वडवणी — वडवणी तालुक्यातील चिंचवण येथे घरगुती वादातून एका मुलानेच आपल्या ७० वर्षीय वडिलांचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या वृद्ध वडिलांवर मुलाने विटेने हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे चिंचवण गावासह परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
मृताचे नातू शुभम फुलचंद कोठुळे (वय २०, रा. चिंचवण) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्याविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
वाद मिटविण्यासाठी गेले अन् जीव गमावला
पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि. २७) सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास कोठुळे कुटुंबात घरगुती कारणावरून वाद सुरू होता. यावेळी कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीकिसन भागोजी कोठुळे (वय ७०) यांनी वाद शांत करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, याच कारणावरून संतप्त झालेल्या फुलचंद कोठुळे याने “तुम्ही आमच्या भांडणात सारखे का पडता?” असे म्हणत अंगणातील वीट उचलली आणि वडिलांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जोरदार वार केले.
या हल्ल्यात श्रीकिसन कोठुळे गंभीर जखमी झाले. डोक्याला व चेहऱ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
नातवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
घटनेनंतर मंगळवारी (दि. २८) शुभम कोठुळे यांनी वडवणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी फुलचंद श्रीकिसन कोठुळे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ११५(२) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडवणी पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, कौटुंबिक वादाचे नेमके कारण, घटनेमागील पार्श्वभूमी आणि इतर पुराव्यांचा तपास केला जात आहे.




