Home Blog Page 145

राज्यभर संताप आंदोलनं तरीही आरोपींची पाठराखण; संतोष देशमुखांच्या हत्येची ही स्थिती तर सामान्यांचे काय?

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी मोकाट आहे. हत्येच्या मास्टर माईंड ला वाचवलं जातंयं, एसआयटी असो की सीआयडी देशमुख कुटुंबीयांना माहिती देत नाही. वाल्मीक कराड वर 302 मोक्का लावण्यात यावा यासाठी टोकाची भूमिका घेत टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करावे लागतय, राज्यात हत्येनंतर संतापाची लाट उसळली अनेक ठिकाणी आंदोलन झाली. एवढं होऊनही सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय पद्धतीने हत्या केल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. लोकसभेत,विधानसभेत हत्येचे पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करण्याचे तसेच तपास सीआयडी मार्फत करण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने कारवाई देखील केली. असं असताना देखील वाल्मीक कराडने समर्पण केल्यामुळे‌ तो सीआयडीला सापडला मात्र पोलिसांना शरण न आलेला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. राज्यात ठीक ठिकाणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन झाली. संतोष देशमुखांच्या लेकीने प्रत्येक ठिकाणी आक्रोशाचा टाहो फोडला. तीच स्थिती भाऊ असलेल्या धनंजय देशमुख यांची आहे. राज्यभर न्यायाची मागणी होत असली तरी या घटनेचा मास्टरमाइंड म्हणून आरोप असलेला वाल्मीक कराड उद्या जामिनावर बाहेर येईल व आपल्याला त्रास देईल कदाचित जीवावर उठेल अशी भीती मसाजोग ग्रामस्थांना वाटू लागली आहे. अजूनही दहशतीचा अंक संपायला तयार नाही. त्याला परिस्थिती ही तशीच कारणीभूत आहे. या प्रकरणातील प्यादे असलेले आठ आरोपीवर मोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले मात्र मास्टरमाइंड वाल्मीक कराड याला वाचवलं जात आहे अशी शंका म्हणण्यापेक्षा खात्रीच जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. वाल्मीक कराड वर फक्त आतापर्यंत खंडणीचाच गुन्हा दाखल आहे. वाल्मीक कराडचा शस्त्र परवाना रद्द करून आपण खूप मोठी कारवाई केली असा आव जिल्हा प्रशासनाने आणला. इतकंच नाही तर पीडित देशमुख कुटुंबीयांना तपासा संदर्भात माहिती सुद्धा देण्यात येत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तपासात एवढी गुप्तता मास्टर माईंड ला वाचवण्यासाठी केली जात असल्याची जनभावना निर्माण होऊ लागली आहे. याच परिस्थितीला कंटाळून शेवटी आरोपी सुटलाच तर आपला जीव घेणार त्यापेक्षा आपणच आत्मदहनासारखा मार्ग स्वीकारलेला बरा अशी उद्विग्न भावना व्यक्त करत धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील तसेच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी त्यांचे मन वळवण्यात व त्यांना खाली उतरवण्यात यश मिळवले. एवढं आंदोलन पेटून लोकप्रतिनिधींनी सर्वोच्च सभागृहात आवाज उठवून गाव समाज पाठीशी असताना देखील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नसेल? न्यायासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल? तर गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील हा विचार न केलेलाच बरा. शेवटी हे राज्य न्यायाचे आहे की अन्याय करणाऱ्या गुंडांचे आहे असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

वाल्मीक कराडसह 100 जणांचे शस्त्र परवाने रद्द

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील शस्त्र परवान्याचा मुद्दा समोर आला होता. दरम्यान याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. यामध्ये प्राथमिक स्वरूपात 100 परवाने रद्द केले असून यात वाल्मीक कराड याच्या शस्त्राचा देखील समावेश आहे.

बीड जिल्ह्यात शस्त्र परवान्यावरून राजकारण तापले होते. याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा प्रश्न समोर आणला होता. दरम्यान याची प्रशासनाने दखल घेतली असून ज्या व्यक्तीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. तसेच ज्याला न्यायालयाकडून एखाद्या गुन्ह्यात शिक्षा झाली. त्याचा शस्त्र परवाना रद्द केला जात आहे. दरम्यान आत्तापर्यंत प्रशासनाने 100 परवाने रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या शस्त्र परवान्याचा देखील समावेश आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण:मकर सक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा ग्रामस्थांचा इशारा

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्येला महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे.मात्र या प्रकरणात वाल्मिक कराडवर देखील आरोप करण्यात आले आहेत, कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, मात्र त्याच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. उद्या 13 जानेवारीला ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे, तर 14 जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी मस्साजोगचे ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन आंदोलन करणार आहेत. मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून मोक्का लावण्यात यावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करण्यात यावी. शासकीय वकील म्हणून उज्वल निकम किंवा सतीष मानशिंदे यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. SIT कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? याची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, त्याच्यावर देखील हत्येचं 302 कलम लावा. नाहीतर उद्या हे आरोपी माझा देखील खून करतील. जर त्याच्यावर मोक्का लागला नाही तर उद्यापासून आम्ही टॉवरवर जाऊन आंदोलन करणार आहोत. मी स्वत:लाच संपवून घेतो, म्हणजे माझ्या भावाला तरी समाधान मिळेल की माझा भाऊ स्वता:हूनच संपला, त्याला आपल्या सारखं मारलं नाही, असं धनंजय देशमुख यांनी उद्वेग्न भावना व्यक्त केल्या आहेत.

राख वाहतूक करणाऱ्या भरधाव हायवाच्या धडकेत सरपंचाचा मृत्‍यू

0

परळी — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रात गाजत असतानाच भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परने मोटार सायकल वरून जाणाऱ्या सरपंचाला जोराची धडक दिली यामध्ये गाडीचा चक्काचूर झाला. तर सरपंचाचा जागीच मृत्यू झाला.

              औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण दडलेलं असल्यामुळे अजूनही राख माफिया बिनधास्त राखेची वाहतूक करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सौंदाना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे शनिवारी रात्री आपल्या गावाकडचे शेतीचे काम उरकून परळी कडे जात असताना मिरवट फाट्याजवळ राख वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्पर
क्रमांक एमएच-44 – 2117 ने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये मोटार सायकल क्र एमएच 23 – 7125 चा चक्काचूर झाला तर मोटार सायकल स्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक मात्र टिप्पर घटनास्थळी ठेवून फरार झाला.अपघात झाल्याचे समजताच नागरीक घटनास्थळी दाखल होत नागरीकांनी अपघातग्रस्ताला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सरपंचाला टिप्परने धडक दिल्यामुळे हा अपघात होता की घातपात होता या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

पुण्याच्या कोयता गॅंग चा कुख्यात सातपुते एलसीबीने केला जेरबंद

0

बीड — स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी (दि.११) पहाटे गेवराईतील म्हाडा कॉलनी परिसरात पुण्यातील कोयता गँगमधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपूते (बप्पा) आणि त्याचा साथीदार तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे या दोघांना मोठ्या शिताफीने जेरबंद केले. यावेळी त्यांच्याकडून कोयता, तलवार, चाकू आणि गुन्ह्यात वापरलेला रिक्षा जप्त करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढून कारवाईच्या सुचना आपल्या टीमला दिल्या आहेत. (दि.१०) रोजी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सिध्देश्वर मुरकूटे हे पथकासह गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करत असतांना पो.ना. विकास बाघमारे यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम रिक्षामधुन अवैध शस्त्र घेऊन जात असल्याचे समजताच पोलीसांनी सापळा लावून म्हाडा कॉलनी जवळील रस्त्यावर रिक्षा अडवला. त्यावेळी पथकाला पाहुन आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र पोलीसांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी पोलीसांनी गोरख सातपुते वय 29 वर्ष रा. काळेवाडी फाटा थेरगाव जि. पुणे आणि तात्याराव उर्फ विजय पहाडे वय 28 वर्ष रा. राहटी फाटा अमरदिप कॉलनी पुणे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून एक कोयता, तलवार, चाकू व गुन्ह्यात वापरलेला रिक्षा असा एकूण 1 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात सहाय्यक फौजदार परशुराम जगताप यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरूध्द गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातपूते आणि पहाडे हे दोघेही पुणे येथील कोयता गॅगचे सदस्यअसुन
काळेवाडी (पिंपरी चिंचवड) पोलीस ठाण्यात दाखल हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये ते फरार आरोपी आहेत. दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेवराई पोलीसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकूटे, सहा. फौ. तुळशीराम जगताप, पो. ह. कैलास ठोंबरे, मनोज बाघ, विष्णू सानप, राहुल शिंदे, पो.ना.विकास वाघमारे व चालक सुनिल राठोड यांनी केली आहे.

अनुदानाच्या नावाखाली वाल्मीक कराडने 140 शेतकऱ्यांना घातला अकरा कोटीचा गंडा?

0

सोलापूर — खंडणी प्रकरणांमध्ये तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड याचे नवनवीन पराक्रम समोर येत आहेत. त्यातच आता 140 शेतकऱ्यांना अनुदान देतो म्हणून वाल्मिक कराडने 11 कोटी 20 लाख रुपयाचा गंडा घातल्याचा गौप्यस्फोट पंढरपुरातील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे.या प्रकरणाने खळबळ उडवली आहे.

वाल्मीक कराडने अनुदानाचं अमिष दाखवत सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप पंढरपूर येथील शेतकरी दिलीप नागणे यांनी केला आहे. दिलीप नागणे हे हार्वेस्टिंग मशीनच्याद्वारे ऊस तोडणीचे काम करतात. त्यांनीच आज हा गौप्यस्फोट केला आहे.

तात्कालीन कृषीमंत्री हे माझे जवळचे असून ऊस तोडणी यंत्राला प्रत्येकी 36 लाखाचे अनुदान मिळवून देतो, असं अमिष वाल्मीक कराड ने या मशीन मालकांना दिलं होतं.‌ त्या बदल्यात प्रत्येकी आठ लाख रुपये देण्याचं सांगितलं होतं. यानंतर तब्बल 140 मशीन मालकांनी प्रत्येकी 8 लाख
रुपये जमा केले. सर्व रोख रक्कम एका पोत्यात भरून मुंबई येथील विश्रामगृहात कराड यांना पाठवून दिली.त्यानंतर आपल्याला अनुदान मिळेल या आशेवर मशीन मालक होते. मात्र बराच काळ उलटल्यानंतरही कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळाले नाही. त्यानंतर मालकांनी कराडला फोन करून आम्हाला अनुदान मिळाले नाही आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली. यावेळी कराडने या सगळ्यांना बीडला बोलावून घेतलं. व तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे तुमचे कुठलेही पैसे नाहीत ? असं म्हणत त्यांना मारहाण केली. या सगळ्या प्रकरणा नंतर वाल्मीक कराडच्या भीतीपोटी या मालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाही. मात्र आता समोर येत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

वाल्मीक कराड याचा पाय आणखी खोलात जात असताना दिसत आहे. त्यामुळेच आता त्याच्यावर होत असलेले हे आरोप खरे आहेत का ?, याचा तपास होणार का ? आणि तपासातून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठ आरोपींना मोक्का

0

बीड — मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असताना आता या सर्वच आरोपींना मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा )लावण्यात आला आहे. मात्र यातून वाल्मीक कराड यांना वगळण्यात आले आहे.

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, विष्णू चाटे, प्रतीक घुले व सोनवणे सध्या अटकेत आहेत. तर कृष्ण आंधळे हा अद्यापही फरार आहे.

त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पथक घेत आहेत. तर दुसरीकडे अटकेत असलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याने त्यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या दरम्यान आज विष्णू चाटे याला न्यायालयात हजर करण्यात आले असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभागृहात या हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी आज करण्यात आली. आता या सर्व वर मोक्का लावला असल्याची सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आ.संदीप क्षीरसागरांकडून १६७ गाव आणि वस्त्यांवर हातपंप, बोअरवेलची मागणी

0

पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बीड मतदारसंघातील गाव आणि वस्त्यांचा सामावेश करा

बीड — जानेवारी २०२५ ते जून २०२५ या काळातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघात क्षेत्रातील एकूण १६७ गाव‌ आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे तसेच जुने हातपंप दुरूस्त करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जानेवारी ते जून महिन्याचा कालावधी हा उन्हाळ्याचा असतो. या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होते. पाण्याअभावी नागरिक,‌ शेतकरी आणि पशु-पक्षी यांना वणवण करावी लागते. त्यामुळे पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी वेळेअगोदर नियोजन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील होणार्‍या पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघात क्षेत्रातील गाव आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे, जुन्या हातपंपाची दुरूस्ती करणे, बंद बोअरवेल सुरू करणे आदी बाबी सामाविष्ट करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. आ.क्षीरसागर यांनी बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील १६७ गावे, वाडी आणि वस्त्यांची यादीच जिल्हा प्रशासनाकडे पाठविली असून यादीतील नमूद ठिकांणावर पाण्याचे नियोजन करावे असे सांगितले आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.

“अरेबियन ज्वेलर्स “चा तर हा झोलझाल; सदस्यांना करणार कंगाल?

0

बीड — राजस्थानी मल्टीस्टेट, ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम ,शुभ कल्याण यासारख्या पतसंस्थांनी ग्राहकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करत गंडवण्याचं काम केलं. एवढं होऊन देखील “अरेबियन ज्वेलर्स” च्या नावाखाली पुन्हा नव नाट्य घडवलं जात आहे. लकी ड्रॉ च्या नावाखाली जनतेची लाखो रुपयांची लूट करण्याची तयारी केली जात आहे. या संदर्भात प्रा सचिन उबाळे यांनी जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करूनही पोलीस यंत्रणेने याची दखल घेतली नाही. नवीन आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कांवत तरी या विरोधात कारवाई करतील काय असा प्रश्न विचारला जात आहे.

“अरेबियन ज्वेलर्स” ने बीडमध्ये आकर्षक लकी ड्रॉ ची स्कीम काढत भरघोस बक्षीस देण्यासोबतच गुंतवलेल्या पैशाचं सोनं देण्याचं आमिष दाखवून चांगलाच जम बसवला आहे. पाच हजाराहून अधिक ग्राहक याकडे आकर्षित झाली आहेत. वास्तविक पाहता अरेबियन ज्वेलर्स कडे दर महिन्याला ग्राहकांकडून जमा होणाऱ्या पैशाचा हिशोब लावला तर तेवढ्या किमतीच सोन देखील दुकानात उपलब्ध नाही. हे वास्तव असताना देखील आमिषाला बळी पडून ग्राहक स्वतःच्या हाताने स्वतःचीच फसवणूक करून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र लालचेची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की माणूस आपोआप चक्रव्यूहात अडकला जातो अशीच स्थिती अरेबियन ज्वेलर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची झाली आहे. महिन्याकाठी 2500 रुपये जमा करायचे असले तरी दोन दिवसाला तीन दिवसाला दोनशे ,तीनशे रुपये सदस्यांकडून गोळा केले जातात. महिन्याला 2500 रू.च टारगेट पूर्ण केलं जातं. पण हे पैसे घेऊन जाताना कुठलंच रेकॉर्ड गुंतवणूकदाराकडे राहणार नाही याची काळजी बहुतांश वेळेला घेतली जाते. त्यामुळे विवाद झालाच तर हाक ना बोंब अशी स्थिती गुंतवणूकदारांची होणार आहे. अरेबियन ज्वेलर्स ने महिन्याकाठी आयोजित केलेले लकी ड्रॉ देखील शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातात. चार चाकी, दुचाकी वाहन या लकी ड्रॉ मध्ये काही जणांना लागली. मात्र लकी ड्रॉ हा बीड पुरताच मर्यादित असताना देखील गुजरात मधील महाराज नावाच्या व्यक्तीच नाव ड्रॉमध्ये निघालं. स्विफ्ट डिझायर गाडी या व्यक्तीला मिळाली मग इतर राज्यातील व्यक्तीने बीडमध्ये कशी गुंतवणूक केली हा देखील मोठा प्रश्नच आहे. या ज्वेलर्स कडून महिन्याकाठी या लकी ड्रॉ योजनेसाठी होणाऱ्या खर्चाचा हिशोब जर पाहिला तर सदस्यांना 24 महिने कालावधी झाल्यानंतर ड्रॉ मध्ये ज्यांचं नाव आलं नाही त्यांना 60 हजार रुपये इतक्या झालेल्या गुंतवणुकीचे सोनं द्यायचं आहे. महिन्याकाठी दुचाकी चार चाकी वाहन भाग्यवान विजेत्यांना वाटली जात आहेत. ड्रॉ चा सोहळा देखील भव्य दिव्य असतो माध्यमांना कार्यक्रमाच्या जाहिराती देखील दिल्या जातात. दर दोन-तीन दिवसाला पाच हजाराहून अधिक ग्राहकांकडून 200 /300 रुपयाची रक्कम गोळा करायला लागणारी माणसं याचा विचार केला तर अरेबियन ज्वेलर्स होत असलेला अवाढव्य खर्च कशाच्या जीवावर करत आहे. त्यांना प्रॉफिट काय राहणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांनी तरी किमान जनतेची फसवणूक रोखण्यासाठी अरेबियन ज्वेलर्स चा झोल झाल काय आहे याची तपासणी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुले सुधीर सांगळे, सोनवणे ला 14 दिवसाची सीआयडी कोठडी

0

बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार दोन आरोपींना काल विशेष पथकाने अटक केली. त्यानंतर कल्याण मधून सरपंचाचे अपहरण करण्यासाठी लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील जेरबंद करण्यात आले. तीनही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता 18 जानेवारीपर्यंत 14 दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले व सुधीर सांगळे 25 दिवसापासून अधिक कालावधी पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांनी आरोपींना फरार घोषित केले होते. पुण्याजवळ आरोपी जवळचे पैसे संपल्याने पळून जाण्याच्या तयारीत असताना विशेष पथकाने त्यांना जेरबंद केले. दरम्यान कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. सुधीर सांगळे व सुदर्शन घुले यांना पकडण्यात यश मिळवल्यानंतर मसाजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला देखील पोलिसांनी कल्याण येथून पकडले. सिद्धार्थ सोनवणे याने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना दिले होते. सुधीर सांगळे व सुदर्शन घुले या दोघांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणून सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पकडलेल्या तीनही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.