Home Blog Page 127

देश धर्मनिरपेक्ष! मंदिर असो की दर्गा कोणीही अडथळे निर्माण करू शकत नाही! — सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली –उत्तर प्रदेशसह सर्व राज्यांमध्ये बुलडोझरच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आज आणखी एक सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, ‘सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरि आहे आणि रस्ते, जलकुंभ किंवा रेल्वे ट्रॅकवर अतिक्रमण करणारी कोणतीही धार्मिक संरचना हटविली पाहिजे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि बुलडोझर कारवाई आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेचे निर्देश सर्व नागरिकांसाठी असतील, मग त्यांचा धर्म कोणताही असो.’ न्यायमूर्ती बीआर गवई आणि केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर गुन्ह्याचा आरोप असलेल्या लोकांवर बुलडोझर चालवण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी सुरू होती.

अनेक राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या या प्रवृत्तीला अनेकदा ‘बुलडोझर न्याय’ म्हटले जाते. अशा प्रकरणांमध्ये केवळ बेकायदेशीर बांधकामे पाडली जातात. आज देशभरात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली गेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझरच्या कारवाईवर बंदी घातली होती आणि केवळ सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण काढण्यासाठी सूट दिली जाईल, असे सांगितले होते.

सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता या प्रकरणात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या वतीने हजर झाले. नेमकं काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय? आम्ही धर्मनिरपेक्ष देश आहोत, आम्ही सर्व नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. बेकायदा बांधकाम हिंदू किंवा मुस्लिम कोणीही करू शकतो. धर्म किंवा समुदायाचा विचार न करता आमच्या सूचना प्रत्येकासाठी असतील.अर्थात अतिक्रमणसार्वजनिक रस्त्यावर किंवा फूटपाथ किंवा जलकुंभ किंवा रेल्वे लाईनच्या परिसरात असेल तर ते आम्ही स्पष्ट केले आहे. रस्त्याच्या मधोमध कोणतीही धार्मिक वास्तू असेल, मग ती गुरुद्वारा असो, दर्गा किंवा मंदिर असो, ती सार्वजनिक उपद्रव होऊ शकत नाही. कायदा कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नाही – न्यायमूर्ती गवई म्हणाले की, कायदा कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नाही. तो प्रत्येकासाठी सारखाचं आहे.तो कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नाही. बेकायदा बांधकामांना सर्व धर्मांपासून वेगळे केले पाहिजे. नोटीस योग्यरित्या दिली जाणे आवश्यक आहे. न्यायमूर्ती विश्वनाथन म्हणाले की, जोपर्यंत महापालिका अधिकारी यावर निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत यावर अर्ध-न्यायिक देखरेख नाही.

कोरोनातील लॉकडाऊन मुळे चंद्र ही गारठला !

0

नवी दिल्ली –कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आले होते.या लॉकडाऊनचा परिणाम जगभरातच नाही तर चंद्रावरही पडल्याची नवी माहिती समोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल चंद्राचा काय संबंध तर भारतीय वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात याचं उत्तर मिळालं आहे.

कोरोना संकटाच्या काळात चार वर्षांपूर्वी अख्खं जगच लॉकडाऊन झालं होतं. या काळात लोकांना घराबाहेरही पडता येत नव्हतं. याच काळात प्रकृती मात्र स्वतः ला रिसेट करत होती. प्रदूषण कमी झालं. हवा स्वच्छ झाली. ज्यावेळी अख्खी पृथ्वीच कोरोनाच्या विळख्यात अडकली त्याच वेळी पृथ्वीचा उपग्रह चंद्र सुद्धा थंड पडला होता. भारतीय वैज्ञानिकांच्या संशोधनात असे दिसून आले आहे की एप्रिल-मे 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात चंद्रावरील तापमानात मोठी घट झाली होती. रॉयल एस्ट्रोनोमिकल सोसायटी: लेटर्स च्या मासिक अभ्यासात प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यात अतिशय घनिष्ट संबंध आहे. फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या रिसर्चर्सने नासाच्या Lunar Reconnaissance Orbiter (LRO) डेटाची मदत घेतली. त्यांनी 2017 ते 2023 दरम्यान चंद्रावरील सहा वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळेत नेमके काय बदल होतात याचा अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की लॉकडाऊनच्या दरम्यानच्या तापमानात बाकी वर्षांतील त्याच काळातील (एप्रिल – मे) तापमानाच्या तुलनेत 8 ते 10 केल्विन इतकी घट झाली होती.
पृथ्वीवर लॉकडाऊन पण चंद्र का गारठला?

कोरोना लॉकडाऊनच्या काळात पृथ्वीवर सगळं काही ठप्प झालं होतं. कंपन्या, कारखाने पूर्ण बंद होते. रस्त्यावर वाहतूकही दिसत नव्हती. त्यामुळे या काळात वायु प्रदूषण अतिशय कमी झालं होतं. अब्जावधी माणसे घरात कैद झाली होती. त्यामुळे ग्रीन हाऊस वायूंच्या उत्सर्जनात कमालीची घट नोंदवण्यात आली. याचा परिणाम म्हणून पृथ्वीच्या वायुमंडळात कमी उष्मा राहिला आणि नंतर उत्सर्जित झाला. PRL चे अभ्यासक मानतात की लॉकडाऊनमुळे पृथ्वीच्या रेडिएशनमध्ये घट झाली. यामुळे चंद्रावरील तापमानात घट होऊ लागली. चंद्र एक प्रकारे पृथ्वीच्या रेडिएशन सिग्नेचरच्या ऍम्प्लिफायर प्रमाणे काम करतो.

लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा वाढला पारा

अभ्यासकांनी तर 12 वर्षांच्या डेटाचा अभ्यास केला परंतु अहवालात सात वर्षांच्या (2017-2023)माहितीचा वापर केला. म्हणजे लॉकडाऊनच्या तीन वर्षे आधी आणि तीन वर्षांनंतरच्या तापमानाच्या माहितीचा समावेश करण्यात आला. 2020 मध्ये साईट 2 वर सर्वात कमी तापमान 96.2 K इतके होते. तर 2022 मध्ये साईट 1 वर सर्वात कमी 143.8 K तापमानाची नोंद करण्यात आली होती. साधारणपणे 2020 मध्ये बहुतांश ठिकाणी तापमान कमीच राहिले. नंतर पृथ्वीवर लॉकडाऊन जसजसे हटत गेले तसतसे चंद्रावर उष्णता वाढत गेली.

चंद्रावरील तापमान घटण्यात सौर घडामोडीही कारणीभूत ठरू शकल्या असत्या. परंतु अभ्यासकांनी अन्य कारणांचाही अभ्यास केला होता. मात्र यातील कशाचाच प्रभाव चंद्रावरील तापमान कमी होण्यास कारणीभूत ठरला नाही. त्यामुळे फक्त लॉकडाऊनमुळेच चंद्रावरील तापमान कमी झालं असाव या निष्कर्षापर्यंत भारतीय वैज्ञानिक येऊन पोहोचले.

बसच्या धडकेत दुचाकी स्वार तरुणाचा मृत्यू

0

आष्टी – अहमदनगरला कामासाठी गेलेल्या तरुणाचा गावाकडे परत येत असताना बसने दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडल ही घटना बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

संदीप आश्रुबा आंधळे (वय 30 वर्षे, रा. लिंबोडी) असे मृत तरूणाचे नाव आहे.
तालुक्यातील लिंबोडी येथील संदीप आश्रुबा आंधळे याच्याकडे एक टेम्पो असून त्याचा थकीत हप्ता भरण्यासाठी संदीप सोमवारी दुपारी नगर येथे दुचाकीने गेलो होता. तेथील काम आटोपल्यानंतर रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता.रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बीड-नगर महामार्गावर वाघळू येथील वळणावर आला असता समोरून येणा-या कळंब-बोरिवली बसने (क्रमांक एमएच-09 एफएल-0572) संदीपच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यात संदीपचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती प्राप्त होताच अंभोरा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक मुकुंद एकशिंगे, पोलिस अंमलदार शिवदास केदार यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी रवाना करत वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त बस पोलिस ठाण्यात आणण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

भ्रष्टाचाराच्या थोरवीने गाजलेले अशोक थोरात जिल्हा शल्य चिकित्सक!

0

बीड — कोरोना काळातील ऑक्सीजन प्लांट असो की साहित्य खरेदी घोटाळ्याच्या थोरवीने नावाजलेले डॉ. अशोक थोरात पुन्हा बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाले आहेत.

बीडची महती प्रशासनामध्ये अनन्य साधारण आहे. चांगला अधिकारी बीडला येत नाही. पण बीडमध्ये राहिलेला अधिकारी कधी बीड सोडत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक अशोक बडे यांची परभणी येथे बदली झाली आहे. डॉ. अशोक थोरात यांची बीड मधून नाशिकच्या सीएस पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांना सहाय्यक संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कोरोना काळात जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले होते. याबरोबरच गर्भपात प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. डॉ. अशोक थोरात यांच्या भ्रष्टाचाराची थोरवी त्यांच्या गैर हजेरीतही गायली जायची. त्यांच्याकडे आता पुन्हा बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजता त्यांनी पदभार स्वीकारून रुग्णालयाचा कारभार हाकायला सुरुवात केली आहे.

परळीच्या “नाथा” घरची रीत न्यारी;बीडचा शेतकरी मरणादारी!बीडच्या 10 शेतकऱ्यांच्या साडे 19 एकर वरच अतिवृष्टी?

0

बीड — राज्य सरकार “लाडका शेतकरी”अशी घोषणा करून मुक्ताफळ उधळीत असलं तरी बीड जिल्ह्याची त-हा न्यारीच बनली आहे.परळीच्या “नाथा”ने जिल्ह्याचा शेतकरी “अनाथ” असल्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं. त्याचं कंबरड मोडलं. पण हे बीड जिल्ह्यातील फक्त दहा शेतकऱ्यांच्या साडे 19 एकर क्षेत्रावरील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलं.त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी बाधित एक लाख 83 हजार 907 शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार असली तरी बीडच्या बीडच्या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या हातावर धतुऱ्याच दिला जाणार असल्याचं शासनादेशावरून चित्र स्पष्ट झालं आहे.

 

राज्याच राजकारण परळी भोवती केंद्रित असल्याचं जिल्ह्यातील प्रत्येक जण अभिमानाने सांगत असलं. तरी कृषी मंत्री पदासारखं महत्त्वाचं पद असताना शेतकऱ्यांना मात्र फायदा झाल्याचं समाधानाने सांगितलं जात नाही.पंगतीत बसलं तर हक्काचा वाढपी असं गरजेचं असतो.मात्र बीडच्या बाबतीत उलटीच त-हा सध्या पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीने बीडसह राज्यात दाना दान उडवली. कृषिमंत्र्यांनी बीडच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत. आश्वासन दिली. परळीच्या जाहीर कार्यक्रमात मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसमोर बोलताना लाडकी बहीण तसं आता शेतकरीही लाडका असल्याची वल्गना केली. याला फार दिवसही लोटले नसताना बीडच्या शेतकऱ्यांची अतिवृष्टी अनुदानात फसवणूक झाल्याचं व लाडका शेतकरी ही घोषणा नुसता प्रसिद्धीचा फंडा होता हे जाहीर झालं. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जुलै ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे कंबरड मोडलं. आशाळभूत नजरेने शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना आर्त हाक दिली. पण राज्याच्या राजकारणा मश्गुल असल्यामुळे ती आर्त हाक कृषी मंत्र्यांच्या कानावर गेलीच नाही. आता लाडका शेतकरी म्हणणाऱ्या सरकारने अतिवृष्टी अनुदान जाहीर केलं आहे. अतिवृष्टी ग्रस्त राज्यातील एक लाख 83 हजार 907 शेतकऱ्यांना ती मिळणार आहे. 138 कोटी 55 लक्ष 48 हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र बीड जिल्ह्याच्या हातात अक्षरशः वाटाण्याचा अक्षदा दिल्या गेल्या आहेत. बीड जिल्ह्यात फक्त दहा शेतकऱ्यांच्या 7. 8 हेक्टर म्हणजेच साडे 19 एकर क्षेत्रावर अतिवृष्टी झाल्याचं शासन आदेशावरून स्पष्ट होत आहे. याच दहा शेतकऱ्यांना दोन लाख 80 हजार रुपयांचा निधी वाटप करण्यात येणार आहे. बीडच्या शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा या शासन आदेशावरून केल्याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. अशा कृषिमंत्र्यांच्या उदासीनतेमुळे बीड जिल्हा शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत नावा रूपाला का येणार नाही? जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात तरी न्याय दिला जाणार आहे की नाही? शेतकऱ्यांची आर्त हाक कानावर जाणारच की नाही? यासारखे प्रश्न आता जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

चंदन सावरगाव जवळ बस पलटी; 16 जखमी

0

बीड — अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोरया जवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.अहमदपूर-छ‌.संभाजीनगर ही एसटी बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात बसमधील 16 जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. बस चालकाकडून रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.


अहमदपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे ही बस निघाली होती, त्यावेळी, अंबाजोगाई-बीड मार्गावरील चंदन सावरगाव येथे बसचा अपघात झाला. या एसटी मधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. मात्र, दुर्घटनेत त्यातील 16 जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर परळी येथे बंदोबस्त ला जाणारे कर्मचारी विशाल क्षीरसागर, सचिन गर्जे अंमळनेर, बाबासाहेब राख अंमळनेर पोलीस ठाणे, व मदन क्षीरसागर पाटोदा पोलीस ठाणे यांनी मदत केली.

जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. तसेच, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये देखील काही जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या अपघातात एसटीचा चालक ही गंभीर जखमी झाला

देशी गायी ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित

0

मुंबई — राज्यात आणि देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

देशी गायींना यापुढे राज्यमाता- गोमाता म्हणून घोषीत करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. गायींच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या खात्यामधील एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. आपल्याकडे अगदी सुरुवातीपासून गायीला खूप महत्व आहे. केवळ धार्मिकच नव्हे तर वैज्ञानिक आणि आर्थिक महत्व असल्यामुळे गायीला आपण कामधेनु म्हणतो. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देशी गायींच्या जाती आहेत.
देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळाऊ अशा जाती आहेत. यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस ‘राज्यमाता- गोमाता’ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.

बियर बार फोडून चोरट्यांनी पावणे दोन लाखाची दारू पळविली

0

केज — महामार्गावर असलेल्या एका बियर बारचे कुलूप तोडून एक लाख 78 हजार रुपये किमतीची विदेशी दारू लंपास केली असल्याची घटना केज मध्ये घडली आहे.

अधिक माहिती अशी की, केज केज-मांजरसूंबा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-डी वर असलेल्या रेणू पेट्रोल पंपाच्या शेजारी रघुनाथ अभिमान थोरात यांचे रेणू बियर बार व हॉटेल आहे. शनिवारी २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १२ वा. च्या सुमारास हॉटेलचे मॅनेजर गौरव महिंन्द्र दास व ७ ते ८ कामगार हॉटेलची दारे कुलूप लावून हॉटेलच्या स्टाफरुमध्ये झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी हॉटेलच्या दरवाजाचे दोन्ही बाजूची कुलुपे कटरने कापून बियरबारच्या असलेल्या गोदामातील विदेशी मद्याचे १ लाख ७८ हजार ५८० रूपये किमतीचे २७ बॉक्स चोरून नेले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी दोन्ही दरवाजे बाहेरून बंद केले होते. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. रघुनाथ थोरात यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस पुढील तपास करत आहेत.

होम मिनिस्टर कार्यक्रमास बाराव्या दिवशीही महिलांचा प्रचंड उत्साह कायम

0

धांडे गल्लीतील रस्ता महिलांच्या सहभागाने फुलून गेला .

बीड — गेल्या 12 दिवसापासून सुरू असलेल्या होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी २०२४ खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची लोकप्रियतेची महिलांमध्ये क्रेझ निर्माण झाली आहे. पैठणी जिंकण्यापेक्षा चार भिंतीच्या आतील जीवन काही क्षण स्वतःच्या आनंदासाठी, दसऱ्याच्या घर कामाच्या व्यस्ततेतुनही या कार्यक्रमाचा आंनद घेण्यासाठी महिला दिवसेंदिवस या कार्यक्रमास प्रचंड उत्साहाने सहभागी होत आहेत.हिरीरीने सहभागी होत आहेत.
धांडे गल्ली प्रभाग क्रमांक 14 धांडे गल्ली चौक या ठिकाणी आज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या कार्यक्रमाची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे.हजारोच्या संख्येने महिला या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिभा विनोद धांडे, सौ.शकुंतला बद्रीनाथ शिंदे,सौ.यमुना लक्ष्मण सुस्कर,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.स्वाती सदाशिव धांडे,महिला आघाडीच्या अध्यक्ष सौ. जयश्रीताई विधाते,माजी सभापती सौ.उषाताई सरवदे,सौ.प्रेमलताताई चांदणे,सौ.किर्तीताई पांगारकर- साळुंके,सौ. भारतीताई राजेश क्षीरसागर, डॉ सौ.अंजलीताई पांगारकर,सौ.शारदा डुलघज सौ. संजीवनी ताई पौळ सौ. सिंधुताई पौळ,सौ.गीता ताई जयंत वाघ,सौ.डोंगर ताई आदी मान्यवर महिलांची उपस्थितीत पारपडले.होम मिनिस्टर चंपावती सम्राज्ञी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे 18 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या कार्यक्रमाने दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.लोकप्रिय होत आहे.याचे सर्व श्रेय काकू- नाना प्रतिष्ठान आयोजित आणि माजीमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर महिला आघाडी विचारमंच यांच्या सूत्रबद्ध नियोजनातून ही स्पर्धा दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

या कार्यक्रत भाग्यवान मानाच्या पैठणीची विजेती सौ.राजश्री अविनाश पिंगळे द्वितीय इमिटेशन ज्वेलरीच्या मानकरी विजेत्यां वाघोले तर तृतीय विजेत्या चौरंगाच्या मानकरी सौ.अर्चना सुरेश गिराम.या ठरल्या आहेत.तर उर्वरित सात महिलांना गिफ्ट हॅम्पर देण्यात आले.यामध्ये सौ.सुवर्णा नागनाथ धांडे,सौ.स्वाती सतीश गायकवाड,सौ.वर्षा लहू बागलाने,सौ.श्रद्धा धर्मेश पिंगळे,सौ.शोभा विकास मुळे,सौ.सोनाल विकास साळवे,सौ सपना गणेश धर्माधिकारी या मानकरी ठरल्या कार्यक्रमात बक्षिसाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.विजेत्या सर्व महिलांची 7 ऑक्टोबर रोजी बीएच.एम.एस.कॉलेज येथे होणाऱ्या खेळ पैठणीचा महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रांती नाना माळेगावकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे,यासाठी सर्व महिलांची निवड झाली आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदत्त अण्णा क्षीरसागर विचार मंचाचे सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन निवेदक सुरेश साळुंकेंनी केले,या कार्यक्रमास महिलांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

नारायण गडावर होणार मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा!

0

बीड — दसरा मेळाव्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू असून शिवसेनेचा मेळावा व पंकजा मुंडे यांचा मेळावा तर राज ठाकरे यांचा मेळावा याकडे राज्याचे लक्ष लागलेले असते यावर्षीपासून मनोज जरांगे पाटील नारायण गडावर दसरा मेळावा घेऊन रणशिंग फुंकणार आहे. आज या अनुषंगाने नियोजन बैठक नारायण गडावर पार पडली. या बैठकीला मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली होती.

घेण्यात आलेल्या बैठकीत कोणत्या ठिकाणी हा दसरा मेळावा होईल त्या ठिकाणी आलेल्या लोकांची बसण्याची व्यवस्था कशी असेल त्यानंतर पार्किंगची व्यवस्था असेल अशा सगळ्या कामाचे गावानिहाय वाटप या बैठकीमध्ये करण्यात आले आहे. बीडच्या सावरगाव घाट मधील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रसिद्ध आहे. आता नारायणगडावर मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नारायणगडावर मराठा समन्वयकांची बैठक आयोजित करण्यात आलीय. आज दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात होते. या बैठकीतच मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्रात राजकीय घटनांना वेग आलेला असताना मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याची घोषणा केली आहे. विधानसभेच्या निवडणूका अवघ्या महिना दीड महिन्याने होण्याची शक्यता असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत यंदा दसरा मेळाव्याचं आयोजन केल जाणार आहे. हा मेळावा कुठे घ्यायचा? स्वरूप कसे ठेवायचे ? याबाबतचे नियोजन करण्यासाठी आज श्री क्षेत्र नगद नारायणगड येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनातील समन्वयक व मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या बैठकीतच मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची रूपरेषा व ठिकाण ठरवल्याची माहिती आहे. निवडणूकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू होणार आहे.
आठवडाभर उपोषण करुनही सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुढील लढाई निवडणुकीची असेल, असे संकेत मनोज जरांगे यांनी दिले होते. त्यानंतर आता बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याची घोषणा झाल्यानं विधानसभा निवडणूसाठी मनोज जरांगे सज्ज होत असल्याचे स्पष्ट होत आहे