Home Blog Page 135

जालन्यातून नऊ जण तडीपार, मनोज जरांगे यांच्या मेहुण्याचाही समावेश

0

जालना — विविध गुन्ह्यांचे आरोप असलेल्या अंबड तालुक्यातील सात आणि घनसावंगी तालुक्यातील दोन, अशा नऊ जणांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई केली. यामध्ये मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर यांचाही समावेश आहे.

दरम्यान, सर्व समाजच आपला पाहुणा आहे. परंतु एखाद्या वेळेस आपले तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र असेल, असा आरोप जरांगे याांनी यासंदर्भात केला आहे.अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करून विक्री करणे, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, इत्यादी गुन्हे तडीपार केलेल्यांवर दाखल आहेत. त्याचप्रमाणे यापैकी एकावर ऑनलाईन जुगार खेळविणे, धमक्या देणे आदी गुन्हेही दाखल आहेत. पोलिसांनी अंबड उपविभागीय कार्यालयाकडे तडीपारीचे 20 प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी नऊ प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी तडीपारीची कारवाई केली.

तडीपार करण्यात आलेल्यां पैकी सात जण अंबड तालुक्यातील असून जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेले आंतरवली सराटी गाव याच तालुक्यातील आहे. अंबड, घनसावंगी, गोंदी, पोलीस ठाण्याच्या वतीने तडीपारीच्या कारवाईचे हे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले होते.जालना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलंय. वामन मसुरराव तौर, रामदास मसुरराव तौर (दोन्ही रा. शिवनगाव ता. घनसावंगी), संदीप सुखदेव लोहकरे (रा. अंबड), गोरख बबनराव कुरणकर (रा. कुरण), अमोल केशव पंडित (रा. अंकुशनगर), गजानन गणपत सोळुंके, संयोग मधुकर सोळुंके (रा. गोंदी), विलास हरिभाऊ खेडकर (रा. गंधारी) आणि केशव माधव वायभट (रा. अंकुशनगर, ता. अंबड) अशी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या 9 आरोपींची नावं आहेत.मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास हरिभाऊ खेडकर, सुयोग सोळुंके, गजानन सोळुंके या तिघांचाही या यादीत समावेश असून, हे मनोज जरांगे यांच्यासोबत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. या आरोपींवर अवैध वाळू उत्खनन, जाळपोळ, धमकावणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान, या अनुषंगाने माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, पाहुणे-रावळे आपल्याला समजत नाही. सर्व मराठा समाजच आपला पाहुणा आणि मायबाप आहे. मराठा आंदोलक म्हणून कुणाला नोटिसा देण्यात येत असतील तर ते चुकीचे आहे. मला बदनाम करण्यासाठी किंवा बोलणे बंद करण्यासाठी एखाद्या वेळेस हे षडयंत्र असू शकेल.

राज्यातील सहा कोटी मराठा समाज आपला पाहुणा आहे. समाजासाठी आपण कुटुंबालाही जवळ करती नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माहित आहे. इतर पाहुण्यांनाही जवळ सुद्धा उभे राहू देणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. एकीकडे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यायचे आणि दुसरीकडे आंदोलकांना नोटिसा देण्याचे काम करायचे, असा आरोपही जरांगे यांनी सरकारवर केला.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला आ.संदीप क्षीरसागर आले धावून!

0

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढ द्यावी

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह पणन मंत्र्यांशी आ.संदीप क्षीरसागरांचा पत्रव्यवहार

नाफेडकडे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विचार करण्याची मागणी

बीड — बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऐनवेळी आ.संदीप क्षीरसागर धावून आले आहेत. मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या खरेदीसाठी नाफेडकडे नावनोंदणी केली, मात्र मुदत संपल्यानंतर आता ही खरेदी कधी होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असून शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी तत्काळ मुदतवाढी द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पणण मंत्री जयकुमार रावल व राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे. याबाबत लेखी पत्रही आ.क्षीरसागर यांनी दिले आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अन् त्यांच्या संवादातून लक्षात आलेल्या समस्या लक्षात घेवून आ.संदीप क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या भावना पत्र लिहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यापयंत पोहचवल्या आहेत. हंगाम २०२४-२५ मधील हमीभावाने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्यास सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी होवू शकते याकडे लक्ष वेधत आ.संदीप क्षीरसागर यांनी याबाबतच्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या संदर्भीय धोरणानुसार सुरूवातीला दि.३१ जानेवारी २०२५ पर्यंत त्यानंतर दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सोयाबीन खरेदीच्या बाबतीत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील नोंदणीधारक शेतकरी ४४ हजार ७०० च्या वर आहेत. त्यापैकी दि.६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत किमान २१ हजार शेतकरी बांधवांककडून सोयाबीन खरेदी झालेली आहे.

बीड मतदार संघासह जिल्ह्यातील किमान ४० टक्क्याच्यावर शेतकरी बांधवांची खरेदी अजूनही शिल्लक आहे. त्यामुळेच या सर्व शेतकरी बांधवांच्या सोयाबीनची खरेदी करण्यासाठी मुदतवाढ द्यावी व त्यातून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी महत्वाची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. निवेदनातच्या प्रती राज्याचे मुख्य सचिव व अवर सचिवांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आ.संदीप क्षीरसागर यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न राज्य शासनापर्यंत पोहचवले आहेत. आता शासनाकडून मुदतवाढीचा निर्णय कधी होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

शेतकऱ्यांना रेशन ऐवजी थेट पैसे, नवीन शासन निर्णयास मंजुरी

0

मुंबई — छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशिर्ष मंजूर करण्याबाबत शासन निर्णयास मंजुरी देण्यात आली आहे.

यानुसार संबंधित केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत.
सदर योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी, २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विभागाच्या दि. 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देव असलेल्या रक्कमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील विपत्तीग्रस्त केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. त्यांना त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावर डीबीटीद्वारे थेट पैसे ट्रान्सफर केले जातात. या अनुषंगाने यंदाही या योजनेच्या लेखाशिर्षास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान हे 14 जिल्हे एपीएल (केशरी) शेतकरी (डीबीटी) योजनेसाठी अनिवार्य ऐवजी कार्यक्रमांतर्गत लेखाशिर्ष प्रस्तावित करणेबाबत वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. त्यास अनुसरुन नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार या निर्णयास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी रेशन कार्डधारक लाभार्थीना संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे अर्ज द्यावा लागतो व अर्जाचा नमुनादेखील तेथेच मिळतो. अर्जासोबत बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची व रेशनकार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची प्रत जोडावी लागत असल्याची माहिती आहे.

विष्णू चाटेसह सुदर्शन घुले चा मोबाईल डेटा रिकव्हर; वाल्मीक कराडवर खुनाचाच गुन्हा

0

बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका दाखल झालेला आहे. मात्र त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती.धनंजय देशमुख यांनी यावर माध्यमांशी संवाद साधत सर्वच आरोपींवर खुनाचा गुन्हा आणि मकोका दाखल झाल्याचं सांगितलं.

धनंजय देशमुख यांनी शुक्रवारी 7 फेब्रुवारी रात्री सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन-तीन दिवसाला मी सीआयडी ऑफिसला येत असतो, आपल्याकडे काही माहिती असेल तर ती पुरवली जाते आणि तपासाबद्दल माहिती घेतली जाते. तपासाचा आढावा घेणं आपलं काम आहे. सीआयडीचे अनिल गुजर यांच्यासोबत चर्चा झाली.धनंजय देशमुख यांना विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेच्या मोबाईल डेटा संदर्भात विचारण्यात आलं, त्यावेळी ते म्हणाले, मोबाईलचा सर्व डेटा रिकव्हर झाला आहे, हा डेटा तपास यंत्रणांकडे आहे. विष्णू चाटेच्या मोबाईलचा डेटाही रिकव्हर केला आहे. तसेच सुदर्शन घुलेच्या मोबाईलचा डेटा पोलिसांना मिळाला आहे. काही गोष्टी गोपनीय आहेत, त्याची माहिती तपास यंत्रणा देत नाहीत. जोपर्यंत तपास पूर्ण होणार नाही, तोपर्यंत माहिती मिळणार नाही. तपासाला अडथळा नको म्हणून काही माहिती दिली जात नाही.वाल्मिक कराडवरील खुनाच्या गुन्ह्याबद्दल धनंजय देशमुख यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही रिमांड कॉपी बघितलं तर सगळं स्पष्ट होईल. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला, ही गोष्ट स्पष्ट आहे. 302 चं नवीन कलम 103 लागलं आहे. खुनाच्या गुन्ह्यातच मकोका लागलेला आहे. तसेच 120 ब कटकारस्थान रचल्याचं कलम लागलं आहे आणि मकोका; हे चार गुन्हे सर्व आरोपींवर लागलेले आहेत. यात कुठलाही आरोपी सुटलेला नाही.
दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अद्याप थेटपणे देशमुख कुटुंबियांनी केलेली नाही. त्याबद्दल विचारलं असता, धनंजय देशमुख म्हणाले की, ज्यांनी आरोपींना पोसलंय, ज्यांनी पाठबळ दिलंय, ज्यांचे आरोपीसोबत संबंध आहेत, त्या सगळ्यांवर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांकडेही आम्ही तीच मागणी केलेली आहे. मुख्यमंत्री हेच गृहमंत्री आणि जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांनीच या प्रकरणात आम्हाला न्याय द्यावा आणि ठोस पावलं उचलावीत. मागच्या सात तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांकडे हीच मागणी केली होती. आज महिना लोटला आहे. आमची त्यांना पुन्हा विनंती असून तपासामध्ये येणारा कुठलाही अडसर, याबाबत विचार करा आणि आम्हाला न्याय द्या.

डोळ्यात मिरची पूड टाकून कात्रीने छातीवर केले सपासप वार

0

बीड — तुझ्या भावाने माझ्यावर केस का केली?” असा जाब विचारत डोळ्यात मिरची पूड टाकून, केस कापण्याच्या कात्रीने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील लोणगाव येथे घडली.

या घटनेत अनिल आत्माराम गायके हा तरूण जखमी झाला त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहे.

अनिल आत्माराम गायके हा तरुण गावातील चौकातून घरी चालत जात असताना सोनकांबळे यांच्या किराणा दुकानासमोर असताना गावातीलच गोपाळ पांडुरंग राऊत याने पाठीमागून येऊन अडवले. “तुझा भाऊ ज्ञानेश्वर याने माझ्यावर केस का केली?”असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच हातातील फोन हिसकावून घेत मोबाइल जमिनीवरच फोडला. तसेच खिशातील मिरचीची पूड डोळ्यात टाकून कात्रीने त्याच्या छातीवर जोराने वार केले.
अनिल याने आरडाओरडा करताच त्याचा भाऊ ज्ञानेश्वर गायके पळत आला. मात्र त्याच्याही मानेवर राऊत याने कात्रीने वार केले. गावातील दोन तरुण रस्त्याने जात असताना ते भांडणाकडे धावल्याने गोपाळ राऊत तेथून पळून गेला. अनिल गायके याच्या तक्रारीवरून गोपाळ राऊत याच्या विरोधात दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंगणवाडीतील खिचडीतून अकरा मुलांना विषबाधा

0

माजलगाव — तालुक्यातील टाकरवन जवळील फुलसिंग नगर तांडा येथे अंगणवाडीत शनिवारी सकाळच्या सुमारास खिचडी खाल्ल्याने 11 बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

टाकरवन जवळ असलेल्या फुलसिंग नगर तांडा या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीत 29 बालक असून त्यापैकी 7 बालके शनिवारी उपस्थित होते. या अंगणवाडीतील मुलांबरोबर शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी आले होते. खिचडी खाऊन ही मुलं आपापल्या घरी गेली. त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास अंगणवाडीतील 7 तसेच जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 4 मूलांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला.अंगणवाडी सेविका कविता राठोड यांनी सरपंच सुनील तर व उपसरपंच दयानंद बोबडे यांना याची माहिती दिली.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका पाठवून बालकांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सर्वांवर उपचार करण्यात आले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. घुबडे यांनी सांगितले.अंगणवाडीत शिकणारी श्रावणी नवनाथ राठोड वय 3 वर्ष, संध्या लखन राठोड वय 5 वर्ष पल्लवी अतुल राठोड वय 5 वर्ष, प्रीतम रवींद्र राठोड, देवांश अजय राठोड (वय 18 महिने रा. फुलसिंग तांडा त्याचबरोबर आर्यन परमेश्वर राठोड वय 4 वर्ष, आरव परमेश्वर राठोड वय 3 वर्ष रा. टाकरवन येथील बालके आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे अक्षर लहू चव्हाण, देवांश अजय राठोड वय 7 वर्ष रा. वारोळा, इशिता देविदास धनगाव वय 7 वर्ष, प्रथमेश दिलीप पवार वय 7 वर्ष व प्रांजल दिलीप पवार वय 8 वर्ष हे सर्व रा. फुलसिंग तांडा येथील रहिवासी आहेत.

मुळूकवाडी जवळ कारचा अपघात ; मानवतच्या डॉक्टर बहीण भावाचा मृत्यू तर 3 जखमी

0

बीड — नवदांपत्यासह देवदर्शन करून परतणाऱ्या कुटुंबीयांची गाडी मांजरसुंबा जवळील मुळूकवाडी शिवारात पुलाला धडकली. गाडी धडकताच गाडीचे टायर निखळून पडले या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतात मानवत तालुक्यातील वझूर बु. येथील डॉक्टर बहिण भावाचा समावेश आहे.

डॉ. ओम ज्ञानोबा चव्हाण व त्यांची चुलत बहिण डॉ. मृणाली शिंदे अशी मृतांची नावे आहेत. मानवत तालुक्यातील वझुर गावातील निवृत्त प्रा.माणिक चव्हाण हे सध्या पालम येथे राहतात. त्यांचा मुलगा डॉ. मंथन चव्हाण हे सोनपेठ येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. दि. 2 जानेवारीला डॉ. मंथन याचे सातोना येथील मुलीशी विवाह पार पडला. हे नवदांम्पत्य यात्रा म्हणून देवदर्शनासाठी कानसूर येथील त्यांची बहीण डॉ.मृणाली शिंदे व वझुर येथील त्यांचा चुलत भाऊ डॉ.ओम चव्हाण असे चारजण कारने (एम.एच.22, ए.एम.4571) जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी गेलेले होते.

तेथून ते परतीच्या प्रवासात सोनपेठकडे येण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अहमदपूर ते अहमदनगर महामार्गावरील महामार्गावरील मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यानच्या मुळकवाडी येथील पुलाला कार धडकल्याने झाला. या अपघातात डॉ.ओम चव्हाण व डॉ.मृणाली शिंदे हे दोघे डॉक्टर बहीण – भाऊ जागीच ठार झाले. तर कारमधील नवदांम्पत्यातील डॉ.मंथन चव्हाण व त्यांची पत्नी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे मानवत तालुक्यातील वझुर व पाथरी तालुक्यातील कानसुर या दोन गावावर शोककळा पसरली. डॉ.ओम चव्हाण यांच्या पार्थिवावर वझुर येथे तर डॉ.मृणाली शिंदे यांच्यावर कानसूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आ.नमिता मुंदडांच्या निवडीला आव्हान; मुंदडासह निवडणूक आयोगाला खंडपीठाची नोटीस

0

छत्रपती संभाजीनगर — केज येथील आमदार नमिता मुंदडा यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या निवडणूक याचिकेत मुंदडा यांच्यासह सर्व उमेदवार व निवडणूक आयोगास नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आ. नमिता मुंदडा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नमिता मुंदडा या केज विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. या विरोधात उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांनी खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी करून देखील फॉर्म 17 सी ची प्रत त्यांनी दिली नाही. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओ शुटींग, सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून दिले नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी उमेदवाराला झुकते माप दिले आहे.

केज विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने कुठलेही नोटिफिकेशन काढले नाही. ईव्हीएम (मतदान यंत्र) द्वारे निवडणूक घेतली, म्हणून लोकप्रतिनिधित्व कायद्याचे कलम 59 आणि 61 यांचे उल्लंघन झाले आहे. कलम 59 मध्ये निवडणुकीत मतदान करण्याची पद्धती ही मतपत्रिकेद्वारे मतदान केले जाईल याबाबतीत आहे.
सदरील निवडणुक याचिकेत पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम तसेच व्हिव्हिपॅट मशीन यांना अनुक्रमांक देताना कायदेशीर तरतुदींचे पालन केलेले नाही. ईव्हीएम मशीन तसेच बॅलेट युनिट्स आणि व्हिव्हिपॅटचे प्रिंटर्स यांना कायमस्वरूपी अनुक्रमांक न देत त्यावर स्टिकर लावण्यात आले होते.त्यामुळे ईव्हीएम मशीन यांची सुरक्षितता संशयास्पद असल्याने निवडणुकीचा निकाल हा प्रभावित झालेला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरील सील यावर स्वतः स्वाक्षरी केलेली नाही. म्हणून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 100 मधील ड (4) नुसार राज्यघटनेचे तसेच त्यामधील तरतुदी आणि नियमांचे व आदेशांचे अनुपालन न केल्यामुळे निवडणुकीवर विपरिणाम झाला आहे.

त्यामुळे नमिता मुंदडा यांची निवडणूक रद्दबातल घोषित करण्याची विनंती केली आहे. सुनावणीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्यासह 23 उमेदवार, निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. पुढील सुनावणी 24 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. अर्जदारांतर्फे ॲड. रविंद्र गोरे, ॲड. सुस्मिता दौंड काम पहात आहेत

वाशी:ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची दीड महिन्यानंतर सुटका

0

वाशी(धाराशिव) — तालुक्यातील कोठावळे पिंपळगाव मध्ये उत्तर प्रदेश मधील 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांना पोलीस ठेवले गेले होते.तब्बल 45 दिवसापासून गायब असलेल्या या मजुरांच्या टोळीची तीन दिवसाच्या शोध मोहिमेनंतर सुखरूप सुटका करण्यात आली.

उत्तर प्रदेश मधील ऊस तोडी साठी आलेले 19 मजूर 15 मुलांसह अचानक एका एकी गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. तर 3 दिवसाच्या शोधानंतर मजूरांची माहिती मिळाली आणि आता त्यांची सुटका करण्यात आली आहे.या प्रकरणी मजुरांना घेऊन येणाऱ्या दोन ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्यातील हे मजूर असून या मजुरामध्ये 11 पुरुष, 8 महिलांचा समावेश आहे. तसेच त्यांच्यासह 15 मुलांची यातून आता सुटका करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, थेट उत्तर प्रदेशमधील ललितपुर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून या बाबत तक्रार दिली असता ही सुटका करण्यात आली आहे.ललितपूर जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र येताच धाराशिवच्या जिल्हाधिकारी यांनी कामगार विभागाला या मजूरांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या प्रकरणाच्या हालचालींना वेग आला आणि अखेर त्यांची सुटका करण्यात आली आहे.

आ. संदीप क्षीरसागरांमुळे बीडच्या औद्योगिक विकासाला येणार गती: जमिन पाहणी;मुख्यमंत्र्यांशी केला पत्रव्यवहार

0

आ.संदीप क्षीरसागर यांची एमआयडीसी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत व्यापक बैठक

बीड — जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बीड येथील औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीच्या विकासाला गती मिळावी त्यातून तरुणांच्या हाताला रोजगार मिळावा व औद्योगिक विकासात बीड जिल्हा पुढे यावा यासाठी बीड विधानसभेचे आमदार संदीपभैय्या क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत शुक्रवारी (दि.७) त्यांनी एमआयडीसी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बीड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेत चर्चा केली. जमिन पाहणी करण्यात आली असल्याचे सांगत याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, यांच्याकडे रीतसर पत्रव्यवहार केला आहे
बीड येथील एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागर यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या या बैठकीला एमआयडीसी विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, प्रादेशिक अधिकारी अधिकारी अमित भामरे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित होते. बैठकीत बीड शहरातील एमआयडीसीचा विकास याबाबत व्यापक चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक ठरली. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांनी या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. बीड एमआयडीसीचा विकास व्हावा या ठिकाणी मोठे उद्योग यावेत, यातून रोजगार निर्मिती व्हावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. एमआयडीसीसाठी जमिनीची पाहणी देखील झाली असून यापुढील काळात बीड जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल अशी भावना व्यक्त करण्यात आली.