Home Blog Page 134

Santosh Deshmukh murder case:आरोपींना पळून जाण्यासाठी टीप देणारा “तो”पोलीस कोण?- धनंजय देशमुख

0

बीड —  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलचं गाजलेलं पाहायला मिळत आहे. आज दोन महिने झाले असून देखील या घटनेचा योग्य तो तोडगा काढलेला नाही. शिवाय या प्रकरणात मंत्री धनंजय देशमुख यांच्या राजीनाम्यावर अजून देखील जोर धरला गेला आहे.यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं पाहायला मिळत आहे. या प्रकरणासंबंधी वाल्मिक कराडला अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपीचा पळून जातानाचा व्हिडीओ समोर आला आणि मोठी खळबळ उडाली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या व्हिडीओनंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. यादरम्यान धनंजय देशमुखांनी देखील गंभीर आरोप केला आहे. आरोपीला पळून जाण्यासाठी टीप पोलिसांनीच दिल्याचा खळबळजनक दावा संतोष देखमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केला आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी भर रस्त्यात गाडी लावून गाडीतून उतरून पळून गेले. यावेळी हाकेच्या अंतरावर पोलीस होते. गाडीचा पाठलाग करुन देखील हे आरोपी का सापडले नाहीत? पोलिसांच्या अभयामुळेच आरोपी मोकाट आहेत . आरोपींना पुढे पोलीस असल्याची टीप कोणी दिली?तो पोलीस कर्मचारी होता का? असा प्रश्न धनंजय देशमुखांनी उपस्थित केला आहे.

सुरुवातीचे काही दिवस तपास कुठल्या पद्धतीने केलेला आहे याच्यावर खूप मोठी शंका आहे. सीआयडी आणि एसआयटीकडे जो तपास दिलेला आहे तोच पुढे व्यवस्थित सुरु आहे. समोरून आरोपी पळताना दिसत आहेत मग या आरोपीचा शोध का लागत नाही? पळून जाणाऱ्या आरोपीमध्ये कृष्ण आंधळे पण आहे. हत्येच्या सुरुवातीच्या वेळी तपास गांभीर्याने घेतला नाही. पुढे पोलीस आहेत याची टीप कोणी दिली. याची माहिती कॉल डिटेल्समधून निघेल. कुठल्या पोलीसाने फोन करून सांगितलं होते का? याचा देखील तपास केला पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.

ईव्हीएम’ डेटा नष्‍ट करू नका;सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश

0

नवी दिल्ली — सध्‍या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) मधून कोणताही डेटा नष्‍ट करू नये, असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. तसेच निवडणुकीनंतर ईव्हीएमची पडताळणी करण्याच्या याचिकेवर निवडणूक आयोगाने (ECI) 15 दिवसांच्या आत उत्तर दाखल करावे, असेही निर्देश दिले आहेत.

निवडणूक निकालांवर शंका असल्यास ईव्हीएमची पडताळणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर), हरियाणा काँग्रेस नेते सर्व मित्तल, करण सिंग दलाल यांनी याचिका दाखल केली होती. जनहित याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान वकील प्रशांत भूषण यांनी युक्‍तीवाद केला की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निवडणूक आयोगाने स्वीकारलेली प्रक्रिया त्यांच्या मानक कार्यपद्धतीशी सुसंगत असावी अशी आमची मागणी आहे. कोणीतरी ईव्हीएमच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची तपासणी करावी. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरमध्ये काही फेरफार आहे की नाही हे पाहावे. यावेळी सरन्‍यायाधीश खन्ना यांनी विचारले, “एकदा मतमोजणी झाली की, पेपर ट्रेल तिथे असेल की बाहेर काढला जाईल?” “त्यांनी ईव्हीएम देखील जतन करायचे आहेत, पेपर ट्रेल तिथे असायला हवा,” भूषण म्‍हणाले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने आपल्या मागील आदेशाचे स्पष्टीकरण दिले आणि म्हटले, “आम्हाला असे नको होते की मोजणी होईपर्यंत कोणताही गोंधळ झाला आहे (मागील आदेशाद्वारे).आम्हाला पाहायचे होते की कोणाला काही शंका आहे का. आम्हाला असे हवे होते की कदाचित अभियांत्रिकी सांगू शकेल की काही छेडछाड झाली आहे का…” असे स्‍पष्‍ट करत खंडपीठाने निवडणूक आयोगाला पुढील 15 दिवसांत याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

एसपींना कंपन्यांचाच पुळका; शेतकऱ्यांच्या बाबतीत होऊ लागलाय सगळा कारभारच गळका?

0

महादेव तांडा येथील सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक!

गेवराई — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बीडचा कारभार हातात घेताच जिल्ह्यात सोलार व पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना अश्वस्त करून अभय दान दिलं. याबद्दल कौतुकच आहे. पण सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी कंपन्यांकडून पीडित असलेल्या शेतकऱ्यांची कैफीयत ऐकून घेऊन शेतकऱ्यांनाही
संरक्षणाची हमी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे लक्ष द्यायला व पारदर्शक कारभार करायला अजून तरी एस पी ने धैर्य दाखवलं नाही. त्यामुळे एसपींना पवन ऊर्जा कंपन्यांचाच पुळका शेतकऱ्यांच्या बाबतीत कारभारच गळका ! अशी नवी म्हण म्हटली जाऊ लागली आहे. सध्या शेतकरी हवालदिल तर आहेच शिवाय कंपन्यांची दांडगाही एसपींचा वरद हस्त यामुळे दहशतीच्या कोंडीत सापडला आहे. शेतकरी कसा नागवला जात आहे याचं उदाहरण बालाघाटावरचा शेतकरी तर देईलच शिवाय देव पिंपरी व कोमलवाडीतील शेतकरी ही देतील त्यांची कैफियत ऐकून न्याय देण्याची भूमिका पोलीस अधीक्षक घेणार का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेवराई तालुक्यातील देवपिंपरी व कोमलवाडी शिवारातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीने बस्तान बसवले, त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यासाठी वर्षाला 80 हजार रु प्रति एकर एकर प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्याचेही कबूल केले. तीस वर्षाचा हा करार असल्यामुळे दोन वर्षाची रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली.बाकीचे बॉन्ड करून देऊ असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. परंतु आता भाडेपत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा कंपनीने मोबदला देणे बंद केले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केली असता कंपनीकडून दांडगाई केली जात आहे. शेवटी कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी सेल रिपाॅवर प्रा. लिमीटेड विरोधात अमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनी स्थापन होत आहे. यासाठी या कंपनीचे अधिकारी शेख अफसर जब्रदिन यांनी त्याठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करून या कंपनीसाठी रविंद्र शिवाजी पवार, ज्ञानेश्वर सुखदेव जाधव, अविनाश अंबादास जाधव, रामनाथ गणपत जाधव, गणेश प्रल्हाद जाधव, अशोक अंबादास जाधव, अनिता रामनाथ जाधव, अभिजित रामनाथ जाधव, अंबादास शेकु पवार या शेतकऱ्यांची जमीन भाडेपत्रावर घेतली.परंतु भाडे पत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा वार्षिक मोबदला कंपनीने बंद करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला असता, तुम्हाला काय करायचे ते करा माझ्या हातामध्ये काही नाही तुम्ही कायद्याने काय करायचे ते करा असे सांगत धमकावले जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तसेच या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला वारंवार विनंती करूनही कंपनी मोबदला द्यायला टाळाटाळ करत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच संबंधित कंपनीचे त्या ठिकाणी ऑफिस असून शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यास आमच्याकडे काही नाही तुम्ही कंपनीकडे तक्रार करा असे म्हणत तुम्ही उपोषणाला बसलात तर आमच्या कंपनीचे कर्मचारी व कंपनीचे काही गुंड लोक तुमचे हात पाय तोडतील अशी धमकी कंपनी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली आहे. यामुळे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी कंपनीच्या बाहेरच बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आजचा पहिला दिवस असून याकडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी
शेतकऱ्यांनी केली आहे.

एस पी नी न्याय भूमिका घ्यावी !
पवन ऊर्जा कंपनीचे अधिकारी कर्मचारी गुंडांचा वापर करून दहशतीच साम्राज्य निर्माण करत आहेत. एसपींनी रुजू झाल्यानंतर पवन ऊर्जा कंपन्यांची काम कोणी आडवत असेल तर पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे. असं सांगण्यासाठी कंपनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्याचवेळी आम्ही देखील पवन ऊर्जा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यांना नागवण्याचं काम करत आहेत. वेळप्रसंगी गुंडांचा वापर करून दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन शेतकऱ्यांना देखील न्याय भूमिका देत हे राज्य कायद्याचं आहे. इथे कंपन्यांची दांडगाई चालणार नाही यासाठी शेतकरी पवन ऊर्जा कंपनी यांची संयुक्त बैठक घ्यावी व कायद्याने सामोपचाराने विकासाचा मुद्दा मार्गी लागावा अशी भावना व्यक्त करून निवेदन दिले होते मात्र एसपींनी अजून कुठलीच कारवाई केली नाही. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. ती त्यांनी ऐकून घ्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल
सामाजिक कार्यकर्त

   डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर

वडवणीत टोबॅकोचे दूकान फोडले: लाखोंचा माल लंपास

0

बीड — जिल्ह्यात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून लिंबागणेश येथील मेडिकल स्टोअर्स फोडल्याची घटना ताजी असतानाच वडवणी पोलीस ठाण्या पासून जवळ असलेल्या शहरातील मध्यवर्ती भागात निवृत्ती सर्जेराव जाधव यांचे न्यु हनुमान टोबॅको सेंटर दुकान मध्यरात्री चोरट्यांनी फोडले आहे. यामध्ये लाखोचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.
संध्याकाळी सहा वाजता दुकान बंद करून जाधव हे बाहेगव्हाण येथे घरी गेले असता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता भाऊ ज्ञानेश्वर सर्जेराव जाधव हा दुकान उघडण्यासाठी वडवणी येथे दुकानावर आल. तेव्हा त्याला दुकान उघडलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता पाठीमागील पत्र्याचे शटर तुटलेले तसेच उचकटलेले दिसले. आतून नटबोल्ट लावलेला कोंडा तुटलेला दिसला. दुकानात ठेवलेले तंबाखूचे पुडे, रोख रक्कम, सिगारेटचे पुडे, इनव्हर्टरची बॅटरी दिसली नाही. दुकानातील सामाण अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
ज्ञानेश्वर जाधव यांनी वडवणी पोलिसांना फोन करून कळवले की, दुकानाची चोरी झाली आहे. त्यानंतर दुकानातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता चोरट्यांनी वाहनात येऊन चोरी केल्याची दिसले. तीन चोरटे असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. दुकानात पाहणी केली असता दुकानातील रोख रक्कम, सिगारेट, तंबाखू, गायछाप, इनव्हर्टरची बॅटरी असं सर्व मिळून २ लाख ८२८ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलं.

या चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वडवली पोलीस ठाण्याच्या काही अंतरावरच दुकानात चोरी झाल्याने पोलिसांचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न पडला आता नागरिकांना पडला आहे. वडवणी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून, रात्रीची ग्रस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे.

इयत्ता 12वीची परीक्षा सूरु; निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

0

मुंबई — बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

नेमकं काय म्हणाले गोसावी?

बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा दहा दिवस आधी घेतली जाणार आहे. त्यासंदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या. 10 दिवस आधी परीक्षा घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निकालही लवकर जाहीर करणार आहोत, 15 मेपर्यंत निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असेल असं शरद गोसावी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 8 लाख 10 हजार 348 मुले आणि 6 लाख 94 हजार 352 मुली आहेत. तर 37 ट्रान्सजेंडर उमेदवार आहेत. या पैकी 7 लाख 68 हजार 967 विद्यार्थी विज्ञान शाखेची परीक्षा देणार आहेत. 3 लाख 80 हजार 410 विद्यार्थी कला शाखेची तर 3 लाख 19 हजार 439 विद्यार्थी वाणिज्य शाखेची परीक्षा देणार आहेत.

सर्व परीक्षार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना 10 मिनिटं वाढवून दिले जाणार आहेत, या आधी पेपरच्या आधी 10 मिनिटं वाढवून दिले जात होते, परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे यांच्यावर देखील पात्र आणि अजामीन पात्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी ठेवली जाणार आहे.परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाणार आहे. तसेच प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून जीपीएससह लाइव्ह ट्रॅकिंग, व्हिडीओ चित्रीकरणंही केलं जाणार असल्याची माहिती गोसावी यांनी दिली आहे.
कॉपीमुक्त परीक्षा आणि कडक कारवाईचा इशारा

गेल्या परीक्षांमध्ये काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने यंदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गैरमार्गाचा वापर होणाऱ्या केंद्रांवर परीक्षा केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.

गैरप्रकार रोखण्यासाठी 271 भरारी पथके आणि विशेष समित्या

संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभर 271 भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक विभागीय मंडळात विशेष भरारी पथके आणि दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत.

विशेष सुविधा – आजारी किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा

जे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी 12, 15 आणि 17 मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.

संतोष देशमुख हत्या प्रकरण: आणखी एक व्हिडीओ समोर, आरोपी पोलिसांसमोरून गेले पळून

0

बीड — सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाशी ( धाराशिव) येथून आरोपी पळून जात असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी यातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. हत्त्ये प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी देशमुखांची हत्या केल्यानंतर सहा आरोपी स्कॉर्पिओ गाडीत बसून धाराशिव जिल्ह्यातील वाशी शहरात गेले. तत्पूर्वी पोलिसांना आरोपी पळून जात असल्याची माहिती मिळालेली असल्यामुळे बंदोबस्त वाशी शहरात लावण्यात आला होता. पारा चौकात पोलीस उभे असलेले लक्षात येताच मारेकऱ्यांनी स्कॉर्पिओ तुन बाहेर पडत फरार झाले. स्कॉर्पिओ गाडीतून उतरून फरार होत असतानाचा 18 सेकंदाच्या सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे.या व्हिडीओमध्ये पाठीमागे पोलीस असताना देखील पोलिसांच्या समोर हे मारेकरी पळून कसे गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. स्कार्पिओ रस्त्यावर सोडूनच हे सर्व आरोपी पळताना या व्हिडिओ दिसत आहेत. संतोष देशमुखांच्या अपहरणासाठी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली होती. याच काळ्या रंगाच्या गाडीतून संतोष देशमुख यांचा अपहरण करण्यात आलं होतं. दरम्यान
संतोष देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ पोलीसांनी हस्तगत केलेली आहे. ज्या स्कॉर्पिओ मधून या अपहरणानंतर संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली.त्यानंतर सर्व आरोपी हे फरार झाले होते. आरोपी असलेल्या प्रतीक घुले याला देखील बीड पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे.

बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सत्येंद्र पाटील,उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार

0

बीड  — बीड शहर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची तर उपाध्यक्षपदी हाजी इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वागत सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी राजेंद्र मस्के, प्रा.विजय पवार, मिरगणे सर, माजी प्राचार्य अनंत नखाते सर, ज्येष्ठ शिक्षक नेते कल्याण वाघमारे सर, रामनाथ डाके सर, अप्पासाहेब रसाळ सर बाळासाहेब गोरे, अशोक रोमण, बंडु कदम, झुंजार धांडे, राजेंद्र साळुंके, जयमल्हार बागल, विशाल तांदळे, दिपक हजारे, मिठ्ठन कोटुळे, दत्ता साळुंके, अभय बीडकर, सचिन हरनमारे, वल्लभ चिरके, गणेश लोंढे, अभिजीत मसकर, पप्पू लांडे, दत्ता कशिद, सुरेश खुर्णे, वामन घोडके, महेंद्र शिराळे यांच्यासह अनेक शिवप्रेमींची उपस्थिती होती.
बीड शहरात गेल्या काही वर्षापासून अत्यंत उत्साहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. सबंध बीडकर नागरिक या शिवजयंती सोहळ्यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी होत असतात. यंदाही बीडचा हा सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकारी, पदाधिकारी, मित्र परिवाराच्या वतीने अत्यंत आनंददायी वातावरणात उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड तसेच शिवजयंतीच्या अनुषंगाने चर्चा व विनिमय करण्यासाठी आणि शिवजयंती उत्सवामध्ये यावर्षीच्या आयोजित कार्यक्रमासंबंधी निर्णय घेण्यासंदर्भात दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती कार्यकारिणीच्या व्यापक बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. आ. संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते सत्येंद्र पाटील यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी हाजी नसीम इनामदार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला शिवप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते.

माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतच्या मुलाचे अपहरण

0

पुणे — शिवसेना नेते माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मूलगा ऋषिकेश सावंत यांचे पुणे विमानतळावरून आज (दि. १०) अपहरण झाल्याची माहिती समोर येत आहे. तो नऱ्हे येथील सावंत यांच्या कॉलेजचे काम सांभाळतो.

आज अचानक दुपारी तीन नंतर ऋषिकेश चा फोन बंद आला. बराच वेळ संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी आणि अपहरणाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचे समोर येत आहे. ऋषिकेश प्रायव्हेट चार्ट विमानाने बँकॉक कडे जात असल्याचे यंत्रणांना समजले. संबंधित पायलटशी बोलून अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेल्या ऋषिकेश ला परत बोलावले आहे. त्यामुळे ही घटना अपहरण की ऋषिकेश स्वतःहून गेला. याबद्दल अजूनही संभ्रम वाढला आहे.

ग्रामसेवकांवर लाडकी बहीण योजनेची नवी जबाबदारी?

0

मुंबई — मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्यास त्या महिलेचा लाभ कसा बंद करायचा, हे आता राज्य सरकार पुढचे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकावर याची माहिती देण्याची जबाबदारी देण्याचा शासन विचार करीत आहे.

त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग, प्राप्तिकर विभाग, महसूल विभाग यांच्या बरोबरच ग्रामविकास विभागाचाही सहभाग या योजनेत घेण्याचा शासनाचा विचार आहे. सरकारी नोकरीचे निवृत्तिवेतन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखल सादर करावा लागतो. त्याआधारे संबंधित निवृत्तिवेतन धारकाचे निवृत्तिवेतन सुरु ठेवायचे किंवा बंद करायचे याचा निर्णय घेतला जातो. मात्र तशी तरतूद या योजनेसाठी केल्यास या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अनावश्यक रीत्या महिलांना धावपळ करावी लागेल. त्यापेक्षा ग्रामसेवकांना ही जबाबदारी देण्याचा विचार शासन स्तरावर सुरु असल्याचे समजते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरून अभिनेते राहुल सोलापूरकर चे वादग्रस्त वक्तव्य

0

पुणे — छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं वादग्रस्त विधान अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केलं होतं. सोलापूरकर याच्या या विधानावरून राज्यभरात पडसाद उमटले होते.

दरम्यान, राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाखतीत राहुल सोलापूर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी राहुल सोलापूरकर यांच्या माफीची मागणी केली आहे. माफी न मागितल्यास तोंडाला काळे फासण्याचा इशाराही खरात यांनी दिला आहे.

रामजी सकपाळ नावाच्या या एका बहुजना घरात जन्माला आलेले भीमराव जो आंबावडेकर नावाच्या गुरुजीकडून दत्तक घेतला जातो. त्याच नावावरून पुढे भिमराव आंबेडकर म्हणून मोठे होतात. त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हटलं आहे, तसं ते अभ्यास करून मोठे झाले आहेत त्या आर्थाने वेदांमध्ये भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर याने केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू, असा इशारा रिपाइं खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात हे विधान अत्यंत निषेधार्थ वक्तव्य केलं असल्याचे खरात यांनी म्हटले. राज्य सरकारने तात्काळ सोलापूरकर यांच्यावर कारवाई सरकारने करावी, आणि राहुल सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुटावर नाक घासून माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत मी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते. वेदांमधल्या चातुवर्णाचे वितरण सांगितल्याप्रमाणे मी ते मत मांडले होते. मात्र त्यातलीच दोन वाक्ये काढून काही लोकांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न आज पुन्हा केला जातोय, असे सांगत कुणाची मने दुखावली असतील तर माफी मागतो, असे वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर म्हणाला. त्याआधी राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले.