Home Blog Page 148

बसची दुचाकीला धडक; जिल्हा परिषद शिक्षकाचा मृत्यू

0

गेवराई — भरधाव एसटी बसने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील 45 वर्षीय जि.प. शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीसह शिक्षकाला बसने जवळपास दोनशे फूट फरफटत नेले होते. ही घटना गेवराई-शेवगाव रस्त्यावरील महारटाकळी येथे रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.

फय्याज खान वय 45 रा.महारटाकळी ता.गेवराई असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. फय्याज खान हे तालुक्यातीलच अर्धपिंपरी याठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. ते आपल्या गावालगत असलेल्या क्रिकेट मैदानावर रोज सकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात होते. दरम्यान रविवारी क्रिकेट खेळून फय्याज खान हे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या माजलगाव-पुणे या बस क्र. एम.एच.13 सी.यू.7836 ने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात ऐवढा भिषण होता की, अपघातानंतर बसने दुचाकीसह फय्याज खान यांना जवळपास दोनशे फुट फरफटत नेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात फय्याज खान या शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चकलांबा पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघातानंतर या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान पोलिसांनी पंचनामा करुन फय्याज खान यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला होता.

जनतेच्या सुरक्षेसाठी 24 तास तयार; कायद्याची घडी बसवणार– एस.पी. कांवत

0

बीड — आयपीएस नवनीत कॉंवत यांनी शनिवारी रात्री पावणे आकरा वाजता पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला सुरूवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेवून जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना अनेक सुचनाही केल्या आहेत. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपली भुमिका प्रसार माध्यमां समोर मांडली. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले आहे. त्याअनुषंगाने ते उद्या जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांनाही पुढील कामासंदर्भात अनेक सुचना देणार आहेत.

नवनीत कॉंवत यांनी यापुर्वी लोणावळा येथे डीवायएसपी, धाराशिव येथे अप्पर पोलिस अधीक्षक तर छ.संभाजीनगर येथे पोलिस उपायुक्त म्हणून कर्तव्य बजावलेले आहे. पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची बीड जिल्ह्यातील ही पहिलीच पोस्टींग आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारून कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या सुरक्षेसाठी मी 24 तास तत्पर राहणार असून जिल्ह्यातील प्रत्येकाला सुरक्षीत वाटले पाहिजे असेच काम करणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. तसेच कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे सर्वांनी नियमाचे, कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. कायदा मोडणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, संरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमधील फरार आरोपींना लवकरच गजाआड केले जाईल, विशेष म्हणजे याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, आरोपींना कडक शिक्षा होईल त्याअनुषंगाने पुरावे गोळा केले जातील, असाही विश्‍वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला आहे. याअनुषंगानेच त्यांनी रविवारी सकाळी पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांकडून बीड जिल्ह्याचा आढावा घेत त्यांना सुचना केल्या आहेत. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, डीवायएसपी विश्‍वाभंर गोल्डे, उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख, शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर, शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज, श्री. गात, डीएसबीचे कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. तर उद्या एसपी बीड जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेवून त्यांना चोख कर्तव्य बजावण्याच्या सुचना करणार आहेत.

बीड जिल्ह्यात अनेक जण खोटे गुन्हे दाखल करून गोरगरिबांना त्रास देण्याचे काम करत आहेत. अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणार्‍यांवरही पोलिस अधीक्षक नवनीत कॉंवत यांची करडी नजर राहणार आहे.

निराधारांना मिळणार संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचा लाभ

0

आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश

बीड— बीड तालुक्यातील अनेक निराधारांना संजय गांधी, श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आधार मिळणार आहे.‌ गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांच्या रखडलेल्या मंजुरी अखेर झाल्या असून नवीन लाभार्थ्यांची यादी तयार झाली. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.

निराधार वयोवृद्ध नागरिक यांना निर्वाहासाठी निधी देणारी श्रावणबाळ योजना तसेच निराधार व्यक्ती, अंध, अपंग, अनाथ मुले, दिर्घ आजार, घटस्फोटीत स्त्रिया इत्यादी दुर्बल घटकांना आर्थिक मदत पुरवणारी संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि अशाप्रकारच्या इतर योजनांच्या समितीची गेल्या अनेक दिवसांपासून बैठक झाली नव्हती, त्यामुळे गोरगरीब आणि गरजू या योजनांच्या लाभापासून वंचित होते. बर्‍याच दिवसांपासून प्रस्ताव आणि अर्ज दाखल करून देखील लोकांंना लाभासाठी प्रतिक्षा करावी लागत होती. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेकवेळा पाठपुरावा करून, बैठका घेऊन संबंधित यंत्रणा व योजना समितीच्या बैठका घेऊन नवीन पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट करून पात्र आणि गरजूंना लाभ देण्यासाठी निर्देशीत केले होते. यावर आता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत बीड तालुक्यातील ग्रामीण भागातून असलेल्या १२९ व शहरातील ९७ नवीन लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच संजय गांधी निराधार पेन्शन योजनेंतर्गत शहरातील ७६ व ग्रामीण भागातील ११२ पात्र आणि गरजू लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. तहसिलदार यांच्या नेतृत्वाखाली सदरील योजनांची बैठक होऊन नवीन लाभार्थींचा योजनेच्या यादीत सामावेश केला गेला आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून वंचित असलेल्या गोरगरीब, निराधार, दुर्बल घटकांना आ.संदीप क्षीरसागरांच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान ज्या लाभार्थ्यांचे अर्ज त्रुटीत पडले आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्रुटीपूर्तता करावी असे आवाहनही आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी सर्व पक्ष, समाज आणि संघटना एकत्र येणार; सोमवारी सामूहिक बैठक

0

बीड — केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची अमानवीय पध्दतीने निघृण हत्त्या केल्याच्या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्व पक्ष, समाज व संघटना आणि एकत्र येऊन आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी (दि.२३) रोजी बीड शहरातील आशिर्वाद लॉन्स येथे सकाळी १० वा. सामूहिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

मस्साजोग येथील सरपंच स्व.संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अतिशय निघृणपणे स्व.देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल १४ दिवस उलटूनही स्व.देशमुख यांचे मारेकरी आणि या प्रकरणाचा सुत्रधार अद्याप मोकाट आहेत. इतके गंभीर प्रकरण असताना प्रशासनाकडून आरोपींच्या अटकेत चालढकल केली जाते आहे. आरोपी हे सत्तेच्या राजाश्रयात असल्याने त्यांना अटक केली जात नाही.‌ सत्तेचा इतका दुरूपयोग जनसामान्यांना घातक ठरत चालला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आणि सर्व विचारांचे लोक एकत्र येऊन सर्वसमावेशक आंदोलन उभे करणार आहेत. दरम्यान या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या सामूहिक बैठकीला सर्व पक्ष, संघटना आणि सर्वच विचारांच्या लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्याच्या अब्रूचे अविनाशी धिंडवडे निघाल्याने एस पी ‘बार’ गळले; नव “नीत” आव्हानांचा काॅंवत यांच्यापुढे डोंगर

0

बीड — मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे लोकसभेसह विधानसभेत निघाल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या जागी आता छत्रपती संभाजी नगर येथे उपायुक्त पदी असलेले कांवत बीडचा कारभार पाहणार आहेत. हत्या, गुटखा माफिया,वाळू तस्करी, वित्तीय घोटाळे यासारख्या “नव” नीत आव्हानांचा सामना करत कायदा सुव्यवस्थेचे राज्य कावत यांना निर्माण करावे लागणार आहे.

बीड जिल्ह्याची स्थिती बिहार पेक्षा ही वाईट झाली आहे. मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये नंतर येथील कायद्या सूव्यवस्थेची लक्तर लोकसभेसह विधानसभेत देखील टांगली गेली. वाळू तस्करी, खंडणी, हत्या, दरोडे, गुटखा तस्करी, पतसंस्थांच्या माध्यमातून सामान्यांच्या खिशावर पडलेले दरोडे ,गोळीबार यासारख्या प्रकरणांनी कळस गाठला आहे. दररोज कायदा सुव्यवस्थेची धिंडवडे निघत असल्याने परिस्थिती चिंताजनक व स्फोटक बनली आहे. जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ प्रकरणानंतर अपयशाचा कलंक घेऊन बाहेर पडलेले नंदकुमार ठाकूर यांच्यानंतर एस पी म्हणून आलेले अविनाश बारगळ देखील गुन्हेगारीला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरले. एस पी ची पडछाया समजल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेची अवस्था तर शेळपटासारखी बनली गेली. ही यंत्रणा नेमकी जिल्ह्यात काय करत होती हा प्रश्न वादातीत बनला गेला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या हायवा वाळू तस्करीत सहभागी असल्यामुळे पोलीस ठाण्यात लावलेले वाळूचे हायवा देखील राजरोसपणे पसार करण्यात यश मिळाले. कायदा सुव्यवस्था राबवणारी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली गेली. त्याचाच परिपाक म्हणून संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर व खंडणी प्रकरण उजेडात आल्यानंतर गुन्हेगारीने किती कळस गाठला आहे. हे महाराष्ट्राला कळालं. परिणामी लोकसभा विधानसभेत हा विषय संदीप क्षीरसागर,सुरेश धस, नमिता मुंदडा, विजय राजे पंडित या लोकप्रतिनिधींनी विधानसभेत तर खा. बजरंग सोनवणे यांनी लोकसभेत लावून धरल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कायदा सुव्यवस्था राबवताना अविनाशी कलंक जिल्ह्याला लावून ते (बार) गळले. बारगळ यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त पदी कार्यरत असलेले आयपीएस नवनीत कांवत हे आले आहेत. 2017 च्या बॅचचे ते तरुण आयपीएस अधिकारी आहेत. सैनिकी शाळेत शिक्षण पूर्ण केल्यामुळे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून कांवत यांची ओळख आहे. त्यांनी आयआयटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली असून तीन वेळेस आय ई एस, आय आर एस, आयपीएस अशी यूपीएससी उत्तीर्ण झालेले आहेत.
बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढून डागाळलेली खाकी स्वच्छ करण्यासह कायदा सुव्यवस्थेच राज्य असल्याची खात्री जनतेला पटवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे. जनतेच्या अपेक्षा ते पूर्ण करतील अशी इच्छा जनतेतून व्यक्त केली जात आहे.

पिकांचे गुणधर्म ओळखुन शेतकऱ्यांनी पिकाची लागवड करावी – जगदीश खोकड

0

हिंगणी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मर्या. अकोला, (महाबीज) कंपनीचे बीज प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न
चौसाळा — बीड तालुक्यातील हिंगणी (बु.) येथे महाबीज जिल्हा कार्यालय बीड यांच्या कडून “महाबीज” तूर वाण  “गोदावरी” “या पिकाचे पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम मंगळवार  दि.17 डिसेंबर रोजी सकाळी हिंगणी ( बु.) येथे चौसाळा – नांदूरघाट रस्त्यावर प्रकाश कुलकर्णी यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता.


यावेळी महाबीज कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेती क्षेत्रात सतत होणारे बदल आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा होणारा वापर तसेच वातावरणीय बदल, महाबीज कंपनी कडून घेण्यात येणारे बीजोत्पादन याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाचा वापर, महाजैविकचा वापर सविस्तर पणे सांगितला. शेतकऱ्यांनी विविध पीक पद्धतींचा वापर करून स्वतः च्या शेतात पिकणाऱ्या पिकांची मार्केटिंग आदी विषयी माहिती दिली. तसेच विविध पीक पद्धती, पिकांत हवामानानुसार होणारे बदल आणि पिकांचे गुणधर्म ओळखून शेतकऱ्यांनी पिकाची लागवड कशी करावी या विषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.


जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमध्ये होणारे नवनवीन बदल तसेच कृषी विभागाच्या योजना आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर पाणी फौंडेशन चे विभागीय समन्वयक संतोष शिनगारे यांनी गट शेती, सेंद्रिय शेती आदी विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच गट शेती व सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी दत्ता जाधव, श्रीकांत कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, सेवानिवृत्त कृषी अधिकारी पी. जी. कुलकर्णी आदींनी आपले अनुभव शेतकऱ्यांना सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा व्यवस्थापक महाबीज बीड चे अजय फुलझेले यांनी केले. सूत्रसंचलन सचिन धस यांनी केले तर आभार उपसरपंच अंकुश गोरे यांनी मानले. यावेळी पाणी फौंडेशनचे तालुका समन्वयक शिवलेश्वर मेदने, प्रवीण काठवटे, सागर गोरे, विशाल करंडे, विशाल घोलप, कृषी पत्रकार विठ्ठल घरत, महाबीजचे डीलर योगेश मंत्री व श्री कोटेचा, परिसरातील शेतकरी उपसरपंच अंकुश गोरे, सुधाकर गुंजाळ, रामुकाका, चंदन नाईकवाडे, संजय गुंजाळ, रविंद्र चव्हाण, वामन मुंडे, सौरभ निनाळे, खंडाळा येथील शेतकरी गटाच्या महिला आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन महाबीज कंपनी बीड कृषी क्षेत्र अधिकारी, (विपनन) सचिन धस व कृषी क्षेत्र अधिकारी, (उत्पादन) अविनाश केदार यांनी विशेष परिश्रम घेऊन केले होते.

 2 कोटीची खंडणी मागितली; वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटेवर गुन्हा दाखल

0

बीड — धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादीच्या केज तालुकाध्यक्षवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावत असल्याची तक्रार केली असून संबंधित अधिकाऱ्यांचं अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याची तक्रार अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे केज पोलिसांनी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर दोन कोटीची खंडणी मागितली आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

‌‌. याबाबत मस्साजोग येथील अवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल केदु शिंदे रा. नाशिक ह.मु. मोंढा रोड बीड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मागील एक वर्षापासून ते अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे. त्यांच्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचं काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून, त्या ठिकाणी विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत.
२९ नोव्हेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना सुनिल शिंदे यांच्या फोनवर विष्णू चाटे याने फोन केला आणि त्यांनी मला वाल्मीक आण्णा बोलणार आहेत असे म्हणाले, ते काम बंद करा, ज्या परिस्थीतीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केलं तर याद राखा असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली.

कार्यालयात हजर असताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले, रा. टाकळी हा मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आला आणि त्याने पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा, असं म्हणून केजमध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाचे अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा, अन्यथा तुमचे हात-पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन, असं म्हणत धमकी दिली होती.
काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक आण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचं, असेल तर दोन करोड रुपये द्या असं सांगितलं होतं. त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांच्या मोबाईलवरुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास सांगितलं. तसंच मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. यापूर्वी २८ मे २०२४ रोजी ११ वाजता याच कारणावरुन आपलं आपहरण केल्याचं सुनिल शिंदे यांनी सांगितलं. त्याबाबत पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याचंही ते म्हणाले.
त्यानंतर ६ डिसेंबर २०२४ रोजी देखील सुदर्शन घुले आणि इतरांनी आवादा कंपनीचे मस्साजोग येथील प्रकल्पाच्या ठिकाणी जबरदस्तीने प्रवेश करुन गेटवरील कामगारांना धमकी देऊन मारहाण केली होती. त्यावेळी कंपनीचे शिवाजी थोपटे यांनी सुदर्शन घुले आणि इतर लोकांविरुध्द पोलीस ठाणे केज येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झालेला आहे.
अवादा कपंनीचे केज तालुक्यातील पवन उर्जा प्रकल्पाचे काम बंद करण्यासाठी वाल्मीक कराड रा. परळी, विष्णु चाटे रा. कौडगाव ता. केज आणि सुदर्शन घुले रा. टाकळी ता. केज हे वारंवार प्रकल्पाचे काम चालु झाल्यापासुन धमकी देत आहेत. त्यामुळे त्यांच्या दहशतीखाली असल्याने, तसंच मनस्थिती बरी नसल्याने सुनिल केदु शिंदे त्यांनी कपंनीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या सल्ल्याने बुधवारी तक्रार दाखल केली असल्याचे म्हटले आहे

न्यायाधीशालाच लाच घेताना पकडलं; एसीबीची मोठी कारवाई

0

सातारा — न्यायपालिकेवर आजही सर्वसामान्य जनतेचा पूर्ण विश्वास आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय,अत्याचारविरुद्ध दाद मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय. लोकशाही प्रक्रियेत न्यायालय ही स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात असल्याने प्रशासन आणि राजकीय दबाव यांच्याविरुद्धची लढाई देखील मोठ्या आशेने न्यायालयात लढली जाते. मात्र साताऱ्यात न्याय देण्यासाठी एका न्यायाधीशालाच लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.शहराती एका हॉटेलमध्ये सापळा रचून न्यायाधीश महोदयांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. त्यामुळे, सर्वसामान्यांच्या न्याय-हक्काचं शेवटचं आश्वासक ठिकाण असलेल्या न्यायपालिकेवरील विश्वासाला देखील या घटनेनं तडा गेला आहे.

पुणे-सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संयुक्तिकपणे साताऱ्यात ही मोठी कारवाई केली आहे. सातारा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश महोदयांविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले, त्यानंतर गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू आहे. पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात न्यायाधीश महोदयांसह खाजगी इसम किशोर खरात व आनंद खरात तसेच एक अनोळखी इसम यांना रंगेहात पकडल्याने न्यायपालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या वडिलांना जामिन देण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली. होती, अशी प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच या घडामोडी घडल्या आहेत. येथील एका हॉटेलमध्ये सापळा रचून अँटीकरप्शनच्या पोलिसांनी सर्वांना रंगेहात पकडले, त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या घटनेने सातारा जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. ज्या न्यायव्यवस्थेवर सामान्य माणसांचा शेवटचा विश्वास असतो, त्याच न्यायव्यवस्थेवरही या कारवाईनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास हा न्यायपालिकेवर आहे, पोलिस यंत्रणांकडून अन्याय झाला तरी न्यायालयात आपणास दाद मिळेल, न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेल्या न्यायमूर्तींकडून आपल्यावरील अन्याय दूर होईल, अशी सर्वसाधारण भावना असते. मात्र, चक्क न्यायाधीश महोदयच लाच घेताना आढळून आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पोलीस, व प्रशासनातील भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. पण, थेट न्यायपालिकेतील वरिष्ठ अधिकारीच अडकल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पकडला

0

 

बीड — केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी आज तिसऱ्या आरोपीला पुण्यामधून अटक केली आहे.

प्रतिक भीमराव घुले वय 25 वर्ष, रा.टाकळी ता.केज असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.प्रतिकच्या अगोदर पोलिसांनी जयराम माणिक चाटे वय 25 वर्ष रा.तांबवा ता. केज, महेश सखाराम केदार वय 21 रा. मैंदवाडी ता.धारुर या दोघांना अटक केली होती. आरोपी प्रतिक हा खून केल्यानंतर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. या आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान जयराम चाटे व महेश केदार यांना सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
असं आहे प्रकरण ?
संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. अपहरणकर्त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना त्यांच्या कारमधून बाहेर काढल्यानंतर काठीने बेदम मारहाण केली. नंतर अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने ते आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले.
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला होता. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यानं तपासात कसूर केल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात आल्याने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी संबंधित पीएसआयचे निलंबन केले.

पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम; मोठ्या संख्येने उपस्थित रहा –.संदीप क्षीरसागर

0

बीड  — राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे जाणते राजे पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या ८४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीडमध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांनी गुरूवारी (दि.१२) रोजी राष्ट्रवादी भवन येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.

पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार साहेब यांचा ८४ वा वाढदिवस गुरूवारी (दि.१२) रोजी आहे. पवार साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी भवन येथे सकाळी ११:०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ८४ उत्कृष्ट विद्यार्थी, ८४ जेष्ठ नागरिक, ८४ विशेष कार्य केलेल्या महिला यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासोबतच विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. या कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.