आ.संदीप क्षीरसागरांकडून १६७ गाव आणि वस्त्यांवर हातपंप, बोअरवेलची मागणी
पाणीटंचाईच्या कृती आराखड्यात बीड मतदारसंघातील गाव आणि वस्त्यांचा सामावेश करा
बीड — जानेवारी २०२५ ते जून २०२५ या काळातील पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघात क्षेत्रातील एकूण १६७ गाव आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे तसेच जुने हातपंप दुरूस्त करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जानेवारी ते जून महिन्याचा कालावधी हा उन्हाळ्याचा असतो. या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होते. पाण्याअभावी नागरिक, शेतकरी आणि पशु-पक्षी यांना वणवण करावी लागते. त्यामुळे पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी वेळेअगोदर नियोजन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जानेवारी २०२५ ते जून २०२५ या कालावधीतील होणार्या पाणीटंचाईच्या निवारणासाठी कृती आराखडा तयार करून त्यामध्ये बीड मतदारसंघात क्षेत्रातील गाव आणि वाडी, वस्त्यांवर नवीन हातपंप बसवणे, बोअरवेल घेणे, जुन्या हातपंपाची दुरूस्ती करणे, बंद बोअरवेल सुरू करणे आदी बाबी सामाविष्ट करण्याची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. आ.क्षीरसागर यांनी बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील १६७ गावे, वाडी आणि वस्त्यांची यादीच जिल्हा प्रशासनाकडे पाठविली असून यादीतील नमूद ठिकांणावर पाण्याचे नियोजन करावे असे सांगितले आहे. याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.
“अरेबियन ज्वेलर्स “चा तर हा झोलझाल; सदस्यांना करणार कंगाल?
बीड — राजस्थानी मल्टीस्टेट, ज्ञानराधा, जिजाऊ, साईराम ,शुभ कल्याण यासारख्या पतसंस्थांनी ग्राहकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करत गंडवण्याचं काम केलं. एवढं होऊन देखील “अरेबियन ज्वेलर्स” च्या नावाखाली पुन्हा नव नाट्य घडवलं जात आहे. लकी ड्रॉ च्या नावाखाली जनतेची लाखो रुपयांची लूट करण्याची तयारी केली जात आहे. या संदर्भात प्रा सचिन उबाळे यांनी जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करूनही पोलीस यंत्रणेने याची दखल घेतली नाही. नवीन आलेले पोलीस अधीक्षक नवनीत कांवत तरी या विरोधात कारवाई करतील काय असा प्रश्न विचारला जात आहे.
“अरेबियन ज्वेलर्स” ने बीडमध्ये आकर्षक लकी ड्रॉ ची स्कीम काढत भरघोस बक्षीस देण्यासोबतच गुंतवलेल्या पैशाचं सोनं देण्याचं आमिष दाखवून चांगलाच जम बसवला आहे. पाच हजाराहून अधिक ग्राहक याकडे आकर्षित झाली आहेत. वास्तविक पाहता अरेबियन ज्वेलर्स कडे दर महिन्याला ग्राहकांकडून जमा होणाऱ्या पैशाचा हिशोब लावला तर तेवढ्या किमतीच सोन देखील दुकानात उपलब्ध नाही. हे वास्तव असताना देखील आमिषाला बळी पडून ग्राहक स्वतःच्या हाताने स्वतःचीच फसवणूक करून घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र लालचेची पट्टी डोळ्यावर बांधली गेली की माणूस आपोआप चक्रव्यूहात अडकला जातो अशीच स्थिती अरेबियन ज्वेलर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची झाली आहे. महिन्याकाठी 2500 रुपये जमा करायचे असले तरी दोन दिवसाला तीन दिवसाला दोनशे ,तीनशे रुपये सदस्यांकडून गोळा केले जातात. महिन्याला 2500 रू.च टारगेट पूर्ण केलं जातं. पण हे पैसे घेऊन जाताना कुठलंच रेकॉर्ड गुंतवणूकदाराकडे राहणार नाही याची काळजी बहुतांश वेळेला घेतली जाते. त्यामुळे विवाद झालाच तर हाक ना बोंब अशी स्थिती गुंतवणूकदारांची होणार आहे. अरेबियन ज्वेलर्स ने महिन्याकाठी आयोजित केलेले लकी ड्रॉ देखील शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जातात. चार चाकी, दुचाकी वाहन या लकी ड्रॉ मध्ये काही जणांना लागली. मात्र लकी ड्रॉ हा बीड पुरताच मर्यादित असताना देखील गुजरात मधील महाराज नावाच्या व्यक्तीच नाव ड्रॉमध्ये निघालं. स्विफ्ट डिझायर गाडी या व्यक्तीला मिळाली मग इतर राज्यातील व्यक्तीने बीडमध्ये कशी गुंतवणूक केली हा देखील मोठा प्रश्नच आहे. या ज्वेलर्स कडून महिन्याकाठी या लकी ड्रॉ योजनेसाठी होणाऱ्या खर्चाचा हिशोब जर पाहिला तर सदस्यांना 24 महिने कालावधी झाल्यानंतर ड्रॉ मध्ये ज्यांचं नाव आलं नाही त्यांना 60 हजार रुपये इतक्या झालेल्या गुंतवणुकीचे सोनं द्यायचं आहे. महिन्याकाठी दुचाकी चार चाकी वाहन भाग्यवान विजेत्यांना वाटली जात आहेत. ड्रॉ चा सोहळा देखील भव्य दिव्य असतो माध्यमांना कार्यक्रमाच्या जाहिराती देखील दिल्या जातात. दर दोन-तीन दिवसाला पाच हजाराहून अधिक ग्राहकांकडून 200 /300 रुपयाची रक्कम गोळा करायला लागणारी माणसं याचा विचार केला तर अरेबियन ज्वेलर्स होत असलेला अवाढव्य खर्च कशाच्या जीवावर करत आहे. त्यांना प्रॉफिट काय राहणार? असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत. नवीन आलेल्या पोलीस अधीक्षकांनी तरी किमान जनतेची फसवणूक रोखण्यासाठी अरेबियन ज्वेलर्स चा झोल झाल काय आहे याची तपासणी करावी व योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण! सुदर्शन घुले सुधीर सांगळे, सोनवणे ला 14 दिवसाची सीआयडी कोठडी
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार दोन आरोपींना काल विशेष पथकाने अटक केली. त्यानंतर कल्याण मधून सरपंचाचे अपहरण करण्यासाठी लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला देखील जेरबंद करण्यात आले. तीनही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता 18 जानेवारीपर्यंत 14 दिवसाची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले व सुधीर सांगळे 25 दिवसापासून अधिक कालावधी पोलिसांना गुंगारा देत होते. पोलिसांनी आरोपींना फरार घोषित केले होते. पुण्याजवळ आरोपी जवळचे पैसे संपल्याने पळून जाण्याच्या तयारीत असताना विशेष पथकाने त्यांना जेरबंद केले. दरम्यान कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. सुधीर सांगळे व सुदर्शन घुले यांना पकडण्यात यश मिळवल्यानंतर मसाजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे या आरोपीला देखील पोलिसांनी कल्याण येथून पकडले. सिद्धार्थ सोनवणे याने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यापूर्वी संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना दिले होते. सुधीर सांगळे व सुदर्शन घुले या दोघांना नेकनूर पोलीस ठाण्यात आणून सीआयडीच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी पकडलेल्या तीनही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने 18 जानेवारीपर्यंत 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
अपहरणापूर्वी आरोपींना सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे जेरबंद
बीड — मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यासाठी त्यांचं लोकेशन देणारा मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी काल कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडले होते.या हत्या प्रकरणातील फरार प्रमुख आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांनाही बीडच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.३) रात्री पुण्यातून ताब्यात घेतले आहे. तर या आरोपींना सरपंचाचे अपहरण करण्यापूर्वी लोकेशन देणारा मस्साजोग गावातीलच सिद्धार्थ सोनवणे याला देखील मुंबईतून बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. तर तर पुरवणी जबाब आवरून विष्णू चाटे यांना देखील अटक करण्यात आलेली होती. सध्या या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.
दरम्यान संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे हा गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थ सोनवणे याला लागली होती. घटनेच्या दोन दिवसानंतर तो देखील गावातून फरार झाला.
सिद्धार्थ सोनवणे फरार झाल्यानंतर त्याच्या संदर्भातील गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सिद्धार्थ हा देखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची खात्री स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना पटली. त्यानंतर 15 दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता.
सिद्धार्थ सोनवणे हा फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याच्यावर झडप मारली.
दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय महेश विघ्ने, तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, भागवत शेलार, गणेश मराडे, विक्की सुरवसे यांनी केली.
मोठी अपडेट! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घुले व सांगळे पोलिसांनी पकडले
बीड — सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेल्या तीन आरोपी पैकी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना एस पी च्या विशेष पथकाने पुण्यातून ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे.
खंडणी व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पकडण्यात पोलिसांना 25 दिवस उलटून गेल्यानंतर देखील अपयश येथे असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत होता. परिणामी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी सापडत नसलेल्या आरोपींना फरार घोषित करून माहिती देण्याचे आवाहन जनतेला केले होते. दरम्यान राज्यभरातून आरोपींच्या अटकेची मागणी होत आहे. या प्रकरणातील तीन आरोपी यापूर्वी पोलिसांनी पकडले होते तर वाल्मीक कराड याने सीआयडी समोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर मसाजोग ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले असता आरोपींना दहा दिवसात जेरबंद करण्यात येईल असं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आश्वासन दिलं होतं. दरम्यान या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पोलिसांच्या विशेष पथकाने पुण्याजवळ ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या प्रकरणातील आरोपी पैकी कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
अखेर…! वाल्मीक कराडची पुण्यात सीआयडी समोर शरणागती
पुणे — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत असलेली आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आले आहेत. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन त्यांनी स्वत: आत्मसमर्पण केले.
विशेष म्हणजे या घटनेच्या काही तासांपुर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. या व्हिडिओत त्यांनी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं.त्यानंतर ते सीआयडी कार्यालयात दाखल झाले होते.या संबंधित आत्मसमर्पणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
सीआयडीला शरण जाण्यापुर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपुर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाशाण रोड येथे सरेंडर होत, अशी त्यांनी सूरूवातीला माहिती दिली. त्यानंतर संतोष भैय्या देशमुख यांच्या जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी,अशी कराड यांनी मागणी केली. आणि राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जातं आहे. तरी पोलीस तपासात मी दर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे शेवटी वाल्मिक कराडने सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली.संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.
कराडांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मयुरी बांगर यांचे उपोषण
बीड — मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व अवादा पवन ऊर्जा कंपनी खंडणी प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मीक कराडला अटक करण्यात यावी अशी एकीकडे मागणी होत आहे.दुसरीकडे मात्र वाल्मीक कराडावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी मयुरी विजयसिंह बांगर उपोषणाला बसल्या आहेत
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा दावा केला जात असून त्याच्या अटकेसाठी सीआयडीकडून शोध सुरु आहे. बीड येथे पवनऊर्जा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आता वाल्मिक कराडच्या समर्थनात उपोषण करण्यात येत आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मयुरी विजयसिंह बांगर या उपोषण करत आहेत.
वाल्मिक कराडवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा दावा मयुरी विजयसिंह बांगर यांनी केला आहे. “राजकीय द्वेषातून हे आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावर जी चिखलफेक करण्यात येत आहे ती थांबवली पाहिजे. वाल्मिक कराड यांच्यावर असलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. आरोप खरे असतील तर त्यावर कारवाई केली जाईल. तुमच्याकडे काही पुरावा आहे का? तुम्ही पुराव्याशिवाय अण्णांवर चिखलफेक कशी करु शकता त्यांचा हा खरा चेहरा नाही. त्यांनी खूप समाजकार्य केले असून अनेक भगिनींचे कल्याण केले आहे. माझ्या सारखे अनेकजण त्यांच्यासाठी आवाज उठवू पाहत आहेत,” असं उपोषणकर्त्या मयुरी विजयसिंह बांगर यांनी म्हटलं आहे.
आमदारांना अंगरक्षक नाही मात्र 26 गुन्हे असलेल्या वाल्मीक कराडला दोन पोलीस अंगरक्षक?
बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरण 9 डिसेंबरला घडल्यानंतर वाल्मीक कराड फरार असून शेवटचं लोकेशन उज्जैन पोहचला होता. त्याने उज्जैनच्या महाकाल मंदिराबाहेर काढलेला फोटोही त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचे अंगरक्षक असलेले पोलीस कर्मचारीही त्याच्यासोबत होते. दरम्यान वाल्मीक कराड वर तब्बल 26 गुन्हे नोंद असूनही पोलीस अंगरक्षक असल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
संतोष देशमुख हत्येनंतर व खंडणी प्रकरणाचे सीआयडी या धागेदोरे खंगाळत आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडवर तब्बल 26 गुन्ह्यांची नोंद असूनही पोलिस संरक्षणात असल्याने भूवया उंचावल्या आहेत. तसेच, कराडला दोन पोलिस अंगरक्षक देखील आहेत. बीड पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेला अहवालामध्ये ही माहिती नमूद आहे. बीड जिल्ह्यामध्ये विद्यमान आमदारांपैकी सुरेश धस, विजयसिंह पंडित, नमीता मुंदडा यांना अद्याप अंगरक्षक नाहीत.तर अमरसिंह पंडित, भीमराव धोंडे, प्रकाश सोळंके, पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, राम खाडे, बजरंग सोनवणे, मयत सरपंच यांचे भाऊ धनंजय देशमुख, संदीप क्षीरसागर यांना एक पोलिस अंगरक्षक आहे. धनंजय मुंडे, सुभाष राऊत यांना प्रत्येकी दोन अंगरक्षक आहेत.दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे वाल्मिक कराड लवकरच पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी दोन दिवसात गजाआड — सीआयडी अधिकाऱ्यांनी दिला विश्वास?
बीड — सध्या राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वीस दिवस उलटून गेले असले तरी पकडण्यात यश आले नाही. मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता दोन दिवसात फरार आरोपी गजाआड करण्यात येतील असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सीआयडी या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे मिळवण्यासाठी सीआयडीची पथक बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अनेक महत्त्वाचे पुरावे देखील सीआयडीच्या हाती सापडले आहेत. दरम्यान मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी कार्यालयात जाऊन तपास कुठपर्यंत आला आहे या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न केला. उद्या सीआयडी चे अधिकारी केज मध्ये जाऊन धनंजय देशमुख यांना तपासाची माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीदरम्यानच या गुन्ह्यातील फरार आरोपींना दोन दिवसात पकडून गजाआड केले जाईल असा विश्वास सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आला असल्याची माहिती देखील मिळत आहे. धनंजय देशमुख यांनी सीआयडी करत असलेल्या तपासावर आपला विश्वास असल्याचं मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. याच प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच खासदार बजरंग सोनवणे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली.









