मुंदडाच्या काळात विकास विसरा !

0

बीड — गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत केज मतदार संघात प्रबळ उमेदवार नसल्यामुळे मतदारांची कोंडी झाली होती. पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचा कासरा जनतेच्या हातात राहण्याऐवजी तो त्यांच्या सासऱ्याच्या हातात राहिल्याने जनतेला मस्तवाल पणाला मग्रुरीला दंडेलीशाहीला सामोरे जावे लागले. विकासाला देखील खिळ बसल्याने या निवडणुकीत मुंदडाच्या फुग्यातली हवा निघू लागली आहे.

“नंदू सबका बंधू”हा डायलॉग चित्रपट प्रीमियम मध्ये प्रसिद्ध आहे. याच अभिनेत्याने वेगवेगळ्या चित्रपटात साकारलेल्या भूमिका या डायलॉगच्या विरुद्ध आहेत. व्हिलन म्हणूनच त्या जास्त नावाजलेल्या आहेत. याच भूमिकांचा अनुभव केजकरांना गेल्या पाच वर्षात अनुभवायला मिळाला. आपल्या समस्या सभागृहात मांडता याव्यात त्या सुटाव्यात, विकासाची नवी दिशा मिळावी यासाठी लोकशाहीत लोकप्रतिनिधीला महत्त्व आहे. मात्र जनमताचा कौल मिळून देखील आपला कारभार जर तिसराच हाकत असेल तर मतदारांची कुचंबना होऊन विकासाला खिळ बसत मतदारांना अपमानाला सामोरे जावे लागते.”भीक नको पण कुत्रा आवर”असं म्हणण्याची स्थिती निर्माण होते. अगदी अशीच अवस्था केज मतदार संघातील जनतेची झाली आहे. जनतेने निवडून दिलेल्या उमेदवाराचा “कासरा“चक्क सासऱ्याच्या हातात गेला. त्यामुळे आपली व्यथा घेऊन गेलेल्या गोरगरीब जनतेची व्यक्तिगत चौकशी करून त्याला हाकलून लावण्याचा फंडा राबवला गेला. जिथ लोकप्रतिनिधी आपला शब्द ओलांडत नाही तिथे जनतेची बिशाद कशी राहणार? अशा माणसाचा तोरा कसा असणार? याचा विचार करूनच अनेकांनी गप पडीची गोळी घेऊन शांत राहण्यातच धन्यता मानली शेवटी मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? त्याच्या विरोधात जावं तर आपलाच फडशा पडणार? यासारख्या दुर्दैवाला जनतेला सामोरे जावे लागले. पुन्हा निवडणुकीत तोच उमेदवार विजयी झाला तर पुन्हा मतदार संघातील कामकाजाचा कासरा सासर्‍याच्याच हातात जाणार असल्याची भीती जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.ही चूक या निवडणुकीत होणार नाही याची काळजी जनता आता मात्र घेऊ लागली आहे. सक्षम पर्याय देऊन विकासाच्या वाटेवर केज मधील मतदार चालणार असल्याचं चित्र सध्या निर्माण होऊन मुंदडा विरोधात रोष व्यक्त होऊ लागला आहे

गंगाधरच शक्तीमान आहे; काका-पुतणे लोकसभेला विरोधक विधानसभेला पुन्हा एक

0

बीड — गंगाधरच शक्तीमान आहे असे म्हणण्याची परिस्थिती बीडमध्ये निर्माण झाली आहे. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे तुतरीच्या प्रचारात होते. तर त्यांचे पुतणे आणि महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर हे भाजपाच्या प्रचारामध्ये व्यस्त होते. दोघे दोन पक्षाकडे लोकसभेला आणि विधानसभेला मात्र पुन्हा एकत्र. हे कसलं राजकारण. बीडवासियांना मुर्खात काढण्याचे काम काका-पुतण्यांकडून सुरू आहे.
आपल्याला संधी कुठे मिळती, सावज कुठे सापडते, या शोधातच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागर व्यस्त होते हे आता स्पष्ट झाले. आपली डाळ कशी तरी शिजली पाहिजे. त्यासाठी जणू काही ठरवून रणनिती आखली. लोकसभेला जयदत्त क्षीरसागरांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मदत केली तर महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांनी भाजपाला मदत केली. तीन महिनेच झाले. लोकसभेला वेगवेगळी भूमिका असणारे हे काका-पुतणे विधानसभेला संदीप क्षीरसागरांच्या विरोधात एकत्र आले. या काका पुतण्यांचे जणू आधीच ठरले होते की काय म्हणूनच जयदत्त क्षीरसागरांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. जर योगेश क्षीरसागरांना महायुतीची उमेदवारी मिळाली नसती तर जयदत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून निवडणूक मैदानात उतरले असते. आणि योगेश क्षीरसागरांनी जयदत्त अण्णांचे काम केले असते. मात्र योगेश क्षीरसागरांना अजित पवार गटाची उमेदवारी मिळाली आणि गोची झालेल्या जयदत्त क्षीरसागरांनी माघार घेत योगेश क्षीरसागरांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. क्षणाक्षणाला राजकीय विचार बदलतातच कसे येतात, यांचे बदललेले निर्णय लोकांना आवडतील काय याचाही विचार केला जात नाही. जणू बीडवासिय मुर्ख आहेत अशी खेळी या काका-पुतणे क्षीरसागरांनी खेळली.

योगेश क्षीरसागरांना पांडुरंग पावले पण मतदार संघाचे ग्रह फिरले!

0

गटात तटाच्या राजकारणात जनता भरडली जाणार

बीड — कुठल्याही कुटुंबात दूही नसावी हे जरी खरं असलं तरी योगेश क्षीरसागर व जयदत्त क्षीरसागर यांच्यातील दिलजमाई पुन्हा गावागावांमध्ये गटातटाच्या राजकारणाला ऊत आणणारी ठरणार आहे. याच धोक्याच्या घंटेचा आवाज कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदेत घुमल्याचं आज पाहिला मिळालं.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेत योगेश क्षीरसागर यांना निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला. काका पुतण्या मधली दरी मिटली असली तरी गावागावातील पेटणाऱ्या राजकारणाचं काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. योगेश क्षीरसागरांचे कार्यकर्ते व जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते यांच्यातील दुफळी कशी एकसंघ होणार हे मात्र कोडच आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाची पद्धतीच आजपर्यंत गटातटाच्या राजकारणाची राहिली आहे. 2 हजार उंबऱ्याच्या गावात असो की वस्ती तांड्यावर असो प्रत्येक ठिकाणी जयदत्त क्षीरसागर यांच्या समर्थकांचे दोन गट हमखास असायचे. विकासाचं काम एखाद अण्णांनी दिलं की दुसरा गट ते काम बंद पाडायचा. यातून रट्टा रट्टी देखील व्हायची. पोलीस केस बारा भानगडी होऊन शेवटी हा वाद बंगल्यावर जाऊन मिटायचा मात्र या घटनेमुळे दोन्ही कडील गटातील कार्यकर्त्यांची पूरती जिरायची विकास काम जिथे अडवल्या गेलं तिथंच ते कायमचं बंद पडायचं. दोन्ही गटांना तुमच्या गावातले लोक चांगले नाहीत असं सांगितलं जायचं. यातून कार्यकर्त्यांचा गावाचा विकास कायमचा खोळंबलेलाच राहायचा यामूळे बंगल्यावरून खेळलेल्या राजकारणात पोळी मात्र नेहमीच बंगल्याची भाजली गेली. कार्यकर्त्यांच्या घराची राजकारणातील जोरामुळे घर पेटतीच राहिली. गेल्या पाच वर्षात गावा गावामध्ये शांतता निर्माण झाली. गावात विकास योजना राबवताना त्यात अडथळा आला नाही. गावात शांतता राहिल्यामुळे कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी स्व कष्टाने आपल्या कुटुंबाच्या विकासाकडे लक्ष दिले. यातून अनेक गावांचा कायापालट झाला. सहकार्याची भावना निर्माण झाल्यामुळे शेतीत देखील नवनवे प्रयोग केले जाऊ लागले एकूणच विकासाला बसलेला तिढा सुटला गेला. आता पुन्हा बीडच्या मतदारसंघांमध्ये इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती मतदारांमध्ये निर्माण झाली आहे. काका पुतण्यामध्ये प्रेम कायम राहावं त्याला कुणाचा आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. मात्र राजकारणात योगेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते वेगळे व जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांत एकोपा कसा निर्माण होणार? निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी योगेश साठी जिवाचं रान निवडून आणण्यासाठी करायचं दूर्देवाने ते निवडून आले तर त्यांनी काम स्वतःच्या कार्यकर्त्याना न देता काकांच्या लोकांना का द्यायचं?काकांच्याना दिलंच तर स्वतःच्या लोकांचं काय? यातून काम आडवा आडवी होऊन विकासाला खिळ पूर्वी सारखीच बसणार आहे.
हिच कैफियत मांडण्याचा कांहीं कार्यकर्त्यांनी प्रयत्न भर पत्रकार परिषदेत केला. मात्र ही बाब माध्यमांसमोर येऊ नये याची काळजी घेत पत्रकार परिषद आवरती घेतली गेली. माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना देखील बगल दिली.यावेळी जाणिवपूर्वक निर्माण केलेल्या गोंधळात कार्यकर्त्यांच्या रास्त भावना दाबल्या गेल्या.
जयदत्त क्षीरसागर यांच्या राजकारणाच्या याच पद्धतीमूळे त्यांना मानणारा वर्ग मोठा असला तरी मतदार कंटाळलेला आहे. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी लागणार आहे असा सूर जनतेतून उमटू लागला आहे.

सिंदफना पाणलोट क्षेत्र विकासासाठी मला संधी द्या—-विजयसिंह पंडित

0

विजयसिंह पंडित यांना पिंपळनेर सर्कलमध्ये वाढता प्रतिसाद
गेवराई — गेवराई विधानसभा मतदारसंघ हा उत्तरेस गोदावरी नदी व दक्षिणेस सिंदफना नदी यांच्या दरम्यान वसलेला आहे. गोदावरीच्या पाणलोट क्षेत्रातील विकासाप्रमाणेच सिंदफना नदीच्या पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी मला एक वेळा संधी द्या, त्या संधीचे मीज्ञसोने करेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी केले. ते पिंपळनेर सर्कल मधील चव्हाणवाडी, कुक्कडगाव खुंडरस, आडगाव, गुंजाळा, वडगाव, गुंदेवाडी व गुंधा या गावातील कॉर्नर बैठकीमध्ये बोलत होते.

माहितीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांनी आज जेवढा विधानसभा मतदारसंघातील पिंपळनेर सरकारचा झंजावाती प्रचार दौरा केला. यावेळी त्यांच्या समवेत जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील, बळवंत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य किशोर सुरवसे, पांडुरंग पठाडे, श्रीकिसन कदम, सुरेश घुमरे, गणेश तोडेकर, अण्णा मामा देवगुडे, माजी सरपंच वशिष्ठ कुठे, जयदत्त शिंदे, तुळशीदास पवार, अशोक हाटवटे, प्रमोद मते, लक्ष्मण करांडे, कैलास गायवळ, भगवानराव देवडकर, कृष्णा प्रभाळे, प्रताप घुगे विनोद घुगे, नंदकिशोर मोरे सरपंच, किरण लांडगे बाळनाथ मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की, गेवराई मतदार संघाचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी फक्त शिवछत्र परीवाराकडेच आहे. त्यामुळे गोदावरी नदी प्रमाने सिंदफना नदीवर ईटकूर, अंकुटा, टाकळगाव, खुंड्रस, औरंगपुर, नाथापूर येथील बंधारे करण्यासाठी शिवछत्र परीवाराकडेच आमदारकी पाहिजे. म्हणून येत्या २० तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.

विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

गेवराई विधानसभा मतदारसंघातील खूंड्रस येथील प्रल्हाद निर्मळ, श्रीराम गुरव, हनुमान निर्मळ, संतोष गाडे, नारायण निर्मळ, बळीराम निर्मळ, वसंत खंडागळे, सदाशिव निर्मळ, सुभाष दळवी, रामप्रसाद हटवटे, महादेव निर्मळ, राधाकिसन निर्मळ, मोहन निर्मळ, विकास निर्मळ, महादेव वैद्य यांनी विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आडगाव येथील सरपंच सुरेशराव बनगर, माजी सरपंच पांडू तात्या देवकर, युवा नेते नंदकिशोर बनगर, शुभम बनकर यांनीही विजयसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयसिंह पंडित यांना विजयी करुन आपला लाडका प्रतिनिधी विधानसभेत पाठवण्याचा निर्धार केला.

एकादशीला ‘योग’जुळले; जयदत्त क्षीरसागरांच्या रूपाने “या” पुतण्याला पांडुरंग पावले!

0

बीड — विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर व डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यातली लढत रंजक व चूरशीची बनत असताना निवडणूक रिंगणातून माघार घेतलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यामुळे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने पुतणे योगेश क्षीरसागर यांना एकादशीला पांडुरंग पावले असे म्हटले जाऊ लागले आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र आज पत्रकार परिषद घेऊन जयदत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जाती जातीतील संघर्षाची दरी कमी करण आज काळाची गरज आहे.अंतर्मनाने जी हाक मला दिली त्यावरुन मी उमेदवारी अर्ज मागे घेतला.जनता माझा परिवार आहे.विस्तारीत परिवाराची जबाबदारी असून विकासाची घडी बसवण्यासाठी संघटीत होऊन योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही ही बाब लक्षात आली.त्यामूळे वाढप्या आपला असला की,शेलक ताटात पडत हे वाढप्याच काम योगेश करणार असल्याने त्यांच्या पाठीशी सर्व जनतेने मतदानाच्या रूपाने उभे राहावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले

अनिल जगताप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; जिल्हा प्रमूख पदाचा राजीनामा

0

बीड — गेल्या चाळीस वर्षांपासून मी प्रामाणिकतेने आणि निष्ठेने शिवसेनेत सक्रिय असून शिवसेनेच्या माध्यमातून मी जनसेवा करत आलो आहे, सर्वसामान्यांचे समस्या अडचणी सोडवत आलो आहे. परंतु वारंवार शिवसेनेने माझ्यावर अन्याय करत मला डावलले आहे. जेंव्हाही विधानसभा निवडणुकीची तयारी केली तेंव्हा तेंव्हा मला सोडून उमेदवारीची माळ दुसर्‍याच्या गळ्यात घालण्यात आली.

बीडमधील अठरा पगड जाती धर्मातील जनसमुदाय माझ्याजवळ येऊन वारंवार दुःख व्यक्त करतो की, सातत्याने शिवसेनेकडून अन्याय तुमच्यावर होतो तरी तुम्ही का हा अन्याय सहन करतात? पण आता बस्स, मी वैतागलोय या अन्यायाला. आता सहन होत नाही. त्यामुळे मी आणि माझे सर्व सहकारी पदाधिकारी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र ठोकून माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत. असे अनिलदादा जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. इथून पुढे मला मानणारी सर्व जाती धर्मातील जनताच माझी नेता आणि सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील हाच पक्ष आहे. मी बीड विधानसभेचा अपक्ष उमेदवार असून माझा विजय निश्‍चित होणार आहे आणि मी विजयी झाल्यानंतर कोणत्याच पक्षात जाणार नाही व कोणत्याच पक्षातील नेत्याला मानणार नाही.असे शिवसेनेला वैतागलेल्या अनिलदादा यांनी पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले.
अनिलदादा जगताप यांनी आज दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्याला कार्यलयात पत्रकार परिषद घेत शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाला वैतागून आपल्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. याबरोबरच बीड शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्‍यांनी देखील आपला राजीनामा दिला असल्याचे अनिलदादा यांनी स्पष्ट केले.

पवार साहेबांच्या सभेतून अनेक मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश;आ.संदीप क्षीरसागरांना मिळणार बळ

0

बीड — मतदारसंघातील अनेक मातब्बरांचा खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या सभेत जाहीर प्रवेश झाला. बीड शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रभाव असलेले अनेक प्रभावी चेहरे आ.संदीप क्षीरसागरांच्या सोबत आले आहेत.

शनिवारी (दि.९) रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ खासदार शरदचंद्र पवार यांची विजयी सभा झाली. यावेळी बीड मतदारसंघातील शहर व ग्रामीण भागातील अनेक मातांनी खासदार पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये बीड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विष्णू वाघमारे, माजी उपनगराध्यक्ष हाजी नसीम इनामदार, माजी उपनगराध्यक्ष शाकेर भाई, बीड माजी पंचायत समितीचे उपसभापती नारायण परजणे, बहिरवाडीचे माजी सरपंच आसाराम गायकवाड, माजी नगरसेवक शेख शाकेर, माजी नगरसेवक अजीम खान, माजी नगरसेवक जलील खान पठाण, बीड पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर (बी.एस.)कदम, फारोकी साहेब, अय्युब खान साहेब आदी प्रभावी असलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात हे प्रवेश झाल्याने आ.संदीप क्षीरसागरांना या मंडळींच्या माध्यमातून मोठे बळ मिळणार आहे.

हाताने भोकं पाडलेल्या नौकेत प्रकाश सोळंके स्वार; ती खोल गर्तेतच बुडणार!

0

बीड — नौकेतून प्रवास करायचा तर ती चांगली असावी लागते. मात्र त्या नौकेलाच स्वतःच्या हाताने भोक पाडून त्यावर स्वार होत पैलतीरावर नेण्याचा प्रयत्न केला तर तो आत्मघात समजला जातो. हाच नियम राजकारणात देखील आहे. माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांच्या बाबतीतही हेच घडत आहे. मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेली भूमिका.रस्त्यांची झालेली चाळणी, शेतकऱ्यांची साखर कारखान्याच्या माध्यमातून केलेली पिळवणूक, पेशवाईच्या राजवस्त्रासाठी रघुनाथराव पेशव्यांसारखी पुतण्यासोबत खेळलेली घातकी चाल या गोष्टी घातक ठरू लागल्या आहेत. मतदारांनी इतके वर्ष ठेवलेला विश्वास आता पूर्ण उडाल्याने सोळंकेची नाव निवडणुकीच्या गर्तेत बुडणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.

प्रकाश सोळंके यांनी माजलगावच्या राजकारणात थोडं थोडं कर नव्हे तर वीस वर्षापासून आधीराज्य गाजवलं. जनतेने नेहमीच आता तरी सुधारणा करतील मतदार संघाचा कायापालट होईल अशी धारणा ठेवली मात्र ही भावना माजलगावकरांसाठी आत्मघातकी ठरली. मतदार संघातील रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली. 90 ते 100 गावातील लोकांना जायला यायला धड रस्ता नाही. माजलगाव तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या मनूर देवी मंदिराचा माजलगाव- मनूर -गोविंदपूर – लूखेगाव या रस्त्यावरून जाणाऱ्यांना गुडघ्या एवढ्याल्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. ढोपराची हाड या रस्त्यावरून जाताना खिळखिळी होतात. तीच स्थिती दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या माजलगाव मंजरथ रस्त्याची आहे. एकूणच पाहिलं तर हे धर्मकार्य विरोधीच भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे अशी भावना या रस्त्यावरून जाणाऱ्या भाविकांची निर्माण होते. कालवा दुरुस्ती असो की उपसा जलसिंचन योजना असो याचे प्रत्येक काम स्थानिक गुत्तेदारांना कधीच दिले नाही. मतदारसंघा बाहेरील लोकांना ही काम देऊन कमिशन घेतल्याचा आरोप अनेक वेळा प्रकाश सोळंके यांच्यावर केला गेला. तीच स्थिती जलजीवन च्या कामात देखील झाली. येणाऱ्या काळात या कामात झालेल्या भ्रष्टाप्रचारामुळे अनेक गावांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही कर्तबगारी कमी की काय ? म्हणून पुन्हा मराठा आरक्षण आंदोलनात वादग्रस्त भूमिका घेऊन समाजाला डिवचत वातावरण कलूषीत करण्याचं काम प्रकाश सोळंके यांनी केलं. राजकारणाच्या नौकेला त्यांनी स्वतःच्या हातानेच मोठं भगदाड पाडलं. याच पडलेल्या भगदाडामुळे पंकजा मुंडे यांना लोकसभेत त्यांचा चाहता वर्ग माजलगाव मतदार संघात मोठा असताना देखील आघाडी घेता आली नाही. परिणामी त्यांना कमी मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्या पराभवाला देखील सोळंकेच्या कर्तबगारीची काळी किनार लागलेली आहे.
साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील गोरगरीब शेतकऱ्यांची जितकी पिळवणूक करता येईल तितकी पिळवणूक प्रकाश सोळंके यांनी केली. शेतकरी आंदोलन या भागात मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे तरी त्यांच्यावर काही प्रमाणात का होईना वचक राहिला. नाहीतर जुन्या काळातील सरंजामशहासारखं त्यांनी शेतकरी जात्यातून अक्षरशः दळून काढला असता. अशी परिस्थिती या भागात त्यांनी निर्माण करून ठेवली. अनेक शेतकऱ्यांना ऊस कारखान्याला जावा यासाठी रक्ताचे अश्रू गाळावे लागले आहेत. हे शेतकरी कसा बरे विसरेल? जे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर त्यांची जी वर्तवणूक राहिली तीच वर्तवणूक स्वतःच्या घरात देखील राहिली. दिलेलं वचन पाळायचं नाही. घातकी राजकारण करत स्वतःची पोळी भाजायची एवढंच धोरण अजूनही कायमच ठेवलं. परिणामी लागलेल्या सवयीमुळे त्यांनी पेशवाईचा इतिहास कसा घडला होता. याचं उदाहरण देखील त्यांनी दाखवून दिलं. पेशवाईची राज वस्त्र अंगावर चढावीत यासाठी रघुनाथराव पेशव्यांनी नारायणराव पेशव्यांचा घात केला होता. तशीच स्थिती यांनी देखील केली. राजकीय निवृत्तीची घोषणा करून उत्तराधिकारी आपला पुतण्या असल्याचं मोठ्या थाटात जाहीर केलं. त्यातून काही काळ का होईना मतदारसंघात त्यांचा मोठेपणा जनतेला भावला मात्र ऐनवेळी आमदारकीची राजवस्त्र स्वतःच्या अंगावरच राहावीत यासाठी राजकीय सारीपाटावर अनुभवी चाली खेळत पुतण्याचा पत्ता कट केला. स्वतःच्या नावाची (उमेदवारीची) घोषणा पक्षश्रेष्ठींना करायला लावली. इथंच सगळ्यात मोठं कधीच न बूजल्या जाणार आणखी एक भोक पडलं. या घटनेची सारवासारव करत त्यांचा पुतण्या राजकीय मंचावरून हा आमचा कौटुंबिक निर्णय होता. मी काकावर नाराज नाही असं सांगत असला तरी जनमताला मात्र हे पटलेलं नाही.
ही राजकीय नौकेला हाताने पाडलेली भोक नाहीत का? “बुंद से गई वो हौद से नही आती” अशी म्हण प्रचलित आहे. आठ दहा दिवसाच्या प्रचारकाळात न बुजवता येणारी भोकं सोळंके कशी बुजवणार? राजकीय नौका निवडणुकीच्या पैल तीरावर कशी पोहोचणार? ती गर्तेतच बुडणार असल्याचं सध्या तरी चित्र माजलगाव मतदार संघात दिसत आहे. सोळंकेच्या नौकेत पाणी शिरत असून नौका बुडण्याच्या मार्गावर आली आहे.सोळंके विरोधात वातावरण प्रचंड तापू लागलं आहे.