Home Blog Page 106

परळी तालुक्यातील कौडगाव हुडा येथील नदीत चार चाकी गाडी गेली वाहून

0

धनंजय मुंडे यांनी रात्रीतून हलवली यंत्रणा

गाडीतील चार पैकी तिघांना वाचवण्यात बचाव पथकांना यश

परळी — तालुक्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी सदृश परिस्थिती असून परिणामी गावागावांतील नद्यांना पूर आला आहे. याचा फटका कौडगाव हुडा येथील तरुणांना बसला असून कौडगाव हुडा येथील तरुणांची चार चाकी कार गाव नदीच्या पुरत रात्री उशिरा वाहून गेली. या गाडीतील चौघांपैकी तीन जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आले असून एक तरुण मयत झाला असून त्याचे पार्थिव सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

रविवारी मध्यरात्री कौडगाव – कासारवाडी रस्त्यावर मारुती बलिनो गाडी पुरात वाहून गेली. ही घटना रविवारी रात्री ११:३० ते १२ च्या दरम्यान घडली असून या घटनेची माहिती स्थानिकांनी तत्काळ या भागाचे आमदार धनंजय मुंडे यांना कळवली आता श्री मुंडे यांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणांना सज्ज करून बचाव कार्याला वेग आणला. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनी गोरक्षनाथ दहिफळे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जगमीत्र कार्यालयाचे समन्वयक बाबुराव रुपनर हे बचाव पथकांना घेऊन मध्यरात्री घटना स्थळी दाखल झाले होते. पाण्याचा प्रवाह अत्यंत जास्त असल्याने बचाव कार्याला अडथळे येत होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मार्फत बीडचे जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री अजित दादा पवार यांच्या कार्यालयास संपर्क करून एन डी आर एफ च्या पथकास पाचारण करण्यात आले. हे पथकही तातडीने रवाना झाले.

दरम्यान या घटनेत वाहून गेलेल्या अमर मधुकर पौळ (वय २२) रा. डिग्रस, राहुल संपती पौळ (वय ३२), राहुल सटवाजी नवले (वय २२) रा. फुलारवाडी ता. पाथ्री या तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले असून विशाल बल्लाळ (वय २४) रा. बोरी सावरगाव ता. केज हा तरुण मयत झाला असून त्याचा मृतदेह सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

पहाटे युवक नेते अजय मुंडे हे घटनास्थळी दाखल झाले होते, त्यांनी ग्रामस्थांशी व प्रशासकीय यंत्रणांशी चर्चा केली. धनंजय मुंडे हेही दूरध्वनीवरून रात्रभर यंत्रणांच्या संपर्कात होते, तसेच त्यांचे सहकारी राजाभाऊ पौळ, सुभाष नाटकर, तसेच धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाची टीम घटनास्थळी मदत कार्यात उपस्थिती होती.

प्रशासन अलर्टवर, नागरिकांनी सतर्क रहावे – धनंजय मुंडे

दरम्यान परळी वैद्यनाथ मतदारसंघांत परळी शहरासह विविध गावातील अनेक नद्यांना पूर आले असून प्रशासन २४ तास अलर्ट मोडवर आहे. नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे, नदी काठी राहणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी तसेच कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जावे, कुठल्याही पुलावरून पानी वाहत असल्यास त्यातून वाहने घालू नयेत, तसेच आपत्ती काळात माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दोन वर्षांच्या चिमुकलीला संपवून आईची आत्महत्या

0

गेवराई — 25 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला फाशी देऊन स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मालेगाव मध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास घडली
सोमवारी 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास अंकिता बळीराम घवाडे वय 25 वर्ष या विवाहितेने घरातील माळवदाच्या हलकडीला दोरीच्या साहाय्याने आपल्या मुलगी शिवप्रीती बळीराम घवाडे व दोन वर्ष हिला फाशी दिली आणि तिचा जीव घेतला. त्यानंतर तिने स्वतःही त्याच ठिकाणी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेत ते बीड येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. सध्या पोलिस शवविच्छेदन अहवालाची वाट बघत आहेत. अद्याप या प्रकारामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
घरगुती कलह, आर्थिक समस्या किंवा मानसिक ताणतणावामुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. तथापि, याबाबतचे खरे कारण पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.आईने आपल्या दोन वर्षांच्या लेकीचा जीव घेऊन स्वतःचेही जीवन संपवल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. या आईने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत मात्र सध्या काहीही माहिती नाही.

मनोहरराव कुलकर्णी (पेंटर)यांना पत्नी शोक

0

चौसाळा — मनोहरराव कुलकर्णी (पेंटर) हिंगणीकर यांच्या पत्नी सौ.सिंधुबाई कुलकर्णी यांचं पहाटेच्या सुमारास सोमवारी निधन झालं. मृत्यू समयी त्या 85 वर्षाच्या होत्या.
सौ.सिंधुबाई कुलकर्णी यांचा आयुष्याचा बराचसा काळ बीडमध्ये गेला. मनमिळावू, आपुलकीची भावना ठेवणारा स्वभाव यामुळे चौसाळा पंचक्रोशीत त्या परिचित होत्या. बीड शहरात “मनोहर आर्ट्स” नावाने प्रसिद्ध असलेल्या मनोहर पेंटर कुलकर्णी यांच्या त्या पत्नी होत्या. चौसाळा येथील स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी चौसाळा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा,सून ,दोन मुली, जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; नातेवाईकांचा आगारात ठिय्या

0

गेवराई — वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सहा महिन्यापूर्वीच हा कर्मचारी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागला होता. दरम्यान संतप्त नातेवाईकांनी आगार प्रमुखाच्या कार्यालयासमोर मृतदेह नातेवाईकांनी आणून ठेवत ठिय्या दिला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
प्रितेश जयराम मोहीते वय 32 वर्ष रा. मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड असे आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचा-याचे नाव आहे.
सहा महिन्यांपूर्वीच अनुकंपा तत्वावर एसटी महामंडळात प्रितेश मोहीते नोकरीला लागले होते. मात्र, नोकरी करत असताना कर्मचाऱ्यास गेवराईच्या आगारातील वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
सतत होत असलेल्या त्रासाला कंटाळून अखेर एसटी कर्मचारी प्रितेश मोहीते यांनी राहत्या घरी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर एसटी कर्मचारी यांचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी थेट गेवराई आगार प्रमुख यांच्या कार्यालयासमोर ठेवून ठिय्या मांडला. दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
या घटनेची माहीती मिळताच गेवराईचे एपीआय प्रविणकुमार बांगर, एपीआय दिपक लंके, संतोष जंजाळ आगारात दाखल होऊन योग्य तो पोलिस तपास करुन दोषी आढळल्यास गून्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले.तेव्हा नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी नेला. दरम्यान, प्रितेश मोहीते हे नेहमी प्रमाणे आज मंगळवार एसटी आगारात हजेरी लावली होती. त्यानंतर ते गावी मादळमोहीला गेले अन् सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.

आधार कार्ड, पॅन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही — उच्च न्यायालय

0

मुंबई — आपल्याकडे आधार कार्ड आहे शिवाय निवडणूक ओळखपत्र आणि पॅन कार्डदेखील आहे. हे तीन कागदपत्रे महत्त्वाची असली तरी त्यातून तुम्ही देशाचे नागरिक आहात, हे सिद्ध होत नाही. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र असले तरी कुणी भारतीय नागरिक होत नाही, असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी एका बांगलादेशी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला आहे.
एवढेच नाही तर आरोपीने सादर केलेल्या सर्व ओळखपत्रांची सरकारी संस्थेकडून फेरतपासणी करण्याचे आदेशही एक सदस्यीय खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी वरील तीन ओळखपत्र पुरेशी नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

ठाणे पोलिसांनी गेल्यावर्षी एकाला बांगलादेशी असल्याच्या कारणावरून अटक केली होती. या आरोपीने खोट्या माहितीच्या आधारे ठाण्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, प्राप्तिकर कागदपत्रे तसेच गॅस आणि विजेची जोडणी मिळवली होती. त्याला सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अपील केले होते. तेही फेटाळण्यात आले आहे.

भारतीय नागरिक नक्की कोण हे ठरवण्यासाठी संसदेने नागरिकत्व कायदा, 1955 तयार करून अंमलात आणला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारेच कोणीही भारतीय नागरिक आहे की नाही, हे सिद्ध करता येऊ शकते. नागरिकत्वासंदर्भात कोणताही वाद असेल, तर याच कायद्यातील तरतुदींचा विचार करावा लागतो. याच कायद्यामध्ये अधिकृत नागरिक आणि बेकायदा स्थलांतरित यांच्यामध्ये नेमकेपणाने फरक करण्यात आला आहे. ज्या व्यक्ती बेकायदापणे भारतात स्थलांतरित झाल्या आहेत, त्यांना कायदेशीर पद्धतीने भारताचे नागरिकत्व घेण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे. जे कायद्याने भारतीय नागरिक आहेत, त्यांनाच या देशाच्या राज्यघटनेने दिलेले अधिकार मिळाले पाहिजेत. बेकायदा स्थलांतरितांना त्यापासून दूरच ठेवले पाहिजे, यासाठी या कायद्यात तरतुदी आहेत, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या नागरिकत्वाचा विषय न्यायालयापुढे येतो त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या विविध ओळखपत्रांवरून तो भारताचा नागरिक आहे, हे सिद्ध करता येणार नाही. नागरिकत्व कायदा 1955 मधील कलम 3 आणि 6 मधील तरतुदींनुसार तो भारतीय आहे की नाही, हे सिद्ध करावे लागेल.
परकीय नागरिक कायदा, 1946 मधील कलम 9 च्या आधारे जर कोणत्याही नागरिकाबद्दल तो भारतीय नसल्याचे पुरावे तपास अधिकाऱ्यांनी सादर केले तर संबंधित प्रकरणामध्ये आपण भारतीयच आहोत, हे न्यायालयापुढे सिद्ध कऱण्याची जबाबदारी त्याच व्यक्तीवर पडते. तसे न्यायालयापुढे सिद्ध करणे, हे त्या व्यक्तीचे काम आहे. जर तो तसे सिद्ध करू शकला नाही, तर तपास अधिकाऱ्यांनी ठेवलेला आरोप न्यायालय ग्राह्य धरू शकते, असेही मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुलांनो लागा तयारीला !पोलीस दलात 15 हजार पदांची मेगाभरती, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

0

मुंबई — महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी मिळणार आहे.आज मंगळवारी दि.12 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे.
यामध्ये पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा विविध पदांचा समावेश आहे. ही भरती केवळ राज्याची कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठीच नव्हे, तर अनेक तरुणांच्या स्वप्नांना पंख देणारी आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा असणार!

या भरती प्रक्रियेमध्ये एकूण पाच प्रकारची पदे भरली जाणार आहेत. पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे:

पोलीस शिपाई: १०,९०८ पदे
सशस्त्र पोलीस शिपाई: २,३९३ पदे
कारागृह शिपाई: ५५४ पदे
पोलीस शिपाई (चालक): २३४ पदे
बॅण्ड्स मॅन: २५ पदे
ही पदे २०२४ आणि २०२५ या वर्षांमध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन भरली जात आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेचे स्वरूप नेमके कसे असेल?

ही भरती प्रक्रिया जिल्हा स्तरावर राबविण्यात येते. यासाठी उमेदवारांना खालील टप्प्यांतून जावे लागणार आहे.

अर्ज आणि छाननी :

सर्वप्रथम, उमेदवारांना अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. यानंतर, अर्जांची छाननी केली जाईल.

शारीरिक चाचणी:

पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी (Physical Test) घेतली जाईल. यामध्ये धावणे, लांब उडी, गोळाफेक इत्यादी चाचण्यांचा समावेश असतो. या टप्प्यात पात्र ठरणारे उमेदवारच पुढील टप्प्यासाठी निवडले जातात.

लेखी परीक्षा:

शारीरिक चाचणीत यशस्वी झालेल्या उमेदवारांची OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा गट क संवर्गातील पदांसाठी असते. यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण या विषयांवरील प्रश्न विचारले जातात.

अंतिम निवड:

लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीतील गुणांच्या आधारे उमेदवारांची अंतिम निवड यादी तयार केली जाते.

वयोमर्यादेत सूट

या भरतीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, ज्या उमेदवारांनी सन २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडली आहे, त्यांनाही या भरतीमध्ये अर्ज करण्याची एक विशेष संधी दिली गेली आहे. त्यामुळे, असे उमेदवारही या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

तयारी कशी करावी?

इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच दोन्ही टप्प्यांची तयारी सुरू करणे महत्त्वाचे आहे.
शारीरिक तयारी: दररोज नियमितपणे धावण्याचा सराव करा, पुश-अप्स, पुल-अप्स आणि इतर शारीरिक व्यायाम करून आपली तंदुरुस्ती वाढवा.
लेखी परीक्षेची तयारी: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा. सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरणावर लक्ष केंद्रित करा. वेळ व्यवस्थापनाचा सराव करण्यासाठी नियमितपणे मॉक टेस्ट सोडवा.
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याने आता लवकरच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, पोलिस विभागात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असणार आहे. त्याचा फायदा तर त्यांना घ्यावाच लागणार आणि जोरदार तयारी करावी लागणार एवढं मात्र सत्य आहे.

महालक्ष्मी कला केंद्र पॉक्सो प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष

0

सबळ पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय; २७ आरोपींवरचा गुन्हा सरकार पक्षाला सिद्ध करता आला नाही

केज — बीड जिल्ह्यात 2023 मध्ये गाजलेल्या महालक्ष्मी कला केंद्र, उमरी (ता. केज) येथील पोक्सो गुन्ह्यातील सर्व 27 आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालय, केज येथे विशेष पोक्सो प्रकरण क्र. 177/2023 सरकार विरुद्ध सत्वशीला या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती एस. बी. भाजीपाले यांनी 11 ऑगस्ट 2025 रोजी सुनावला.

7 जुलै 2023 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास, शासनाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा उशिरा महालक्ष्मी कला केंद्र सुरु असल्याची माहिती मिळाली. तपासात असे उघड झाले की, कला केंद्रातील व्यवस्थापक लहू रामहारी अंधारे, नृत्य करणाऱ्या महिला, ग्राहक आणि इतर काही जण मिळून उपस्थित होते. त्यावेळी कला केंद्रात चार अल्पवयीन मुलींना नृत्यासाठी बोलावून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आले, तसेच एका अल्पवयीन मुलीवर अनोळखी व्यक्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप होता. तसेच, चालक सत्वशीला बाबासाहेब आंधारे व रत्नाकर शिंदे यांनी आर्थिक फायद्यासाठी अल्पवयीन मुलींचा वेश्याव्यवसायासाठी वापर केल्याचा आरोप करण्यात आला. पीडिता दलित समाजातील असल्याने, माहीत असूनही तिच्यावर दबाव आणून आणि पैशाचे आमिष दाखवून शोषण केल्याचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात भा.दं.वि., पोक्सो कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 आणि अ.जा.जा.अ. प्र.का. यांसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. तपास पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी करून सर्व 27 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान फिर्यादी पक्षाकडून एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, सरकार पक्षाला आरोप सिद्ध करण्यात अपयश आले. आरोपींच्या वकिलांच्या बचावामुळे न्यायालयाने सर्व आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील लहू अंधारे, शीतल अंधारे, संगीता काळे आणि संतोष बडगे हे चार आरोपी निकालापर्यंत कारागृहात होते, तर उर्वरित आरोपी जामिनावर होते. आरोपींच्या बाजूने ॲड. अजित लोमटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. संस्कार शिनगारे, ॲड. चंद्रकांत जाधव, ॲड. ओमप्रकाश धोत्रे आणि ॲड. अभिजित सोळंके यांनी सहकार्य केले. या प्रकरणाकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

गेवराई : माजी पंचायत समिती सभापतीच्या पतीचा ग्रामसेविकेवर बलात्कार

0

छत्रपती संभाजी नगर — गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतीचा पती दीपक सुरवसे याने महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढण्याची धमकी देत तिच्यावर रेल्वेस्टेशन भागातील हॉटेलसह, नाशिक, नगर येथे नेऊन वारंवार अत्याचार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे.
अत्याचार पीडित ग्रामसेवक महिलेचे फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीपासून घटस्फोट घ्यायला लावला. शहरात राहण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यासह मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन गारखेडा भागातील घरासमोर गोंधळ घातला. हा प्रकार १४ सप्टेंबर २०२२ ते २ जुलै २०२५ या काळात घडला. १ ऑगस्ट रोजी बीड येथे गुन्हा दाखल होऊन वेदांत नगर ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. ३५ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, ती सहा वर्षांपूर्वी गेवराई पंचायत समितीमध्ये नोकरीला लागली. तेव्हा पंचायत समितीच्या सभापती म्हणून दीपक सुरवसेची पत्नी कार्यरत होती. मात्र, दीपक हाच पंचायत समितीच्या कार्यालयात बसून कामकाज पहायचा. कर्मचाऱ्यांना तो सूचना देत असल्याने तेव्हा पीडितेची त्याच्याशी ओळख झाली.

सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसेने पीडितेला फोन करून रेल्वेस्टेशन भागातील हॉटेल विट्स येथे बोलावले. कामाचे बोलणार असेल या समजुतीतून पीडिता गेली. तेव्हा सुरवसेने तिच्यावर जबरदस्ती केली. विरोध करताच नोकरी गमवावी लागले अशी धमकी दिली. पीडितेने आरडाओरड केली मात्र, तिचा आवाज बाहेर गेला नाही. सुरवसेने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर सुरवसेने फोटोसुद्धा काढले असून कोणाला काही सांगितले तर नोकरी घालविल आणि तुझ्या घरी सांगेल अशी असे धमकावले. अधिक तपास महिला उपनिरीक्षक संगीता गिरी करत आहेत.
नाशिक, नगरच्या रिसॉर्टमध्ये नेऊन अत्याचार

सुरवसेने पीडितेला ब्लॅकमेल करून नाशिकच्या केव्हज कंट्री, इगतपुरीचे मानस रिसॉर्ट, दौलताबाद भागातील हिरण्य रिसॉर्ट, अहिल्यानगर येथील ओरोस हॉटेलमध्ये नेऊन वारंवार बलात्कार केला. तो तिला सातत्याने बाहेरगावी नेऊन अत्याचार करू लागला. लग्राचे आमिष दाखवू लागला. तसेच तिचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन देत होता.

पीडितेच्या पतीला मारण्याचा कट रचला

सुरवसेने पीडितेच्या पतीला मारण्याचा कट रचला. असाच धाक दाखवून त्याने मे २०२५ मध्ये पीडितेला पतीपासून घटस्फोट घेण्यास भाग पाडले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे गारखेडा भागात राहण्यास आलेल्या पीडितेच्या घरी येऊन सतत अत्याचार करू लागला. २ जुलै रोजी कारमधून (एमएच-२३-एयु ५००१) घरासमोर येऊन गोंधळ घातला. तुझे व्हिडिओ तुझ्या मुलांना दाखवतो अशी धमकी दिली. हा फक्त ट्रेलर आहे, जास्त शहाणपणा केलास तर इज्जत उतरविल अशी धमकी दिली.

देशातील 300 खासदार एकवटले, निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा

0

नवी दिल्ली — ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला.यामध्ये काँग्रेस, सपा, आप, द्रमुक यासह अनेक पक्षांनी यात भाग घेतला आहे. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग असून निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले.

सध्या देशात मत चोरीच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन मतदार यादीतील अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केले होते. ‘एसआयआर’ आणि ‘मतचोरीच्या’ आरोपांवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढला आहे. इंडिया आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्यामध्ये विरोधी पक्षाचे 300 हून अधिक खासदार सहभागी झाले असून संसदेच्या मकरद्वार ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला असून काही खासदारांना ताब्यात घेण्यात आलं.यावेळी आंदोलन करताना तृणमूल काँग्रेसच्या एका खासदाराची प्रकृती बिघडली.
मात्र दिल्ली पोलिसांनी खासदारांच्या निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात आहेत. बॅरिकेड्स उभारून मोर्चा थांबवण्यात आला. इंडिया आघाडीच्या या मोर्चादरम्यान राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांचाही सहभाग होता.निवडणूक आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि फलकही लावण्यात आले आहेत. संसदेपासून काही अंतरावरच हा मोर्चा अडवण्यात आला असून शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक खासदार तिथेच ठिय्या देऊन बसले
तत्पूर्वी, आज निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या 30 सदस्यीय शिष्ट मंडळाला बैठकीसाठी बोलावले. निवडणूक आयोगाने दुपारी 12 वाजता 30 जणांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी 12:00 वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेच्या कमतरतेमुळे, कृपया जास्तीत जास्त 30व्यक्तींची नावे द्या असे सांगण्यात आलं.
मात्र गेलो तर आम्ही सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नाही तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता, असं विरोधकांचं म्हणण आहे.

मतदार यादीवरून वाद सुरूच

मतदार यादीतील अनियमिततेवरून, घोटाळ्यावरून लढाई सुरूच आहे. राहुल गांधींसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी कालपासूनच याबाबत मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील लाँच केली. तसेच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केलं.

अनेक खासदार बॅरिकेड्सवर चढले आणि ते ओलांडून उड्या मारल्या, त्यात अखिलेश यादव यांचाही समावेश होता. तर टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोईत्रा याही बॅरिकेड्सवर चढल्या. त्यानंतर अखिलेश यादवर हे ठिय्या देऊन बसले. तर निवडणूक आयोगाकडे फक्त 30 खासदार नाही तर आम्ही सर्व जाणार असं जयराम रमेश यांनी सांगितलं. पोलिसांनी जाऊ दिल तर आम्ही निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊ, पण ते आम्हाला जाऊच देत नाहीयेत असं अखिलेश यादव म्हणाले.

गोसावींच्या वरदहस्ताने नेकनूर बनतेय गोमांस तस्करीचा अड्डा

0

बीड — जनावरांची मोठी बाजारपेठ असलेल्या नेकनूर मध्ये गोवंशाची हत्या करून गोमांसाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या घटना समोर आल्याने खळबळ माजली आहे. गोवंश हत्या विधेयकाची गळचेपी ठाणे प्रमुखाच्या वरदहस्ताने होत असल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील गावामधून जुगारासह बनावट व अवैध दारूचा पूर वाहू लागला आहे. शेतीमालावर दरोडे टाकणाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. माध्यमामधून तसेच जनतेकडून पोलीस अधीक्षकांपर्यंत याची तक्रार केली जात असली तरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचाच परिणाम म्हणून ठाणे प्रमुख गोसावींना वरिष्ठांचा धाक वाटेना असा झाला आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत जरी प्रामाणिक अधिकारी असले तरी त्यांचा वचक कर्मचाऱ्यावर राहिलेला नसल्याने गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अवैध धंद्यामधून मिळत असलेल्या कमाईचा लाभ वरिष्ठांपर्यंत पोहोचत असल्याने गोसावींना अभयदान मिळत असल्याची चर्चा जनतेत होऊ लागली आहे. पत्यांचे क्लब ,मटका, हातभट्टी, दारू, केमिकल युक्त ताडी यासारखे अवैध धंद्यांमधून मिळणारी कमाई कमी आहे म्हणून की काय पण गोवंश हत्येकडे देखील दुर्लक्ष केले जात आहे. याचाच परिणाम म्हणून नेकनूर गोमांस विक्रीच केंद्र बनलं आहे. गोवंश हत्या बंदी विधेयकाचे तीन तेरा वाजवले जात आहेत. या ठिकाणावरून बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस तस्करी ऑर्डर प्रमाणे केली जात आहे. बीडच्या पेठ बीड पोलीस ठाण्यात 27 जुलै 2025 रोजी गोमांस विक्री करणाऱ्या दोघांना बार्शी नाका भागात पकडल्याची घटनेची नोंद करण्यात आली होती. अरबाज जलाल खान पठाण वय वर्ष 26, दर्गा कॉलनी नेकनुर याला पकडले देखील.यावेळी पोलिसांनी गोमांस सुद्धा जप्त केले होते. असं असतानाही पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रमुख मूदीराज यांना प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता वाटली नाही. थोडाफार पैसा घेऊन तात्काळ जामीनही देण्यात आल्याने त्यांच्या देखील प्रामाणिकतेवर जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राज्यभरात कुरेशी समाजाने बहिष्कार टाकल्याने जनावरांचा बाजार ठप्प झालेला असला तरी गोवंशाच्या हत्या करणाऱ्यांना मात्र सुगीचे दिवस आल्याच पाहायला मिळत आहे. अशा घटना उघडकीस येऊनही नेकनूर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने जनतेतून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून गोवंश हत्या करणारा विरोधात कारवाई करावी. तसेच त्यांना आश्रय देणाऱ्या ठाणे प्रमुखावर देखील कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.