राम मंदिरातील चोरीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘रामरक्षा’ आंदोलनाला सुरुवात

मुंबई — अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यव्यापी ‘रामरक्षा’ आंदोलनाला मुंबईतून प्रारंभ झाला आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रामरक्षा महाआरती आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत तसेच पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाआरतीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातील कथित चोरीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिर उभारणीसाठी अनेक कारसेवकांनी बलिदान दिले असून, मंदिरासाठी भाविकांनी दिलेल्या देणग्यांचा हिशेब जनतेसमोर यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, “आम्ही श्रद्धाळू हिंदू आहोत, पण कुणी मंदिर लुटत असेल तर ते कदापि सहन करणार नाही. राम मंदिराला दिलेलं दान कुठे गेलं? शिवसेनेने दिलेली चांदीची वीट कुठे आहे?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, चोरीप्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शांत बसणार नाही. राज्यभर सुरू करण्यात आलेले ‘रामरक्षा आंदोलन’ हे जनतेच्या भावनांशी जोडलेले आंदोलन असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, मुसळधार पावसातही मुंबईतील या आंदोलनाला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलनाला प्रतिसाद दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles